जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध | Importance Of Sports Essay Marathi

 जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध | Importance Of Sports Essay Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध बघणार आहोत. सहामाही परीक्षा नुकतीच संपली होती. अर्थात त्यानंतर येते शाळेचे गॅटरींग म्हणजे आम्हा मुलांसाठी खेळांच्या सामन्यांची पर्वणीच! पण वर्गातील स्कॉलर्स' मात्र नेहमीच त्याबाबतीत नाक मुरडतात. 


त्यापेक्षा शाळेने जास्तीचे तास अभ्यासासाठी घ्यावेत, असा त्यांचा आग्रह होतो. पण काय जीवनात खेळांना काहीच स्थान नाही? खेळ! खेळ म्हणजे निरोगी मनाने केलेली उत्साहवर्धक, उत्स्फूर्त क्रीडा! कुठलेही हेवेदावे न करता द्वेष वा कलुषित मने मैदानाबाहेर ठेवून केलेली नियाज क्रीडा म्हणजे खेळ!


खेळ... मैदानी असोत वा बैठे! त्यांची सुरुवात कोणत्याही खेळाने होवो. भले, शाळेतील लिंबू चमच्याने का होईना, पण याच शिदोरीचा उपयोग त्याला आयुष्यभर होतो. आधी शाळा... मग कॉलेज... युनिव्हर्सिटी... राज्यपातळी... राष्ट्रपातळी... एशियाड ... ऑलिंपिक्स... असा खेळांचा चढता क्रम दिमाखात चालू राहतो.


खेळाने राष्ट्राच्या उन्नतीसाठी निर्णायक असलेली राष्ट्रीय एकात्मता, एकीची भावना निर्माण होते. बंधुत्वाची, सहकार्याची सांघिक भावना वाढीस लागते. खेळ सर्वांना बरोबर घेऊन जायला शिकवितो. खेळात बुद्धीचातुर्याचा कस लागतो. महत्त्वाकांक्षेची, शिस्तीची, ईर्येची बीजं रुजतात. 


अटीतटीत यशासाठी लढत द्यायची सवय लागते. प्रतिस्पर्ध्याला जोखून त्याप्रमाणे योजना आखता आखता माणूस मुत्सद्दी बनतो. निर्णयशक्तीबरोबर आत्मविश्वास वाढतो व व्यक्तिमत्त्व विकास होतो. आत्मबल वाढून निखळ मानसिक आनंद मिळतो. 


आनंदाची वाटणी करण्याची, दुसऱ्याला त्याचे क्रेडीट देण्याची सवय लागते, क्वचितप्रसंगी आपले म्हणणे बाजूला ठेवून, उदात्त दृष्टिकोन ठेवून पंचांचे म्हणणे मान्य करून तडजोड करण्याचीही सवय मनाला लागते. खेळातले यश म्हणजे लपंडावच. यशाने कधीच हुरळून जायचे नाही आणि अपयशाने खचायचेही नाही ही मोठी शिकवण खेळ देते.

Success should not madden you. Defeat should not sadden you.

कोत्या मनोवृत्तीला थारा न देता विशाल दृष्टिकोन ठेवण्यास खेळच शिकविते. आणखी किती फायदे सांगू! माझ्या मते खेळांशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होणार नाही, शिवाय कुणीतरी म्हटलं आहे "The life without games & sports is like the body without soul."शाळांमध्ये म्हणूनच वर्षातून दोनदा पावसाळी, हिवाळी क्रिडामहोत्सव असतो. साऱ्या जगात अनेक देश एकत्र येऊन... ऑलिंपिक नगरी वसली जाते. 


तिची तयारी २ वर्षे अगोदर सुरू असते. नुसते पुस्तकी किडा होऊन ह्या २१ व्या शतकात चालणार नाही. त्यामुळे सुदृढता अबाधित राहणार नाही. निरोगी व सुदृढ शरीर हाच खरा अलंकार आहे. शरीराबरोबरच खेळाने मनही निरोगी बनते. असे म्हटले जाते,

"A sound mind in a sound body."

मग जर खेळांना महत्त्वच दिले नाही, तर... लिटल मास्टर सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर, इंग्लिश खाडी पोहून जाणारी रुपाली रेपाळे, विम्बल्डन विजेते लिअँडर पेस व भूपती जोडी, ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद, सुवर्णकन्या पी. टी. उषा, सानिया मिर्झ, बिलियर्ड मास्टर गीत सेठी तयार होऊ शकते असते? 


आजची ऑलिंपिक कांस्य पदक मिळविणारी वेटलिफ्टर करनाम मल्लेश्वरी एका रात्रीतून उदयाला आली का? नाही. कदापि नाही. या सर्वांचे आयुष्य म्हणजे एक यज्ञच आहे! या यज्ञात त्यांनी अनेक प्रलोभनांचे हवन केलेले आहे! अनेक लोभापासून दूर राहन, शरीरसंपत्ती वाढीस लावून अथक परिश्रमानंतर हे दैदीप्यमान यश खेळानेच त्यांना दिले.


पण हल्ली वर्तमानपत्रांतून आपण काही निराशाजनक बातम्या वाचतो नि मन विषण्ण होते. काही क्रिडापटू उत्तेजक द्रव्ये घेतात. त्यातही राजकारण, अनीतीचे डावपेच शिरले आहे. एक प्रकारचे प्रदूषणच त्यात झाले आहे. क्रिकेटमधील 'मॅचफिक्सिंग' च्या प्रकरणाने तर असंख्य क्रिडा शौकिनांची हृदये शतश: विदीर्ण झाली. जी लाखो जनता या क्रीडापटूंच्या यशोशिखरापुढे लवून मानाचा मुजरा


करते तिच्या काळजात विश्वासघातकी खंजीर खुपसून काळीज रक्तबंबाळ झाले. खेळ ह्या शब्दालाच गालबोट लागले. हॅन्सी क्रोनिए अझर काळाच्या पडद्याआड गेले. दुसरी खेदाची गोष्ट म्हणजे तुलनेने एक अब्ज लोकसंख्या असलेल्या ह्या देशाची क्रीडाविषयक प्रगती इतर देशांच्या विकासाइतकी झाली नाही. हरितक्रांती, श्वेतक्रांती झाली पण क्रीडाक्रांती होत नाही, हे आपलं दुर्दैवं.


यासाठी भारत सरकारने खेळांसाठी आवश्यक पैसे, साधनसामग्री पुरवली पाहिजे. क्रीडाकौशल्यास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत. सकस आहार, प्रतिष्ठा, नोकरी यांची हमी खेळाडूंना द्यायला हवी. समानतेच्या न्यायाने गुणग्राही दृष्टीने योग्य खेळाडूचीच निवड करायला हवी. कुठलीही जात पात धर्म - धर्मनिरपेक्ष सहिष्णु भारतात पाहिली न जाता! 


आपल्यापेक्षा लहान, लोकसंख्येने कमी असलेली राष्ट्रेही भौगोलिक दृष्ट्या संपन्न भारतापेक्षा जास्त यश खेळात मिळवितात, मग आपणाला ते का जमू नये? निराशा झटकून कामाला लागले तर यशश्री नक्कीच भारताच्या गळ्यात माळ घालेल. सुवर्णकाळ येईल, सुवर्णपदकांची माला घेऊन .मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद