प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे i मराठी निबंध | PRYATNE VALUCHE KAN RAGDITA TEL HI GALE ESSAY MARATHI

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे i मराठी निबंध | PRYATNE VALUCHE KAN RAGDITA TEL HI GALE ESSAY MARATHI


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे मराठी निबंध बघणार आहोत. 

मुद्दे : 

प्रयत्नान्ती परमेश्वर 

यत्न हाच यशाचा पाया

ज्यांच्या ठिकाणी हा गुण तिथे परमेश्वराचे वास्तव्य

भावी जीवनाच्या उत्कर्षासाठी अविरत प्रयत्न आवश्यक 

थोरांची उदाहरणे 

यशाची माळ तुमच्या गळ्यात 

यत्नावर श्रद्धा हवी

संशोधकांच्या अविरत प्रयत्नांनी सुखसाधनांची रेलचेल  

यत्न तेथे ईश्वराचा वरदहस्त


 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे।' प्रयत्नाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. स्वराज्यस्थापनेच्या कार्यात शिवबांना कित्येक अडचणी आल्या, तरी त्यांनी यत्नदेवाची उपासना सोडली नाही. यत्नदेवाने त्यांची मनोकामना पूर्ण केली. 


म्हणून महाराष्ट्रात 'हिंदवी स्वराज्य' अवतरले. प्रारंभी पाणक्या असलेला राम नावाचा मुलगा अथक प्रयत्नांनी आपल्या भावी जीवनात रामशास्त्री प्रभुणे म्हणून ख्यातनाम न्यायमूर्ती झाला. आधुनिक काळातही लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या थोर नेत्यांनी सततच्या प्रयत्नांनी पारतंत्र्यातील निद्रिस्त भारतीय समाजाला जाग आणली.


प्रयत्नाला परमेश्वर मानणारी माणसे प्रत्येक क्षेत्रात वावरत असतात. पेनिसिलीनचा शोध लावणारा संशोधक प्रयत्नाला परमेश्वर मानणारा होता; म्हणून तर तो बुरशीतून पेनिसिलीनचा शोध लावू शकला. एखादा कलावंत आपल्या कलेत निष्णात होतो; कारण त्यामागे त्याची प्रयत्नांची साधना असते. 


एखादा खेळाडू जेव्हा मैदानावर यशस्वी होतो, तेव्हा ते यश काही त्याला आपोआप प्राप्त होत नाही. त्यामागे त्याचे अथक प्रयत्न असतात.जो माणूस प्रयत्न करीत राहतो त्याला मार्ग सापडतो. जो नशिबावर, प्रारब्धावर अवलंबून राहतो, तो कधीच यशस्वी होत नाही. 


'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी' हे खरे नाही. प्रारब्धवादी माणसे आपल्या नशिबी जे लिहिले आहे. तेच घडणार,' असे मानतात. त्यांचा स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास नसतो. अशी माणसे परिस्थितीपुढे हतबल होतात. त्यांच्या वाट्याला फक्त दुःखच येते. 


म्हणून प्रारब्धवादावर नव्हे, तर प्रयत्नवादावर श्रद्धा हवी.नव्या जगाच्या शोधासाठी निघालेल्या प्रवाशांचा मार्ग अनेकदा चुकला, पण त्यांनी आपला प्रयत्न सोडला नाही. म्हणूनच कोलंबस, वास्को दी गामा यांना नव्या भूमीचा शोध लागला, यत्नदेवाची आराधना करण्यास उपचारांचे अवडंबर लागत नाही; 


केवळ निष्ठेचे फूल वाहून या ईश्वराची पूजा करावी, यश आपल्यामागे धावत येईल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद