माझा आवडता नाटककार राम गणेश गडकरी मराठी निबंध | Majha Avadaata Naatakakaar Ram Ganesh Gadkari Essay Marathi

माझा आवडता नाटककार राम गणेश गडकरी मराठी निबंध | Majha Avadaata Naatakakaar Ram Ganesh Gadkari Essay Marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राम गणेश गडकरी मराठी निबंध बघणार आहोत. मराठी रंगभूमीच्या इतिहासात पहिल्या शंभर वर्षांतील यशस्वी नाटककारांपैकी किर्लोस्कर, देवल, खाडिलकर आणि गडकरी या चार नाटककारांचा प्रभाव अजूनही टिकून आहे. पैकी राम गणेश गडकरी हे माझे आवडते नाटककार आहेत. 


त्यांच्या उदयाच्या व उत्कर्षाच्या काळात त्यांच्या नाटकांनी वाचकांना आणि प्रेक्षकांना अगदी भारून टाकले होते. काव्य, नाट्य आणि विनोद या तीनही क्षेत्रात ते सारख्याच तेजाने तळपले. या तीनही क्षेत्रात त्यांनी असामान्य प्रभुत्व मिळविले होते म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती असामान्यतेचे वलय निर्माण झाले होते. 


त्यांच्या साऱ्या साहित्याने महाराष्ट्राला वेड लावले होते. अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जी वाङ्मयीन कामगिरी करून ठेवली आहे. ती बद्धीला स्तिमित करणारी आहे. आज त्यांना जाऊन इतकी वर्षे झाली तरीही त्यांची कीर्ती पहिल्याइतकीच प्रफुल्लित आणि टवटवीत आहे. 


प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', 'राजसंन्यास', 'एकच प्याला' ही सर्वच नाटके एकापेक्षा एक वरचढ आहेत. प्रेमसंन्यास' मध्ये हृदयाला पीळ पाडणारा करुणरस, बुद्धीला चकित करणारे कल्पनारम्य काव्य आणि मनाला पराकाष्ठेचा रिझवणारा विनोद यांचा जबरदस्त समन्वय आहे. 


कथानकाच्या वा रचनेच्या दृष्टीने या नाटकात दोष असतीलही पण करूणरसाचा व हास्यरसाचा परिपोष करण्याच्या त्यांच्या काव्यमय भाषेच्या जबरदस्त सामर्थ्यामुळे हे नाटक जनमानसाची पकड घेऊ शकले. गडकऱ्यांच्या नाट्यप्रतिभेतून उचंबळणाऱ्या कल्पना व उत्प्रेक्षा पाहून लोकांची मने दिपून गेली. 


'प्रेमसंन्यास'च्या लोकप्रियतेचे दुसरे कारण म्हणजे गोकुळ हा विनोदाचा निराळाच नमुना त्यांनी लोकांसमोर आणला होता. इतका निरागस व निर्मळ विनोद त्यापूर्वी मराठी रंगभूमीवर आला नव्हता. 'पुण्यप्रभाव' मध्येही कथानक वा रचनेच्या दृष्टीने दोष आहेत. आटोपशीरपणा वा बांधेसूदपणा या नाटकात कोठे औषधालाही सापडत नाही. 


तरीही या नाटकाने महाराष्ट्रात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. याची कारणे कोणती? तर पतिव्रतेचा पुण्यप्रभाव हा भारतीय संस्कृतीचा गाभा असलेला विषय गडकऱ्यांनी नाटकासाठी निवडला. स्त्रीचे पावित्र्य आणि मांगल्य यांविषयी उचंबळून येणारा दिमाख या नाटकातील वाक्यावाक्यातून दरवळतो. 


अनेक सुभाषितांचा सडा या नाटकातून दिसून येतो.'राजसंन्यास' हा तर गडकऱ्यांचा एक महान ज्ञानयज्ञ आहे. मराठी इतिहासाची, मराठी संस्कृतीची, मराठी भाषेची, मराठी शौर्याची, मराठी इमानाची ही एक अमरगाथा आहे. देदीप्यमान विचारांची मराठी साहित्यावर उठलेली ही एक उत्तुंग लाट आहे. या नाटकाचा अपूर्ण स्वरूपातही त्याची भव्यता आणि सौंदर्य यांचा साक्षात्कार होतो.


या नाटकात आपल्या रोजच्या जीवनातील एक भयानक सत्य नाटककाराने आपल्यापुढे उभे केले असल्याचा प्रत्यय येतो. एका बुद्धिमान माणसाचा दारूपायी होणारा नाश अत्यंत परिणामकारकपणे गडकऱ्यांनी या नाटकातून दाखविला आहे. हे नाटक पाहताना प्रेक्षकांच्या काळजाला क्षणोक्षणी पीळ पडत राहतो. 


प्रेक्षकांच्या काळजाचा ते कब्जाच घेते. 'भावबंधन' हे नाटक त्यांनी शेवटच्या आजारात कसेबसे पुरे केले. गडकऱ्यांच्या प्रतिभेचे सामर्थ्य आणि वैशिष्ट्य सांगावयाचे झाले तर काव्य आणि नाट्य यांचा अपूर्व संगम हे होय. गडकरी यांच्या नाटकांतील अनेक दोष आता जाणवत असले तरी ती पुन:पुन: पाहावीशी आणि वाचावीशी वाटतात, याचे कारण काय? 


गडकऱ्यांनी मानवी जीवनाच्या त्रिकालबाधित मूल्यांचे पूजन आणि चित्रण केले आहे. त्यांच्या नाटकातील स्त्री ही निस्सीम त्याग आणि निस्सीम निष्ठेमुळे तेजस्वी बनलेली असते. त्याशिवाय त्यांनी विनोदाची अप्रतिम निर्मिती केली आहे. त्यांचा विनोद प्रसंगनिष्ठ असतो आणि अर्थनिष्ठसुद्धा असतो. उदा. "वैद्य हाच रोग्याचा खरा जिवलग मित्र असल्याशिवाय रोग्याच्या जीवाशी इतकी लगट कोण करील?" 


गडकऱ्यांच्या भाषेत लखलखाट, त्यांच्या काव्यमय कल्पनांचा आणि उत्प्रेक्षांचा झगझगाट आजही वाचकांचे डोळे दिपवून टाकतो. हास्यरसाचा आणि करुणरसाचा परिपोष करण्याचे गडकऱ्यांच्या भाषेचे सामर्थ्य आजही पहिल्याइतकेच प्रभावी वाटते. 


भारतीय संस्कृतीमधील आणि प्राचीन साहित्यातील जे जे म्हणून काही मंगल आणि ऊर्जस्वल आहे, ते ते देदीप्यमान स्वरूपात गडकऱ्यांनी आपल्या नाटकात मांडले आहे. म्हणूनच आज काळ बदलला असला, नाट्यतंत्र फार पुढे गेले असले, नाटकांच्या विषयाचे स्वरूपही आज वेगळे झाले असले तरी गडकऱ्यांचे नाट्यसृष्टीतील स्थान अढळ आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद