श्रावणमासी हर्ष मानसी मराठी निबंध | Shravanmasi Harsh Mansi !Essay Marathi

 श्रावणमासी हर्ष मानसी मराठी निबंध | Shravanmasi Harsh Mansi !Essay Marathi 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  श्रावणमासी हर्ष मानसी  मराठी निबंध बघणार आहोत. श्रावण महिन्यातील निसर्गदृश्ये किती मनमोहक असतात ! मधूनच तुरळक अशी कोवळी सूर्यकिरणे मेघांचा पडदा बाजूला सारून पृथ्वीवर डोकावतात. 


त्याच वेळी आकाशात अवतरते ते सप्तरंगी इंद्रधनुष्य, पृथ्वी आणि आकाश यांच्यामध्ये झुलता पूल होऊन. सूर्यकिरणांमुळे आकाशातील ढग रंगपंचमी खेळत असतात. सूर्य व ढग लपाछपी खेळत असतात आणि ऊनपावसाचा खेळ सुरू होतो. 


ऊन पडते आणि लगेच पावसाला सुरवातही होते. पण तो पाऊस तरी कसा गमतीचा- आला आला म्हणतो तोच एकदम पसार होतो आणि पुन्हा सोनेरी ऊन पडते. ." श्रावणमास हा सौंदर्यमास आहे. धरणीमाता हिरवा शालू नेसून अन्नब्रह्माच्या पूजेला बसल्यासारखी वाटते. 


चाफा, गुलाब, बकुळ यांसारखी सुवासिक फुले फुललेली असतात. त्यांच्यावरून येणारा वारा परमेश्वराचा सुवासिक श्वासच प्रतिक्षणी घेऊन येत असतो. परमेश्वराची कृपा नदीच्या रूपाने भरभरून वाहत असते. झऱ्यांमध्ये जीवन ओसंडत असते. 


हिरवेगार तृणांकुर वाऱ्याच्या झोताने डोलतात तेव्हा त्यावर उमटणारी लहर पृथ्वीमातेला होणाऱ्या सुखाचे दर्शन घडवते. डांबरी रस्ते धुऊन काळे कुळकुळीत झालेले असतात. जणू सौंदर्यसम्राज्ञीला दृष्ट लागू नये म्हणून घातलेले काळे गोफ तिच्या सौंदर्यात भरच घालत असतात. 


श्रावणात एखादया निरभ्र रात्री सारे आकाश चांदण्याने भरलेले असते. आकाशाचा कल्पतरू फुलांनी बहरलेला असतो. जणू रत्नाकराने स्वतःच्या कोषागारातील तेजस्वी मौक्तिक सुमनांची मुक्तहस्ताने आकाशात उधळण केल्याचा भास होतो.


श्रावणमास म्हणजे खरे तर 'श्रवणमास.' सृष्टीचे श्रुतिमधुर संगीत ऐकण्याचे भाग्य या कालखंडात लाभते. सरसर, सरसर येणाऱ्या-जाणाऱ्या पर्जन्यसरीच्या पदन्यासाचा कोमल पदरव कानी पडतो तो याच महिन्यात. तृप्त विहंगमांचे मंजुळ कूजन फार दिवसांनी ऐकायला मिळते तेही याच महिन्यात. 


सरितांचे गाणे, निर्झराची झुळझुळ, सागराची घनगंभीर पण श्रवणसुखद गर्जना ऐकायला मिळते तीही याच महिन्यात. गुराख्यांचा मंजुळ पावा ऐकायला मिळतो तोही श्रावणातच आणि घराघरांत व मंदिरांत गोड गीतांची मैफल जमते तीही याच कालखंडात.


श्रावणमासात भक्तिरस ओसंडून वाहतो. पोळा आणि नारळीपौर्णिमा हे कृतज्ञता दर्शवणारे सण याच महिन्यात येतात. आपल्याला अन्न मिळावे यासाठी वर्षभर खपणाऱ्या बैलांचा विश्रांतीचा आणि मानाचा दिवस पोळा. या दिवशी शेतकरी त्यांची पूजा करतात. नारळीपौर्णिमेला दर्यावर्दी लोक सागराची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. गोपाळकाल्याचा सण अमाप उत्साह आणि आनंद घेऊनच येतो.


डोंगरदऱ्यांतून फिरण्याची लहानथोर मंडळींची हौस वर्षासहलीच्या रूपाने याच कालखंडात पूर्ण होते. चैतन्यरसात सारा परिसर, सारा निसर्ग बुडाल्यासारखा वाटतो. असा हा श्रावणमास सौंदर्याचे लेणे ल्यालेला! भक्तिभावाची फुले घेऊन आलेला!! शिवाला, शुद्धतेला, पावित्र्याला पूजणारा, भरभरून आनंद देणारा ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद