आमच्या गावची जत्रा मराठी निबंध Aamchya Gavachi Jatra Nibandh.

  आमच्या गावची जत्रा मराठी निबंध  Aamchya Gavachi Jatra Nibandh. 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमच्या गावची जत्रा मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  आमच्या गावची जत्रा असलेले दोन निबंध बघणार आहोत आला श्रावण श्रावण गुच्छ-रंगाचे घेऊन ऊन पावसाचे पक्षी आणि ओंजळीमधून श्रावणाचे आगमन झाले की, ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो. 

सृष्टीवर नवचैतन्य अवतरते. यौवनाच्या मंजिऱ्यांनी दाही दिशा मोहरून जातात. आमच्या गावात श्रावणाचे पडघम महिनाभर आधीच वाजू लागतात. श्रावणाच्या आगमनाची तयारी सुरू होते. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी! 

त्या दिवशी आमच्या गावातील वारुळाच्या मारुतीसमोर मोठा 'पचंबा' भरतो; पण एकच दिवस पचंबा भरवण्याचा आमच्या गावचा रिवाज नाही, तर दर शनिवारी गावातील चार मारुतीमंदिरांसमोर हा क्रमाक्रमाने


पचंबा भरतो. आमचे गाव तसे बऱ्यापैकी मोठे! ५००० लोकवस्तीचे. त्यामुळे मारुतीमंदिरेही भरपूर; पण 'पचंबा' भरविण्याचा मान मात्र फक्त चार मारुतींचा! ते म्हणजे वारुळाचा मारुती, माळीवाड्याचा मारुती, झेंडीगेटचा मारुती आणि तेलखुंटाचा मारुती हे होत. पचंबा' म्हणजे मारुतीचा उत्सव ! 


जत्राच म्हणा की! मारुती आणि पचंबा गावकऱ्यांच्या खास आवडीचे; मग पचंबासाठी गावकऱ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहतो. मग पचंबासाठी गावातील त्या त्या भागातील लोकांची जय्यत तयारी सुरू होते. गावातील वयोवृद्ध, प्रतिष्ठित लोकांची सभा भरते. 


सभेत पचंबाचे नियोजन केले जाते. तरुणमंडळी या कामासाठी अगदी आघाडीवर असतात. गावातील हनुमान व्यायाम मंदिर' या तालमीतील लहान-थोर , पठे जय्यत तयारीला लागतात. मोठी माणसं त्यांना मार्गदर्शन करतात. मंदिराची डागडुजी होते. 


रंगरंगोटी केली जाते. आवार झाडूनपुसून लख्ख केले जाते. स्त्रियांना खेळण्यासाठी एक खास विभाग सजवला जातो. मोठमोठ्या झाडांना नाड्यांचे झोके बांधले जातात. छोटेसे मैदान साफ केले जाते. मंदिरपूजेचा मान. यावर्षी कुणाचा हेही ठरवले जाते. 


नवनव्या कापडचोपडांची खरेदी होते. लेझीम, कुस्त्या, ढोल यांचा सराव सुरू होतो. रात्रीच्या वेळी बाप्यांची जेवणं झाली की, भांडीकुंडी आवरून आयाबाया, पोरी-सोरी एकमेकींना हाळ्या देतात. मग फेरांच्या गाण्यांना उधाण येतं. झिम्मा, फुगड्यांचा सराव सुरू होतो.


असं करता-करता, बोलता-बोलता नागपंचमी येऊन ठेपते. पचंबाचा दिवस उजाडतो. गडीमाणसं भल्या पहाटे उठून तयारीला लागतात. नवी कापडं अंगावर घालतात. तरणेताठे मिळून लेझमीचा ताफा पुढे उभा राहतो. ढोलवाले ढोलावर थाप मारतात. 


नंतर मानाचं माणूस सजूनधजून उभं राहतं. गुलाल-बुक्का उधळीत ही जत्रा पुढे सरकू लागते. नाचत-गात मारुतीम्होरं येते. मारुतीच्या घंटा वाजू लागतात. मारुतीजवळ पुजारी तयारीतच असतो. मग मानाची महापूजा होते. पूजा झाली की देवदर्शनाला सुरुवात होते. हार-नारळांचा ढीग वाढत जातो.


मंदिराच्या समोरील वाटेवर आदल्या रात्रीच दुतर्फा राहुट्या पडतात. दुकानं थाटली जातात. त्यात गुलाल, बुक्का, हळदीकुंकू, हारफुलं, नारळ यांची दुकानं. शेजारीच मिठाईची दुकानं लावलेली असतात. फुलांच्या सुगंधाबरोबरच मेवामिठाईचा घमघमाट सुटतो. 

इंग्रजी नावांच्या पाट्या लावलेली हॉटेल्स उघडलेली असतात. मध्ये मध्ये खेळणी, उपयुक्त वस्तू, तयार कापडं, पिना, काटे, बांगड्या, शोभेच्या वस्तू, झटपट फोटो काढून देणारी दुकानं आणि भेळीची दुकानं हारीनं लावलेली असतात. पचंबाच्या निमित्तानं फिरणारे पाळणे, गोल फिरणारी चक्रं असंच काहीबाही उभारलं जातं.


साधारणपणे दुपारपर्यंत पचंबात पुरुषांचीच गर्दी असते. दुपारनंतर मात्र ललना नटूनथटून, एकमेकींना आपल्या हातावरची मेंदी दाखवत, पूजेचं ताट घेऊन गटागटानं हसत खिदळत पचंबाला निघतात. आता मात्र पुरुषमंडळी पचंबातनं काढता पाय घेतात. सायंकाळी पचंबात असते फक्त स्त्रियांचे राज्य ! 


नव्या नवऱ्या, तरण्याताठ्या, म्हाताऱ्याकोताऱ्या या सर्वांच्या अंगात जणू मारुती संचारतो. एकदा मारुतीरायाचं दर्शन झालं, वारुळावर दूध टाकलं की त्यांचा मोर्चा झोक्याकडे वळतो. तिथं आधीच गर्दी झालेली. चारचार जणी झोक्याला लोंबकळलेल्या असतात. इकडे झिम्मा, फुगड्या, फेरांना रंग चढलेला असतो. 


बांगड्यांची किणकिण, पैंजणांची छुमछुम, जोडव्यांचा दणदणाट व हास्यांचे फवारे यांनी वातावरण दुमदुमून जाते. पण मध्येच खरेदीची आठवण येते व झोके सोडून पळापळ सुरू होते. कमरेचे पैसे सुटतात व मनमुराद खरेदी होते. मिठाईवर ताव मारला जातो. भेळीची पुडकी सुटतात. चक्रात फिरून होतं. 


झटपट फोटो काढले जातात. आता संध्याकाळ टळून जाते. मग नाइलाजानं घराकडे पावलं वळतात. पचंबाचा आनंद मनात भरभरून घेत, पुढच्या शनिवारच्या पचंबात राहिलेल्या गोष्टी करण्याचा मनसुबा करीत !
अशी ही आमच्या गावची 


जत्रा. वर्षभराचा आनंद एकेका पचंबात मिळवून देणारी जत्रा; म्हणून श्रावणाच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

  
निबंध 2

आमच्या गावची जत्रा मराठी निबंध  Aamchya Gavachi Jatra Nibandh.


आनंदी आनंद गडे 

इकडे तिकडे चोहीकडे 

नभात भरला, दिशात उरला

मोद विहरतो, चोहिकडे

आनंदी आनंद गडे 

जत्रा म्हटली की बालकवींच्या वरील कवितेचा अनुभव येतो. जिकडे तिकडे आनंदच भरून राहिला आहे असे वाटते. जत्रा म्हणजे गर्दी. 


झबली, टोपडी, फ्रॉक, हाफपँट, चुणीदार, सलवार-खमीज, पाचवारी, नऊवारी, पायजमा, बॅगी, धोतर तसेच कुरळे काळे जावळ, बॉयकट, बॉबकट, एक वेणी, दोन वेण्या, पोनीटेल, अंबाडा, तुळतुळीत गोटे, सोल्जरकट आकर्षक भांगाचा कोंबडा, मानेत रुळणारे केस, गांधी टोप्या, फेटे इ. विविध तव्हेचे पोशाख व विविध वृध्द, तरुण, प्रौढ, वयस्क इत्यादी सर्व प्रकारची माणसे,


सप्तरंगांची रंगीत, इंद्रधनुषी दुनिया! जत्रा - म्हणजे जनसागराला आलेल्या भरतीच्या लाटाच लाटा!
जत्रेला आस्तिक, नास्तिक, हौसे, नवसे, सर्व प्रकारच्या लोक येतात. जत्रा ‘सामान्यचपणे' सुगीच्या दिवसात येते. किसानांची शेतीची कामे झालेली असतात. 


शेतात माणिक-मोती पिकतात. हाताशी पैसा असतो. सतत कष्ट उपसणाऱ्या त्यांच्या जीवनाला थोडा विरंगुळा हवा असतो. बदल हवा असतो. म्हणून गावच्या जत्रेत ते गर्दी करतात. कोणाला नोकरीत बढती मिळते, तर कोणाच्या घरात पाळणा हलतो. कोण दुखण्यातून बरा होतो, 


तर कोणी परीक्षेत घवघवीत यश मिळवतो. कोणाचा लांबलेला विवाह पार पडतो, तर कोण निवडून येतो. कोणी कोर्टकज्जे करून मालमत्ता मिळावी म्हणून, अशा विविध कारणांनी बोललेले नवस फेडण्यासाठी येतात. कोणी ओटी (देवीची) भरतात. कोणी देवीला पातळ नेसवतात. 


कोणी दंडवत घालत घालत देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जातो. कोणी महापूजा करतात. वस्तू दान करतात. कोंबडे, बकरे कापतात. देवीला सोन्या-चांदीचे कान करतात. पुण्याच्या चतु:शृंगीची जत्रा अश्विन शुध्द प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत असते. ही देवी उंच टेकडीवर आहे. 


शृंग म्हणजे पर्वतशिखर. देवीच्या भोवताली चार टेकड्या आहेत. देवळात जाण्यास सुरवातीला लांबच लांब दगडी पायऱ्या आहेत. मध्यभागी असलेल्या लोखंडी कठड्याने पायऱ्यांचे विभाजन केले आहे. डावीकडे एक गणपतीचे देऊळ आहे. उजवीकडे भवानी, सप्तशृंगी देवींची देवळे आहेत. 


देवळाच्या तटाच्या भिंतीला एक टेकडी आहे. खिडकीतून सूर्योदय, सूर्यास्ताचे पिवळेधमक सोने दिसते. खालचा भरगच्च परिसर दृष्टीच्या टप्प्यात एकदम येतो. गाभा यात चतु:शृंगीदेवी जरा उंचावरच विराजमान झालेली आहे. या देवीला देवळाबाहेरून डोंगरातून प्रदक्षिणा घालावी लागते. 


देवीच्या दोन्ही बाजूंस तिचे पुजारी बसलेले असतात. दर्शनासाठी स्त्रिया व पुरुष यांच्या रांगा स्त्री व पुरुष पोलिस लावतात. देवीपुढे कुणाच्या अंगात येते. मग काही माणसे प्रश्न विचारतात. देवळात आवाज घुमत असतो. कुंकवाचे मळवट भरले जातात. 

चंदन, उदबत्त्या, कापूर, अष्टगंध इ. चा प्रसन्न दरवळ असतो. भाविक दर्शन घेतात. घंटा वाजवतात. पैसे ठेवतात. नमस्कार करतात. स्त्रिया ओटी भरतात. आपापसात कुंकू लावून प्रसाद वाटतात. काही लोक रोज नेमाने दर्शनास जातात. अष्टमीला तर गर्दीला उधाण येते. 


जत्रेत छोटी-मोठी दुकाने असतात. देवळाजवळ पूजासाहित्य, प्रसाद इ.ची दुकाने असतात. तसेच चहा, भेळ, वडापाव, शेवपुरी, रगडा पॅटिस यांची दुकाने असतात. इडली, डोसा, सामोसे, पुरीभाजी यांचीही दुकाने असतात. आईस्क्रीमचीही दुकाने असतात. 


'बुढ्ढी के बाल'वाला इकडून तिकडे हिंडत असतो. पानपट्टीची दुकाने असतात. तसेच साबणावर रिंग मारणे, बंदुकीने फुगे फोडणे इ. खेळ असतात. आपलीच विविधरूपे दाखविणारा आरसेमहाल असतो. 'मौत का कुआँ'असतो. विजेचे गोलाकार, चक्राकार रंगीत विविध आकाराचे पाळणे असतात. फोटोची दुकाने असतात.


लोक सर्वत्र भिरभिरत असतात. खाद्यपदार्थांवर ताव मारतात. चहा पितात. आईस्क्रीम खातात. मुले हट्ट करून आई-वडिलांकडून एखादा फुगा, टोपी, कटकटे, डफली अशी काही खेळणी घेतात. स्त्रिया बांगड्या भरतात. भांडी खरेदी करतात. शोभेच्या मूर्ती, फुलदाण्या खरेदी करतात.


सर्वजण जत्रेच्या उत्सवात उत्साहात आनंदाने सहभागी होतात. घरच्या सर्व चिंता बाजूला ठेवतात. येथे माणसांचे एकमेकांत मिसळून जाणे अगदी सहज घडते. या आठवणी कायम राहाव्यात यासाठी ग्रामीण स्त्री-पुरुष जत्रेत फोटो काढतात. 

या स्टूडिओत गरिबातला गरीबही स्कूटरवर बसताना, जीपगाडी चालवताना दिसतो. जत्रेत एकात्मतेचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद