आपला आपण करावा उद्धार मराठी निबंध | AAPLA AAPAN KRAVA UDHHDAR MARATHI NIBANDH

 आपला आपण करावा उद्धार मराठी निबंध | AAPLA AAPAN KRAVA UDHHDAR MARATHI NIBANDH

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आपला आपण करावा उद्धार मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.



मुद्दे : भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश –  

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार - 

परावलंबीपणा 

नको-आधाराची अपेक्षा नको  

चराति चरतो भग विवेक हवा  

परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी हवी  

शिवरायांचा आदर्श 

ऐकावे जनांचे करावे मनाचे.

 प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला आहे. भगवान सांगतात, 'आपला आपण उद्धार करावा, आपणच आपला घात करू नये. आपण स्वतःच स्वतःचे मित्र आहोत, स्वत:च स्वतःचे शत्रू आहोत.'


भगवंताचा हा उपदेश प्रत्येक व्यक्तीने शिरोधार्य मानायला हवा. म्हणूनच, 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' ही उक्ती आपण कायम मनात बाळगली पाहिजे. पण नेमके हेच आपण विसरतो आणि सदैव दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करतो, दुसऱ्याच्या आधारासाठी आसुसतो. 


त्याचे कारण म्हणजे बालपणी लागलेली परावलंबित्वाची सवय! लहानपणी माणसाचे अपत्य हे पराधीन असते; पण तीच सवय त्याला कायमची लागते आणि मग तो मानू लागतो की, दुसऱ्यांच्या मदतीशिवाय मी यश संपादन करू शकतच नाही. 


अशा व्यक्तीला मग कुणाची मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती अगतिक होते आणि नशिबाला दोष देत राहते. मग यश तिच्यापासून दूर पळते. 'चराति चरतो भगः' जो चालतो; म्हणजे जो प्रयत्न करतो, तोच यशस्वी होतो; त्याचे भाग्य त्याच्याबरोबर चालते.


आपण लहानपणी सायकल चालवायला शिकतो, तेव्हा आपण दुसऱ्याला आपली सायकल धरायला सांगतो. पण जेव्हा आपण दुसऱ्याला मागे टाकून धीर करून स्वत: सायकल चालवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपणाला सायकल चालवता येऊ लागते. 


आपण विवेकाने वागले पाहिजे.काळानुरूप स्वतःला बदलले पाहिजे. परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली तयारी ठेवली पाहिजे. योग्य संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवून यशाचे शिखर गाठले पाहिजे. 



यासाठी आपल्यासमोर आदर्श हवा शिवरायांचा ! कोणाचाही आधार नसताना त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते त्यांनी स्वकर्तृत्वाने साकार केले. 'ऐकावे जनांचे, करावे मनाचे.' सर्वांचा सल्ला ऐकावा; पण शेवटी आपण स्वतःच विचार करून आपला आपणच उद्धार मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

आपला आपण करावा उद्धार मराठी निबंध | AAPLA AAPAN KRAVA UDHHDAR MARATHI NIBANDH


God helps those who help themselves. जे लोक स्वतः प्रयत्न करतात त्यांनाच परमेश्वर मदत करतो असं म्हणतात. आता बघा, परीक्षेत चांगले गुण मिळवून पास व्हायचं आहे, त्यासाठी देवाची नुसती प्रार्थना करून चालेल का? स्वत:च प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यास केला पाहिजे. तरच यश मिळणार.


न ऋते श्रान्तस्य सख्याय देवाः! पिढीजात श्रीमंती फार थोड्या लोकांना लाभते. परंतु शिक्षणाच्या साहाय्याने नोकरी मिळवून गरिबीचा शापही नष्ट करता येतो. संसारात तर संकटे गुपचुप येऊन उभी असतातच. त्या संकटांना घाबरून कसे चालेल? संकटातच माणसाची खरी परीक्षा होते. 


आपल्यावर संकटे कोसळली की, दूर करायला दुसरे लोक येत नसतात. आपणच प्रयत्नपूर्वक त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. पूर, भूकंप, आजारपण अशी कितीतरी संकटं पाठलाग करीत असतात. त्या संकटांना झुगारून देऊन प्राप्त परिस्थितीला तोंड आपल्याला स्वतःलाच द्यावे लागते. 


पुढे पुढे संकटाची सवय होते व संकटे आपल्याकडे यायला घाबरू लागतात. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द मात्र हवी. स्वातंत्र्यपूर्व काळात जे लोक शिकले त्यांना सुखासुखी शिक्षण मिळाले नाही. कोणी वार लावून शिकले तर कोणी शिष्यवृत्ती मिळवली. 



आगरकर, आंबेडकर, सानेगुरुजी यांना शिक्षणासाठी किती कष्ट सहन करावे लागले ते सर्वांना माहीत आहेच. त्यांना कोणी मदत केली? स्वत:चा उद्धार त्यांनी स्वत:च केला. महर्षी कर्वे, महात्मा फुले यांना सामाजिक सुधारणा करण्याची गरज वाटली. दुसरे कोणीतरी येऊन समाजात सुधारणा करतील म्हणून ते वाट बघत बसले नाहीत. तर राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, महर्षी कर्वे यांनी स्वत: प्रयत्न करून समाजाची प्रगती करण्याचा प्रयत्न केला.



देशाला स्वातंत्र्य इंग्रजांनी सुखासुखी दिलं
नाही. तर अनेक देशभक्तांनी स्वप्रयत्नाने, स्वार्थत्यागाने, आत्मबलिदानाने स्वातंत्र्य मिळवलं. स्वत:चा व देशाचा उद्धार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही म्हणतात, 'दुसरा आपल्या उद्धारार्थ धावून येईल अशी आशा बाळगू नका. 


एखादा महात्मा आपल्याला कोठवर उचलून घेणार? किती मदत करणार ? आपण नेहमी त्याच्याच मदतीवर अवलंबून राहिलो तर आपणच आपला घात करून घेऊ.' आपल्याला मिळालेल्या सवलतींचा, घडवून आणलेल्या परिस्थितीचा योग्य फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे, 



आपला आपणच उद्धार केला पाहिजे. आपण आपला करावा विचार ! तरावया पार भावसिंधु। मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 3

आपला आपण करावा उद्धार मराठी निबंध | AAPLA AAPAN KRAVA UDHHDAR MARATHI NIBANDH


"उद्धरेत् आत्मना आत्मानं न आत्मानम् अवसादयेत्।

आत्मा एव हि आत्मनो बन्धुर् आत्मैव रिपुर् आत्मनः॥" 


भगवद्गीतेत म्हटले आहे की, “आपण आपला उद्धार करावा, आपला नाश करू नये. आपणच आपले बंधू असतो व आपण आपले शत्र!" संदर्भ आध्यात्मिक आहे. आपण स्वत:ला जिंकले, आत्मसयम केला तर आप आपले बंध असतो अन्यथा शत्रू! सत्त्व, रज, तम या त्रिगुणाचा समतोल माणसाला उच्च पातळीवर नेतो. 


सर्वांना हे साधत नाही. कारण लोभ, मोह, मद, मत्सराटी षडरिपू त्याला खालच्या सामान्य पातळीवरच ठेवतात.  डॉ. आंबेडकरांनी याच श्लोकाचा व्यापक अर्थ घेतला. स्वत:पलीकडे त्यांनी ६-६.५ कोटी ज्ञातिबांधवांचा, त्यांच्या उद्धाराचा विचार केला. 


वर्णव्यवस्था, अज्ञान, अंधश्रद्धा यामुळे दलित बांधव अस्पृश्य झाले. निष्क्रिय झाले. त्यांना सजग करायला त्यांनी तळमळीने साद घातली. आपल्या मदतीला कोणी येईल ही आशा फोल आहे. तुम्हीच उठा, स्वत:चा व स्वत:च्या जातिबांधवांचा विचार करा, उद्धार करा. वर्णव्यवस्था तुम्हीच तोडा, आधुनिक ज्ञान, विज्ञान शिकाअसा मंत्र त्यांनी दिला. त्यासाठीच 'मूकनायक' वर्तमानपत्रात लेख लिहिताना या गीता-वचनाचा दाखला दिला. 


बहिष्कृततेचा शाप लागूनही एकलव्याने, कर्णाने स्वत:चे बल, कौशल्य स्वत:च्या सामर्थ्यावर वाढवले. कुणापाशी याचना करीत दीनवाणे बसून राहिले असते तर? ... उद्धाराच्या प्रतीक्षेत अहिल्या शिळा होऊन युगानुयुगे पडून राहिली. प्रभू रामचंद्र न येते तर? ... 


उद्धार करणे म्हणजे वरच्या प्रतीला नेणे. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा यांनी घेरलेल्या समाजाला जर वरच्या स्थितीला न्यायचे असेल तर रूढीचं बंधन तोडून पुरोगामित्व धरले पाहिजे. नेते दिशा देतील पण समाजाने स्वत: आपली दशा वालवली पाहिजे. .. 


ज्यांना उद्धार करायचा त्यांची स्वत:ची धडपड त्यासाठी हवी असते. त्यासाठी स्वत:ची बलस्थाने पक्की करायला हवीत. कच्चे दुवे शोधून त्यावर मात करायला हवी. विचारांचं बियाणं रुजवून कर्तव्याच्या कर्मयोगाचा पाऊस पाडला पाहिजे. प्रयत्नांचं खतपाणी घालायला हवं म्हणजे उद्धाराची गोड फळं मिळतील. 


पेरलंच नाही तर उगवेल काय? जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात, कुठल्याही मानवप्राण्याला, कुठल्याही समाजाला, कुठल्याही देशाला लागू पडणारं त्रिकालाबाधित अक्षरवचन आहे हे! आदिवासी अवस्थेतून मानव आज कुठल्या कुठे जाऊन पोचला आहे. इतर प्राणी त्याच पूर्वावस्थेत आहेत.


 'God helps those who help themselves' किंवा 'Everybody has to teach himself' ही वचने हेच सांगतात. आखाती राष्ट्रांनी पेट्रोल द्यायचे बंद केले म्हणून भारत देश हताश झाला नाही. त्याने बॉम्बे हाय शोधून आपली गरज भागविली. 


विकसित बड्या राष्ट्रांचे दास न बनता अणुस्फोट करून, क्षेपणास्त्र बनवून, अंतरीक्ष काबीज करून आपला आपण विकास केला. कुणाचे मिंधे झालो नाही.. बेचिराख झालेला जपान किंवा जर्मनी स्वकर्तृत्वावर पुन्हा उठला. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या इस्राएलने हार न मानता स्वबलावर शेतीत जगात अग्रेसर स्थान मिळवले....


 उद्धारासाठी लागते उत्कट इच्छा, अथक परिश्रम, सातत्य आणि दर्जा. जो ही किंमत मोजायला तयार असतो त्याचा उद्धार त्याचा शत्रू देखील रोखू शकत नाही. स्वत:च्या मनगटातली शक्ती जो ओळखतो, जागृत करतो, वापरतो तोच मोठा होतो. 


स्वस्थ बसणाऱ्याचा तोटाच होतो. 'जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला' हे वचनही आपल्याला हेच सांगते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद