अपंग तरुणाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Marathi Essay on "Autobiography of a Handicapped Person

 अपंग तरुणाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Marathi Essay on "Autobiography of a Handicapped Person 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  अपंग तरुणाचे आत्मवृत्त  मराठी निबंध बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो! आज तुम्ही अपंगदिनानिमित्त माझा सत्कार करण्यासाठी मला येथे बोलावलेत याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आत्तापर्यंतच्या भाषणात. सर्वांनीच माझ्या जिद्दीची, माझ्यातील कलाकाराची तारिफ केली, पण त्याही पलिकडे जाऊन मी आज तुम्हाला माझी जीवनकहाणी ऐकवणार आहे. 


मी खर म्हणजे जन्मत: अपंग नव्हतो. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत मी ही तुमच्या सारखाच एक आनंदी, दंगा-मस्ती करणारा, शाळेत जाणारा मुलगा होतो. पण एके दिवशी रस्ता ओलांडतांना एका वाहनाची धडक बसली आणि माझे दोनही पाय कायमचे अधू झाले. 


नशीबी ही चाकाची गाडी आली. अपघातानंतर अनेक दिवस मी हॉस्पिटल मध्ये होतो. अनेक उपचार, औषधे, शस्त्रक्रिया झाल्या पण माझे पाय काही नीट झाले नाहीत. घरी आल्यावरही प्रत्येक गोष्टीसाठी आई-बाबांवर अवलंबून रहावे लागायचे. 


क्रिकेट खेळायला जाता येत नाही यामुळे मी खूप चिडचिड करायचो. या अपघातामुळे शाळाही बुडली. माझ्या बरोबरीची इतर मुले पुढल्या वर्गात गेली त्यामुळे शाळेत जायचीही इच्छा नसायची. वाटायचे, हे सर्व माझ्याच बाबतीत का?


पण माझ्या आईने या काळात मला अतिशय काळजीने, प्रेमाने वाढवले. माझ्या मनात जिद्द पेटवली. मला माझी लहानसहान कामे स्वतःहून करण्याची सवय लावली. तिने घरीच राहून माझा अभ्यास करवून घेतला व परिक्षेला बसविले. आश्चर्य म्हणजे मी चांगल्या मार्कांनी पास झालो व परत चौथ्या इयत्तेत शाळेत दाखल झालो. 


शाळा, अभ्यास, नवे मित्र यामुळे मी माझे अपंगत्व विसरलो. पुढे आईने माझ्यातील चित्रकाराचे गुण हेरले व माझ्या कलेला प्रात्साहन दिले. दहावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळवून पास झाल्यानंतर मी चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आलो. आज मी अभिमानाने सांगू शकतो की मी एक यशस्वी चित्रकार आहे. 


माझ्या चित्रांना देश-विदेशातून मागणी असते. मोठमोठी चित्रप्रदर्शने मी भरवित असतो. मी एका अपंगांच्याच शाळेत चित्रकला शिक्षक आहे. या सर्व प्रवासात माझी आई खंबीरपणे माझ्या मागे उभी राहीली. माझे बाबा व चित्रकलेच्या गुरुंनीही मला मोलाची साथ दिली. 


या सर्वांमुळेच मी आज तुमच्या समोर उभा आहे. मी अतिशय सुखात आहे, आनंदात आहे. माझी एकच विनंती आहे की आम्हा अपंगांना कमी लेखू नका. आम्हीही इतर धडधाकट लोकांप्रमाणे सक्षम आहोत. आमची कीव करण्याऐवजी आमच्यावर प्रेम करा व सहानुभूतीने वागा. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद