नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi

 नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi:  मुंबईहून पुण्याकडे परतत होतो. पुणे जवळ आल्याच्या खुणा दिसत होत्या. आता आपल्या आवडत्या नदीचे आपल्याला दर्शन घडणार असे वाटू लागले. नदीजवळील परिसरातून आम्ही जात होतो; पण नदी दिसत नव्हती. एवढी मोठी नदी हरवली होती, अगदी चक्क गायब झाली होती.कारण त्या नदीच्या संपूर्ण पृष्ठभागावर ‘पाणवनस्पती' उगवली होती. अनेकदा या वनस्पतीविषयी मी वर्तमानपत्रात वाचले होते, पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरत असेल अशी कल्पना नव्हती. नदीला काय वाटत असेल बरं! नदी बोलू लागली तर...



...तर ती नक्कीच मानवाला दोष देईल. या नदीने माणसाला काय दिले नाही? कुठल्यातरी डोंगरकपारीतून ती वाहत येते ती कशासाठी? आपल्या मानवपुत्रांना जीवन देण्यासाठीच ना! 


nadi bolu lagli tar essay in marathi
nadi bolu lagli tar essay in marathi



ती जीवन देते आणि माणसाचे जीवन फुलते. मानवी संस्कृतीचा इतिहास काय सांगतो? पूर्वीच्या काळी नदीच्या काठीच तर गावे वसत होती, मानवी संस्कृतीचा विकास होत होता. म्हणून तर प्राचीन काळापासून नदयांना 'लोकमाता' म्हणून संबोधिले जाते. या नदया आपल्या काटांवर सुपीक माती, गाळ टाकून शेतीसाठी उत्कृष्ट भूमी निर्माण करतात. या सरितेमुळेच माणसाची तहान भागते, शेते पिकतात, द्राक्षांच्या बागा फुलतात. आपल्याजवळ जे जे आहे ते दुसऱ्याला देत जा, हाच संदेश सांगत ही आपला सतत मार्गक्रमण करीत असते. 



वर्षाऋतूकडून मिळालेल्या जलाचा लोढा घेऊन येणाऱ्या या तटिनीला माणसाने अडविले, मोठमोठ्या भिती बांधून तिचा प्रवाह थांबविला, तरीही ही सरिता रागावली नाही. तिने माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. त्यांच्यासाठी तिने कड्यावरून उड्या घेतल्या, बोगदयातील काळोखातून ती धावली. तिच्या पाण्यावर माणसाने वीज निर्माण केली. त्यामुळे त्याचे घर प्रकाशाने उजळून निघाले, कारखान्यातील यंत्रे फिरू लागली. माणसांचे जीवन अधिक संपन्न, समृद्ध झाले. नदी आपल्या पाण्यातील मासे देऊन माणसाच्या जेवणाची लज्जतही वाढवीत होती.


आम्ही माणसे मात्र हे सारे विसरलो. मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या मुलांना विचारले, “तुम्हांला पाणी कोठून मिळते?" तर ती सांगतात, “नळांतून.” अशा त-हेने आपल्याच कामात सदा गुंतलेल्या माणसाला या लोकमातेची आता आठवणही राहिलेली नाही. आपल्या गावातील सारी घाण आणून तो नदीत सोडतो, मोठमोठे कारखानदार आपल्या कारखान्यांतील दूषित पाणी नदीत आणून सोडतात. साखरेच्या कारखान्याची मळी पाण्यात सोडली जाते. अशावेळी नदीला केवढे दुःख होत असेल! तिला बोलता येत नाही. अगदीच भावना अनावर झाल्या तर ती बेफाम होते आणि मग गावेच्या गावे उद्ध्वस्त करीत जाते.


या नदीला बोलता आले तर ती प्रथम या द्वाड माणसाचे कान पकडून म्हणेल, "अरे उद्दामांनो, तुम्हांला काही अक्कल आहे का? तुम्ही माझ्या पाण्यावरून भांडणे करता. राज्याराज्यात माझ्या पाण्यावरून आज भांडणे पेटली आहेत. आता भारत आणि बांगलादेशातही पाण्याचा वाद सुरू झाला आहे. माझे पाणी म्हणजे तुम्हा सर्वांचे जीवन. ते भरभरून घ्या आणि हसत हसत जगा; आणि हो, जरा माझी स्वच्छताही ठेवा. अरे बाळांनो, माझ्याकडे पाण्याचा साठा उदंड आहे. ते कोणालाच कमी पडणार नाही. यास्तव तुम्ही भांडणे थांबवा व सुखाने जगा."
वरील निबंध नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevhaessay in marathi : विदयापीठाच्या वनस्पतिविभागाने भरविलेले ते एक प्रदर्शन होते. विश्वातील सर्व वृक्षवेलींची ओळख आपण या प्रदर्शनात करून दिली आहे, असा प्रदर्शन-नियोजकांचा दावा होता. म्हणून मी पुनः पुन्हा फिरून ते प्रदर्शन पाहत होतो. शेवटी एका संयोजकाचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्याने मला विचारले, “आपणाला काय हवे आहे?"


मी मुळातच गोंधळलेलो होतो त्यात या प्रश्नाने अधिकच भर पडली आणि मी त्याला सांगितले, “मला कल्पवृक्ष हवा आहे, मला कल्पवृक्षाखाली बसायचे आहे." क्षणभर तो व्यवस्थापक गोंधळला; पण तो बराच चलाख असावा. लगेच सावरून तो म्हणाला, "चला, मी तुम्हांला कल्पवृक्ष दाखवतो." मग आम्ही दोघेजण त्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या टोकाला गेलो. तेथे लोकांची गर्दी मुळीच नव्हती. अगदी कडेला एक बुटकेसे डेरेदार झाड होते, त्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, “हा पाहा कल्पवृक्ष. आता तुम्ही याचे निरीक्षण करा. मी येतो हं, मला दुसरे काम आहे."
mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi
mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi


त्या निर्जन भागात आता मी एकटाच होतो. दूरवर माणसांचे आवाज ऐकू येत होते; पण मी होतो त्या भागात माणसांचीच काय ; पण पक्ष्यांचीही चाहूल ऐकू येत नव्हती. त्या क्षणी मला हसू आले. या सर्वांना या कल्पवृक्षाची व त्याच्या सामर्थ्याची कल्पना नसावी बहुतेक. असे वाटले आणि मी विचार केला-चला, आपण तरी आपली अनेक वर्षांची मनीषा पूर्ण करून घ्यावी. झाड जरा खालच्या बाजूला होते, तेव्हा तेथे उतरून झाडाखाली बसावे असे मी ठरविले. म्हणून मी थोडे खाली उतरलो. पण तेवढ्यात मनात आले की प्रथम आपण हे निश्चित करू या, की कल्पवृक्षाखाली बसून काय मागायचे?


हो, उगाचच काही चुकीचे मागितले तर शेवटी आपल्यालाच पश्चात्ताप करायची वेळ यायची. तेव्हा आधी पूर्ण विचार करून ठरवावे आणि मगच मागणी करावी. काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे? खूप पैसा मागावा का? हो, कारण पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. कारण ‘सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते', असे विद्वानांनी म्हटलेच आहे. तेव्हा ठरले, कल्पवृक्षाला सांगावे की, कधीही संपणार नाही इतकी संपत्ती दे. पण ही एवढी संपत्ती आपण घरी कशी नेणार? आणि घरी तरी कोठे ठेवणार?


एकदम एवढा पैसा आला की लोकांच्या डोळ्यांत भरणार. लोक समजतील की आपण काही तरी अनैतिक मार्गाने हा पैसा मिळविला. शिवाय 'इन्कम टॅक्स' वाले पिच्छा पूरवतील आणि सर्वांत मोठी भीती म्हणजे चोरांची. चोरांमूळे या पैशापायी प्राण गमवावे लागतील. मग काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे?

विदया मागावी का? कोणत्या शाखेतील पदवी मागावी? कला, शास्त्र की व्यापार? कोणती पदवी मागावी? एम्. ए., एम्. एस्सी., एम्. कॉम., पीएच्. डी., डॉक्टर की इंजिनीअर? पण कल्पवृक्षाकडून मिळविलेल्या या पदवीचा आपण उपयोग करू शकू का? लोक विश्वास ठेवतील का आपल्यावर? डॉक्टर झालो तर आपण रुग्णांवर औषधोपचार करू शकू का? असे एक ना अनेक प्रश्नांचे मनात काहूर माजले, पण त्याच क्षणी माझे सुसंस्कारित मन आक्रंदून उठले. छे, छे; हे बरोबर नाही. कष्टाविना विदया साध्य होणे शक्य नाही. ती विदया, विदया नव्हेच, ते ज्ञान, खरे ज्ञानच नव्हे. कल्पवृक्षाजवळ काय मागावे? हा प्रश्न अदयापि सुटलाच नव्हता.


यापूर्वी होऊन गेलेल्या मोठमोठ्या लोकांनी काय मागितले होते त्याची मला आठवण झाली. मोरोपंतांनी देवाला प्रार्थिले, 'सूसंगती सदा घडो.' ज्ञानदेवांनी पसायदान मागितले-'जो जे वांच्छील, तो ते लाहो प्राणिजात.' मग आपण काय मागावे? कशी कोण जाणे, मला भोवतालची जाणीव झाली. सर्वत्र अंधार पडला होता. दूरवर येणारा माणसांचा आवाजही बंद झाला होता. बहतेक प्रदर्शन बंद झाले असावे. किर्रऽऽ असा रातकिड्यांचा आवाज येत होता. मी घाबरून पटकन कल्पवृक्षाखाली गेलो आणि म्हटले, “मला आता घरी पोहोचव." दुसऱ्या क्षणी मी माझ्या घरी होतो.


वरील निबंध मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi

झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi


झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi : एकदा काय गंमत झाली, आमच्या अकरा मजली उत्तुंग ‘गिरनार'जवळची झोपडपट्टी बोलू लागली. अहो, अगदी चक्क एखादया फडा वक्त्यासारखी ती आपले विचार मांडू लागली. वेळ होती रात्रीची. 'गिरनार' अगदी शांत झोपला होता-मऊ, मऊ फोमच्या गादयांत गोड गुलाबी स्वप्ने पाहत. त्याला कशाचा पत्ताच नव्हता. 


'गिरनारची' श्रीमंत शेजारीण 'उषाकिरण'सुद्धा अगदी रम्य, तरल स्वप्नात गुंग होती. जागी होती फक्त त्या दोन उंच इमारतींमधील झोपडपट्टी आणि जागा होता समोरचा अथांग निळा सागर. तो सुद्धा आपला नेहमीचा खळखळाट थांबवून शांतपणे त्या झोपडपट्टीचे गा-हाणे ऐकत होता. कारण कधी नव्हे ती झोपडपट्टी बोलत होती.
तिचा स्वर अगदी धीरगंभीर होता. तिच्या वयाचा विचार केला तर ती जरा अधिकच पोक्त वाटत होती. नाहीतरी संकटे कोसळली की अनुभवाने सर्वांनाच अकाली प्रौढत्व येते.


zopadpatti bolu lagte tevha essay in marathi
 zopadpatti bolu lagte tevha essay in marathi


 या झोपडपट्टीचे तसेच झाले होते. बरेच दिवस मनात साचलेली 'दु:खे' तिला आता कुणाला तरी सांगायची होती. तिने गिरनारला हाका मारल्या तेव्हा उषाकिरण जागी झाली आणि नवलाईने ऐकू लागली. “अरे गिरनार, तू आणि तुझी मैत्रीण उषाकिरण, माझ्याकडे तिरस्काराने बघता. माझ्या ओंगळ रूपामुळे तुमचे सौंदर्य डागाळते असे तुम्हांला वाटते. पण, तुमचा हा उलटा न्यायच नाही का? अरे सांगा, या जागेवर आधी कोण होते, तुम्ही की मी? माझीच जागा बळकावून तुम्ही मला दूर करू पाहता.


 कोठे जातील ही गरीब माणसे आणि त्यांची कच्चीबच्ची? तुमच्या मोठमोठ्या फ्लॅट्समध्ये जेवढी माणसे राहतात त्याच्या दसपट माणसे एका एका झोपडीत राहतात. रात्री झोपताना पाहावे तर एकाच्या अंगावर दुसऱ्याचे पाय ; तुमच्याकडे मात्र प्रत्येकाला स्वतंत्र खोली. तुम्ही माणसे आणि तीही माणसेच ना! मग हा फरक का? तुमच्याजवळ जे अवयव आहेत, तेच त्यांच्याजवळ. शक्तिसामर्थ्याबद्दल बोलायचे झाले तर कदाचित ती माणसे तुमच्यापेक्षा वरचढ ठरतील! मग हा भेदभाव का? पुरेसे अन्न नाही, चांगले कपडे नाहीत. चैनीच्या गोष्टी नाहीत. कारण त्यांच्याजवळ दामाजीपंतांचा अभाव आहे. तुम्ही मात्र स्वतःच्या गरजेपेक्षा अवास्तव पैसा बळकावून बसला आहात.



तुम्हांला माझे रूप ओंगळ वाटते. पण याला जबाबदार कोण? येथे राहणाऱ्या हजारो माणसांना का स्वच्छ जीवन आवडणार नाही! पण साधे पाणी तरी त्यांना पुरेसे मिळते का? तुला आठवते ती पु. लं. ची 'फुलराणी' रंगमंचावर काय सांगत होती? 'म्युनिसिपालटीचा मोठा नळ फुटतो तेव्हा आमची आंघोळ.' एवढ्या लहानशा जागेत हा माणसे आपले सर्व विधी उरकतात. मग घाण नाही का होणार?



 त्यांची दुःखं तरी किती अगणित. त्यामुळे ते मदयाला जवळ करतात. तर तुम्ही त्यांना त्यासाठी बोल लावता. पण तुमचे फ्रीज-कपाटांचे चोरकप्पे उघडा. तेथे काय आढळते? परक्या देशातील चोरट्या वाटेने आलेल्या मदयाच्या बाटल्या. तुमचे जीवन सुखी व्हावे यासाठी ही माणसे राबतात. या माणसांच्या श्रमांवरच तुम्ही तुमचे सुखी जीवन उभारलेले असते. पण त्यांचे जीवन साधारण सुसहय व्हावे एवढेही तुम्ही पाहत नाहीत. उलट आम्ही म्हणजे या झोपडपट्ट्या आणि त्यांतील माणसे यांचे खरेखोटे जीवन तुम्ही तुमच्या साहित्यात रंगवता आणि मानवतेचा पुळका आल्याचे भासवून पडदयावरही त्याचे अवास्तव चित्रण करता. पण एक लक्षात ठेवा,


 अनंत काणेकरांनी सांगितलंय त्याप्रमाणे ‘याच माणसांजवळ मोठं मन आहे, माणुसकी आहे.' झोपडपट्टी गप्प झाली, ती थकली होती; पण आता तिला हलके वाटत होते. 'गिरनार' शांत होता. सागर मात्र खवळला होता. वरील निबंध झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi :  “मित्रांनो, या तुमच्या समारंभात आज मला भाषण करण्याची संधी हवी आहे. मला ओळखलेत ना तुम्ही ! अहो, तुमच्या या समारंभातील मी सम्राज्ञी आहे. आज दोन दिवस येथे हे प्रदर्शन चालू आहे. या गुलाबपुष्प प्रदर्शनातील सम्राज्ञी ठरलेली मी एक गुलाबकळी. या प्रदर्शनात मी पहिला क्रमांक मिळविला आहे. तो मान तुम्हीच मला दिलात. हजारो फूलांतुन माझी निवड  झाली आहे. त्या निमित्ताने माझ्या मालकिणीचाही गौरव झाला आहे.


“माझ्या मालकिणीचे श्रेय मी मान्य करतेच. कारण तिने घेतलेल्या निगराणीमुळेच मलो आजचे हे सौंदर्य प्राप्त झाले आहे. दिवसातील बराच वेळ ती आमच्यासाठी खर्च करते. त्यासाठी ती बरेच वाचन करते, संशोधन करते आणि त्यामुळेच अनेकदा माझ्या मालकिणीला गुलाबपुष्प प्रदर्शनात बक्षिसे मिळतात. तिचा छंद आज तिचा ध्यास झाला आहे.



Gulab Fulache Manogat Essay In Marathi
Gulab Fulache Manogat Essay In Marathi


“आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. आम्हां गुलाबपुष्पांचा जन्म माणसाच्या जन्मापूर्वीच झालेला आहे. तसे संदर्भ आढळतात. पण आमची निश्चित जन्मभूमी कोणती हे मात्र कुणाला सांगता येत नाही, तरी प्राचीनकाळी रोम हे गुलाबांच्या बागांसाठी विख्यात होते. दहाव्या शतकात अरबांनी आम्हांला भारतात आणले. तुमच्या प्राचीन वाङ्मयात आम्हांला अनेक नावांनी संबोधिलेले आहे. त्यांतील एक नाव आहे 'तरुणीपुष्प.'


 किती यथार्थ नाव आहे हे! तरुणतरुणींत मी विशेष प्रिय आहे. एकमेकांच्या प्रेमाचे प्रतीकच ते मला मानतात. मोगल राजांच्या काळात आमची लोकप्रियता विशेष वाढली. जहांगीर बादशहा ब बेगम नूरजहान यांच्या विवाहप्रसंगी आमच्यापासून प्रथम अत्तर तयार करण्यात आले.

“आज आमच्या हजारो जाती तयार करण्यात आल्या आहेत. पण सर्वच जाती सुगंधी नाहीत. नाना आकार, नाना रंग. मित्रांनो, आजवर आम्हांला अनेक गौरव लाभले. पंडितजींच्या कोटावरील लाल गुलाब हा विश्वप्रेमाचा संदेश देत होता. आज गुलाबपुष्पांचा छंद विश्वव्यापी झाला आहे. त्यामुळेच जगभर ठिकठिकाणी आमची प्रदर्शने भरविली जातात.


“या सगळ्यात एक खंत आहे की हे माझे वैभव फक्त काही मूठभर लोकांचीच मिरासदारी झाली आहे. गुलाबाचा छंद जोपासणे म्हणजे चिक काम आहे. त्यामुळे गोरगरीब याकडे वळतही नाहीत. कालपासून मी पाहते, एवढी मंडळी माझे सौंदर्य पाहून गेली पण त्यांत एकही श्रमिक नव्हता, झोपडपट्टीतील एकही मूल नव्हते.


 मी मान्य करते की माझ्यासारखी फुले देणारी झाडे ते लावू शकणार नाहीत पण या प्रदर्शनातील हजारो फुलांचे अनुपम सौंदर्य ते आपल्या डोळ्यांनी लुटू शकणार नाहीत का? हा आगळा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. दोन दिवस हे प्रदर्शन तिकिट लावून झाले. आता एखादा दिवस विनातिकिट हे प्रदर्शन ठेवले तर चालणार नाही का? भाकरीमागे धडपडणाऱ्या मंडळींना मुद्दाम येथे आणले तर ... तरच माझ्या या अल्पायुषी जीवनाचे खरे सार्थक होईल.”


टीप : वरील निबंध गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते


  • fulache manogat nibandh marathi
  • fulanchi atmakatha nibandh in marathi
  • fulanchi atmakatha essay in marathi language
  • fulache atmavrutta essay in marathi language
  • fulache atmakatha essay in marathi

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या) मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi

गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध 



मी गावकुसाबाहेरची वस्ती आहे' “पाहुण्यांनो, क्षणभर थांबा. नाकावर रुमाल ठेवून तुम्ही येथून झपाझप जात आहात. पण थांबा. मला तुमच्याशीच बोलायचे आहे. इतका वेळ तुम्ही गावाची प्रशंसा करीत होता. पण आता मला पाहुन नाक मुरडता. किती कृतघ्न आहात तुम्ही! 'गाव तिथं महारवाडा असायचाच' असे तुम्ही उपेक्षेने म्हणता. पण खरं सांगू का, हा महारवाडा आहे म्हणूनच गाव एवढा स्वच्छ आहे. गावातला केरकचरा हा महार गोळा करून आणतो. मेलेले ढोर हा मांग ओढून आणतो. या वस्तीतील ही सारी मंडळी गावासाठी राबत असतात आणि त्याबद्दल या लोकांना काय मिळते? तर केवळ शिव्याशाप.


"निसर्गाने सर्वांसाठी भरभरून दिलेले पाणीही या लोकांना मिळत नाही. तहान भागायची मारामार, मग त्यांनी स्वच्छ तरी कसे राहायचे? यांची पोटे तर सदा रिकामीच. मग जे काही मिळेल ते खायचे. 'शिळेपाके, आंबलेले' या शब्दांशिवाय दुसरे शब्द त्यांना माहीतच नाहीत. कष्टांशिवाय ‘कचाकचा भांडायचे' एवढीच त्यांची दुसरी करमणूक. कोणत्याही रोग-साथीला ही वस्ती प्रिय, मग फटाफट मृत्यू. नव्या जन्माचा आनंद नाही. मृत्यूचा शोक नाही. आनंद-शोक करायला येथील माणसांजवळ वेळ आहे तरी कुठे?

gavakusabaheril vastiche atamrutta essay in marathi
gavakusabaheril vastiche atamrutta essay in marathi


“आता हे गावकुसाबाहेरील जगही जागे व्हावयास लागले आहे. येथील काही मुले शहरात जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यांच्यातला माणूस जागा झाला आहे. ते आपल्या लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊ लागले आहेत. गावाने दिलेले फाटके कपडेच तराळाने घातले पाहिजेत, नवीन कोरे कपडे अंगावर चढवायचे नाहीत, ही वर्षानुवर्षे चालत आलेली समजूत ते पुसू पाहत आहेत.


 ग्रहणाच्या वेळी 'दे दान सुटे गिराण' म्हणून दान मागायचे नाही अशी शिकवण ते आपल्या लोकांना देत आहेत. त्यांच्यातील भटक्या लोकांच्या मुलांना स्थिर जीवन लाभावे म्हणून त्यांची खटपट चालू आहे. त्यासाठी आता येथे शाळा पण सुरू झाली. गावातील विहिरीवर ते आपला हक्क आता संगू लागले आहेत. गावकऱ्यांना हे कसे रूचणार? मग ते म्हणतात-'म्हारडा मातला आहे.' कधी कधी मला पेटवून दिले जाते. मारझोड तर नित्याचीच. पण लक्षात ठेवा, आता मी ऐकणार .... वर्षे तुम्ही मला गावाबाहेर ठेवलेत, पण आता येथेही नवे गाव वसणार आहे."




वरील निबंध गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध | Gavakusabaheril Vastiche Atamrutta Essay In Marathi


आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध

आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi : स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या समाजावस्थेत जेव्हा एखादा अगतिक माणूस आदर्श शोधत हिंडायला लागतो तेव्हा वर्तमानकाळात तर त्याची पूर्ण निराशा होणे स्वाभाविकच आहे. परंतु जेव्हा का तो गेल्या शतकाचा वेध घेऊ लागतो, तेव्हा त्याला हिमालयासारखी उत्तुंग अशी अनेक व्यक्तिमत्त्वे भेटतात आणि मग अशा या अगतिक माणसाचे मन "रितेच जीवन सारे। ही तहान सांगा केव्हा संपायची?' या विचाराने आक्रंदू लागते.अशा मानसिक संभ्रमावस्थेत असताना मनात येते, आज जोतिबा अवतरले तर.


जोतिबा आज अवतरले तर ते आनंदित होतील की खंतावतील? असा प्रश्न पडतो. ज्या स्त्री-शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर अट्टाहास केला ती स्त्री सुशिक्षित झालेली पाहन त्यांना आनंद होईल; पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांत पाणीही येईल. कारण स्त्रीवरचे अन्याय आजही संपलेले नाहीत. कारणे बदलली असतील; पण छळ तसाच चालू आहे. त्या काळी विधवा स्त्रीची मानहानी करून तिला घरातील विहिरीचा मार्ग दाखविला जात असे; तर आज स्त्रीला जिवंत जाळण्याच्या घटना घडताहेत.

Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi
Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi


ज्या दलितांच्या उद्धारासाठी जोतिरावांनी समाजाचा रोष ओढवून घेतला तो दलित तरी सुखी आहे का? जोतिबांनी आपल्या घरातील आड मुक्त करून या अस्पृश्यांची तहान भागविली; पण आज गावोगावी 'एक गाव एक पाणवठा' हा कार्यक्रम योजूनही खेडोपाडी हा अस्पृश्य अजूनही एका व्यापक अर्थाने तहानलेला आहे. आजही त्याची वस्ती गावकुसाबाहेरच आहे. 


जोतिराव आजअवतरले तर त्यांना आढळेल की, त्यांच्या मागणीनुसार आज शासनाने या मागासलेल्या लोकांना अनेक सवलती दिल्या आहेत, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत; पण त्यांनी हा हरिजन सुखी झाला आहे का? सुशिक्षित झाला आहे का? नाही. फार थोड्या संख्येने तो साक्षर झाला आहे आणि जे शिकलेसवरले आहेत ते आपल्या समाजासाठी काही करीत आहेत का? याचा विचार केला तर निराशाच पदरी पडेल.बहुसंख्य दलित अजूनही जुन्या संस्कारांच्या, रूढींच्या पिंजऱ्यातच बंदिस्त आहेत.



जोतिबांना त्यांच्या 'शेतकऱ्याचा असूड' खेड्यातील भिंतीवर दिसेल. पण त्यांच्या कल्पनेतील खेडी तेथे आढळणार नाहीत. बहुतेक खेडी ओस पडलेली दिसतील. हा जमिनीचा पुत्र पोटार्थी होऊन शहरात गर्दी करताना त्यांना आढळेल. शेतकऱ्यांतही जोतिबांना एक नवा अपरिचित वर्ग आढळेल. तो म्हणजे 'सधन शेतकरी'. जोतिरावांच्या हयातीत या वर्गाचा उदय झाला नव्हता. शेतमजूर मात्र पूर्वीपेक्षाही अधिक दरिद्री झालेला त्यांना आढळेल पुण्याच्या बाजूला हिंडताना मात्र त्यांना आपल्या सावित्रीचे आगळे स्मारक दिसेल आणि ते म्हणजे 'सावित्रीबाई फुले दत्तक योजना'. 


गरीब घरांतील विदयार्थिनींच्या शिक्षणाची झालेली ती सोय पाहुन जोतिबांना गदगदून येईल. सावित्रीच्या श्रमाचे चीज झाले, या विचाराने ते आनंदित होतील आणि मग जोतिबा एक अर्ज लिहितील. कोणाला माहीत आहे? प्रत्यक्ष त्यांच्या निर्मिकाला-भगवंताला. कशासाठी? स्वर्गवासाची सुट्टी घेऊन ते भूलोकावर वास्तव्याला येतील आणि पुनश्च आपल्या कामाला लागतील.

वरील निबंध आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध | Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi

 माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi

निबंध 1 
माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi:  माझा छोटा भाऊ विचारीत होता, “दादा, देवांना 'त्रिदश' का म्हणतात?" मी म्हणालो, "अरे, त्यांना माणसांसारखी चौथी वार्धक्यावस्था नाही.देव कधी मरत नाहीत." म्हणजे देव अमर आहेत. “देवांप्रमाणेच माणसे अमर झाली तर " त्याने प्रश्न निर्माण केला.


 खरोखर, देवांना मिळालेली संजीवनीची कुपी माणसापर्यंत आली तर? नाहीतरी आज माणसाचे त्या दिशेने प्रयत्न चालू आहेतच. रक्तदान, मूत्रपिंडदान असे अवयव दान करून, अवघड शस्त्रक्रिया पार पाडून आणि प्रभावी औषधोपचार करून तो माणसाला मृत्यूच्या दारातून मागे फिरवितो. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे आणि मृत्युसंख्या घटली आहे; तरीपण मानव मृत्यूवर पूर्णपणे मात करू शकलेला नाही. आजही माणूस मर्त्य आहे. अशा या मानवाला संजीवनी गवसली तर....


Manus Amar Zala Tar Essay In Marathi
Manus Amar Zala Tar Essay In Marathi

तर प्रथम ज्याच्या हातास ती संजीवनी-अमृत-गवसेल तो लक्षाधीश, कोट्याधीश होईल. मग या अमृताचा काळाबाजार' होईल. कारण कोणतीही गोष्ट अदृश्य करून तिचा काळाबाजार करण्यात माणस मोठा पटाईत आहे. मग या अमृतातही भेसळ होईल व थोड्याच दिवसांत या अमृताची नक्कल केलेले कृत्रिम अमृतही बाजारात अवतरेल.

विचार करण्याचा मुद्दा असा आहे की, माणसाला अमृत गवसल्याने तरी त्याचे दुःख संपेल का? तो सुखी होईल का? होईल, कारण त्याला त्यामुळे आपल्या प्रिय माणसांचा वियोग होणार नाही. एक-एक कुटुंब म्हणजे पारंब्या फुटलेला मोठा वटवृक्षच होईल. पण यामुळे मात्र समाजाला नको असलेली दुष्ट माणसे देखील अमर होतील की! असे घडले तर मात्र माणसे सुखी होण्याची शक्यता कमीच. 


शिवाय 'अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीनूसार अमरत्व प्राप्त झालेली ही माणसे एकमेकांचा दुस्वास करू लागतील. शिवाय या अनुषंगाने विचार करता, दोन पिढयांतील विचारांचे अंतर हीसुद्धा एक चिंतेची बाब ठरेल. आज अनेक घरांतून, समाजांतून अनेक त-हेचे वाद निर्माण झाले आहेत. माणसे अमर झाली तर हे पिढीतील विचारांचे अंतर फारच वाढेल. कुटुंबात, समाजात तीन-चार पिढ्या आढळतील. मग वादांना काय तोटा?



माणसाला अमरत्व प्राप्त झाले की, लोकसंख्या बेसुमार वाढणार आणि वाढत्या बेकारीचा प्रश्न 'आ' वासून उभा राहणार. आजही आपल्या देशापुढे बेकारीची समस्या आहेच, त्यामुळे मग माणसे अमर झाली तर हाहाःकारच उडेल. अन्नधान्य, पाणी, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. कदाचित या सर्व गरजा भागविण्यासाठी वैयक्तिक मालकी हक्काला राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप दयावे लागेल. प्रयोगशाळांना शरण जावे लागेल आणि निसर्गनिर्मित संपत्तीला मानवनिर्मितीची जोड दयावी लागेल.



 आपण अमर आहोत असे एकदा सिद्ध झाले की, माणसातील साहसी वृत्तीला उधाण येईल. चंद्राबरोबर इतर ग्रहांवर जाण्यासाठीही माणूस पुढे सरसावेल. धाडसी स्पर्धांना ऊत येईल. पण येथे एक धोकाही संभवतो. मरण नाही म्हटल्यावर पुनर्जन्माची कल्पना नष्ट होईल. त्याबरोबरच पापपुण्याचा निवाडा होण्याची कल्पनाही लोप पावेल. त्यामुळे माणूस दुष्कृत्ये करताना कचरणार नाही, ऐहिक जीवनात गुंतलेला असताना तो अध्यात्माचा विचार करणार नाही आणि मग मानवी जीवन क्षुद्र बनेल



या साऱ्या विचारांत एक धोका आपण विसरलो आणि तो म्हणजे माणूस अमर झाला तरी तो अजर होणार का? तसे नसेल तर माणसाला हे अमरत्व नकोसे होईल. जखमेची वेदना घेऊन शोकाकूल अवस्थेत फिरणारा चिरंजीव अश्वत्थामा आपल्या परिचयाचा आहेच. त्याला आपले चिरंजीवित्व नकोसे झाले होते. त्याप्रमाणेच माणसाची अवस्था होईल व तो देवाकडे गा-हाणे घालील, “देवा, सोडव रे बाबा आता या यातनांतून, लवकर मरण येऊ दे."

वरील निबंध माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
धन्‍यवाद

निबंध 2  


पुराणकालीन कथांमध्ये देवदानवांनी अमृतमंथन केले आणि त्यातून अमृताचा कलश बाहेर काढला. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. अखेरीस देवांच्याच युक्तीने 'मोहिनी' रूपात आलेल्या श्रीविष्णूने ते देवांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला अन् सारे देव अमर झाले. ही कथा ऐकत असताना माझ्या दहा वर्षांच्या भावाने मला प्रश्न विचारला. "दादा तसे ते अमृत आपल्याला मिळाले तर ? आपले आजी-आजोबा, बाबा-आई, तू-मी सर्वजण अमर होऊन जा ना ! आपण अमर झाल्यावर काय मज्जा येईल नाही !"

भावाच्या या प्रश्नाने माझी मात्र झोप उडाली. अहो, खरोखरच जर हा 'अमृताचा कलश' या माणसांपर्यंत आला आणि माणसे अमर झाली तर ? आज आपण पाहतोय काळ बदलतोय... नवीन नवीन शोध लागताहेत. औषधे, इलाज, शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात होताहेत आणि त्या यशस्वी होताहेत. प्रभावी गुणकारी औषधोपचाराने माणूस आज मृत्यूच्या दारातून अनेकवेळा परत आला आहे. त्याची आयुर्मर्यादा वाढली आहे, तरी पण 'मृत्यू' कुणाला टळलेला नाही. माणूस हा मर्त्य आहेच. आणि मग अशा माणसाला ही 'संजीवनी' मिळाली तर...


प्रथम या 'अमृताचा'च काळाबाजार वाढेल, भ्रष्टाचार वाढेल. सर्वजण लक्षाधीश, कोट्यधीश होतील. अमृतातही भेसळ होईल आणि पुढे तर कृत्रिम अमृतही बनवले जाईल. पण माणसाला अमर झाल्यानंतर त्याची दुःखे संपतील का? एकमेकांतील भांडणतंटे-दुरावा-दुःस्वास-स्पर्धा या थांबतील का ? नाही ! उलट आयुष्यमान वाढल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अतिरेक होईल. अंदाधुंदी माजेल, बेबंदशाही आणि हाहाकार निर्माण होईल. प्रेम-भक्ती अशा भावनांचा अंत होईल.


दुसरीकडे अमृत गवसल्याने लोकसंख्या प्रचंड वाढेल त्याबरोबर खाणारी तोंडे... म्हणजेच पुन्हा बेकारीची समस्या, पृथ्वीतलावर असलेल्या 'अन्न-पाणी-हवा' या मूलभूत गरजा भागविता येणार नाहीत... त्यासाठी पुन्हा सुंदोपसुंदी वैयक्तिक संपत्ती म्हणून मानव ते जमा करू लागेल. आणि प्रिय माणसांचा वियोग होणार नाही, ही गोष्ट धरली तरी 'अति परिचयात् अवज्ञा' ही उक्ती खरी होईल. पिढ्या वाढत जातील. विचारांची रेलचेल होईल. एक घर, एक समाज, एक देश अशा मर्यादा न राहता अविचारांचाच धुमाकूळ सुरू होईल.

सध्या सुद्धा तीन-चार पिढ्या झाल्या तरी त्यांच्यात ऐक्य टिकणे कठीण आहे, तर मग ही अफाट नाती, या अनेक पिढ्या यांचे काय होणार ? महाभारतातील 'यादवी' आठवते ना? तशीच ती सुरू होईल. माणसे माणसांना मारतील. राहायला जागा राहणार नाही.


माणसांच्या साहसीवृत्तीचा-त्यांच्या बुद्धिमत्तेचा ही विचार करायला लागतो तर त्यांना हे ब्रह्मांड कमी पडेल. कल्पनांच्या भराऱ्या आकाशपाताळ एक करतील. त्यामुळे पुन्हा सर्व गोष्टी विनाशाकडेच वळतील. पुनर्जन्म-पापपुण्य, कल्याण, सुखदुःख या गोष्टींचा नामोनिशाण राहणार नाही. मानवी जीवनाचे महत्त्वच नाहीसे होईल, तो क्षद्र होऊन जाईल आणि अखेर पुन्हा त्या पुराणकथेतील अमरत्व प्राप्त झालेल्या अश्वत्थामा आठवू लागेल.


तोही त्याच्या चिरंजीवत्वाला कंटाळला. जखमेच्या वेदना घेऊन शोकाकूल होऊन अखंडपणे नाहक भटकत राहिला. हे सर्व आठवल्यावर वाटते, "नको रे बाबा ते अमरत्व, आणि त्या यातना, फक्त हे ईश्वरा, अमर असे कल्याणकारी काम मात्र आमच्याकडून करून घे. एवढेच मागणे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Manus Amar Zala Tar Essay In Marathi