मानवता धर्म मराठी निबंध | Manavta Dharm Nibandh Marathi

 मानवता धर्म मराठी निबंध | Manavta Dharm Nibandh Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मानवता धर्म मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण मानवता धर्म असलेले दोन निबंध बघणार आहोत “खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे।" ही महन्मंगल प्रेमाचे पाईकअसणाऱ्या पू० सानेगुरुजींची ‘धर्माची' व्याख्या सर्वांना माहीत आहेच.


 'धारणात् धर्म इति आहुः।',

 'धर्मो धारयते प्रजा।' 


अशीही धर्माची व्याख्या केली जाते. सर्व समाजाला एकत्र आणणारा, समाजाची धारणा करणारा, समाजाला नीती शिकवणारा तो धर्म. आचार प्रभवो धर्मः। अशी महाभारतात धर्माची व्याख्या केली आहे. सदाचार सांगणारा, शिकवणारा तो धर्म!


परंतु मध्ययुगीन कालात कर्मकांडाचे महत्त्व वाढले. अनेक धर्म उदयास आले. जैन, बौद्ध, हिंदू धर्मपंथ निर्माण झाले. शीख, इस्लाम, खिश्चन हेही धर्म नसून धर्मपंथच म्हणावे लागतील. कारण सर्व धर्मांचा पाया एकच आहे. कारण मजहब नहीं सिखाता आपसमें बैर करना। सर्व धर्मांच्या मुळाशी मानवतेची शिकवण आहे. 


धर्माला जेव्हा विकृत स्वरूप प्राप्त झाले, धार्मिक तेढ वाढली तेव्हा साधुसंतांना मानवधर्म शिकवावा लागला. त्यांनी जो धर्म सांगितला तो मानवधर्मच. मानवता धर्मच. परस्परांशी प्रेमाने, आपुलकीने, सहानुभूतीने वागणे म्हणजे मानवधर्म. (न असौ धर्म: यत्र न अस्ति सत्यम्। (महाभारत) जेथे सत्य नाही तेथे धर्म नाही. सत्य म्हणजे ज्यात दुसऱ्याचा


दुस्वास नाही, छलकपट नाही ते सत्य. ज्योतिबा फुलेही म्हणतात, की सर्व सुख मलाच असावे असे आपल्याला का वाटते? दुसऱ्याला का नसावे? 'मानवाचा धर्म, सत्य नीती खूण!' मानवाने मानवाशी मानवासारखे, बंधुभावाने वागणे म्हणजेच मानवधर्माचे पालन करणे.


रखरखत्या वाळवंटात अंत्यजाच्या मुलाला उचलणाऱ्या एकनाथांचा, अनाथ मुलांची सेवा करणाऱ्या मदर टेरेसांचा, अस्पृश्यता दूर करणाऱ्या महात्मा गांधींचा, कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या बाबा आमटयांचा, आदिवासी, डोंगराळ भागातील मुलांना शिकवणाऱ्या अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांचा धर्म कोणता? मानवधर्म!


स्वामी विवेकानंदांनी 'धर्म म्हणजे दीनदुबळ्यांची सेवा' असे व 'जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, ज्यासी अपंगिता नाही, त्यासी म्हणे जो आपुले।' असे जे तुकाराम महाराज सांगतात, ते किती सार्थ आहे.


“आपल्या सुखात दुसऱ्याला वाटेकरी करून घ्यावेसे ज्याला वाटते, तोच 'मानव' " असे दादा धर्माधिकारी म्हणतात. जो 'एकटा' खातो तो 'पाप' खातो, असे भगवद्गीता सांगते. आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी बंधुभावाने राहणारा किंवा समाजातील लोकांशी प्रेमाने, आपुलकीने वागणारा किंवा 'हे विश्वचि माझे घर' असा मानणाराच खरा धार्मिक ! कारण सर्वात महान असणाऱ्या मानवधर्माचे तो पालन करत असतो.


पण आजच्या स्पर्धेच्या, सत्तेच्या, यंत्राच्या, विज्ञानाच्या युगात हा मानवधर्म कुठे तरी हरवला आहे असे वाटते. म्हणून बहिणाबाईही प्रश्न विचारते, 'अरे मानसा मानसा, कधी होशील मानस?' 'भारतीय संस्कतीचे वस्त्र मानवतेच्या धाग्यांनी विणले आहे,' 


असे डॉ. राधाकृष्णन् म्हणतात. मग आपण भारतीयांनी या मानवता धर्माचे पालन नको का करायला? म्हणजेच खळांचि व्यंकटी सांडणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या स्वधर्माचा अभ्युदय होईल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


 निबंध 2

 मानवता धर्म मराठी निबंध | Manavta Dharm Nibandh Marathi



धारणात् धर्मः इति आहुः, 

धर्मेण विधृताः प्रजाः।" 


महाभारतात श्रीव्यासांनी धर्म म्हणजे काय? याचं संदर स्पष्टीकरण केलं आहे. धारयते इति धर्मः। आधार देतो तो धर्म! धर्म प्रजेचं धारण म्हणजे रक्षण करतो. रक्षणाबरोबरच समाजाची जीवनशैली, विचारसरणी, यांचं पोषण करतो, त्यांना योग्य वळण देतो तो धर्म. 


त्याच महाभारतात भीष्म म्हणतात, “धर्मस्य निष्ठा तु आचार:" सदाचार हा धर्माचा आधार आहे.... सामान्यत: सर्व लोक धर्म म्हणजे कर्मकांड, कर्मठ आचरण असे मानून गल्लत करतात. म्हणून हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन असे वेगवेगळे धर्म आज मानतात. 


ह्या चुकीच्या अर्थाने समाजात फूट पडत आहे. दरी निर्माण होत आहे. मार्ग भिन्न पण ध्येय एकच हे कुणाच्या लक्षातच येत नाही. 'परमेश्वर' म्हणजे विश्वनिर्मितीमागील अव्यक्त शक्ती! म. फुले हे निर्मिक कल्पनेचे पुरस्कर्ते! जसा चंद्र एक आहे, 


सूर्य एक आहे, हवा एकच आहे. सर्व प्राणिमात्रांसाठी या गोष्टी एकच आहेत. तसा सर्व मानवजातीचा धर्म एकच आहे असे ते मानतात. हाच तो मानवधर्म! म्हणजे मानवता हाच धर्म!!



या मानवता धर्माचे ब्रीद आचार्य
विनोबा भावे सोप्या सुंदर शब्दांत सांगतात. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे मानवता. त्यात सदाचार वर्तन म्हणजे मानवधर्म! दुसऱ्याच्या दु:खाने दु:खी होणं ही माणुसकी, पण दुसऱ्याच्या सुखानं आनंदी होणं ही खरी मानवतेची कसोटी. 


माणूस इथे घसरतो. मत्सर त्याला ग्रासतो. दसऱ्याच्या वैभवाने मत्सर न वाटता आनंद वाटणे हे खरे आपल्या अंत:करणाचे वैभव ! ते ज्याने प्राप्त केले तो खरा मानवधर्म शिकला.

"पावो शीतलता लाहे।

ते डोळियाची लागी होये।

तैसें परसुखें जाये। सुखावतु॥"


 या समर्पक ओवीत संत ज्ञानेश्वर हीच कल्पना मांडतात. आपल्या सर्व संतांनी व समाजसुधारकांनी हाच मानवधर्म आचरणात आणला आहे. सामाजिक समता प्रस्थापित करून, अन्यायकारक रूढी नाहीशा करून सर्वांना सुखी करायची त्यांनी धडपड केली आहे. 


राजा राममोहन रॉय यांनी सतीची चाल बंद केली, महर्षी कर्त्यांनी विधवा विवाह घडवून आणले, म. फले यांनी स्त्री-शिक्षण करवले. आंबेडकरांनी दलितोद्धार केला. दामाजीपंतांनी दुष्काळग्रस्तांसाठी धान्य कोठार लुटवले. बाबा आमट्यांनी कुष्टरोगी सेवा केली... 


हे सारे माणुसकीचे गहिवर म्हणजेच मानवधर्माचे पालन स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व ही या मानवधर्माची त्रिसूत्री आहे... मला जसे स्वातंत्र्य हवे तसे इतरांचे स्वातंत्र्य मी मानले पाहिजे. आपपर भाव न राखता श्रेष्ठ कनिष्ठ असे जातिभेद न मानता समता मी स्वीकारली पाहिजे. 


जगातील सारे मानव माझे बांधव. हे मानताना प्रांतिक संकुचितता सोडली पाहिजे. असे केले तर हेवेदावे, भांडण, लढाया, आक्रमणे, जुलूम, क्रौर्य सारे विराम पावेल. आकाशाच्या एकाच छताखाली अवघी मानवजात सुखेनैव नांदेल. 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.  म्हणूनच ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेली "भूतां परस्परें जडो। मैत्र जीवाचें।" हीच या मानवधर्माची सांगता आहे.