'परीक्षेच्या एक तासापूर्वी' मराठी निबंध | Importance of Exams Essay Marathi

 'परीक्षेच्या एक तासापूर्वी'  मराठी निबंध | Importance of Exams Essay Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण 'परीक्षेच्या एक तासापूर्वी' मराठी निबंध बघणार आहोत.  'यंदा ज्ञानेश्वर नक्की येणार !' 'मला नाही वाटत...गेल्याच वर्षी आला होता तो.' 'माझी नीट तयारी नाही गं...धडे फक्त चारच वेळा वाचले नं!'


'अगं मला पातळावर नीट मॅचिंग ब्लाऊजच सापडेना ! शेवटी नाद सोडला, आणि...पांढरा ब्लाऊज वापरला !' 'नंबर नीट लिहा ! वर्ग लक्षात आला ना ! दोन वाजता पेपर संपल्यावर कँटिनपाशी ये.' 'पेपरवर आपल्या कुलदैवतेचं नाव लिही. अंगारा लाव बरं का !'


दर मिनिटाला अशी शेकडो वाक्ये उमटत होती. आज 'मराठी'चा पहिला पेपर होता. 'आर्यन हायस्कूल'मध्ये चार-पाचशे मुले शालान्त परीक्षेसाठी आली होती. मुलांबरोबर त्यांचे प्रत्येकी एक-दोन पालकही आले होते. म्हणून बारा-पंधराशे जण जमले होते. 


सर्वत्र गलका ऐकू येत होता. परीक्षा सुरू होण्याआधी पंधरा मिनिटे आधीची सूचना देणारी मोठी घंटा झाली. वर्गांचे दरवाजे उघडले. मुले वर्गात शिरली. पर्यवेक्षक पेपरांचे गढे घेऊन वर्गात आले. लाउडस्पीकरवरून वारंवार सूचना येऊ लागल्या. 'पालकांनी कृपया लवकर वर्गाबाहेर पडावे. गॅलरीत थांबू नये. तळमजल्यावरील हॉलमध्ये थांबावे.'


विद्यार्थ्यांनी आपापले नंबर पाहून त्या सीटवरच बसावे. स्वतःजवळची पुस्तके, वह्या बाहेर गॅलरीत ठेवाव्यात. वर्गात काहीही ठेवू नये.' अशा सूचना पुनः पुन्हा येऊनसुद्धा काही पालक हलता हलेनात. शेवटी शिपायांनी तोंडाने गोड बोलत पण हात धरूनच त्यांना बाहेर नेले. 


गॅलरीत पुस्तके व वह्या यांचा ढीग साचला. काही जण शेवटच्या क्षणापर्यन्त बाहेर वाचीत होती. शेवटी पर्यवेक्षकांनी त्यांना दम दिला. 'पुस्तके ठेवा व ताबडतोब वर्गात या.' ती मुले वर्गात आली पण त्यांचे अर्धे लक्ष पुस्तकांकडेच. (देवळातल्या चपलांप्रमाणे पुस्तके जाणार तर नाहीत ?)


पुष्कळ मुले वर्गात बडबडतच होती. कोणी एकमेकाला best luck देत होती. कोणी एकमेकांना खुणा करीत होती. पर्यवेक्षक उत्तरपुस्तिका वाटून पहिल्या पानावरील रकाने कसे भरायचे ते सांगत होते. गोष्ट साधी होती पण ते करतानाही मुलांचे चेहरे भयशंकित दिसत होते. 


आत्मविश्वास डळमळत होता. 'नंबर बरोबर आहे ना ?' 'माझी जागा बरोबर आहे ना ?' या सारख्या अनेक शंका मुलांच्या तोंडावर उमटत होत्या. उत्सुकता, भीती, उतावीळपणा, अनोखेपणा, पहिलेपणा, अशा अनेकविध भावछटांची दाटी त्या चंचल डोळ्यांत झाली होती.


'टक टक्' आवाज करीत एक मुलगी उभी राहिली. 'सर, पावती घरी राहिली ! घरी जाऊन आता आणू का ?' ती घाबरत बोलत होती. 'उद्या घेऊन या, बसा आता' पर्यवेक्षकांनी तिला सांगितले- 'सर माझ्या बाकावरचा नंबर चुकलाय'....एक मुलगा ओरडला, 'अहो तुम्ही A २१२७६ एवजी A २१२६७ क्रमांकवर बसला आहात. ती उत्तरपुस्तिका इकडे द्या व पलीकडच्या वर्गात जा', पर्यवेक्षकांनी उत्तर दिले.


'मे आय कम इन सर'.... बाहेरून आवाज आला. 'यस' म्हणताच तो आला व A २१२६७ क्रमांकवर बसला. इतक्यात दुसरी घंटा झाली. प्रश्नपत्रिका वाटल्या गेल्या. मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव प्रश्नपत्रिकेच्या ओळी ओळीसरशी बदलत होते. कागद फडफडू लागले. पेनांचे कुरकुर आवाज सुरू झाले. परीक्षा सुरू झाली. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद