भूकंपाने शिकवला धडा मराठी निबंध | BHUKANPANE SHIKAVLA DHADA ESSAY MARATHI

 भूकंपाने शिकवला धडा मराठी निबंध | BHUKANPANE SHIKAVLA DHADA ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंपाने शिकवला धडा मराठी निबंध बघणार आहोत. २६ जानेवारी, २००१. सारा भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करत होता. छोटे छोटे विदयार्थी प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजारोहणासाठी गणवेष घालून शाळेत गेले होते. 


कोठे मिरवणूक चालू होती, तर काहीजण सुट्टी म्हणून आळसाने वावरत होते. अचानक जमीन थरथरली. क्षणभरच; पण परत दोन-तीन मिनिटांनंतर जमिनीखालून जोरात आवाज येऊ लागले आणि जमीन हादरू लागली. भूकंप होत आहे याची जाणीव ज्यांना चटकन झाली ते घराबाहेर पळाले. पण बाहेर असलेले सर्वजण तरी सुरक्षित होते का?


भूकंपाच्या धक्क्याने गावेच्या गावे नष्ट झाली. उंच इमारतींचे दोन-दोन मजले जमिनीत गाडले गेले. झेंडावंदन करणारे विदयार्थी त्यांच्या शिक्षकांसह भूमीत गाडले गेले. नुकत्याच बांधलेल्या काही उंच इमारती पत्त्यांप्रमाणे कोसळल्या. येणाऱ्या आपत्तीला प्रतिकार करायलाही क्षण मिळाले नाहीत. 


काही न पडलेल्या इमारतींना असे तडे गेले की त्या वास्तव्यास निरुपयोगी ठरल्या. सर्व गोरगरिबांना उपयोगी पडणारे भुजचे रुग्णालय-रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टर, सेविका आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासह भुईसपाट झाले.


घडलेल्या भयंकर हानीची कल्पना काही तासांतच आली. चोवीस तासांत सगळीकडून मदतीचा ओघ वाहू लागला. आकाश, जल, स्थल या मार्गांनी मदत येऊ लागली. प्रत्यक्ष भूकंप अनुभवलेली माणसे आपल्या गावापासून, पुन:पुन्हा होणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांपासून दूर जाऊ इच्छित होती. 


कल्पनेच्या पलीकडे असलेल्या या संकटामुळे सुरवातीला सर्वजण गोंधळले होते. पण चोवीस तासांच्या आत लष्कराने सारी परिस्थिती हातात घेतली आणि कार्याला शिस्त लावली. भूकंपाने जे धडे दिले, त्यांतील एक महत्त्वाचा धडा म्हणजे लष्कराच्या कामाला तोड नाही ही प्रखर जाणीव. 


दुसरी या संकटात जाणवलेली सुखद गोष्ट म्हणजे आजच्या या व्यवहारी, भ्रष्टाचारी जगातही माणुसकी शिल्लक आहे. म्हणूनच भूकंपपीडितांना मदत करण्यासाठी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे युवक धावून आले. कशाचीही अपेक्षा न करता पीडितांसाठी ते अहोरात्र कष्ट करत राहिले. 


त्यांनी लष्कराला मदत केली. त्यामुळेच भूकंपानंतर ओढवणाऱ्या रोगराईच्या संकटमालिका आपण टाळू शकलो. लातूरच्या भूकंपात पोळलेल्या विदयार्थांना पुण्यात कच्छी जैन समाजाने मदत केली होती. अशा या युवकांची तुकडी कच्छच्या पीडितांसाठी धावली. त्यांनी तेथे अन्नछत्र सुरू केले. 


वैदयकीय आणि इतर मदत तर जगाच्या कानाकोपऱ्यातून आली. यांत धर्म, जात, पंथ, वर्ण, श्रीमंत, गरीब कोणताच भेदभाव नव्हता. मोठ्या अधिकाऱ्यापासून गरीब हमालापर्यंत सारे जण एकाच प्रकारचे अन्न घेत, एक सारख्याच तंबूत राहात होते. कुणाला कोणत्याही अडचणीची पर्वा नव्हती. एकच ध्यास होता भूकंपामुळे - आलेल्या आपत्तीशी झगडायचे; मोडून पडायचे नाही.


भूकंप होऊन आता काही काळ गेल्यावर मनात येते गुजरातमध्ये एवढे भयंकर नुकसान झाले, मनुष्यहानी व वित्तहानी झाली, त्याला जबाबदार नैसर्गिक आपत्ती की मनुष्याची अविचारी वृत्ती! तसे पाहता भुज, कच्छचा भूप्रदेश भूकंपप्रवण आहे, याची फार पूर्वीपासून कल्पना होती. 


तरीपण बांधकाम करणाऱ्यांनी याचा विचार केला नाही. उंच मनोरे उभारले. भूकंपप्रतिबंधक योजना केली नाही व वापरलेल्या मालातही भेसळ केली, असे आता उघड होत आहे. परदेशात एवढाच शक्तिमान भूकंप होऊनही एवढी मोठी मनुष्यहानी होत नाही.


भूकंपाने दिलेला हा मोठा धडा आहे. मानवाने या विज्ञानयुगात कितीही प्रगती केली, तरी निसर्गनियमांच्या विरुद्ध पाऊल टाकण्यापूर्वी त्याने त्रिवार विचार केला पाहिजे. नाहीतर फार मोठा फटका बसण्याची शक्यता असते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद