माझ्या मायदेशा महाराष्ट्रा मराठी निबंध | Maharashtra State Essay In Marathi

माझ्या मायदेशा महाराष्ट्रा मराठी निबंध | Maharashtra State Essay In Marathi

माझ्या मायदेशा महाराष्ट्रा मराठी निबंध | Maharashtra State Essay In Marathi : माझ्या मायदेशा महाराष्ट्रा, मी तुला प्रथमच सांगून टाकतो, मी विश्वबंधुत्व मानणारा मानव आहे, मी एक भारतीय आहे पण मी प्रथम महाराष्ट्रीय आहे. जगाच्या पाठीवर कोठेही वावरताना जेव्हा मराठी शब्द कानांवर पडतात ना, तेव्हा मला आनंदाचे भरते येते. बा महाराष्ट्रा, मी कोठेही असलो तरी माझे चित्त सदैव तुझ्याकडे असते. वृत्तपत्रातील महाराष्ट्राबद्दलची एखादी छोटी वार्ताही मला समाधान देण्यास पुरेशी होते.

 महाराष्टा, तुझ्यामाझ्यात हा स्नेहाचा धागा का निर्माण झाला माहीत आहे? कारण मी या खडकाळ भूमीत जन्माला आलो, याच मातीत मी रांगलो, येथेच मी खेळलो आणि येथेच मी मोठा झालो. माझ्या शरीरातील कणकण तूझ्या अणुरेणने बनला आहे. मायदेशा, मघाशी तूझ्या भूमीचा मी 'खडकाळ' असा उल्लेख केला. तुला त्याचा राग आला नाही ना? महाराष्ट्रा, तुझी भूमी अशीच आहे. खडकाळ डोंगराची पाठ तुला लाभली आहे, म्हणून तर तुझा तो लाडका पुत्र तुला 'दगडांचा देश' असे संबोधतो. गंगेच्या मुखातला गाळ येथे नाही वा गंगौघासारखा जलाशयाचा बारमाही वाहता पाण्याचा लोंढाही नाही. पण तुझी कष्टाळू मुले खूप कष्ट उपसून तांदूळ, ज्वारी पिकवितात. पण आता मात्र तुझ्या या सुपुत्रांनी कमाल केली आहे. धरणांनी अडविलेल्या पाण्यावर आता महाराष्ट्रात ऊस डोलतो आहे, तंबाखू फुलते आहे. महाराष्ट्रा, तुझ्या ठिकाणी उभारलेल्या या कारखान्यांतील साखर आता साऱ्या भारतभर जणू साखरपेरणीच करीत आहे. महाराष्ट्रा, कारखान्यांवरून आठवलं हं! 

आता. औदयोगिक विकासातही तू मागे नाहीस. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर ही तुझी मोठमोठी शहरे स्वतःच्या औदयोगिक वसाहती मोठ्या दिमाखाने मिरवत आहेत. महाराष्ट्रा, कोकणभूमी ही तुझी डोंगराळ भूमी. एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला सागर अशा निसर्गरम्य भूमीतही आता कारखाने उठले आहेत. कोकणातील आंबा, काजू व मासे आता हवाबंद डब्यांत बसून दूरदूरवर परदेशाची सफर करीत आहेत. _माझ्या मायदेशा, तू आपल्या लेकरांना ऊब दिलीस, त्यांना वाढविलेस; पण त्यांनीही आपल्या कर्तृत्वाने तुझ्या नावाचा झेंडा तीनही लोकांत फडकविला. ज्ञानदेवाच्या काव्याचा आनंदपरिमल आज सातशे वर्षे होऊन गेली तरी कमी झालेला नाही. विश्वैक्याचे स्वप्न आज विसाव्या शतकातील माणस जे पाहत आहे ते ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपूर्वी पाहिले होते. 'हे विश्वचि माझे घर' अशी त्यांनी माणसाला विशाल दृष्टी दिली. रयतेच्या रक्षणासाठी शिवबाने स्वराज्य निर्मिले व चारित्र्यवान राजा कसा असू शकतो त्याचे प्रमाणच दाखवून दिले. 

'प्राण गेला तरी माझे राज्य देणार नाही' अशी रणभेदी गर्जना करणारी राणी लक्ष्मीबाईही, बा महाराष्ट्रा, तुझीच माहेरवाशीण. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' असे उन्मत्त इंग्रज सरकारला खणखणीत स्वरांत बजावणारा 'बाळ' तुझाच पुत्र. महाराष्ट्रा, तुझी ही सारी लेकरे काटक आहेत. मोडू, पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा सर्वश्रुत आहे.

महाराष्ट्रा, तुझ्या हया लेकरांनी आपली अस्मिता मोठ्या निष्ठेने जपली आहे. पंढरीचा विठोबा हे त्यांचे लाडके दैवत. आपल्या मायदेशाइतकीच आपल्या मायबोलीवर त्यांची भक्ती आहे.
वरील निबंध माझ्या मायदेशा महाराष्ट्रा मराठी निबंध | Maharashtra State Essay In Marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवादकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत