माझा आवडता समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले मराठी निबंध | Maza Avadta Samaj Sudharak Essay in Marathi

 माझा आवडता समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले मराठी निबंध | Maza Avadta Samaj Sudharak Essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले मराठी निबंध बघणार आहोत.  मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी. तिथे विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ एक मोठा पुतळा आहे. कुणाचा ? गांधींचा ? नेहरूंचा ? ...नाही ! 


तो आहे महात्मा जोतिबा फुले यांचा. पुणे शहर महाराष्ट्रातल्या विद्येचे माहेरघर. तिथे भाजी बाजारात मंडईत गेलात तर तिथेही 'फुले' यांचे नाव आढळेल !...महात्मा जोतीराव फुले, हाच माझा आवडता समाजसुधारक.


जोतीरावांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंद फुले. पूर्वी त्यांचे नाव गोव्हे होते. पुढे त्यांचे आजोबा फुलांचा व्यवसाय करू लागले तेव्हापासून लोक यांना 'फुले' म्हणू लागले. १८२७ साली जन्मलेल्या 'ज्योती'ची आई तो फक्त एक वर्षाचा असताना वारली व त्याचा सांभाळ दाईने केला. 


त्यांचे प्राथमिक शिक्षण थोड्या फार अडचणीतून पुरे झाले. पण पुढे त्यांना इंग्रजीचा अभ्यास पुरा करायला बरीच वर्षे लागली. दरम्यान इ. १८४१ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचा विवाहदेखील झाला होता.एका ब्राह्मण मित्राच्या वहाडात मिरवणुकीबरोबर नवऱ्या मुलीकडे जात असताना जोतीरावांचा घोर अपमान झाला. त्या प्रसंगामुळे 'मागास समाजा'ला अपमानित अवस्थेतून वर आणायला हवे अशी प्रेरणा त्यांना मिळाली. 


शिवाय अहमदनगरला ख्रिस्ती मिशनरी लोकांचे कार्य पाहून त्यांना स्फूर्ती आली, आणि पुण्यात परतल्यावर त्यांनी कनिष्ठ वर्गातील मुलींसाठी शाळा काढली. प्रथम काही दिवस ते स्वतः शिकवीत. पुढे आपली पत्नी सावित्रीबाई फुले हिला शिकवून त्यांनी तयार केले, नंतर सावित्रीबाई त्या शाळेत मुलींना शिकवू लागली. 


या काळात फुले पतिपत्नींना अतिशय कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. उच्च वर्गातले लोक त्यांची निंदा करीत. सावित्रीबाई एक स्त्री असून स्वतः शिकली व मुलींना शिकविते म्हणून रस्त्याने जाता येताना लोक तिच्याकडे एखाद्या पापिणीसारखे बोट दाखवीत. दोघा पतिपत्नींना शिवीगाळ करत. 


अंगावर दगड विटांचा मारा करीत. कारण त्या काळात स्त्रीने शिक्षण घेऊ नये, फक्त चूल व मूल सांभाळीत राहावे असा समज होता. स्त्री शिकली तर बिघडेल, असा प्रचार केला जात असे. खरे पाहता स्त्री शिकली तर पुरुषी जुलुमाची बंधने तोडून ती स्वतंत्र होईल हीच खरी भीती लोकांना वाटत होती.


'स्त्री'ला शिक्षण देऊन आत्मोद्धार करण्याची प्रेरणा देणाऱ्या जोतीरावांनी मागास समाजासाठी दोन शाळा काढल्या. त्यांच्या या शिक्षण कार्याबद्दल १६ नोव्हेंबर १८५२ रोजी जोतीरावांचा सरकारतर्फे सत्कार करण्यात आला.


जोतीरावांच्या समाजसेवेची ही पहिली पावती होती. स्त्रियांना केवळ शिक्षण देऊन जोतीराव थांबले नाहीत. फसलेल्या, नाडलेल्या कमारीमातांचा प्रश्न जोतीरावांच्या डोळ्यापुढे उभा राहिला. कित्येक नवजात मुले कचऱ्याच्या पेट्यात टाकली जातात. 


काही देवटाच्या पायरीवर ठेवली जातात हे जोतीरावांनी पाहिले होते अशांसाठी जोतीरावांनी इ. स. १८६४ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह काढले. कुमारी मातांना आधाराचा हात दिला. त्या काळात अपमानित व उपेक्षित स्त्रियांच्या व त्यांच्या मुलांच्या रक्षणासाठी हे धाडसी प्रयत्न जोतीरावांनी केले हेच त्यांचे सामाजिक सुधारणेतले दुसरे पाऊल होय.


जोतीराव विचारवंत व क्रियाशील सुधारक होते. महारमांगांसाठी आपल्या घरापुढचा हौद खुला करणाऱ्या जोतीरावांना उच्चवर्गीय समाजाने वाळीत टाकले पण जोतीरावांनी त्याची पर्वा केली नाही. 'गुलामगिरी', शेतकऱ्याचा ‘असूड' 'इशारा' 'जातिभेद विवेकसार' वगैरे ग्रंथ लिहून जोतीरावांनी त्या काळच्या मूर्ख व दुष्ट सामाजिक रूढींवर टीकेचे आसूड ओढले आहेत. 


इ. १८७३ मध्ये तर त्यांनी 'सत्यशोधक समाज' स्थापन केला आणि हिंदू समाजातल्या अनेक अनिष्ट प्रथांविरुद्ध लोकांत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुणे नगरपालिकेत सदस्य झाल्यावरही त्यांनी हे प्रयत्न चालू ठेवले होते. या देशातील बहुजन समाज शेतकरी असून खेड्यापाड्यात राहणार आहे. त्यांचा शैक्षणिक आणि आर्थिक उद्धार झाल्याखेरीज त्यांचे अज्ञान, धर्मभोळेपणा दूर होणार नाही. 


सरकार व सावकार त्यांना फसवून लुबाडतात. हे शिक्षणाशिवाय संपणार नाही. नोकरी-चाकरीबरोबर व्यवहारज्ञान व व्यावसायिक कौशल्य यांचे शिक्षण सर्वांना द्यायला हवे असे आग्रही विचार त्यांनी केवळ पुस्तकांतून मांडले नाहीत तर ब्रिटिश सरकारला लेखी कळविले होते.


जोतीरावांना मारायला पाठवलेले दोन मारेकरी पुढे त्यांचे शिष्य झाले. शिकून मोठे झाले. यापेक्षा त्यांच्या समाजसुधारणेचा वेगळा पुरावा हवाच कशाला ? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद