छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | chhatrapati shivaji maharaj nibandh in marathi

 छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | chhatrapati shivaji maharaj nibandh in marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध बघणार आहोत. 

'ऐसा पुत्र देई देवा ।

तेथे कोणा न वाटावा हेवा ।।'


असे मागणे परमेश्वराला मागणाऱ्या मातोश्री जिजाऊ होत. त्यांनी एका आदर्श राजाचं स्वप्न चितात पाहिले होते. तेच वास्तव अनुभवातून साकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 'जिचे हाती पाळण्याची दोरी, ती दोन्ही जगाते उद्धारी' या म्हणीची सत्यता खऱ्या अर्थाने जिजाऊ मातेने पटवून दिली.


छत्रपती शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे भोसले विजापूरकरांच्या आदिलशहाच्या चाकरीला होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही त्यांनी स्वतःचे राज्य निर्माण केले होते. त्यांच्याही स्वप्नात एक आदर्श राजा आणि त्याचे राज्य होते. बाल छत्रपती शिवरायांना त्यांनी ओळखलं. 


दादोजी कोंडदेवासारख्या द्रष्ट्या गुरूचा सहवास नि मातोश्री जिजाऊ मातेचा सहवासात शिवाजी राजे घडले. बालशिवाजीला मातोश्री जिजाऊ रामायण, महाभारतातल्या शौर्याच्या, धाडसाच्या गोष्टी सांगून त्यांचे मन तयार करत होत्या तर दुसरीकडे न्याय, निर्णय, दंडनिती, माणसांची ओळख, सामान्य लोकांचे दुःख, रंजल्या गांजलेल्यांना पोटाशी कवटाळण्याचा तारक मंत्र दादोजी देत होते. यांच्या सहवासातून राजे घडत गेले.


‘लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात' तशी कांती गुणग्राहकता राजाच्या अंगी आहे हे जिजाऊने ओळखले अन्यायाची चीड, शिस्तप्रियता, न्यायप्रियता, प्रसंगावधान, समाजप्रियता, गुणग्राहकता इत्यादी राजाला आवश्यक असलेल्या गुणांचा संस्कार आणि विकास होऊ लागला. बालशिवाजी हळूहळू जाणते राजे होऊ लागले. 


वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधण्याचा संकल्प सोडला. आपल्या अंगी असलेला असामान्य पराक्रम नि धाडस यांच्या बळावर आदिलशाही नि मोगलशाही हादरवून सोडली. छत्रपती शिवाजी राजांचे कर्तृत्व तळपणाऱ्या तेजःपुंज सूर्याप्रमाणे होते. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या राजांचे दर्शन शिवनेरीला झाले.


परकीय आक्रमणाने त्रस्त झालेली जनता, उद्ध्वस्त झालेला भाग याचा कायापालट होण्यास वेळ लागला नाही. मावळप्रांतात शहाजी पुत्राबद्दल आपुलकी प्रेम व आदर वाढण्यास वेळ लागला नाही. त्या मुलखात अरेरावी करणाऱ्या बादल-देशमुखांना कठोर शासन केल्याने सर्वसामान्य लोकांमध्ये राजाबद्दल त्याच्या न्यायवृत्तीबद्दल दिलासा आणि आनंद वाटू लागला. 


संपूर्ण मावळप्रांतात राजाचा दरारा निर्माण झाला. शिवाजी राजे प्रजाहितदक्ष राजे होते. त्याबरोबरच ते धर्मनिष्ठ होते. परकियांनी उद्ध्वस्त केलेल्या जीर्ण, शीर्ण उद्ध्वस्त मंदिराचा त्यांनी उद्धार केला. एवढेच नव्हे तर पुरोहितांना त्यांच्या कामाप्रमाणे वेतन मंजूर केले.


परस्त्रियांना त्यांनी मातेच्या ठिकाणी मानले. कल्याणच्या सुभेदाराची सून कल्याण लुटत असताना शिपायांच्या हाताला लागली तिचा बहिणीप्रमाणे सन्मान करून तिच्या घरी सन्मानाने पाठविले, दुसरे रायगडावरील कठिण कडा बाळाच्या ओढीने उतरणारी असामान्य धाडस करणारी स्त्री ‘हिरकणी' तिच्या असामान्य धाडसाचे कौतुक करून तिला साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला. त्या बुरुजाला 'हिरकणी बुरुज' असे नाव देऊन गौरव केला.


चांगला प्रशासक होण्याला अनेक गुणांचे वरदान राजाला मिळाले होते. माणसांची पारख, गुणग्राहकता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक चांगला विशेष होता. राज्य उभे करण्यासाठी जी अनेक माणसे त्यांनी मिळविली, हा हा म्हणता जोडली ती याच गुणांमुळे.


ज्यांचे रयतेवरील प्रेम, प्रजा निष्ठा, न्यायव्यवस्था, अष्टप्रधान मंडळ, माणसे ओळखण्याची गुण ग्राहकता, कुशल प्रशासक, जनतेला अभय देणारा राजा या सर्व गुण वैशिष्ट्यावरून तो एक जाणता राजा होता असे म्हणावे लागेल. 'झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु परंतु या सम हा'. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद