एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ मराठी निबंध. | Marathi essay ekmeka sahya karu avghe dharu supanth

 एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ मराठी निबंध. | Marathi essay ekmeka sahya karu avghe dharu supanth 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.त्या खेडेगावाबद्दल मला फार आश्चर्य वाटले. कारण त्या गरीब खेडेगावातील लोकांचा धंदा शेती असन सर्व खेड्यात मिळून फक्त एकच बैलजोडी आहे. लोक गरीब आहेत. 


सर्वांना बैलजोडी घेणं परवडणार नव्हतं. मग सर्वांनी पैसे जमा केले. एक बैलजोडी खरेदी केली व क्रमाक्रमाने एकमेकांच्या सोयीनं, सहकारानं ते शेतीची कामे पार पाडतात. खरंच कौतुक करण्यासारखीच ही गोष्ट नाही का?


एकमेकांना सहकार्य करण्याची भारताची परंपराच आहे. प्राचीन काळी भारतातील खेडी स्वयंपूर्ण होती. एकमेकांच्या सहकार्याने खेड्यातील सर्वांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जायच्या. आजही सहकार्याशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही.


एखादे घर चांगले चालायचे असले, शाळा चांगली चालायला हवी असेल, एखाद्या संस्थेचा, कंपनीचा, कारखान्याचा कारभार चांगला चालावा असे वाटत असेल, तर एकट्यानं चांगलं काम करून काहीही होत नाही. एकमेकांच्या साह्याशिवाय कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. एकटा कॉन्ट्रॅक्टर इमारती बांधू शकत


नाही किंवा एकटा इंजिनिअर मोठमोठ्या पुलांचं बांधकाम करू शकत नाही. म्हणून आपल्याला जे काम करणं शक्य आहे ते काम मनुष्यानं आपल्या कुवतीप्रमाणं केलं पाहिजे, दुसऱ्याला त्याच्या कामात मदत केली पाहिजे, हाच मानवाच्या जीवनातील सन्मार्ग होय. 


दुसऱ्याच्या कामात विघ्न उत्पन्न करणारी विघ्नसंतोषी वृत्ती काय कामाची? त्यामुळे आपलाही फायदा नाही. दुसऱ्याचे नुकसान करण्यात कसला शहाणपणा? समाजातील सर्वांनीच एकमेकांच्या अडचणीच्या वेळी, गरजेच्या वेळी एकमेकांना सहाय्य केलं तरच सर्वांचा फायदा होईल. हाच सुपंथ होय.


कोल्हापरच्या राजर्षी छत्रपती शाह महाराजांनीही या सहकाराचे महत्त्व ओळखले होते. 'शेती व उद्योग दोन्ही क्षेत्रांत सहकाराचा अवलंब केला तरच आपला विकास होऊ शकेल,' असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. तसेच 'भांडवलदारांच्या मर्जीवर, स्वार्थबुद्धीवर व न्यायबुद्धीवर काम करणाऱ्या हजारो लोकांचे जीवित अवलंबून राहते, 


ही स्थिती बरोबर नाही,' असेही त्यांनी सांगितले. तसेच पश्चिमेच्या धर्तीवर सर्वस्वी चालणारे कारखाने आमच्या देशात यशस्वी होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. 'आपली सहकार पतपेढी काढा,' असा सल्लाही त्यांनी दिला.


'सहकार चळवळ' माणसांच्या अनेक समस्या सोडवू शकते. म्हणूनच नामदार गोखले, धनंजयराव गाडगीळ यांनी या चळवळीचा प्रसार केला. प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांनी काढलेला साखर कारखाना सहकाराच्या तत्त्वाचे उत्तम उदाहरण आहे.


आज शहरात व ग्रामीण विभागातही या चळवळीचे महत्त्व फार वाढले आहे. घरे बांधण्याची समस्या असो किंवा दुधाचा प्रश्न असो किंवा स्वस्त व चांगल्या दर्जाच्या अन्नधान्याचा प्रश्न असो; सहकारी तत्त्वातून, चळवळीद्वारे ही समस्या सोडवता येते. 


आज सर्व लघुउद्योग, ग्रामीण उद्योग सहकारी तत्त्वावर आधारित असतील तर त्यांना शासनाचे कर्ज मिळू शकते. सहकारातून मोठमोठया महाविद्यालयांची, दवाखान्यांची, कारखान्यांची, उद्योगधंद्याची उभारणी होत असते.


देश स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी, लो. टिळक यांना जनतेचा 'सहकार' होता. स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मावळ्यांचे, तर सेतू बांधण्यासाठी श्रीरामप्रभुंनी वानरांचे साहा घेतले. आजही आर्थिक साहाय्य, यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान, अनधान्य इ. बाबतीत महाराष्ट्रात सहकार्याचा हात पुढे केला जातो. 


त्यामुळेच आज खेड्यांची, शहरांची व समाजाची प्रगती झपाट्याने होत आहे. हे काम नव्हे तव एकट्याचे! येथे सहकार्य हवे सर्वांचे! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2 


एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ मराठी निबंध. | Marathi essay ekmeka sahya karu avghe dharu supanth 


लहानगा चंद्रशेखर विस्फारलेल्या डोळ्यांनी ते दृश्य पाहत होता. बालसुलभ कुतूहल, आश्चर्य, आनंद अशा विविध भावच्छटा त्याच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या. “सूर्यप्रकाशात धरलेला कागद जळेल का ?" या बाबांच्या प्रश्नाला त्याने ठामपणे नकारार्थी उत्तर दिले होते. 


पण बहिर्गोलभिंगाच्या माध्यमातून सूर्यकिरणे कागदावर पडली आणि पाहता पाहता कागद जळू लागला. विखुरलेल्या किरणांना जे साधलं नाही ते संहत किरणांनी लीलया साधलं होतं. ते पाहून हा ‘भावी शास्त्रज्ञ' दिपून गेला होता.



खरं तर संघटनेत अफाट शक्ती दडलेली आहे हे तत्त्व संपूर्ण सृष्टीलाच लागू होत नाही का? कीटक, पशू, पक्षी, मानव, दानव किंबहुना देवही याला अपवाद नाही. ते जेव्हा संघटित असतात तेव्हा त्यांच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची प्राज्ञा नसते. एकी हे शत्रूला नामोहरम करण्याचं अमोघ शस्त्र आहे.


'संहतिः कार्यसाधिका' हे तर खरेच पण 'एकी शस्त्र जया नराचिया हाती, शत्रू तयाप्रती काय करी?' हेही तितकेच खरे. मुंगीसारखा यःकश्चित जीव. पण त्या जर का सर्वशक्तिनिशी तुटून पडल्या तर सापासारख्या शत्रूलाही परतवून लावतात. स्वसंरक्षणाचं उपजत ज्ञान असलेले प्राणी कळप करून राहतात. 


याच एकीच्या बळावर पक्षी पारध्याच्या जाळ्यातून स्वतःची सुटका करून घेतात. किष्किंधापती सुग्रीव एवढा बलाढ्य तरी वालीचा वध आणि पत्नीची मुक्तता करण्यासाठी त्याने श्रीरामांशी सख्य केले. साक्षात प्रभू रामचंद्रांना सेतुबंधन आणि सीतामाईच्या सुटकेसाठी वानरांचे सहकार्य घ्यावे लागले, हे सर्वश्रुतच आहे. 



महर्षी विश्वामित्रांनी यज्ञरक्षणार्थ रामलक्ष्मणांची मागणी राजा दशरथाजवळ केली होती. निर्मिकाला सृष्टीची रचना करताना पंचमहाभूतांना हाताशी घरावे लागलेच ना? मग सामान्य मानवाची काय कथा? कल्पना करा, मावळ्यांची साथ नसती तर रोहिडेश्चरासमोर स्वराज्यसंस्थापनेची शपथ घेण्याचं धाडस शिवबानं केलं असतं? 


आंदोलने, चळवळी, सत्याग्रह, सशस्त्र क्रांती इत्यादी द्वारा भारतीयांची एकजूट पाहून इंग्रजांनी येथून आपला गाशा गुंडाळला. परस्परसहकार्याच्या बळावर बाबा आमटे यांनी नंदनवन फुलविले. गोकुळवासीयांची एकी पाहून गोवर्धनासारखा जड (आणि जडही) पर्वत हलका झाला. 



गोपांना धडा शिकवायला निघालेल्या इंद्रालाच त्यांनी चांगला धडा शिकविला. 'Nature is a best teacher हा निसर्ग तर आम्हाला वारंवार एकीचं सामर्थ्य सांगत असतो. सप्तरंगी इंद्रधनुष्य नेत्रांना मोहविते, सप्तस्वरातून साकारलेलं संगीत श्रवणेंद्रीयांना सुखविते, षड्रसयुक्त अन्न जिव्हेला तोषविते तर नवरसांनी युक्त काव्य मनाला रिझविते. 


असंख्य जलबिंदू सिंधूचं रूप धारण करतात तर अणुरेणूंच्या संयोगाने विशाल पृथ्वी बनलेली दिसते. एक एक धागा गुंफून अखंड वस्त्राची निमिर्ती होते. हाताची पाच बोटे एकत्र आली तर महत्कार्ये सिद्धीस जाऊ शकतात. 'पाचामुखी परमेश्वर' बोलतो अशी आमची श्रद्धा आहे. 


संघे शक्तिः कलौ युगे ।! कलियुगात तर संघटित होणे ही काळाची गरज, निकड आहे. राजर्षी शाहू महाराजांनी हे वास्तव जाणले होते म्हणूनच “ आता प्रत्येकाने निरनिराळे काम करण्याचे दिवस गेले. पुष्कळ लोकांनी आपली कुशलता, अक्कल, पैसा व अंगमेहनत एकत्र केली पाहिजे. कुटुंबाची व्याख्या पुष्कळ विस्तृत केली पाहिजे," असा बहुमोल संदेश त्यांनी प्रजाजनांना दिला होता. सहकारी



पतपेढी, शेती लघुउद्योग, शिक्षणसंस्था यातूनच समाजाचा विकास साधणार आहे. आज अंतराळात नवनवे प्रयोग होत आहेत. नवनवीन संशोधने चालू आहेत. अनेक राष्ट्रांनी एकत्र येऊन हे काम केलं तर ते 'बहुजनहिताय, बहुजनसुखाय' ठरेल.


गंधर्वांनी कौरवांचा पराभव करून दुर्योधनाचे हरण केले ही वार्ता ऐकन भीमाने आनंद व्यक्त केला तेव्हा धर्मराजाला ते रुचले नाही. त्याने भीमाची समजत घातली. 'परस्परविरोधे तु वयं पञ्च च ते शतम् । परैः विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् ॥ 


साने गुरुजींनीही भारतीयांना आवाहन केले आहे. "हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायला हो बलसागर भारत होओ।"  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद