माझा आवडता कलावंत-कुमार गंधर्व मराठी निबंध | Maza Avadta Kalavant Kumar Gndhrva Marathi Nibandh.

 माझा आवडता कलावंत कुमार गंधर्व मराठी निबंध | Maza Avadta Kalavant Kumar Gndhrva Marathi Nibandh.

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता कलावंत कुमार गंधर्व मराठी निबंध बघणार आहोत. बऱ्याच दिवसांनी मुलांनी टेपरेकॉर्डरवर कुमार गंधर्वांची कॅसेट लावली होती. त्यांचे कुदरत की गति न्यारी,' हे कबीराचे भजन ऐकताना मन नकळत डोलू लागते व नंतरचे 'सुनता है गुरु ग्यानी' हे भजन. 


त्या भजनाच्या तालात मन नाचू लागले. बरेच दिवसांनी कुमार गंधर्वांच्या गाण्याचा मी आस्वाद घेत होते. कुमार गंधर्वांचे गाणे ऐकले की, कलावंत असावा तर असा असे मला वाटते. कुमार गंधर्व अवघे नऊ-दहा वर्षांचे होते त्या वेळी त्यांनी जीना हॉलमधली संगीत परिषद जिंकली होती. 


त्यांचे गाणे ऐकून रसिकांनी उद्गार काढले- अरे हा तर कमार गंधर्वच!' अब्दल करीम खाँची गायकी त्यांनी पेश केली होती. बालवय असूनही त्यांच्या आवाजाला टिपेची धार होती. स्वत:भोवती गिरक्या घेत घेत त्यांची तान बाहेर पडत असे. श्रोते तो बाल-कलावंत पाहून मंत्रमुग्ध होऊन जात. नंतरचे संगीताचे शिक्षण त्यांनी देवधर मास्तरांकडे घेतले.


देवधर मास्तरांनी लहान वयात यशस्वी झालेल्या या कलावंताला अहंकाराचा स्पर्श होऊ दिला नाही. तर भारतीय संगीतातील नानाविध आविष्कारांचे भांडार त्यांच्यासमोर खुले केले. त्यामुळे गायनातील सर्व नाविन्य परंपरागत ज्ञान व जाणतेपणा आणि वैभव याचा त्यांना लाभ झाला.


देवधर मास्तरांच्या घरी दर शनिवारी मैफिली होत असत. भूप गाताना कुमार गंधर्व मध्यमाच्या बारीकशा कणाला अघखळपणे स्पर्श करून जात. गाताना अनपेक्षित स्वरावली काढून चटकन नामानिराळे होत असत. ते ऐकून रामभैय्या दाते एकदा म्हणाले होते, 'अरे, हा म्युझिशियन नाही, मॅजिशियन आहे.'


कलकत्त्याची कॉन्फरन्स गाजवून परत येताना त्यांना साध्या सर्दी-खोकल्याचं निमित्त झालं. पण ती मोठी व्याधी ठरली. पाच वर्षे कुमार गंधर्वाचे स्वर कंठातच रुतून बसले. पाच वर्षांनी अर्धा तास गायची डॉक्टरांनी परवानगी दिली. फडक्यांच्या क्लासमध्ये त्यांचे गाणे झाले. व्याधीनं शरीराच्या काही भागाचे


लचके तोडलेले असतानाही पूर्वी लागायचा तसाच 'सा' लावून व्याधीला ओशाळून टाकलं. त्यांचे स्वर्गीय सुंदर स्वर ऐकून सुहृदांचं मन आनंदानं उंचबळलं व त्यांनी डोळे टिपले. कुमार परत गायला लागला होता! रुग्ण शय्येवर असताना त्यांनी व्याधीनं निराश किंवा दःखी न होता संगीताची मौन साधना केली होती. 


किती तरी नवी गीते, नवे राग, नव्या बंदिशी, देखण्या शद्वयोजना त्यांनी मनात साठवल्या होत्या. आजारानंतर ते गाऊ लागले की त्यांच्या गीतातून कारुण्य, आर्तता यांची रूपेरी छटा जाणवे. 'करमन की गति न्यारी' आनंद व कारुण्य यांचा सुंदर मिलाफ जाणवे. त्यांच्या गायनातील कोयल रिषभ श्रोत्यांचे हृदय आरपार भेदून जात असे.


परंपरानिष्ठ श्रोत्यांना जरी त्यांची सृजनता पटली नाही तरी जे. काही त्यात नवीन आहे, ते निराळे व चांगले आहे असे त्यांचे मन सांगत असे. त्यांच्या प्रिय पत्नीचे- भानुमतीचे-नव्हे, जिवाभावाच्या सखीचे अकाली निधन झाले. या धक्क्याने एखादा महापुरुषही उन्मळून पडला असता. पण या धक्क्याचीही त्यांनी संयमाने नोंद घेतली. 


हुंदके ओठांमध्ये दाबून धरले. डोळ्यांतले पाणी पापण्यात साठवले. आक्रोश करून दुःखाचे प्रदर्शन केले नाही. केवळ संगीताच्या साथीनं स्वत:चे पुढचे जीवन आक्रमू लागले.अमाप प्रशंसा लाभली तरी प्रशंसेची झूल घेऊन स्वत:च्या धुंदीत किंवा बेफिकीरपणे वागले नाहीत, 


कलावंत असूनही ते विचारवंत होते, आदर्श गृहस्थ होते व कित्येकांचे सच्चे मित्र होते. आपल्याजवळच्या कलेची मुक्त हातानं उधळण करणारे ते कलावंत होते. रवीन्द्रनाथ टागोरांच्या शब्दात सांगायचे झालं तर असं म्हणावं लागेल 'सीमेत असून तू असीम होतास, छेडत होतास आपुले सूर. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद