योगी पावन मनाचा मराठी निबंध | Yogi Pavan Manacha Marathi Nibandh

 योगी पावन मनाचा मराठी निबंध | Yogi Pavan Manacha Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण योगी पावन मनाचा मराठी निबंध बघणार आहोत.  आज आपण योगी पावन मनाचा असलेले दोन निबंध बघणार आहोतयोगी पावन मनाचा। साही अपराध जगाचा! असे चिमुकल्या मुक्ताबाईनं ज्ञानेश्वरांना सांगितलं व त्यांचा राग, संताप नाहीसा केला होता. योगी खरोखर पवित्र वृत्तीचे असतात. 


दुसऱ्यांचे अपराध सहन करतात पण त्यांना त्रास देत नाहीत. शिक्षा करत नाहीत. उदार मनाने क्षमा करतात. योगी पुरुषांचे मन फार कोमल असते. चकोर पक्ष्याला चंद्रकिरणे प्राशन करून जे समाधान लाभते, छोट्या पाखरांना आईच्या पंखात कसा आसरा, ऊब मिळते, लहान मुलाला 'आई' पाहून कसे समाधान वाटते, तसा, धीर, प्रेमळपणा, आनंद योगी पुरुषांच्या सहवासाने मिळतो. 


तृषार्ताला पाणी मिळाल्यावर तो जसा तप्त होतो, तशी योगी पुरुषांपासून मानवाला तृप्ती मिळते. योगी पुरुष लहरी नसतात, मनात आली तर मदत केली नाहीतर फटकारलं, असं त्यांचं वागणं नसतं तर एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे योगी सर्वकाळ सुखदाता! 


पाणी शरीराचा वरवरचा, बाहेरचा मळ स्वच्छ करू शकते. परंतु योगी पुरुष अंतर्मनातील दुष्ट विचार, विकार, वासना नष्ट करतात, पाणी पिऊन थोडा वेळ तहान शमते. परंतु योगी पुरुषाच्या दर्शनाने चिरकाल टिकणारा आत्मानंद मिळतो. 


योगी पुरुषाच्या पवित्र मनामुळे सर्व इंद्रिये तृप्त होतात. मनुष्य सुखी होतो. रामकृष्णांच्या दर्शनाने विवेकानंदांना स्वानंद लाभला होता. योगी पुरुषांचा जन्म स्वत:साठी नसतोच. परोपकाराय सतां विभूतयः। आकाशातील मेघाचे सर्व जीवन दुसऱ्यांसाठी असते. 


झाडांची फुले, फळे दुसऱ्यांसाठी असतात, त्याप्रमाणे योग्यांचे सर्व जीवन दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, परोपकारासाठी, उद्धारासाठी असतं. उपदेशानं, आत्मज्ञान जागृत करून ते मानवाला ज्ञानी करतात. ज्ञानेश्वर महाराज तर योग्यांचे राजे होते. 


संस्कृतमधील तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत पोचविण्यासाठीच त्यांचा जन्म होता. ते कार्य केल्यावर त्यांनी समाधी घेतली. धैर्य हा पिता, क्षमा ही माता, सदैव शांत वृत्ती ही गृहिणी, सत्य हा पुत्र, दया ही बहीण व मन:संयम हा भाऊ आहे. तसेच पृथ्वीतल ही शय्या, दिशा हे वस्त्र, आणि ज्ञानामृत हे भोजन, हे सर्व ज्याच्या कुटुंबात आहेत, अशा योग्याला भय कशापासून असणार? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

 योगी पावन मनाचा मराठी निबंध | Yogi Pavan Manacha Marathi Nibandh

सुवासिक चंदनाला सर्पाची मिठी असावी, देखण्या गुलाबाला काट्यांचा वेढा असावा, पवित्र कमळाला चिखलाचा खंदक असावा तसा या जगात संतांना, सज्जनांना समाजकंटकांनी कायमच त्रास दिला आहे.... संत ज्ञानेश्वरांचेही तसेच आहे.


'संन्याशाची मुले' म्हणून जगाने हिणवले. स्वत:चा दोष नसताना झालेली अवहेलना, त्यांना सहन न होऊन त्यांनी स्वत:ला कोंडून घेतले. निवृत्ती, सोपानांना काय करावे सुचेना. प्रयत्न करूनही ज्ञानदेव दार उघडेनात तेव्हा धाकट्या मुक्ताईनं लडिवाळ शब्दांत आपल्या थोरल्या भावाला साद दिली, त्याची समजूत घातली. - तेच 'ताटीचे अभंग' झाले. या अभंगांतून ज्ञानदेवांना आपल्या मनावर त्यांनी ताबा ठेवावा हे सुचविताना ती म्हणते


'योगी पावन मनाचा। 

साही अपराध जनाचा॥

विश्व रागें झालें वन्ही। 

संतें सुखें व्हावें पाणी॥' 


योगी मनाने पावन असतो. लोकांचे असंख्य अपराध तो योगेंद्र सहन करतो. कुणीही कितीही त्रास दिला तरी आपल्या मनाचा तोल तो जाऊ देत नाही. थंड पाण्याचा फवारा जसा आग विझवतो तसा योगी पुरुष आपल्या अस्तित्वाने विकारांचा वणवा, क्रोधाचा अंगार विझवून टाकतो.


संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ या सर्वांना जनक्षोभाच्या आगीचे चटके बसले. पण सर्वांनी सूडाची भाषा बोलून आगीतील तेलाची भूमिका न घेता पाण्याची शीतलता स्वीकारली. प्रत्यक्ष आचरणात आणली. समाजकंटकांनी टोचून टोचून पाहिले पण ते योगी पुरुष अचल राहिले. 


ढळले नाहीत. अतुल धैर्य दाखवले. इतकेच नव्हे तर त्यांनी समाजावर प्रेमाच्या शीतलतेचा वर्षावच केला. "बालादपि गृहीतव्यं युक्तायुक्तम्" या उक्तीप्रमाणे ज्ञानदेवांनी मुक्ताईचे शहाणे बोल, ती लहान असूनही मानले. पुढे तेच 


"जो खांडावया घावो घाली। 

कां लावणी जयाने केली। 

दोघां एकचि साउली। 

वृक्ष दे जैसा॥" 


असा दृष्टान्त ज्ञानेश्वरीत योगेशांच्या संदर्भात देतात. तर संत तुकाराम 


"तृण नाहीं तेथें पडिला दावाग्नि । 

जाय तो विझोनि आपसया॥” 


अशा शब्दांत संतांच्या क्षमाशीलतेचा गौरव करतात. संत एकनाथ तर 'पाण्यापेक्षाही संत श्रेष्ठ' असे श्रेष्ठत्व संतांना देतात. पाणी क्षणभरच आपली तहान भागवते, तर संत सर्वकाळ आपल्याला सुख देतात. पाण्याचा गोडवा फक्त जिभेला तृप्त करतो तर योगी पुरुष काया, वाचा, मने तृप्ती देतात.


परंतु असं हे पावन मन घडणं ही सोपी, सहजसाध्य गोष्ट नाही. सर्व चराचर सृष्टीत एकाच परमेश्वराचा अंश भरलेला आहे', ही मनाची अवस्था जेव्हा प्राप्त होते तेव्हाच योगी पुरुषाला ही शीतलता प्राप्त होते. ती अवस्था आल्यावरचमग सर्व विकारांचा दाह नाहीसा होतो आणि


जो सर्व भूतांचे ठायीं।

 द्वेषातें नेणेचि कांहीं।

आपपरू नाहीं। 

वैतन्या जैसा॥ 


ही ज्ञानेश्वरांनी वर्णिलेली अनुभूतीही मिळते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद