क्षमा सज्जनांचा गुण आहे मराठी निबंध | KSHAMA SAJJANACHA GUN AAHE ESSAY MARATHI

 क्षमा सज्जनांचा गुण आहे मराठी निबंध | KSHAMA SAJJANACHA GUN AAHE ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण क्षमा सज्जनांचा गुण आहे मराठी निबंध बघणार आहोत.  आज आपण क्षमा सज्जनांचा गुण असलेले दोन निबंध बघणार आहोत 



क्षमा शस्त्रे करे यस्य दुर्जनं किं करिष्यति। 

अतृणे पतितो वह्निः स्वयमेव प्रशाम्यति॥


सुभाषितकारांनी म्हटलेलंच आहे की, ज्याच्या हातात क्षमारूपी शस्त्र आहे. त्याला दुर्जन काय करू शकणार? काहीही करू शकत नाही. ज्याप्रमाणे गवत नसलेल्या जमिनीवर अग्नी पडला तर तो आपोआप विझतो, त्याप्रमाणे अग्नीप्रमाणे तापलेले दर्जनही शांत क्षमाशील माणसापुढे आपोआप थंड होतात, शमतात, नमतात. Hate the 'sin, not the sinner. असे म्हटलेले आहे.


पापाचा दुष्ट प्रवृत्तीचा तिरस्कार करा. त्या माणसाचा नव्हे. संतसजनांना हे तत्त्व ज्ञात होते. त्यामुळेच येशू खिस्ताने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली. सॉक्रेटिसाने विषाचा प्याला प्राशन केला. आपला छळ करणाऱ्या समाजाला ज्ञानेश्वरांनी उदार मनाने क्षमा केली तर आपल्या अंगावर १०८ वेळा धुंकणाऱ्या माणसावर एकनाथ- महाराज रागावले नाहीत. 


पूर्वीच्या काळी पहिलाच गुन्हा असेल तर त्यास क्षमा केली जात असे. क्षमा हे शूर-वीरांचे भूषण आहे. सजनांचा गुण आहे. आपल्यामध्ये प्रतिकार करण्याचे सामर्थ्य असतानाही दुसऱ्यास शिक्षा न करणे, ही साधी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी विशाल अंत:करणाची गरज लागते. 


अपराध नसतानाही शिक्षा करणे, त्रास देणे ही दुर्जनांची प्रवृत्ती तर अपराध केल्यावर त्यास शासन करणे सामान्य लोकांची प्रवृत्ती. पण अपराध्यालाही क्षमा करणे ही सजनांची वृत्ती आहे. मुक्ताबाई म्हणतात,


विश्वरागे झाले वह्नि।

संते मुखे व्हावे पाणी। 


दष्ट लोकांचा दुष्टपणा नाहीसा करण्याचा तो सोपा उपाय आहे. भगवान श्रीकृष्णानेही शंभर अपराधांना क्षमा केली होती.


उत्तम: क्लेशविक्षोभं क्षमः सोढुं न इतरः। 

मणिः एव महाशाणघर्षणं न तु मृत्कणः।


जो श्रेष्ठ असतो तोच क्लेश व अस्वस्थता सहन करण्यास समर्थ असतो. हिराच कसोटीच्या मोठ्या दगडावर घासणे सहन करू शकतो. मातीचे ढेकूळ किंवा कण ते सहन करू शकत नाही. त्याप्रमाणे क्षमा हे सजनांचे शस्त्र आहे. भूषण आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध  2 

क्षमा सज्जनांचा गुण आहे मराठी निबंध | KSHAMA SAJJANACHA GUN AAHE ESSAY MARATHI


उच्च प्रतीच्या जीवनाची त्रिसूत्री-दया, क्षमा, शांती।

हे तिन्ही ज्यांचे ठायी वसती-तेच सज्जन असती.... 


कोणी आपला अपराध केला की आपले पित्त खवळते, चीड येते; कोणी आपल्यावाटी गेले, नुकसान केले तर 'जशास तसे' तत्त्वाने 'ईंट का जवाब पत्थरसे' ही देतो, शेपटीवर पाय दिल्यावर सापाने फणा काढावा तसा - अगदी नैसर्गिक! कोणी याला बाणेदार म्हणतील, कोणी लढाऊ- पण जीवनस्तर सामान्यच! दुसऱ्याचे अपराध माफ करण्यासाठी विशाल अंत:करण लागते. म्हणूनच क्षमा हा सज्जनांचा गुण!


"तुका म्हणे राहे, अंतरीं शीतल।

 शांतीचें तें बल, क्षमा अंगीं॥" 


दंश करणाऱ्या विंचवालाही पुन्हा पुन्हा पाण्यातून बाहेर काढणारे महंमद, अंगावर पानाची पिचकारी मारूनही न रागावता पुन्हा पुन्हा नदीस्नान करणारे एकनाथ, एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करणारे म. गांधी, जिंकूनही सिकंदराला सोडून देणारा पौरस, घाव घालणारावरही सावली धरणारे वृक्ष, जाळून नष्ट करणारालाही ऊब देणारी लाकडे, क्रूसावरही ‘परमेश्वरा यांना माफ कर म्हणणारा येशू- ही सारी उच्चस्तरीय जीवने!


चांगल्याशी चांगले वागणे यात काय चांगुलपणा? हा तर व्यवहार झाला. सामान्य प्रतीचा, सामान्यांचा, वाईटाशीही चांगले वागणे हा खरा चांगुलपणा. सामान्यांना न जमणारा, म्हणूनच असामान्य असा सज्जनपणा! ...पण याची किंमतही जबरदस्त मोजावी लागते. 


नुकसान, क्लेश, अवमान, उलघाल, अस्वस्थपणा सहन करण्याच्या स्वरूपात. कधी प्राण गमावण्याच्या परिणामी स्वरूपातही! इतरेजन हे करूच शकत नाहीत.


जो श्रेष्ठ तोच क्लेश व अस्वस्थता सहन करतो, इतर करू शकत नाहीत. हिराच कसोटी दगडावर घासणे सहन करतो, मातीचे ढेकूळ ते सहन करू शकत नाही. त्रास होण्याच्या कसोटी प्रसंगातच, त्रास देणाऱ्याशी माणूस कसा वागतो, क्षमा करतो की भडकून उठतो यावरून माणसाचे सज्जनपण वा सामान्यपण ठरते. 


अशा प्रसंगी सामान्य जीवनस्तरीय टिकत नाहीत मग ते होतात- “सारी दुनिया जला दूँगा" म्हणणारी अमिताभ बच्चनने रंगवलेली 'यंग अँग्री मेन' पात्रे! सूडाचा आसूड हाती घेणारा, शांती ढवळून टाकणारा, निरपराध्यांनाही वेठीला धरणारा, हिंसक, दोन पायांचे पशू! यातून काय निघतं? वैराचा वणवा तेवढा पेटतो.


अपराध्याला शिक्षा हा मानवी न्याय झाला. पण 'क्षमा' हा झाला दिव्य मानवी आविष्कार!... कोणी याला भ्याडपणा, पुळचटपणा, बुळेपणा, बावळटपणा, नामर्दपणा, मूर्खपणा म्हणतील. पण सारा सज्जनपणा पणाला लावावा तेव्हा कुठे क्षमेचा हुंकार ऐकू येतो हे त्यांना काय कळणार म्हणा!... 


“क्षमा ज्ञानस्य आभरणं"..."क्षमातुल्यस्तपोनास्ति' क्षमा करायला ज्ञानबल, तपोबल लागते. अपार करुणा, मानवाच्या अस्तित्वाच्या हेतूचे आकलन लागते... क्षमा हे सामंजस्याचं परिपक्वतेचं (Maturity) प्रतीक. क्षमा हे शस्त्र! शत्रुत्वाचे पंख कापण्याचं.


“क्षमा शस्त्र करे यस्य दुर्जन: किं करिष्यति?" ज्याच्या हाती हे शस्त्र आहे त्याचं दुर्जन काय वाकडे करणार ? उलट शरणच येणार.म्हणूनच आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांच्यापुढे दरोडेखोरांनी आपण होऊन आपल्या बंदुका टाकल्या- आणि येशू देव होऊन घराघरातील देव्हाऱ्यात जाऊन बसला! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.