ग्रामीण विदयार्थ्यांची सुख-दुःखे मराठी निबंध | GRAMIN VIDYARTHYANCHI SUKH-DHUKHE ESSAY MARATHI

 ग्रामीण विदयार्थ्यांची सुख-दुःखे  मराठी निबंध | GRAMIN VIDYARTHYANCHI SUKH-DHUKHE ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ग्रामीण विदयार्थ्यांची सुख-दुःखे मराठी निबंध बघणार आहोत. दिवाळीच्या सुट्टीचे दिवस होते आणि पुण्यातील एका महाविदयालयाच्या दाराशी विदयार्थ्यांचा घोळका दिसला. सुट्टीत एवढे विदयार्थी महाविदयालयात का? असे कुतूहल चाळवले, म्हणून गर्दीत डोकावलो-आणि मी चकित झालो. 


ते विद्यार्थी त्या महाविदयालयातील नव्हतेच, तर ग्रामीण भागातील एका महाविद्यालयातील होते. त्यांनी मोठ्या कौतुकाने सांगितले की, शहरातील या महाविद्यालयाने त्यांच्या छोट्याशा महाविद्यालयाला दत्तक घेतले आहे. त्यांच्या महाविदयालयात शिकताना ज्या त्रुटी राहतात, त्या या महाविदयालयातील प्राध्यापक भरून काढतात. 


हे ऐकून मला फार आनंद वाटला. खरोखर अशा एकमेकांच्या गरजा आम्ही सांभाळून घेतल्या, तर कितीतरी प्रश्न चुटकीसारखे सुटतील, नाही! शहरात राहणाऱ्या मंडळींना ग्रामीण विदयार्थ्यांच्या अडचणी, समस्या सहसा माहीतच नसतात. 


शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून आता खेडोपाडी शाळा निघाल्या आहेत. नाहीतर पूर्वी चार चार-आठ आठ कोस मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागे. आपले एकेकाळचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना नदी पोहून शाळेत जावे लागे. आजही काही खेड्यांतून शाळा नाहीत. 


महाविद्यालये तर बऱ्याच गावांतून नसतात. मग खेड्यापाड्यांतील मुले जवळच्या गावातील, शहरातील महाविदयालयांकडे वळतात. त्यांची राहण्याची नीट सोयही नसते. या विदयार्थ्यांचे दिवसभराचे जेवण म्हणून घरून डबे एस्. टी.ने येतात. कधी एस्. टी. उशिरा येते, तर कधी येत नाही. मग दिवसभराचा उपवास घडतो.


ग्रामीण विदयार्थ्यांच्या बऱ्याच पालकांना महाविदयालयीन शिक्षणाचा खर्च परवडत नाही. विद्यार्थिनींना शिक्षण मोफत असले, तरी इतर खर्च पालकांना परवडत नाही. मग मुलींना अनेकदा अशा महाविदयालयीन शिक्षणाला वंचित राहावे लागते. 


ग्रामीण जीवनातून शहरात शिक्षणासाठी येण्याचा मुलामुलींचा ओढा असतो. सुरवातीला ही मुले गोंधळून जातात. काही वेळेला त्यांची चेष्टा होते. त्यांना रॅगिंगसारख्या आपत्तींना तोंड दयावे लागते.


ग्रामीण विदयार्थ्यांच्या शिक्षणाबाबत येणाऱ्या अडचणीत मोठी अडचण म्हणजे शिक्षणाच्या बऱ्याचशा शाखा ग्रामीण महाविद्यालयांतून उपलब्ध नसतात. दुसरी मोठी अडचण म्हणजे शहरातील महाविदयालयांतून विदयार्थ्यांना उत्कृष्ट प्राध्यापक व अद्ययावत ग्रंथालय उपलब्ध असते. ग्रामीण विदयालयांतील व महाविदयालयांतील अध्यापक वर्ग हा सतत बदलणारा असतो. 


खेडेगावातील काही शाळा या एकशिक्षकी शाळा असतात. अशा शाळांत शिक्षक नसल्यामुळे अभ्यासाचे अनेकदा खूप नुकसान होते. ग्रामीण विदयार्थ्यांची अशी काही विदारक दुःखे आहेत. ग्रामीण जीवनातील शिक्षणातील काही सुखेही असतात.


ग्रामीण शिक्षणसंस्थांतील वातावरण अतिशय शांततामय असते. शहरातील चैन व इतर प्रलोभने खेड्यांत नसतात. खेडेगावात यांत्रिक उदयोग नसल्यामुळे प्रदूषणाचा त्रास होत नाही. निसर्गसान्निध्याचा लाभ खेडेगावातील विदयार्थ्यांना मिळतो. 


ग्रामीण क्षेत्रातील विदयालये-महाविद्यालये यांतील विदयार्थ्यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे शिक्षक, प्राध्यापक आणि विदयार्थी यांचे संबंध जवळचे असतात. शिक्षकाला प्रत्येक विदयार्थी माहिती असू शकतो आणि त्यामुळे विदयार्थी शिक्षकांना आपल्या शंका, अडचणी सोडवण्यासाठी भेटू शकतात, हेही नसे थोडके ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद