स्‍त्रीजन्मा ही तुझी कहाणी मराठी निबंध | Stri Janma Hi Tujhi Kahani Essay In Marathi

स्‍त्रीजन्मा ही तुझी कहाणी मराठी निबंध | Stri Janma Hi Tujhi Kahani Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्‍त्रीजन्मा ही तुझी कहाणी मराठी निबंध बघणार आहोत. ऐक स्त्रीजन्मा, तुझी कहाणी फार प्राचीन परंपरा आहे या देशाला. या देशात तुझे स्थान काय? या प्राचीन काळातील ज्या कथा ऐकायला मिळतात त्यात हे स्त्रीजन्मा, म्हणे तुला आदराचे स्थान होते । 


ऋषिमुनींबरोबर त्यांच्या धर्मकन्या, धर्मपत्नीही वेदविदयांचा अभ्यास करत, विद्वानांच्या सभेतील मैत्रेयी, गार्गी, कात्यायनी यांच्या विद्वत्ताप्रचुर चर्चांच्या कथा वाचायला मिळतात. 


प्रत्यक्ष रणांगणावर आपले युद्धकलेतील नैपुण्य दाखवणारी कैकयी रामायणात भेटते. पण स्त्रीजन्मा, या मोठेपणाच्या कथा एवढ्याच ! यापुढे तुझ्या वाट्याला आला केवळ बंदिवास! भटका माणूस स्थिर राहू लागला. शेती करू लागला. 


त्याने घर बांधले आणि हे स्त्रीजन्मा, तुझी वेगळी कहाणी सुरू झाली. त्याने शिकार करायची, तू ती रांधायची. तुला गृहस्वामिनी म्हणून गौरवता, गौरवता घरात डांबले गेले. तुला अर्धांगिनी म्हणून गौरवले आणि त्याच वेळी तुला 'अबला' बनवले. 


लहान असताना पित्याच्या आज्ञेखाली तू होतीस, मोठी झाल्यावर पतीच्या धाकाखाली आणि वार्धक्यात पुत्राच्या मर्जीनुसार तुझे जगणे सुरू झाले. हे स्त्रीजन्मा, वर्षानुवर्षे असे हे तुझे जगणे होते. तुला मान नाही, विचार नाही, मत नाही. तू नुसते राबायचे, कष्टायचे. 


तुझ्यावर मालकी पुरुषाची. त्याला वाटेल तेव्हा तो तुझा लिलाव करू शकतो, तुला घराबाहेर काढू शकतो. हे पुराणकाळापासून चालू आहे. अहल्या, तारामती, द्रौपदी यातच होरपळून निघाल्या.


हे स्त्रीजन्मा, या तुझ्या गुलामीच्या काळाला भेदण्यासाठी काही पुरुषच पुढे आले. महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिकवण्यासाठी आपल्या पत्नीला शिकवले, आगरकरांनी स्त्रियांचे हक्क सुधारकांतून मांडले, महर्षी कर्वे यांनी स्त्रियांसाठी आश्रम काढला.


स्त्री शिकू लागली, ज्ञानी झाली, कर्तबगारी गाजवू लागली. आपले घर सांभाळताना, आपली कामगिरी बजावताना आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना घडवत राहिली. म्हणून तर महात्माजींनी म्हटले की, 'एक माता शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे.'


आज अवतीभवती पाहिले की वाटते, स्त्री खूप शिकत आहे, प्रगती करत आहे. पण नीट बारकाईने पाहिल्यास कळेल की स्त्रीला अजूनही समाजात पुरुषाच्या बरोबरीचे स्थान नाही. यातूनच अन्यायकारक प्रथा निर्माण होतात. यामुळे स्त्रीवर खूप बंधने येतात. 


ती स्वत:च्या आयुष्याचा मुक्तपणे विचार करू शकत नाही. तेव्हा, स्त्रीला सर्व अन्यायापासून मुक्त करायचे असेल तर समाजात स्त्री-पुरुषसमानतेचे तत्त्व रुजवले पाहिजे. खरे तर आपण व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करायला शिकले पाहिजे. जातपात वा धर्म यांवरून माणसामाणसांत भेदभाव करता कामा नये. 


माणसाकडे माणसासारखेच पाहिले पाहिजे. तेव्हाच समाजातील अनिष्ट प्रथा नाहीशा होतील आणि स्त्री सन्मानाने समाजात वावरताना दिसू लागेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद