हुंडा एक सामाजिक समस्या । Hunda Ek Samajik Samasya Marathi

 हुंडा एक सामाजिक समस्या । Hunda Ek Samajik Samasya Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध बघणार आहोत. हिंदू समाजात ज्या काही थोड्या फार अनिष्ट रूढी पडल्या आहेत त्यातलीच ही हुंडा पद्धती. लग्नाच्या वेळी हिंदू आईवडील, मुलगी नवऱ्यामुलाला देणे याला कन्यादान' समजतात. 


असे दान करताना तिला जर दागदागिन्यांनी नटवून सजवून केले तर त्याला ‘सालंकृत कन्यादान' समजतात. पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे. (अतिप्राचीन काळात मात्र हिंदू स्त्रिया केवळ शिकलेल्याच नव्हे तर ऋषीमुनींच्या प्रमाणे विद्वान असत. 


त्यांच्याशी वादविवाद चर्चा करण्यात भाग घेत असत.) त्यावेळी स्त्रियांचा विवाहदेखील अगदी बालवयात मुलगी ७/८ वर्षांची असताना करीत असत. त्यावेळी हुंडा म्हणजे 'कन्यादान' करताना वराला दिलेली 'वरदक्षिणा' असे आणि ती देखील वधूपित्याच्या ऐपतीनुसार मर्यादित असे.


पुढे पुढे या वरदक्षिणेची रक्कम वाढू लागली. मुलाची जात, कुळ, शिक्षण, खानदान, त्याची नोकरी अगर त्याचा व्यवसाय यावर हा 'आकडा' अजगरासारखा फुगू लागला. त्यात दागदागिने देऊन वर रक्कम 'हुंडा' म्हणून देणे अनिवार्य ठरू लागले. 


पुढे त्यात मुलाचा पोशाख, वरपक्षाकडील मंडळींचे मानपान, त्यानंतर लग्नाच्या दिवसाचा जेवणखाण, नाश्ता, फराळ, चहापाणी आणि अखेर स्वागत समारंभ यांचा खर्च यांची भर पडली. मध्यमवर्गीय समाजात अशा विवाहाचा खर्च चाळीस-पन्नास हजार रुपयांपासून लाख-दीड लाख रुपयांपर्यंत होत असतो.


या सर्व प्रकारात 'स्त्री'ची सतत अप्रतिष्ठा होत राहिली. पुढे स्त्रिया शिकू लागल्या. पुरुषाच्या बरोबरीने अर्थार्जन करू लागल्या. तरीही 'हुंडा' पद्धत बंद होण्याऐवजी अधिकाधिक जाचक होऊ लागली. हुंडा दिला नाही म्हणा सुनेचा छळ व कधी कधी अमानुष वधदेखील होऊ लागला.


इंदिरा गांधींच्या काळात वीस कलमी योजनेच्या जोडीला संजय गांधींची जी पाच कलमे जोडली होती, त्यात हुंडाविषयक कलम जोडलेले होते. (१) तरुण पुरुषांनी 'हुंडा' घेणार नाही अशी प्रतिज्ञा करणे, (२) तरुण स्त्रियांनी हुंडा घेणाऱ्या पुरुषांशी लग्न करणार नाही असा निर्धार करणे अशी त्यातील धोरणे होती.


आजकालच्या भारतातील कायद्यानुसार 'हुंडा घेणे' हा कायद्याने गुन्हा आहे. तरी अजून लोक हुंडा घेत आहेत व देणारे देत आहेत. वर्षानुवर्षे या विरुद्ध संघर्ष चालला आहे. तरीही ही पद्धत अजून चालूच आहे. या विषयावर मराठीत कथा, कादंबऱ्या, नाटके प्रसिद्ध झाली आहेत. 


श्री. भा. वि. ऊर्फ मामा वरेरकर यांचे 'हाच मुलाचा बाप' हे नाटक व ग. दि. माडगूळकर लिखित 'वरदक्षिणा' हा चित्रपट याच विषयावर होता. जयवंत दळवी लिखित 'पर्याय' नाटक व लेक चालली सासरला' ' हा चित्रपट यांनीही हा विषय प्रभावीपणे मांडला आहे. ज्योती म्हापसेकरांचे 'मुलगी झाली हो'


हे पथनाट्यही हा विषय मांडते. नाटक व सिनेमा काढून जागृती थोडीफार होईल. कायद्याने फारतर थोडी भीती निर्माण होईल पण खरी आंतरिक सुधारणा होणार नाही. त्यासाठी विवाहेच्छू तरुण-तरुणीमध्ये या प्रश्नाबाबत 'स्त्री' जातीवरील अन्यायांची आणि माणसांच्या अमानुषपणांची जाणीव व्हायला हवी.


माणसांचा अमानुषपणा असे मी मुद्दाम म्हणतो. हुंडा केवळ पुरुषालाच हवा असतो असे नव्हे, तर तो सासूलाही - 'स्त्री'लाही - हवा असतो. आपण त्या अनिष्ट आपत्तीतून गेलो असलो तरी ! एवढेच नव्हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी 'हुंडा' नकोसा वाटणाऱ्या बाईला आपल्या मुलाच्या विवाहाच्या वेळी मात्र हुंडा घेणे अगदी साहजिक वाटते.


समुद्रात हिमनग पाण्याच्या जेवढा वर दिसतो त्याच्या दसपट पाण्यात असतो म्हणतात. हुंड्यासारख्या प्रश्नाचे वरवर दिसणारे स्वरूप असेच छोटे व सहज सुटणारे वाटले तरी तसे नाही. त्याची व्याप्ती पृष्ठभागाखालीच फार आहे. म्हणूनच कित्येक नवतरुणींच्या संसाराच्या नौका त्यावर आपटून फुटतात ! खरे ना ? म्हणून म्हणतो-गाडून टाका या हुंडा पद्धतीला !  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद