मृत्यू नसता तर मराठी निबंध | mrutyu nasta tar essay in Marathi

मृत्यू नसता तर मराठी निबंध | mrutyu nasta tar essay in Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मृत्यू नसता तर मराठी निबंध बघणार आहोत.  'वाढते जनन प्रमाण व कमी होत जाणारे मृत्यूचे प्रमाण यामुळे पृथ्वीवर आणखी काही वर्षानी माणसाना राहायला जागाच शिल्लक राहणार नाही.' बातमी विचित्र होती. 


मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे, याबद्दल त्यात आनंद दिसत नव्हता. मग खरोखर अजिबातच मृत्यू नसता तर या कल्पनेने सुरुवातीलाच मी अतिशय आनंदित झालो. जीवसृष्टीचे केवढे गंडांतर टळले असते. मरणाचे भय नाही, मग भय राहिले असते तरी कोणते ? 'मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो.' 


'जन पळभर म्हणतिल' 'मरणात खरोखर जग जगते' वगैरे कविकल्पना रद्दच झाल्या असत्या. साहित्यातून मृत्यू हा विषयच बाद झाला असता. 'गॅस्ट्रोमुळे एकशे दहा लोक दगावले,' 'ब्रह्मपुत्रेच्या पुरामध्ये बुडून दोनशे माणसे मरण पावली' अशा बातम्या पुष्कळ वेळा वृत्तपत्रातून येतात. 


मृत्यू नसता तर...या बातम्यांना काही अर्थ उरला असता का ? कॉलरा, प्लेग, देवी, विषमज्वर, क्षय, धनुर्वात, पक्षाघात, अल्सर, कॅन्सर (कर्करोग) वगैरे रोगांना विचारतो कोण ? हे सर्व रोग जरी टोळधाडीसारखे एकदम तुटून पडले असते तरी प्राण जाणे शक्य नाही ! 


वैद्यराज ! डागदर साहेब....विचार करा, मृत्यू नसता तर तुमचा भाव किती उतरला असता ? रोग आहेत, पण मरणाचे भय नाही, तर रिकामे पैसे घालविणार कोण? डॉक्टर बुडाले असते तर वकीलही बोंबललेच असते. न्यायालयात गाजणारे सर्वात महत्त्वाचे खटले, म्हणजे खून खटले आणि न्यायालयातून होणारी सर्वात महत्त्वाची कडक शिक्षा म्हणजे फाशी !


पण मृत्यू नसता तर-ना खून, ना फाशी ! मग 'संध्याकाळ', 'मुंबई चौफेर' सारखी सायदैनिके मेली असती-चुकलो, त्यांनाही मरण नाहीच-ती मागे पडली असती. सा-या सनसनाटी बातम्या इतिहासजमा झाल्या असत्या. पण मृत्यू नसता तर इतिहास तरी आहे असा राहिला असता का ? 


पाटलीपुत्राच्या नंद राजापासून तो अगदी इंदिरा गांधीपर्यंतचा काळ बघा, गेल्या दोन हजार वर्षात भारतात किती घडामोडी घडल्या ? चंद्रगुप्त, सिकंदर, अशोक, कनिष्क, समुद्रगुप्त, विक्रमादित्य, हर्ष यांच्यापासून तो शिवाजी, संभाजी, बाजीराव यांच्यासकट लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं. नेहरूपर्यंत सारेच जिवंत ! 


सगळे एकमेकांना भेटले असते, फक्त गलितगात्र अवस्थेत. मग शिवाजीच्या जन्मतारखेबाबत वाद राहिला नसता व पानिपतच्या लढाईत सदाशिवराव भाऊचे काय झाले हा प्रश्न राहिला नसता. एक गोष्ट विसरलोच मी ! फक्त भारतवर्षाचाच विचार केला आतापर्यंत. पण जगाची हालत काय झाली असती ? मृत्यूचे प्रमाण काही टक्क्यांनी नुसते कमी झाले तरी लोकसंख्यावाढीबद्दल विचारवंत भीती व्यक्त करीत आहेत. 


मग मृत्यू अजिबातच नसता तर-गवताच्या माचाप्रमाणे एकावर एक गुंड्या रचतात तसे राहण्याची वेळ माणसावर आली असती. पॅसिफिक, ॲटलांटिक, आदी महासागरांत लोहस्तंभ उभारून नवी नगरे वसली असती. डोंगर, पर्वत खोदून गुहेत. पाण्याखाली, झाडांवर, (कदाचित परग्रहावर सुद्धा?) माणसे राहायला गेली असती.


आताच माणसाची अवस्था कवी मर्डेकर म्हणतात तशी पिंपातल्या उंदरासारखी किवा किडा मुग्यासारखी आहे. मृत्यू नसता तर डासांच्या अंड्यासारखी स्थिती झाली असता. माणस वाढली असती, पण माणुसकी संपली असती. मरण नसल्यामुळे बेपर्वाई वाढली असती.


परस्पर सामंजस्य, प्रेम, आपुलकी, माया, ममता या भावनाच दिसल्या नसत्या. मृच्छकटिक नाटकामधला चारुदत्त म्हणतो- दारिद्रयापेक्षा मित्रा, मरण बरे वाटते ! पण तेच नाही तर ?....एका देहातून जीव निघून दुसऱ्या देहात जाणे याचा अर्थ मरण असा असेल तर -

मृत्यू नसता तर पुनर्जन्मही नसता !

आणि कदाचित तुम्ही आम्हीही नसतो !


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद