गरिबी एक शाप मराठी निबंध । Garibi Ek Shaap Marathi Nibandh

 गरिबी एक शाप मराठी निबंध । Garibi Ek Shaap Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  गरिबी एक शाप या विषयावर माहिती बघणार आहोत. कोणत्याही विकसनशील राष्ट्रासाठी गरीबी हा शाप आहे. आधुनिक भारत आज याच शापाला तोंड देत आहे. भारताच्या नवानिर्मिती प्रक्रियेमध्ये गरिबीमुळे बाधा उत्पन्न होते. उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या साधनांचा अभाव गरिबीमुळे निर्माण होतो. 


भारतात आज ही ४० टक्के जनता गरीब आहे. गरिबी म्हणजे अशी आर्थिक स्थिती ज्यात व्यक्ती जगण्यासाठी मूलभूत साधने मिळविण्यात असमर्थ ठरते. गरिबी माणसाला अज्ञानी बनविते. त्याला खऱ्याखोट्यातील अंतर कळत नाही. आपल्या जिवाचे रक्षण करणे एवढे एकच ध्येय गरिबापुढे असते. 


आपल्या समाजात निर्धन माणसाचा आदर कुटुंब किंवा समाजं कुणीच करीत नाही. भारतात राजकीय कारणांमुळे गरिबी आहे. आपल्या २०० वर्षांच्या राजवटीत ब्रिटिशांनी भारताचे शोषण केले. त्यांच्या नीतीमुळे भारतीय उद्योगधंदे नष्ट झाले. शेती विकासाकडे लक्ष दिले गेले नाही. 


वेगवेगळ्या मार्गांनी त्यांनी भारतातील संपत्ती लुटून इंग्लंडला नेली व जाताना आपल्या हातात गरिबीची झोळी दिली. याखेरीज अशिक्षितपणा, रुढीप्रियता, अंधविश्वास, सामाजिक रीतिरिवाज, अज्ञान, दैववादी वृत्ती यामुळे भारतीय गरीब होत आहे.


भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याजवळ त्याचा व त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होऊ शकेल एवढी जमीन नाही. शेतीकाम पण वर्षभर चालू नसते. परिणामी त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. त्याला सहा महिने तरी बेकार राहावे लागते. 


वाढत्या लोकसंख्ये मुळे महागाई वाढली व पर्यायाने गरीबीही. वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे भारतात गरीब निर्माण झाले. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे बेरोजगारी वाढली. शेतीवर लोकसंख्येचा जास्त भार पडला. त्यामुळे दरडोई उत्पन्न कमी झाले. 


भारतातील गरिबीचे आणखी एक कारण आहे. उत्पन्नाचे असमान वितरण. देशातील एकूण उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा मूठभर भांडवलदारांच्या हातात केंद्रित झाला आहे. तर बहुतांश लोक गरिबीत जीवन जगत आहेत.


गरिबी दूर करण्यासाठी सरकारने पंचवार्षिक योजना सुरू केल्या. मागासलेल्या वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारने आर्थिक मदत केली. त्यामुळे ते आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील. शिकलेल्या तरुणांना बँकेद्वारे कमी व्याजावर कर्ज दिले जाते व त्यांना स्वयंरोजगारासाठी उद्युक्त केले जाते. रोजगार वाढला की गरीबीही दूर होईल.


गरिबीतून सुटका करण्यासाठी सर्वप्रथम लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उत्पादन वाढविणे, भांडवलवृद्धी, उत्पन्नाचे समान वितरण, आर्थिक योजनांद्वारे आर्थिक विकास होईल. जर आपण या योजनांचा योग्य प्रकारे उपयोग केला तर एक दिवस आपण सगळे संपन्न बनू. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला दारिद्यरेषेच्या वर आणून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू. मित्रांनो तुम्‍हाला हा लेख कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद .