जयप्रकाश नारायण : एक थोर नेता मराठी निबंध | Jayprakash Narayan : Ak Thor Neta Essay Marathi

 जयप्रकाश नारायण : एक थोर नेता मराठी निबंध | Jayprakash Narayan : Ak Thor Neta Essay Marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  जयप्रकाश नारायण : एक थोर नेता मराठी निबंध बघणार आहोत. जानेवारी १९७७ मध्ये पाच निरनिराळ्या पक्षांना एकत्रित करून जनता पक्ष स्थापन करणारे जयप्रकाश नारायण हे एक थोर व फार लोकप्रिय नेते होते. 


महात्माजींच्या मृत्यूनंतर भारतातील सर्वमान्य आणि आदरणीय नेते म्हणून लोक त्यांच्याकडे पाहू लागले, त्यांना 'लोकनायक' म्हणू लागले. जयप्रकाशांचा जन्म ११ऑक्टोबर १९०२ रोजी सिताबदियारा या गावी झाला. पाटण्याच्या शाळेत ते विद्यार्थ्यांचे पुढारी बनले. 


अन्यायाविरुद्ध लढा द्यायला येथेच त्यांनी सुरुवात केली. श्रीमद्भगवद्गीतेने त्यांच्यावर फार प्रभाव पाडला होता. खुदीराम बोसमुळे त्यांना क्रांतिकारकांबद्दल आपुलकी वाटू लागली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपणही क्रांतिकारकांमध्ये सामील व्हावे असे त्यांना वाटे. परंतु तो मार्ग योग्य नसल्याची जाणीव त्यांना म. गांधींमुळे झाली.


संघटितपणे केलेल्या असहकारामुळे इंग्रजांचा प्रतिकार करणे जयप्रकाशांना अधिक आवडले. म.गांधींनी चालू केलेल्या असहकाराच्या आंदोलनात त्यांनी उडी घेतली. परंतु आंदोलनात काही कार्यकर्ते अहिंसेचा मार्ग सोडून जाळपोळ करू लागले. 


त्यामुळे गांधींनी आंदोलन स्थगित केले. तेव्हा जयप्रकाश परत अभ्यासाकडे वळले. शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी मार्क्स, एन्जल्स, एम.एन.रॉय यांची पुस्तके वाचली. त्यांना समाजवादाचा परिचय झाला, मार्क्सवादी विचारांचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला.


भारतात परत आल्यावर म. गांधींच्या सहवासात ते साबरमतीच्या आश्रमात राहिले. ३१ डिसेंबर १९२९ला पंडित नेहरूंनी संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. याच वेळी जयप्रकाशांचा परिचय पं. नेहरूंशी झाला व नेहरूंच्या विनंतीनुसार जयप्रकाश काँग्रेसचा मजूरविभाग सांभाळू लागले. 


त्यानंतर त्यांची काँग्रेसच्या चिटणीसपदी नेमणूक झाली. शेतकरी, कामकरी व सर्व श्रमिक लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात जयप्रकाशजी गढून गेले. त्यानंतर स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र झाला. गांधींना व प्रमुख नेत्यांना तुरुगांत टाकण्यात आले. मुंबईत काँग्रसचे कार्यालय उघडण्यात आले आणि देशभराच्या चळवळीची सूत्रे जयप्रकाश येथून हलवू लागले. १९३४ साली त्यांनी नवा काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन केला.


१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यावेळी जयप्रकाशांनी युद्धविरोधी जनमत तयार करायला सुरुवात केली. तेव्हा सरकारने त्यांना तुरुंगात टाकले. १९४२ च्या दिवाळीत ते आपल्या ५ साथीदारांसह तुरुंगातून निसटले आणि त्यांनी भूमिगत क्रांतिआंदोलन अधिकच तीव्र केले. 


यापुढील पायरी म्हणजे स्वतंत्र नेपाळच्या भूमीवर एक नभोवाणी केंद्र उभारून तिथून क्रांतिकारकांना सूचना द्यायच्या अशी योजना त्यांनी आखली. परंतु इंग्रज सरकारने त्यांना व अनेक क्रांतिकारकांना पकडले. १५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. 


जयप्रकाशजींचे स्वप्न सत्यसृष्टीत उतरले. परंतु जयप्रकाशजींना सत्तेचा लोभ नव्हता. त्यांनी विनोबांच्या सर्वोदय चळवळीला आपले जीवन वाहून घेतले. ते भूदान, संपत्तीदान, श्रमदान इ. कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी झटू लागले. दु:खी, दरिद्री देशबांधवांच्या सुखासाठी ते रात्रंदिवस झटू लागले. लोक त्यांना 'लोकनायक' म्हणू लागले.


१९७२ मध्ये चंबळचे कुप्रसिद्ध दरोडेखोर त्यांना शरण आले. पाचशे डाकुंनी त्यांच्या पायाशी शस्त्रे ठेवली. त्या साऱ्यांची सुधारण्याची प्रामाणिक इच्छा पाहून जयप्रकाशांनी त्यांना माणसात आणले. यावेळपर्यंत देश स्वतंत्र होऊन २५ वर्षे झाली होती. 


परंतु पूर्वीची काँग्रेस आता पार बदलून गेली होती. सत्ताधारी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार यातच मग्न होते. या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांनी आंदोलन चालू केले. गुजरात, बिहार येथे आंदोलन यशस्वी होऊ लागले. जयप्रकाशांनी देशभर दौरा करून लोकांना संपूर्ण क्रांतीचे आव्हान केले. 


जानेवारी १९७७ मध्ये इंदिराजींनी निवडणुका जाहीर केल्या. जयप्रकाशांनी पाच पक्षांना एकत्र करून 'जनता पक्ष' स्थापन केला आणि निवडणुकीत हा पक्ष जिंकून आला. त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम जयप्रकाशजी करीत राहिले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली होती. 


त्यांपैकी 'समाजवादच का?', 'समाजवादापासून सर्वोदयापर्यंत', 'जेलडायरी' ही प्रमुख पुस्तके आहेत. त्यांची प्रकृतीही या काळात खूपच बिघडली होती. ८ ऑक्टोबर १९७९ ला त्यांचे निधन झाले. आयुष्यभर अन्यायाविरुद्ध झगडा देणारे लोकनायक शांतपणे अनंतात विलीन झाले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद