नभ मेघांनीं आक्रमिलें मराठी निबंध | Nabha Meghani Aakramile Essay Marathi

 नभ मेघांनीं आक्रमिलें मराठी निबंध | Nabha Meghani Aakramile Essay Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण नभ मेघांनीं आक्रमिलें  मराठी निबंध बघणार आहोत.  धडाड् धूम् धाड धाडऽऽऽ...केवढे आवाज हे ! त्या आवाजांनीच मी जागा झालो. क्षणभर वाटले हे तोफांचे तर आवाज नाहीत ? हळूहळू आकाश कृष्णमेघांनी झाकोळून गेले. 


विजांचा कडकडाट सुरू झाला. वा-याचा आवाज वाढू लागला. पावसाचे टपोरे थेंब जमिनीवर टपटपू लागले आणि थोड्याच वेळात मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. 'नभ मेघांनी आक्रमिले' हे नाट्यगीत गुणगुणतच पावसाची गंमत पाहण्यासाठी रेनकोट व हॅटसह मी रस्त्यावर आलो.


कोसळत्या सरींचे जोरदार सपकारे सपासप बसू लागले. दोन मिनिटांत माझ्या चष्म्यावरून पाण्याचे ओघळ वाहू लागले व रस्त्यासकट भोवताली घरे, दारे, मुले, माणसे, थरथरत आहेत असा मला भास झाला. मुकाटपणे चष्मा काढून शर्टाच्या वरच्या खिशात सारला. 


मोटारच्या काचेवरचे पाणी दूर करण्यासाठी असणाऱ्या स्वयंचलित काड्यांसारख्या (wipers) चष्माच्या काचा पावसात साफ करणाऱ्या काड्या बसविण्याची सोय हे चष्मेवाले केव्हा करणार असा एक यक्ष प्रश्न माझ्या मनात तेवढ्यातच डोकावून गेला.


रस्त्यावर 'पाणीच पाणी चहुकडे' झालेले होते. मी स्वतःच जवळजवळ गुडघाभर पाण्यात उभा होतो. रस्त्यावरून जाताना लोकांची त्रेधा-तिरपीट उडाली होती. एक बस गबलताप्रमाणे पाण्यातून आली. बहुतेक  रिकामी....स्टेशनपर्यंत पोचतो तो कळले....गाड्या फार मंद जात आहेत. 


रुळांवर पाणी चढले होते. गाड्यांत सुद्धा छत्र्यांनी व रेनकोटांनी पाणी आल्यामुळे चिकचिकाट झाला होता. गाडीत बसलेली व गाडीच्या दाराखिडक्यात लोंबकळणारी माणसे शिमग्याच्या सोंगांसारखी दिसत होती. कडक इस्त्रीवाले, टिनोपॉल पँटवाले यांच्या कपड्यांची पोतेरी झाली होती. 


चपलेने उडणा-या शिंतोड्यामुळे काही जणांच्या पाठीमागील बाजूला चिखली ठिपक्यांची रांगोळी दिसत होती. मुली दोन तीनच दिसल्या. त्या स्वतःला कशाबशा सांभाळीत चालल्या होत्या. . इतक्यात पावसाचा जोर वाढला. आकाशात ढग पिसाळलेल्या वाघाप्रमाणे डरकाळ्या फोडत होते. 


रस्त्यावर बसमध्ये व गाड्यांमध्ये ऑफिसात जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी दाटली होती. शाळा, कॉलेज, सरकारी कचे-या अथवा इतर कार्यालये बंद राहणार याची खात्री असल्यामुळेच बरीच माणसे कर्तव्यतत्परतेचा आव आणून ऑफिसकडे निघाली होती. 


रस्त्यावर दुतर्फा मोटारी व बसेस तुंबून पडल्या होत्या. वा-यामुळे अनेकांच्या छत्र्या उलट्या झाल्या होत्या. रेनकोट असून नसल्यासारखेच झाले होते. हॉटेले आणि थिएटरे इथे मात्र बरीच गर्दी साचली होती. पावसाचा मारा चुकविण्यासाठी कित्येकांनी विश्रांतिगृहांत विश्रांतीसाठी धाव घेतली होती, थिएटरांपुढे नितळत्या छत्र्यांखाली डोके सावरीत advance booking साठी रांगा लांबत होत्या. 


चुकले पीर मशिदीत सापडायचे...तशी चुकली पोरे थिएटरात मिळायची. पावसाचा मारा थोडा चुकवीत, थोडा सोसत मी दुपारी दीड वाजता घरी पोचलो व कपडे बदलून जेवायला बसलो तोच रेडिओवर मराठी बातम्यांत मुंबईची बातमी आली...


'अतिवृष्टीमुळे मुंबई व उपनगरात रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ग्रँटरोड, लालबाग, परळ, हिंदमाता, माटुंगा विभागात अनेकांच्या घरांत पाणी शिरले आहे. वरळी व. माहीम येथील सातशे झोपड्या पाण्याखाली गेल्या असून भांडीकुंडी, अन्न, कपडे, वगैरे सर्व वस्तू वाहून गेल्या आहेत.'


'अरेरे !' माझ्या मुखातल्या या दुःखोद्गाराबरोबरच माझ्या हातातील पाण्याचे भांडे ताटात पडून अन्नात पाणी कालवले गेले होते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद