आजकालची शिक्षणपद्धती मराठी निबंध | AajKalchi Shikshan Paddhati Essay In Marathi

 आजकालची शिक्षणपद्धती मराठी निबंध | Aajchi Shikshan Paddhati Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आजकालची शिक्षणपद्धती मराठी निबंध बघणार आहोत. स्वामी विवेकानंद म्हणतात - Education is the manifastation of perfection already present in man. माणसाचे शरीर, मन आणि आत्मा यांतील सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण होय. 


श्रद्धा, शुचिता, सातत्य, पावित्र्य यांनी युक्त अशा जीवनाची अनुभूती आणून देणे हा या शिक्षणाचा उद्देश असतो. मानवात असलेल्या सुप्त गुणांना दैवी गुणांचा परिसस्पर्श प्राप्त करून देण्याचे काम शिक्षकाकडून अपेक्षित असते.


आपल्या देशात फार प्राचीन काळापासून शिक्षणाचा अखंड स्रोत वाहत आहे. त्या काळात 'गुरुकुल पद्धती' अस्तित्वात होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारचे शिक्षणविषयक धोरण वेगळेच होते. ब्रिटिश सरकारला भारताचा व्यावसायिक शिक्षणात विकास होऊ द्यायचा नव्हता, कारकुनांची फौज निर्माण करणे एवढेच त्या सरकारचे उद्दिष्ट होते. 


उच्च शिक्षणाची येथे सोय नव्हती. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाचे उद्दिष्ट बदलले. बुद्धिमान माणसे, उच्चविद्याविभूषित व्हावीत, त्यांचा देशाच्या प्रगतीसाठी उपयोग व्हावा, अशी धडपड चालू झाली. आजकाल आता बालवाड्या, प्लेग्रुप, के.जी. अशा पूर्वप्राथमिक स्तरापासून शिक्षणाला सुरुवात होते. 


त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षण! आज अनेक शाळा आहेत, विद्यार्थ्यांची संख्या अतिशय वाढली आहे. पण शाळेतील शिक्षण प्रत्यक्ष जीवनापासून अलग राहिले आहे. शाळांत परीक्षांना अवास्तव महत्त्व दिले जात असते. 


त्यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनतात, शिक्षकही परीक्षेत हमखास चांगले गुण मिळतील अशाच त-हेची अध्यापन पद्धती वापरतात. त्यानंतर महाविद्यालयीन उच्च शिक्षण! आज अनेक सरकारी महाविद्यालये आहेत, खाजगी महाविद्यालये आहेत. त्यांचीही संख्या भाराभर वाढली आहे. 


येथेही पदवी म्हणजे नोकरीची खात्री हाच विचार असतो. त्यामुळे नोकऱ्या कमी पडू लागल्यावर पदवीला किंमत उरली नाही. गेल्या ३०-४० वर्षांत शिक्षणाचा प्रसार समाजाच्या सर्व स्तरात पोहोचला आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. परंतु सुशिक्षितपणा कितपत आला आहे, शंकाच आहे. 


प्राथमिक शिक्षण मोफत, मुलींना शिक्षण मोफत, मागासवर्गीयांना सवलती यामुळे शिक्षणसंस्थांची संख्या वाढत आहे. पण तेथे साऱ्या सोयी आहेत का याचा विचार होत नाही. अभियांत्रिकी विद्यालय काढणे हा सध्या फायद्याचा विषय झाला आहे. 


पण त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे, आणि दर्जा घसरत आहे. (११+४) (१०+२+३) असे वेगवेगळे प्रयोग शिक्षणपद्धतीत झाले, प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांची संख्या वाढली, गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागले आणि परीक्षापद्धतीवरचा विश्वास उडू लागला. शिक्षणक्षेत्रातही गैरव्यवस्था, भ्रष्टाचार इ. आपल्याला अनुभवाला येत आहे.


उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारी मुले तिकडेच स्थायिक होऊ लागली आहेत आणि Brain drain चा प्रश्न उभा राहिला आहे. - शिक्षणक्षेत्रातील या गोंधळाच्या अनेक कारणांपैकी एक आहे आपली समाजव्यवस्था. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे लोकसंख्येचा महापूर. 


एकेका वर्गात ७०-८० विद्यार्थी असतात. मग शिक्षक प्रत्येकाकडे वैयक्तिक रीत्या लक्ष देऊच शकत नाही. शाळेतील शिक्षणाकडे पालक व विद्यार्थी केवळ आर्थिक सुबत्तेचे साधन म्हणूनच पाहतात. तसेच लहानपणापासून पाळणाघरात वाढणारी मुलेही पालकांकडून होणाऱ्या संस्कारांना मुकतात आणि जीवनाचा उद्देश 'पैसा' आहे असेच मत बनवून घेतात. 


पैशाची लालसा, भ्रष्टाचार यांनी बरबटलेल्या समाजात विद्यार्थ्यांनी आपल्या समोर आदर्श तरी कोणाचा ठेवायचा, असा प्रश्न पडतो. त्यातून हल्ली विद्यार्थ्यांच्या मनावर टी.व्ही.चा जबरदस्त पगडा असतो. टी.व्ही.च्या नादात मुलांचे चांगली पुस्तके वाचण्याकडे दुर्लक्ष होते. 


वाचनाच्या अभावामुळे. नीतिमूल्यांचे संस्कार मुलांना मिळत नाहीत. मग शाळेत 'मूल्यशिक्षण' शिकवावे लागते, त्यासाठी एक तास ठेवावा लागतो. विद्यार्थी पाश्चात्यांच्या मद्यपान, धूम्रपान, स्वैराचरण अशा वाईट सवयींचेच अनुकरण करीत आहेत.


यात बदल घडवून आणण्यासाठी समाज, राष्ट्र, राजकारण यात आमूलाग्र बदल व्हायला हवा. मुलांच्या आकलनशक्तीला, निरीक्षणाला वाव मिळेल असे शिक्षण त्यांना शाळेत मिळायला हवे. आदर्श ज्ञानी शिक्षकांची शिकवण त्यांना मिळायला हवी, ग्रंथवाचनाची गोडी त्यांना लावली गेली पाहिजे. 


पालकांनी त्यांच्या निर्मळ वृत्तीला उत्तेजन देऊन त्यांची शिक्षणाची आवड जोपासली पाहिजे. त्यांच्यावर चांगले संस्कार करायला हवेत, शिस्तमय जीवनाची त्यांना सवय लावायला हवी. म्हणजे मग विद्यार्थ्यांमधून प्रकाशसूर्य तळपतील आणि त्या प्रकाशात इतरांचेही जीवन ते उजळून टाकतील. 


वसंत बापटांच्या शब्दांत सांगायचे तर 'देह मंदिर,चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य, सुंदर मंगलाची नित्य हो आराधना मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद