संदीप मोरे मराठी निबंध | SANDIP MORE ESSAY MARATHI

 संदीप मोरे मराठी निबंध | SANDIP MORE ESSAY MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संदीप मोरे मराठी निबंध बघणार आहोत. सर्व गोष्टी सुरळीत पार पाडल्या तरी आज काहीतरी चुकल्या-चुकल्यासारखं वाटत होतं. काय बरं आज राहिलं? हो! आज संदीप रोजच्याप्रमाणे फूल घेऊन आला नाही. तो आता येणार कसा? तो शाळा सोडून दुसऱ्या गावाला गेला होता. त्याची बदली झाली होती.


गेल्या वर्षीच इयत्ता पाचवीमध्ये संदीपची बटू मूर्ती शाळेत प्रवेश करती झाली. सर्वच लहान मुले निष्पाप असतात. परंतु संदीप सुंदर नसूनही लोभस होता. त्याचे डोळे फार बोलके होते. मी त्याच्याकडे पाहून हसले. का कोण जाणे, एवढ्याशा गोष्टीनं त्याची शाळेतली भीती कमी झाली. दुसऱ्या दिवशी हातात केशरी रंगाचं मोठं गुलाबाचं फूल घेऊन स्वारी शाळेच्या प्रवेशदारात उभी. 


मला देण्यासाठी त्यानं ते फूल जपून आणलं हातं. लाजत लाजत मला फूल दिलं व स्वारीनं धूम ठोकली. नंतर मला कळलं की मला देण्यासाठी हा रोज फूल विकत आणतो. खाऊसाठी मुलं आईवडिलांजवळ पैसे मागतात, चॉकलेट, आईस्क्रीमसाठी हट्ट करतात. पण 'बाईंना फूल आणायचं आहे, पैसे दे,' असा हट्ट करणारा ‘संदीप' एखादाच असावा.


माझ्यासाठी फूल विकत आणायचं नाही, अशी ताकीद दिल्यावर त्यानं आपल्यातला खाऊ मला देणं सुरू केलं. कधी चॉकलेट, कधी एखादी गोळी, वडी नाहीतर चार शेंगदाणे. माझं खाऊ खाण्याचं का वय होतं? खाऊ मी त्याला द्यायचा की त्यानं मला? परंतु त्याला नको म्हणणं शक्य नव्हतं. इतक्या निरागस मुलाला नाराज करणं मला जमलं नाही.


एके दिवशी तो आला व म्हणाला, “बाई, तुम्ही शुक्रवारी मटन खाता?" तो काय म्हणतोय तेच मला समजेना. संपूर्ण शुद्ध शाकाहारी अशा मला असा कोणी प्रश्न विचारेल व तोही शाळेत याची मला सुतराम् कल्पना नव्हती. मी 'नाही' म्हटले व शुक्रवारी काय केव्हाच खात नाही;' हे ऐकल्यावर तो नाराज झाला. त्याला आवडणारे 'मटन' त्याला मला द्यायचे होते. काय म्हणावे या खुळेपणाला तेच मला समजेना.


हा संदीप मला दिवसातून दोनदा भेटत असे. एकदा शाळेच्या सुरुवातीला व मध्ये मुलांशी मारामारी केल्यामुळे. कधी कोणाला ढकलणं, कधी केस ओढणं, कधी चिमटा काढणं तर कधी ओरबाडणं, नाना तक्रारी असायच्या. त्याला रोज रागवावं लागायचं. शिक्षा करावी लागे, क्वचित प्रसंगी नाजूक धपाटाही मारावा लागे. 


तरी त्याचा राग कधीच आला नाही. अभ्यासात त्याचा पहिला नंबर नसला तरी पहिल्या पाचात त्याचा नंबर असे. 'बाई, आमची बदली झाली. आम्ही सांगलीला जाणार,' असं सांगून त्यानं निरोप घेतला. उद्यापासून मला नित्यनियमाने फूल देणारा, भावुक पण खोडकर, हुशार पण दंगेखोर, लबाड, मिस्किल, पण हळवा संदीप शाळेत येणार नव्हता! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद