बहुजन हिताय, बहुजन सुखाय! मराठी निबंध | Bahujan hitaya Bahujan sukhay essay in Marathi

 बहुजन हिताय, बहुजन सुखाय! मराठी निबंध | Bahujan hitaya Bahujan sukhay essay in Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  बहुजन हिताय, बहुजन सुखाय! मराठी निबंध बघणार आहोत.   'सुख आले माझ्या दारी मज काय कमी या संसारी' धरणीमाता गुणगुणत होती. चराचर सृष्टी तिच्या वत्सल अंकावर विसावली होती. मायेचं छत्र धरणारं आकाश, प्रकाशदान देणारा सहस्त्ररश्मी, भूमीला, सुजला सुफला करणारे मेघ, दशादिशांवर चवऱ्या ढाळणारा मंद, शीतल वायू! सारे कसे चैतन्यरसात न्हाऊन निघालेले! त्यांच्या श्वासाश्वासातून एकच दिव्य


ध्वनी ऐकू येत होता.

'बहुजनहिताय बहुजनसुखाय'


निसर्गराजाने जिवाचे कान करून हा कल्याणकारी मंत्र ऐकला नि तो मंत्रमुग्ध होऊन गेला. वृक्ष फलभाराने लवले, कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता! स्वतः उन्हात करपून श्रांत जिवांवर मायेचं छत्र धरण्याचं काम त्यांनी हसतमुखाने स्वीकारलं, नाजूक वेलींनी पर्णफुलांचा संभार लीलया पेलला. तृषितांची तहान भागविण्यासाठी लोकमाता दुथडी भरून वाहत होत्या. गोमाता वासरांची भूक भागवून ‘भगवंताच्या लेकरां'साठी मुबलक दूध देत होत्या.


बुद्धी नि भावनेचं अमोल लेणं लाभलेला मानव त्याला अपवाद असेल? निसर्गाच्या परोपकारी रूपाने त्याला अक्षरशः मोहिनी घातली. त्यागातल्या आनंदाची गोडी त्याने चाखून पाहिली. इतरेजनांच्या हितासाठी, सुखासाठी जीवनपुष्प उधळून देण्याचा वसा त्याने निसर्गाकडून घेतला. 


आणि पाहता पाहता मानवी संस्कृतीने उन्नतीचे गौरीशंकर गाठले. माणूस 'माणूस' राहिल नाही. 'नराचा नारायण' झाला. आनंद, सुख, शांती, समाधान त्याच्या घरी गुण्यागोविंदाने नांदू लागले. ऋषिमुनींच्या आश्रमाचा पावन परिसर विश्वकल्याणाच्या मंगल प्रार्थनेने दुमदुमून गेला.


सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । 

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ॥


लाडक्या बाळाने तृप्तीची ढेकर दिल्यावरही आई त्याच्या मुखात दोनचार काऊचिऊचे घास बळेबळे कोंबते तसे विधात्याचे झाले. परमप्रिय अपत्यांच्या सुखात काहीतरी उणं असल्याची रुखरुख त्याला लागली. ती उणीव भरून काढण्यासाठीच की काय 'जगाच्या कल्याणा, विज्ञानाची विभूती' धरेवर अवतरली.


या देवदूताने समस्त शास्त्रांच्या हाती ज्ञानामृताचे अक्षय कुंभ दिले. यंत्रांचा, प्रसारमाध्यमांचा 'सुकाळु जाहला' 'बहुजनहिताय, बहुजनसुखाय' आकाशवाणी भुईवर अवतरली. दूरदर्शनने जवळून दर्शन दिले. सुखसोयी वाढल्या. चैनीच्या वस्तूंची लयलूट झाली. कोणता मानू स्वर्ग, स्वर्गिचा की


धरेवरचा? असा संभ्रम निर्माण झाला. तो मायावी स्वर्ग द्रष्ट्या, ज्ञानी लोकांना भुरळ घालू शकला नाही. भौतिक सुखांची चंगळ 'बहुजनसुखाय' असली तरी 'बहुजनहिताय' नाही हे त्यांच्या दिव्य दृष्टीला दिसत होतं. स्वार्थासुराच्या पावलांची चाहूल त्यांना अस्वस्थ करीत होती.


आणि एका बेसावध क्षणी (दुर्दैवी क्षणीच म्हणायला हवं!) मानवाने निसर्गाचे बोट सोडून दिले. विज्ञानबळावर, तो निसर्गावर विजय मिळविण्याची दुःस्वप्ने पाहू लागला. 'माझ्याच सुखात माझे सुख, माझ्याच हितात माझे हित आहे' असा (आसुरी?) साक्षात्कार त्याला झाला. बहुजनांच्या सुखदुःखाशी त्याला काही देणे घेणे उरले नाही..


'राष्ट्राय स्वाहा, इदं न मम' म्हणणाऱ्यांची जिव्हा आता 'इदं न मम' म्हणताना चाचरायला लागली. दान देताना हात अभावितपणे थरथरू लागले. 'त्यजेदेकं कुलस्यार्थे, ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत्' (कुळाच्या कल्याणासाठी एकाचे हित बाजूला ठेवावे, गावाच्या हितासाठी कुळाच्या हितावर पाणी सोडावे) अशा उदात्त विचारसरणीची हकालपट्टी झाली.


त्याग, परोपकार करणे शुद्ध मूर्खपणाचे वाटू लागले. निव्वळ स्वार्थापोटी देशाचे लचके तोडताना, मायभूला गहाण ठेवताना जनाचीच काय मनाचीही शरम वाटेनाशी झाली. माणूस 'माणूस' राहिला नाही. नरपशू झाला. कोणता म्हणू नरक? नरकिचा की..... नाही, नाही.


या सुंदर सृष्टीवर बीभत्स, ओंगळ, अमंगल नरकाची कल्पनाही सहन होत नाही. आजही पृथ्वितलावर काही नीतिवंत, शुचिमत, गुणवंत, दयावंत, विचारवंत पुण्यात्मे नांदताहेत. ते चालते बोलते दीपस्तंभ आमच्या भरकटलेल्या तारूला पैलतीराला नेतील. लौकरच सोनियाच्या पावलांनी पहाट उगवेल. भूपाळीच्या मंगल सुरांनी मानवाला हलके हलके जाग येईल.


 मोरपिसांची टोपी घालून, चिपळ्यांच्या तालावर, गिरक्या घेणाऱ्या वासुदेवाच्या सुरात तोही आपला सूर मिसळेल. "जळो अमंगल लाजिरवाणे, स्वार्थासाठी जगणे हो। बहुजन हिताय, बहुजनसुखाय, धन्य धन्य ते जगणे हो ।” मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद