अणुशक्ती आणि आपण मराठी निबंध | ANUSHAKTI AANI AAPAN ESSAY MARATHI

 अणुशक्ती आणि आपण मराठी निबंध | ANUSHAKTI AANI AAPAN ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अणुशक्ती आणि आपण मराठी निबंध बघणार आहोत. भारताने ११मे आणि १३मे १९९८ ला अणुचाचण्या केल्या आणि सर्व जगात खळबळ माजून गेली. अमेरिकेला फार मोठा धक्का बसला, कारण या अण्वस्त्र चाचण्यांचा त्यांना पत्ता लागला नव्हता. 


शिवाय पाकिस्तानने चीनच्या मदतीने अण्वस्त्रे मिळवली असली, तरी त्यांचा स्फोट केला नव्हता. डिसेंबर १९९५ मध्ये निवडणुकांच्या घोषणा झाल्या. नंतर जनमत आपल्याकडे वळविण्यासाठी नरसिंहराव शासनाने गुप्तपणे अण्वस्त्र चाचण्यांची तयारी चालवली होती. 


परंतु अमेरिकेने अशा चाचणीचे वाईट परिणाम होतील असे सांगितल्याने ती चाचणी रद्द झाली. परंतु यावेळी मात्र अत्यंत गुप्तपणे सर्व तयारी होऊन ११मे रोजी एकाच वेळी तिन्ही स्फोट घडवून आणण्यात आले. भारतीय अणुऊर्जा संघटनेचे अध्यक्ष आर.चिदंबरम् हे १९९८ च्या स्फोटांचे शिल्पकार मानले जातात. 


डॉ.राजा रामण्णा हे भारतातील पहिल्या अणुस्फोटाचे (१९७४ मधल्या) जनक आहेत. १९७४ नंतर भारतीय अणुशास्त्रज्ञांनी प्रचंड प्रगती केली आहे याचेच हे स्फोट द्योतक आहेत.अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ ला हिरोशिमावर आणि ९ ऑगस्ट १९४५ ला नागासाकीवर बाँब टाकून क्रूर नरसंहार केला आणि साऱ्या जगाला आपल्या सामर्थ्याची जरब बसवली. 


या अणुबाँबच्या दहशतवादाला शह देण्यासाठी सोविएत युनियनने १९४९ च्या ऑगस्टमध्ये अणुस्फोट चाचणी केली. अणुस्फोटांचे भयानक परिणाम पाहून सर्वसामान्य जनतेला अणुशक्ती म्हणजे विनाश असेच वाटते, आणि ते एका अर्थी खरेही आहे. 


तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आज जग उभे आहे आणि या युद्धात अणुबाँबचा वापर झाला तर फार मोठा संहार होणार हे कटू सत्य आहे. अणुयुद्ध झालेच तर जय वा पराजय होणार नाही, तर सर्वनाशाशिवाय हाती काहीच येणार नाही.


परंतु अणुशक्ती ही जेवढी विध्वंसक आहे तेवढीच ती विधायकही आहे. सर्व शास्त्रीय शोधांप्रमाणेच या शक्तीचा मानवी कल्याणासाठी उपयोग करणे शक्य आहे. अणूला आपला मित्र बनवून शांततेसाठी त्याचा उपयोग करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अणुभट्टीतून मिळणाऱ्या उष्णतेचा वापर करून पाण्याची वाफ करता येते. 


या वाफेच्या योगाने वीज निर्माण करणारी यंत्रे चालवून अमाप वीज निर्माण करता येते व खेड्यापाड्यांपर्यंत वीज पुरवता येते. कारखाने वाढवून राष्ट्रीय उत्पादनात भर घालता येते. । - अणुभट्टीतून मिळणारी अणुरक्षाही मोलाची असते. तिच्या साहाय्याने अन्न निर्जंतुक करता येते, निरनिराळ्या रोगांचा नाश करता येतो.


अणुशक्तीच्या योगाने वाहनांची गती विलक्षण वाढली आहे. अंतराळविहार शक्य झाला आहे तो अणुशक्तीमुळेच, आण्विक इंधन वापरून परग्रहावर जाणे सहन शक्य आहे. त्या दृष्टीने शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू आहेत. अणुकिरणांच्या साहाय्याने अन्ननिर्मिती वाढविता येते. अणुशक्तीने भूमी सुजलाम् सुफलाम् केली आहे. 


अणुस्फोटांमुळे नद्यांचे प्रवाह बदलणे, मोठमोठे बोगदे खणणे आदी खर्चिक व वेळखाऊ गोष्टी जलद व कमी खर्चात होऊ शकतील. अन्ननिर्मितीप्रमाणे अन्नाच्या साठवणीसाठीही अणुकिरणांचा उपयोग होतो.रोगाचे निदान व निर्मूलन या दोन्हीसाठी अणुशक्ती साहाय्य करते. औद्योगिक क्षेत्रात तर अणुशक्तीने क्रांतीच केली आहे.


अणुविघटनातून विद्युतशक्तीची निर्मिती अनेक देशात होते. आपल्या देशातही आपण अणुशक्ती या कामी वापरली आहे. रशियन नौदलातील 'लेनिन'ही बर्फफोडी नौका अणुशक्तीचा वापर करणारी पहिली नौका होय.


आता अमेरिकेच्या नौदलातही अणुशक्तीचा वापर पाणबुड्या, विमानवाहिका आणि इतर अनेक प्रकारच्या जहाजांवर होतो. या जहाजांना इंधनासाठी सतत किनाऱ्यावर यावे लागत नाही, ती वर्षानुवर्षे समुद्रावर राहू शकतात. तेव्हा अशी ही तेजस्विनी अणुशक्ती मानवाला वरदायिनी ठरणार की विघातक ठरणार हे मानवावरच अवलंबून आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद