गौतम बुद्ध मराठी निबंध | Gautam Buddha Marathi Nibandh

 गौतम बुद्ध मराठी निबंध | Gautam Buddha Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गौतम बुद्ध मराठी निबंध बघणार आहोत. बौद्ध धर्माचे थोर संस्थापक भगवान बुद्ध यांचा जन्म कपिलवस्तु येथे राजा शुद्धोधन व राणी माया यांच्या पोटी झाला. ते शाक्य राजघराण्याचे राजपुत्र होते. राजपुत्राच्या पहिल्या वाढदिवसालाच ज्योतिषांनी भविष्यवाणी वर्तवली की हा मुलगा मोठेपणी मोठा संत होईल. 


म्हणून राजाने त्याच्यासाठी राजवाड्यातच सर्व सुखसोयींची तरतूद केली. त्याला कधीही बाहेर जावे लागू नये व कोणतेही दुःखद दृश्य दिसणार नाही याची सोय केली. तरुण होताच राजपुत्र सिद्धार्थचा विवाह राजकुमारी यशोधराशी करुन दिला गेला. त्यांना एक पुत्रही झाला, त्याचे नाव राहुल असे होते.


राजपुत्र सिद्धार्थ एके दिवशी शहराचा फेरफटका मारत असताना त्याला एक प्रेतयात्रा दिसली. आपल्या सारथ्याजवळ त्याने हे काय आहे असे विचारताच सारथ्याने प्रत्येक जीवंत व्यक्ती मरते व मृत्युनंतर ती स्वर्गात किंवा नरकात जाते असे सांगितले. 


पुढे काही अंतरावर एक वृद्ध मनुष्य व एक अत्यंत आजारी मनुष्य दिसला. ही सर्व दृश्ये पाहिल्यांवर राजपुत्राच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलली. तो विचार करु लागला की आपण अशा एका जगात रहातो आहोत जे दुःख आणि काळज्या, चिंता यांनी भरलेले आहे.


जन्म, वृद्धावस्था व मृत्युचा फेरा कोणालाच चुकत नाही. मग या सर्व ऐषोआराम व सुखसोयींचा उपयोग काय? जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली व एके दिवशी पत्नी, पुत्र व राजघराण्याचा त्याग करुन ते निघून गेले. 


घर-दार सोडून सुख 'शांतीच्या व सत्याच्या सोधात ते अनेक वर्ष फिरत राहीले. त्यानंतर निरंजना नदिच्या किनारी बसून त्यांनी घोर तपश्चर्या केली. पुढे बुधगया येथे बोधी वृक्षाच्या छायेखाली समाधी लावून बसलेले असतांना त्यांना दिव्यज्ञान झाले. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांना सत्याचा शोध लागला. त्यानंतर ते महात्मा बुद्ध या नावाने ओळखले जाऊ लागले.


सारनाथ व काशी याठिकाणी त्यांनी सर्वप्रथम लोकांना उपदेश केला. लाखो लोक हळूहळू त्यांचे अनुयायी बनले. त्यांनी लोकांना पंचशील तत्व सांगितली, ही पाच तत्त्वे होती- हिंसा करु नका, चोरी करु नका, खोटे बोलू नका, मद्यपान करु नका व नेहमी सत्याचे पालन करा. 


आपले सर्व आयुष्य त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात घालविली. त्यांच्या मते मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे. गौतम बुद्ध हे भारतातील एक थोर संत होते. अशा या महात्म्याचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथे निधन झाले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद