योगसाधनेचे महत्त्व मराठी निबंध | YOGSADHNECHE MAHATVA MARATHI NIBANDH

योगसाधनेचे महत्त्व मराठी निबंध | YOGSADHNECHE MAHATVA MARATHI NIBANDH

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण योगसाधनेचे महत्त्व मराठी निबंध बघणार आहोत.  मनुष्य ही निसर्गाची सर्वश्रेष्ठ कृती आहे. मनुष्याचे शरीर योगाद्वारे विकसित होऊ शकते. मनुष्य ईश्वराचा श्रेष्ठ पुत्र आहे व त्याच्यामध्ये ईश्वराच्या सर्व तेजोमय शक्ती बीजरूपाने वास करतात. 


सामान्यपणे त्याच शक्ती कामी येतात. दैनंदिन जीवनात आपण त्याचाच उपयोग करतो. योगाद्वारे या शक्तीना जागृत करून मनुष्य ईश्वरासारखा शक्तिशाली व आनंदरूप बनू शकतो. प्राचीन काळापासूनच योगसाधनेद्वारे अद्भुत शारीरिक क्षमता उत्पन्न केली जात आहे. 


महाभारतातील भीम, दुर्योधन, घटोत्कच इत्यादी चे सदृढ़ शरीर आणि वज्रासारखी काया असल्याची वर्णने आहेत. वास्तविक शक्ती नैसर्गिक असते. ती तरुण, वृद्ध काहीच नसते. बालपण, तरुणपण, म्हातारपण या अवस्था जीवनात येतात. त्यात तारुण्यावस्था वैशिष्ट्यपूर्ण असते. या अवस्थेत शरीराच्या कणाकणांत उत्साह आणि शक्ती असते. प्रत्येकालाच आपण नेहमीच तरुण राहावे असे वाटते. परंतु असे होत नाही. 


योगाद्वारे मनुष्य आपले शरीर तरुण ठेवू शकतो. मन आणि शरीराचा घनिष्ठ संबंध असतो. ज्या व्यक्तीचे मन स्वस्थ असते त्याला शारीरिक कष्टाचे काहीच वाटत नाही. मानसिक ताण असेल तर थकवा वाटतो. चिड़चिड़ वाढते, जेव्हा मनुष्य जीवनातील प्रश्न सोडवू शकत नाही, तडजोड कशी करावी कळत नाही. 


मनात अनेक विचार येतात यालाच मानसिक ताण म्हणतात. पिट्युटरी व एड्रिनल ग्रंथीचा ताण वाढतो, नाड्या उत्तेजित होतात. मनांत द्वंद्व निर्माण होते. कोणत्याही कामाचा उत्साह वाटत नाही. विचार करणे कठीण वाटते आणि मग शरीर अनेक रोगांनी ग्रस्त होते. 


ज्यात हृदयरोग, उच्च रक्तदाब, संधिवात, डोकेदुखी, कंबरदु:खी, ढेकरा येणे, महिलांना होणारा जास्त रक्तस्राव, किडनीचे विकार, पोटाचे विकार, रक्तवाहिन्यांचे विकार इ. मुख्य आहेत. हे रोग फार वाढल्यास लवकर मृत्यू येतो.


योगात मानसिक ताण दूर करण्याचे सोपे उपाय आहेत. उदा. शवासन, प्राणायाम, योगनिद्रा, दीर्घ श्वासोच्छवास इ. योगनिद्रा, शवासन-ध्यानाद्वारे आपले अंगप्रत्यांग शिथिल होते. मनाच्या क्रियेकडे फक्त पाहत राहिल्यास मन विचलित करणारे विचार आपोआप लोप पावतात. व पूर्ण सुखाची अनुभूती येते.


योगामुळे चिंता नष्ट होतात. सात्त्विक भोजन प्रसन्न मनाने केल्यास मनुष्य निरोगी व प्रसन्न राहतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या गरजा मर्यादित करून आहे त्यात समाधान मानणे ही आनंदमय स्थिती योगाद्वारेच प्राप्त होऊ शकते. सुखी जीवनासाठी रोज १०-१५ मिनीटे योगासनासाठी दिलीच पाहिजेत. 


योग एक सुखद व शांत जीवन जगण्याची कला आहे. ज्याचा सतत अभ्यास केल्यास शरीर निरोगी व मन शांत राहते. बुद्धी तीक्ष्ण होते. योगामुळेच आपल्यात विनम्रपणा, उदारपणा मानवतेसारखे मानवी सद्गुण उत्पन्न होतात. चांगल्या चारित्र्याच्या निर्मितीस ते सहायक ठरतात. 


ज्याप्रमाणे जीवनातील उद्दिष्ट प्राप्तीसाठी मनाच्या एकाग्रतेची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मन स्थिर राहण्यासाठी मनुष्य मानसिकदृष्ट्या निरोगी असला पाहिजे. शारीरिक स्वास्थ्य असले की मानसिक स्वास्थ्य आपोआपच चांगले राहते. कुणाचेही काही दुखत असेल शारीरिक वेदना असतील तर मन स्थिर राहत नाही. 


माणूस विचार करू शकत नाही. ज्ञान मिळविण्यात अडथळा निर्माण होतो. मन शारीरिक वेदनेकडेच आकर्षिले जाते. अशा परिस्थितीत आजच्या व्यस्त जीवनक्रमात प्रदूषित वातावरणात प्रत्येक मनुष्याने आपले शरीर निरोगी ठेवणे हे त्याचे परम कर्तव्य असेल. "निरोगी शरीरातच निरोगी मनाचा वास असतो."


लोकांमध्ये योगाबद्दल जागृती करण्यासाठी जिल्हा, प्रांत व राष्ट्रीय पातळीवर योग शिबिराचे आयोजन केले जाते. नवनवीन क्षेत्रातील व्यक्तीसाठी त्यांच्या इच्छेनुसार व उत्साहानुसार योगाचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारात अंतर्बाह्य परिवर्तन होऊन तो खरा मानव बनेल. 


एकीकडे योग निरोगी बनवितो तर दुसरीकडे त्यामुळे आपल्यामध्ये सात्त्विक आहार, सात्त्विक आचार विचार, परस्पर प्रेम, अध्यात्म आदी गुणांचा समावेश होतो. याशिवाय उदरनिर्वाहासाठी आपण कोणत्याही क्षेत्राशी जोडलेले असो उदा. डॉक्टर, वकील, अध्यापक इ. सतत योगसाधना केल्यास सर्वांना आपापल्या क्षेत्रात कार्यक्षमता वाढल्याचा अनुभव येईल.


योगात अनेक गुण असले तरी त्याच्याविषयी तरुण पिढीची त्याच्यावर निष्ठा का नाही? असे का? त्याची दोन कारणे आहेत. एक, तरुणांना योगाचे महत्त्व माहीत नाही. दोन, त्यांना त्याची जीवनात आवश्यकता भासत नाही. हा तरुण वर्ग जेव्हा प्रौढ वयात येतो तेव्हा आजूबाजूच्या सामाजिक कुप्रथा, जीवनातील अनियमितपणामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक विकारांनी ग्रस्त होऊ लागतो. 


तेव्हा योगाचे महत्त्व त्यांच्या लक्षात येते. त्याची आवश्यकता वाटू लागते. परिणामी प्रयोग म्हणून योगाचा अवलंब केला जातो. एखादा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे हे त्याच्या इलाजापेक्षा केव्हाही चांगले. परंतु आजची तरुण पिढी उपचार म्हणून त्याचा वापर करण्याची चूक करीत आहे. 


आपण योगाला आपल्या दिनचर्येशी जोडून त्यास जीवनाचे एक अभिन्न अंग बनविले पाहिजे. आजपासूनच याचा प्रयोग सुरू करा आणि इलाजाची गरज पडू देऊ नका. अशा प्रकारे भारतीय योगाचा लोककल्याणाच्या भावनेने ओतप्रोत महायज्ञात आपण सर्व एका शांतिपूर्ण समाजाची रचना करू आणि शेवटी लोक-कल्याणात मदत करु. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद