लेखकाची जबाबदारी मराठी निबंध | LEKHAKACHI JABABDARI ESSAY MARATHI

 लेखकाची जबाबदारी मराठी निबंध | LEKHAKACHI JABABDARI ESSAY MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लेखकाची जबाबदारी मराठी निबंध बघणार आहोत. लेखक हा आपल्या समाजाचे एक अभिन्न अंग आहे. तो एक विवेकी, संवेदनशील, बुद्धिमान प्राणी आहे. समाज आणि साहित्य यांना जोडणारा लेखकच असतो. 


लेखक समाजातच राहून साहित्य निर्मिती करतो. अशा प्रकारे त्याला दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. लेखक ज्या देशात जन्म घेतो, ज्या समाजात राहतो, तेथील परिस्थितीचा त्याच्या मन-बुद्धीवर प्रभाव पडतो. लेखक आणि सामान्य जन यांच्या प्रतिभा शक्तीत अंतर असते. 


सामान्य जन आपल्या परिसरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला पाहतात, ऐकतात आणि मूक प्रेक्षकाप्रमाणे किंवा श्रोत्याप्रमाणे फक्त अनुभवतात तर लेखक आपल्या भावना आणि विचारांशी तुलना करून ते लिपीबद्ध करून समाजासमोर ठेवतो. रोमाँरोलाँच्या मते, "ज्याला अन्याय पाहून राग येत नाही तो कलाकार आहे पण मनुष्य नाही."


साहित्य म्हणजे लेखकाच्या विचारांची अभिव्यक्ती. आपले जीवन आणि समाजाचा आरसा. तात्पर्य, जसा समाज असेल तसेच साहित्य असेल. जसे साहित्य असेल तसाच समाज असेल, ज्याप्रमाणे कालिदास, मोहन राकेश, आनंद यादव इ० विद्वान लेखकांच्या साहित्यात आपणास त्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचे वास्तव स्वरूप दिसते. 


समाजापासून अलिप्त राहून साहित्य समाजात आदरास प्राप्त होऊ शकत नाही. समाजाच्या स्वरात स्वर मिळवून चालणे व त्यास आपल्याकडे आकर्षित करून घेऊनच साहित्य समाजात मान्यता मिळवू शकते. मराठीत हरी नारायण आपटे हे एक असेच मोठे कांदबरीकार होऊन गेले. 


त्यांनी त्याकाळातील केशवपन आणि विधवांची स्थिती या सामाजिक समस्यांचे चित्रण आपल्या कांदबरीतून केले. भारत जगातील प्राचीनतम राष्ट्रांपैकी एक आहे. इथे मोठ्या प्रमाणावर प्रचंड प्राचीन साहित्य उपलब्ध आहे. ज्ञानाचे प्रचंड भांडार इथे मिळते. 


आपल्या साहित्यात आणि विश्वसाहित्यातही ज्ञान-विज्ञानाच्या नवनवीन तत्त्वांचा प्रवेश होत आहे. अशा परिस्थितीत लेखकाची ही जबाबदारी आहे की त्याने नव्या आणि जुन्या ज्ञानाला आपल्या साहित्यात स्थान द्यावे. जर त्याने ही जबाबदारी पार पाडली तर तो देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल. 


तर त्याने ही जबाबदारी पार पाडली नाही तर त्याचे साहित्य कावळा-चिमणीची गोष्ट बनेल. आपल्या स्वजनांची अवज्ञा करून तो यशस्वी लेखकांच्या श्रेणीत जाऊन उभा राहू शकणार नाही.


कवीच्या भावना कवितेच्या रूपात बाहेर पडतात. विद्वान लोक साहित्याला समाजाचा आरसा यासाठी म्हणतात की त्यात प्रत्येक युगाचे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक इ० सर्व परिस्थितींचे प्रतिबिंब पडलेले असते. लेखक आपल्या काळातील सर्व चांगल्यावाईट गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो.


लेखक एक मनुष्य आहे. तो पण समाजात राहून विकास करतो. तो त्या परिसराला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा नाही की तो असाहाय्य आहे. लेखकामध्ये अशी एक दिव्य शक्ती असते जी आपल्याभोवतीच्या परिसराला नवेपणा देऊ शकते. पृथ्वीवर स्वर्गाची निर्मिती करू इच्छिणाऱ्या विश्वामित्रासारखा तो आहे.


इतिहास साक्ष आहे की लेखकाने प्रत्येक युगात आपल्या कर्तव्याचे यथायोग्य पालन केले आहे. जर लेखक वाचकांच्या मनावर प्रभाव टाकण्यात यशस्वी झाला तर त्याचे साहित्य राष्ट्रासाठी एक अमूल्य ठेव बनेल. जगात लेखकच फक्त असा एक प्राणी आहे जो कुणाच्या मागे जात नाही, तर संदेश देत पढे-पुढे जातो. 


ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडताना तो समाजाला मार्गदर्शन करतो. खरा लेखक तो असतो जो मन, वचन आणि कर्माने तपस्वी साधक असतो. त्याचे जीवन दिव्याप्रमाणे आहे. जो स्वत: जळून दुसऱ्यांना प्रकाशित करतो. ज्ञानाचा उजेड घराघरात पसरवितो. 


वि. स. खांडेकरांच्या मतानुसार "लेखक आदर्शवादी असला पाहिजे."  जेव्हा लेखक आपल्या सभोवती भयंकर भ्रष्टाचार, धुमसणे, बेकारी, दहशतवाद, खून इ० चे तांडव पाहतो तेव्हा समाजाच्या उद्धारासाठी आपली कंबर कसतो. आपल्या लेखनाद्वारे जनतेत जागृती करण्याचा प्रयत्न करतो. 


या कार्यात तो बऱ्याचदा यशस्वी होतो तर पुष्कळदा त्याला आपली हत्यारे खाली टाकावी लागतात. आपल्या काळाचे यथार्थ चित्रण करताना भविष्याप्रती जागृत राहतो. तो जो काही विचार करतो तो जनसामान्यांपर्यंत पोहोचवितो. लोकांनी ते कोणत्या रूपात स्वीकारावेत हे लोकांवरच अवलंबून आहे.


लेखक केवळ मनोरंजनासाठी लिहीत असेल तर कलेसाठी कला असे समजून लिहितो. पण ते साहित्य जिवंत नसते. साहित्यात जर जीवनातील वास्तव नसेल तर ते साहित्य नव्हे. केवळ मनोरंजन हा साहित्याचा हेतू नसावा तर त्यात मार्मिक उपदेशही असावा.


लेखक केवळ देशकाल परिस्थितीमुळेच प्रभावित होत नाही तर त्याला जगात घडणाऱ्या घटनाही प्रभावित करतात. भीषण नरसंहार पाहिला की तो रडतो त्याचे आक्रंदन वृत्तपत्राद्वारे आपल्यापर्यंत पोहोचते. १९४५ मध्ये अमेरिकेने हिरोशिमा-नागासाकीवर बाँब टाकले तेव्हा त्याने आपला विरोध जाहीर केला. 


भारतात जेव्हा भोपाळ गॅसकांड झाले तेव्हा संपादकीय लेखाद्वारे त्याने लोकांचे लक्ष वेधले. दुष्ट रुढी, परंपरा नष्ट करण्यातही लेखकाचा सहभाग आहे. गुजरातमधील रूपकँवरला सती जाण्यास भाग पाडले तेव्हा सर्व वृत्तपत्रांनी महिनाभर त्याला विरोध केला. स्त्री मुक्तीसाठी लेखकांनी वेळोवेळी आपला आवाज उठविला.


लेखकाने प्रथम आपल्या साहित्यकृतींचे त्या लोकांपर्यंत जाण्यापूर्वी सूक्ष्म निरीक्षण केले पाहिजे. कारण तो जे लिहितो ते समाजातील बुद्धिजीवी वर्ग वाचतो. 


त्याने कुणाच्या धर्मावर प्रहार करणारे साहित्य लिह नये. लेखक समाजाचे वास्तव सादर करणारा सामाजिक प्राणी आहे. येणाऱ्या उद्याला तो सुधारण्याचा प्रयत्न करीत असतो. उद्यासाठी सुंदर स्वप्नही तो आजच देतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद