जाहिरातीची कला मराठी निबंध | The Art Of Advertising Essay Marathi

जाहिरातीची कला मराठी निबंध | The Art Of Advertising Essay Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जाहिरातीची कला मराठी निबंध बघणार आहोत. गाडी बराच वेळ बंद पडली होती. हातातले वर्तमानपत्र जवळजवळ वाचून संपले होते आणि अशा वेळी माझे लक्ष वेधले गेले ते वृत्तपत्रातील जाहिरातींकडे. अगदी मन लावून मी जाहिराती वाचू लागलो आणि त्यांतील लालित्य लक्षात येऊ लागले. 


मानवी स्वभावाचे सारे कंगोरे लक्षात घेऊनच त्या विविध जाहिराती तयार केल्या होत्या आणि यापूर्वी लक्षात न आलेले जाहिरातीतील कलागुण मला जाणवले. भारावून जाऊन मी बाहेर पाहिले; आणि काय गंमत! खिडकीतून समोर पाहिले तर तेथेही एक जाहिरात मला खुणावत होती. 



उंच कड्यावरील प्रभावी अंजनाची' जाहिरात पाहून मनात आले, जणू ही जाहिरात मानवाला त्याच्यातील त्रुटींची जाणीवच करून देत आहे. भव्य, दिव्य निसर्गाच्या सान्निध्यात तुला अमृतांजनाची गरज आहे. डोकेदुखीने हैराण झालास तर... तू या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊ शकणार नाहीस-असे जणू त्या जाहिरातीतून सूचवावयाचे होते.


जाहिरात ही आता आपल्या रोमारोमात भिनली आहे. नभोवाणी, दूरचित्रवाणी यांच्या माध्यमांतून ती घराघरातून मुक्काम ठोकत आहे. मला वाटतं, या जाहिरातीला आता कोणतीही जागा अप्राप्य नाही. ऑलिम्पिकचे मैदान असो, विशाल आकाशाचे प्रांगण असो वा गर्दीने गजबजलेला रहदारीचा रस्ता असो, सर्वत्र हिचे अस्तित्व आहेच. 


मुंबईत तर स्मशानाच्या भितींवरही जाहिराती रंगीबेरंगी रूपे घेऊन हजर आहेत. या जाहिरातीचे कार्य जसे महान तशी तिची रूपेही अनंत. तिला देक्श्राव्य शक्ती प्राप्त झाल्याने तर ती अधिकच आकर्षक झाली आहे. अशा या जाहिरातीचेही शास्त्र आहे. अनेक शास्त्रांच्या साहाय्यानेच ही कला विकसित होते. 


जाहिरातीच्या कलेला भक्कम आधार आहे तो मानसशास्त्राचा. मानवी मनाची नाडी तिने अचूक जाणली आहे. एखादी गोष्ट पुनः पुन्हा ऐकविली की ती माणसाला खरी वाटू लागते हे जाणून तीच तीच जाहिरात चित्रपट, दूरचित्रवाणी, नभोवाणी या माध्यमांतून अवतरते आणि मग ग्राहकाला ते खरेच वाटू लागते. 


एका साबणाच्या पावडरची विक्री जाहिरातीमुळे काही हजारांवरून कित्येक लाखांवर गेली असल्याचे नुकतेच वाचनात आले. माणसाच्या मनातील चिंता, व्यथा जाहिरात ओळखते. तरुण वयातील मुली चेहऱ्यावरील मुरमांनी बेचैन असतात, तर चेहरा गुळगुळीत ठेवण्यासाठी चांगल्या ब्लेडच्या शोधात तरुण असतात. 


जाहिरात त्यांच्या समस्या मांडून त्यांचे मन जिंकते आणि जाहिरातीतील मालाचा खप वाढविते. आजच्या जाहिरातीचे विशाल क्षेत्र आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, मानवी जीवनातील असे आता एकही क्षेत्र उरलेले नाही की ते या जाहिरातीने व्यापले नाही. 


विविध भेटींची आकर्षणे, आवडत्या अभिनेत्यांच्या नावांचा उपयोग आणि जीवनातील अवघड क्षण टिपून जाहिरात अवतरते आणि ग्राहकाचे मन जिकते. जाहिरात ही आज माणसाच्या जीवनाचा अपरिहार्य भाग झाली आहे. जाहिरातीची ही कला अनेक 'कलांची कला' आहे. 


जाहिरातीच्या कलेत चित्रकला, अभिनयकला, लेखनकला यांबरोबरच आज संगीतकलेलाही स्थान लाभले आहे. दूरचित्रवाणी व नभोवाणीवर अवतरणाऱ्या या जाहिराती गाण्यांसह अवतरतात. जाहिरातीत स्वतःला 'मॉडेल' म्हणून सादर करण्याचा व्यवसाय आज प्रतिष्ठा व धन दोन्हीही मिळवून देतो. 


सरस्वती आणि लक्ष्मी या दोघींचा संयोग जाहिरातीत आहे. आज परमेश्वराला इहलोकात अवतार घ्यावासा वाटला तर त्यालाही जाहिरातीच्या या कलेचाच आधार घ्यावा लागेल, हे नक्कीच! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

जाहिरातीची कला मराठी निबंध | The Art Of Advertising Essay Marathi 



सध्या जाहिरात युग चालू आहे असे म्हटले तरी हरकत नाही. जाहिरातीचे क्षेत्रही चित्रपटसृष्टीप्रमाणे स्वप्नांची भूल घालणारे असते. लहानथोर सर्वांनाच जाहिरातीचे प्रचंड आकर्षण असते. जाहिरात हे ग्राहकापर्यंत आपले उत्पादन पोचवण्याचे व्यापाऱ्यांचे साधन असते. 


आजकाल उत्पादन केवळ चांगले असून भागत नाही, ते चांगले आहे असे जाहिरातीद्वारा लोकांच्या मनावर ठसवावे लागते. 'ओरडणाऱ्यांची करवंदे खपतात पण गप्प बसणाऱ्यांची द्राक्षेसुद्धा खपत नाहीत' हे आजच्या युगातील फार खरे सत्य आहे. 


त्यामुळे जाहिरात ही प्रत्येक विषयाला व्यापून उरणारी आहे. जाहिरातीमध्ये रसिकता, संगीत, कलात्मकता अशा गोष्टींची मनोवेधक गुंफण असते. त्यामुळेच जाहिराती अधिकाधिक आकर्षक बनतात. म्हणूनच हल्ली जाहिरातीची कला ही 'पासष्टावी कला' मानली जात आहे.


जाहिरात म्हणजे कल्पनाविलास. ज्या कल्पनेभोवती जाहिरात गुंफलेली असते, त्या कल्पनेशी आपले नाते जसे जुळेल, त्याप्रमाणे आपल्याला जाहिरात आवडते वा नावडते. आवडणाऱ्या मॉडेल्सबद्दल जोरदार चर्चा होतात, जिंगल्स ओठांवर रेंगाळतात. 


जाहिरातीच्या जगात असते झिंग आणणाऱ्या तारुण्याची उत्साही सळसळ! प्रसन्नतेचा हलकेच शिडकावा करून शिणल्या मनाला ताजेतवाने करणारा नर्म विनोद! रोजच्या जीवनाशी इमान राखतानाच डोळ्यांत फुलवलेली स्वप्ने! भारतीय जीवनातील परंपरेचे महत्त्व जपतानाच बदलत्या जीवनशैलीचेही चित्रण! प्रगत तंत्रज्ञानाचा अचूक उपयोग करून तयार केलेल्या तांत्रिक करामती!! 



या जगात दुःखाने पिचणे नाही, निराशेच्या भोवऱ्यात गरगरणे नाही. राग, असूया, द्वेष अशा वाईट प्रवृत्तींना येथे शिरकाव नाही. इथे सापडतो प्रचंड आशावाद! खऱ्याखोट्याच्या सीमारेषा पुसून टाकणारा, नित्यनवीन स्वप्नांची उधळण करणारा. 


'कुछ बात है जिन्दगीमें' असा दिलासा देणारा, म्हणूनच मनाला भिडणारा! या साऱ्यांमुळे जाहिराती नकळत आपल्या मनात घर करून बसतात. जाहिरात ही उत्पादक व ग्राहक यांच्यामधला दुवा असते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले उत्पादन पोहोचविणे हे जाहिरातीचे उद्दिष्ट असते.


सुरुवातीच्या काळात अमुक उत्पादन अमुक कंपनीचे आहे व त्याचे अमुक गुणधर्म आहेत, एवढेच सांगणे असे जाहिरातीचे काम असे. आज जाहिरातीवर ग्राहकाला त्या उत्पादनाच्या खरेदीसाठी उद्युक्त करावयाची जबाबदारी येऊन पडली आहे आणि 'जाहिरात' हा कलाप्रकार न राहता तो एक शास्त्र बनू लागले आहे. 



जाहिरात संस्था अस्तित्वात आल्या आहेत. जाहिरात माध्यम हा प्रचंड व्याप्ती असलेला बिझनेस झाला आहे.
जाहिरात तयार करण्याचे Attraction, Interest, Decision & Action असे चार टप्पे असतात. लोकांच्या मनात आपल्या उत्पादनाबद्दल आकर्षण निर्माण झाले पाहिजे. मग ते उत्पादन घेऊया असे ग्राहकाला वाटले पाहिजे व ग्राहकाला ते घेण्यासाठी जाहिरातीने उद्युक्त केले पाहिजे.


जाहिराती या अनेक प्रकारच्या असतात. कही वेळा नवीन उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवायचे असते. उदा. केलॉग्जची जाहिरात. तर काही वेळा आपल्या उत्पादनाची मधून मधून आठवण करून देण्यासाठी जाहिराती असतात. 


पावसाळा आला की छत्र्यांच्या, व्हिक्स वेपोरबच्या जाहिराती यायला लागतात. दिवाळी आली की रंगांच्या जाहिराती, फर्निचरच्या जाहिराती येऊ लागतात. काही वेळा एखादा कार्यक्रम एखादी कंपनी प्रायोजित करते. अन् मग त्या कार्यक्रमाबरोबर त्या कंपनीची जाहिरातही आपल्या लक्षात राहून जाते. उदा. T.V.S सारेगामा, संतूर 'सारे सारे गाऊया', कोलगेट 'टॉपटेन', क्लोजअप 'अंताक्षरी'. त्याचप्रमाणे लोकप्रिय नट्या साबणांच्या जाहिरातीत असतात.


क्रिकेटपटूंबद्दल लोकांना आकर्षण असते हे पाहून Boost is the secret of my Energy अशी कपिलदेवला जाहिरात करायला लावले जाते. जाहिराती कुठे कुठे असतात असे बघण्यापेक्षा कुठे नसतात असे विचारायला हवे. टी.व्ही., रेडिओ, वृत्तपत्रे, मासिके, इमारती, रेल्वे प्लॅटफॉर्म, भिंती, दुकाने, बसेस, रेल्वेचे डबे या साऱ्या ठिकाणी आपल्याला जाहिराती पाहायला मिळतात.


आज जाहिरातींचा इतका महापूर आला आहे की काही वेळा नको या जाहिराती, असे वाटते. आवडता कार्यक्रम पाहायला टी.व्ही.समोर बसावे तर निम्म्याहून अधिक वेळा जाहिराती पाहाव्या लागतात. काही वेळा खोट्या



जाहिरातींमुळे ग्राहकांची फसवणूक होते. उदा. वजन कमी करण्यासाठी औषधे, यांच्या जाहिराती फसव्या असतात. परंतु काही असले तरी जाहिरात ही कलांची कला आहे. आज जाहिरातीत चित्रकला, संगीत, छायाचित्रण, लेखन, अभिनय या साऱ्यांचा मिलाफ आढळतो. 


जाहिरातीतील 'मॉडेल'ना पैसा व प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे जाहिरात हा आजच्या युगाचा धर्मच बनला आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद