माझ्या कल्पनेतील आदर्श गुरु-शिष्य मराठी निबंध | Mazya Kalpanetil Adarsh Guru Shishya Marathi Nibandh

माझ्या कल्पनेतील आदर्श गुरु-शिष्य मराठी निबंध | Mazya Kalpanetil Adarsh Guru Shishya Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझ्या कल्पनेतील आदर्श गुरु-शिष्य मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. 'गुरु व शिष्य' हे शब्द उच्चारताच द्रोणाचार्य अर्जुन, धौम्य ऋषी- अरुणी, रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंद, अशी भारतातील गुरु-शिष्यांची थोर परंपरा उभी राहते. 


परंतु आजचे 'गुरु' व 'शिष्य' यांच्यामध्ये ती परंपरा खंडित झालेली दिसून येते. कोणी चांगले गुरु व आदर्श शिष्य शोधूनही सापडत नाहीत. माझ्या मते ही परंपरा परत प्रस्थापित करता येईल. त्यासाठी प्रथम श्रेष्ठ गुरु निर्माण झाले पाहिजेत. 


श्रेष्ठ गुरु कसा असावा बरं? जो ज्ञानी असेल, ज्याच्या मनात ज्ञानाची ओढ असेल, लालसा असेल असा गुरु हवा. या गुरुच्या मनात विद्यार्थ्याबद्दल अपार माया, प्रेम असावे 'ज्ञानाची उपासना' व 'ज्ञानदान' या दोन तत्त्वांनाच त्यांच्या जीवनात स्थान असावे. 


जे जे आपणासी ठावे। 

ते ते इतरांसी शिकवावे। 

शहाणे करून सोडावे। शिष्यांसी। 

या प्रवृत्तीचे गुरु असावेत. 


गुरु नुसते स्वत: ज्ञानी असून चालणार नाहीत. तर त्यांचे चारित्र्य निष्कलंक असावे. ते सदाचारी व सविचारी असावेत, त्यांच्यामध्ये विवेक, समजुतदारपणा व शांत वृत्ती हवी. 'जमदग्नी'सारखे गुरु काय कामाचे? शिष्यांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटावी असे ते असावेत. तसेच माझ्या कल्पनेप्रमाणे 'गुरु' उत्तम मार्गदर्शक हवेत,


याच्य या आदर्श गुरुंचे शिष्यही आदर्शच असतील. नम्रता व विनय त्यांच्याजवळ असेल. ज्ञानाची ओढ त्यांना लागलेली असेल. ते सुविचारी असतील, गुरूंनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धाळू वृत्तीने ते स्वीकारणार नाहीत. गुरुंना शंका विचारतील, वेळप्रसंगी वाद घालतील. 


परंतु 'वादे वादे तत्त्व बोध:' करून घेतील. 'गुरु'सुद्धा 'मानव' आहे. 'देव' नव्हे यांची त्यांना जाणीव असेल, त्यामुळे एक उत्तम मार्गदर्शक' या दृष्टीने ते गुरुंकडे बघतील. संकटाच्या प्रसंगी गुरूंचा सल्ला विचारतील. परंतु 'मन:पूतं समाचरेत्।' या वृत्तीनेच वागतील असा सारासार विवेक गुरूंनी त्यांच्यामध्ये निर्माण केलेला असावा.


आपल्या देशात अनेक गुरु, महापुरुष होऊन गेले. परंतु आजकाल चांगले शिष्य निर्माण होत नाहीत. त्यांनी निर्माण केलेली विचारधारा पुढे चालू राहात नाही. तसेच त्यांनी चालू केलेले कार्य काही दिवसांत संपुष्टात येते. गुरूंच्यानंतर शिष्यांना त्यांचे कार्य पुढे चालवायचे असते. त्यामुळे आपल्यानंतर नेतृत्व करणारे शिष्य गुरूंनी निर्माण करावे. 


गुरुंचे शिष्य नंदीबैली' प्रवृत्तीचे नसावेत. तर गुरूंचे विचार, त्यांनी अंगिकारलेले कार्य, त्यांचा ध्येयवाद, त्यांची दूरदृष्टी, ज्या कालात व समाजात ते जगले त्यांच्याशी निगडित असलेले सर्व संदर्भ समजणारे कृतिशील कार्यकर्ते असावेत. शिष्य 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' या कल्पनेचे नसतील तर विवेकनिष्ठ व कृतिशील भाष्यकार असतील.


गुरुंपासून प्रेरणा घेऊन, पंखात शक्ती घेऊन स्वत:च्या बळावर ‘गरुडभरारी' मारणारे असतील. गुरुंचे शिष्य भाबडे' असणार नाहीत, गुरुंच्याबद्दल त्यांच्या मनात 'भोळा भक्तिभाव' असणार नाही. पुढील काळाला योग्य असो वा नसो, त्या गुरुंचे कार्य ते 'गिरवलेल्या कित्या'प्रमाणे चालू ठेवतील. 


गुरुंच्या कार्यावर श्रद्धा ठेवून त्या मागची भूमिका, हेतु, त्या काळची परिस्थिती समाजावून घेऊन, तेच तत्व, तेंच कार्य, स्थळ, काळ परिस्थितीनुसार पुढे चालू ठेवणारे शिष्यच माझ्या मते आदर्श शिष्य. गुरुंच्या ठिकाणी आंधळा अभिनिवेश बाळगणारे शिष्य त्यांच्या कार्याची परंपरा भावी काळात राखू शकणार नाहीत.  


समजा; एखाद्या महापुरुषाने एखादी शाळा, कारखाना काढला. पण ती शाळा, ते कार्य पुढे चालू ठेवणारे आदर्श शिष्य, अनुयायी असावेत. असे गुरुशिष्य लाभले तर प्राचीन भारतातील गुरु-शिष्यांची परंपरा पुन्हा निर्माण होऊ शकेल. 


ज्ञानाचा नवी दृष्टी देणारा 'आदर्श' गुरु तर त्या ज्ञानाच्या मार्गावरून जाताना, स्थल-काल परिस्थितीनुसार त्या मार्गात बदल करून, न डगमगता, गुरुंचे कार्य कळसास नेणारा असा आदर्श शिष्य हवा! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2 

माझ्या कल्पनेतील आदर्श गुरु-शिष्य मराठी निबंध | Mazya Kalpanetil Adarsh Guru Shishya Marathi Nibandh



माझ्या पिढीचा एक कवी कर्मवीरांना उद्देशून कवितेत म्हणतो - “कर्मवीर,


उगाच आता आम्हाला तुम्ही

त्या गुरू-शिष्य परंपरेच्या पवित्र गोष्टी सांगू नका

प्राध्यापकांच्या खांद्याला खांदा लावून चालताना

नॉन व्हेज जोक करण्यात आणि

त्यांच्याच घराच्या गच्चीवर थर्टी फस्ट

डिसेंबर साजरा करण्यात किती गंमत असते म्हणून सांगू !”


आज गुरू-शिष्य संबंधातील पावित्र्य हरवत चाललय. शिक्षण हा एक धंदा बनलाय, विद्यार्थ्यांनीही ताळतंत्र सोडलाय. गुरुबद्दल आदर नावाची भावना आजच्या विद्यार्थ्यांमध्ये अभावानेच आढळून येते. काहीजणांना मात्र सर्व काही आलबेल आहे असे वाटते. 


जर खरंच सगळं आलबेल असतं तर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंवर विद्यार्थिनींना शिक्षकांच्या घरी जाऊ नये असा फतवा काढण्याची नौबत आलीच नसती. या एकाच उदाहरणावरून आपणास कळून येते की गुरू - शिष्य संबंधाने किती निम्नतम पातळी गाठली आहे.


मग मी विचार करतो की माझ्या कल्पनेतील आदर्श गुरू - शिष्य कसे असतील ? विचार करताना कल्पनांचा बहार कुन्दपुष्पांप्रमाणे हळुवारपणे फुलू लागतो आणि आदर्श गुरू - शिष्यांचं एक सुरेख चित्र आकारास येऊ लागते. हे कल्पनेतील गुरू - 


शिष्य जर प्रत्यक्षात आले तर शैक्षणिक क्षेत्रात नंदनवन फुलायला कितीसा वेळ लागेल? त्यासाठी फक्त जबरदस्त पवित्र इच्छाशक्ती आणि आपल्या कार्यावर असीम श्रद्धा पाहिजे. माझ्या कल्पनेतील गुरूपुढे आदर्श असेल कर्मवीरांचा, साने गुरूजींचा! 


मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांना खांद्यावर बसवून मैलोगणती अनवाणी पायांनी पायपीट करणारे कर्मवीर - असोत अथवा मुलांच्या दुःखाने दुःखी होणारे, पावसाची गाणी नाचत गात शिकवणारे, मुलांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारे, मातृहृदयाचे हळवे साने गुरूजी असोत ते एखाद्या दीपस्तंभासारखे गुरूला मार्गदर्शक ठरतील.


माझ्या कल्पनेतील गुरू विचारपूर्वक शिक्षणाचे क्षेत्र निवडेल. दुसरीकडे कुठेच काही जमत नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून तो या क्षेत्रात आलेला नसेल. त्याला या क्षेत्राची मनापासून आवड असेल. तो ध्येयवादी वृत्तीने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करेल. “शूल व्यथांचे उरी वाहावे जळत्या जखमांवरी स्मितांचे गुलाबपाणी शिंपीत राहावे


उद्याद्रीवर लक्ष उद्याची

पहाट मंथर जागत आहे

तुमच्यासाठी लाख रवीचे

दुःख अति हे साहत आहे"

अशी त्याची वृत्ती असावी.

माझ्या कल्पनेतील शिष्यही 


गुरूला शोभेल असा आदर्श असेल. तो नम्र असेल. तो चतुरस्त्र असेल. तो ज्ञानाचा भुकेला असेल. तृषार्त, तप्त धरणी जशी पावसाच्या जलधारेसाठी तडफडत असते तद्वतच तो शिष्य सुद्धा ज्ञानप्राप्तीसाठी तळमळत असेल. तो विनम्र असेल तर लाजाळू नसेल. 


तो धीट असेल पण उद्धट नसेल. तो रसिक असेल पण वायफळ नसेल. ज्ञानकण वेचण्यासाठी सतत त्याची धडपड चालू असेल. माझ्या कल्पनेतील गुरू शिष्यांचे नाते अत्यंत जवळीकतेचे असेल. त्या नात्यला औपचारिकतेचा शाप नसेल तर अकृत्रिम जिव्हाळ्याचा परिसस्पर्श असेल. आपुलकीच्या सुगंधात ते नाते न्हाऊन निघेल. माझ्या कल्पनेतील गुरू, शिष्यांचा पालक असेल, भाऊ असेल, सखा असेल. शिष्य गुरूला म्हणेल -

“त्वमेव माता च पिता त्वमेव

त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव"


त्यांच्यात मैत्रीचे नाते असेल. पण या मैत्रीचा दर्जा उच्च कोटीचा असेल. गुरूबरोबर सुपारी खाण्याइतपत खालचा दर्जा तिचा नसेल, जो आपल्या चुका दाखवून आपणास शहाणा करतो, तोच खरा मित्र अशी मित्राची व्याख्या सॉक्रेटीसने केली आहे. 


या दृष्टीने गुरू शिष्याचा खरा मित्र असेल. शिष्याला कोणतीही अडचण असेल तर तो मोकळेपणाने गुरूचा सल्ला घेईल इतका मोकळेपणा त्यांच्या नात्यात असेल. गुरूच्या छडीने मुले सुधारत नाहीत, ती सुधारतात त्याच्या गोडीने! शिष्याला गुरूबद्दल 'आदरयुक्त भीती' वाटेल; ‘भीतीयुक्त आदर' नव्हे! गुरू हा शिष्याला मोठ्या भावासारखा वाटेल शिष्य गुरूचा उचित तो आदर राखेल.


माझ्या कल्पनेतील गुरू शिकवण्यात निष्णात असेल. शिकवण्याच्या पारंपारिक पद्धतींचा तो कमीत कमी वापर करेल. तो आकलनावर भर देईल, पाठांतरावर नव्हे तो जीव ओतून शिकवेल. त्याचे शिकवणे श्याम बेनेगलच्या आर्ट फिल्म सारखे रूक्ष नीरस व कंटाळवाणे नसेल तर एखाद्या निर्झरासारखे अथवा कारंज्यासारखे चैतन्याने भरलेले असेल. 


मुलांच्या एकाग्रतेसाठी विनोदाच्या अस्त्राचा तो पुरेपूर वापर करेल, पण त्याचा अतिरेक टाळेल, शिकवताना वर्गातील वातावरण गंभीर न ठेवता ते खेळकर राहील यासाठी तो प्रयत्न करेल. त्याचं शिकवणं मुलांना आवडलं पाहिजे. 


मुलांना तल्लीन करण्याचं, बांधून ठेवण्याचं सामर्थ्य त्याच्या वाणीत असेल. पावसाच्या कविता चार भिंतींच्या आत न शिकवता पावसाच्या सरींत भिजत शिकवणं तो पसंत करेल. सिमेंटच्या जंगलात खास गुदमरणाऱ्या मुलांना तो निसर्गाच्या जवळ नेईल.


माझ्या कल्पनेतील शिष्य ज्ञानपिपासू असेल. तो सरांचे शिकवणे मन लावून ऐकेल. तो वर्गात गोंधळ घालेल, पण टवाळक्या करणार नाही. वयाला साजेलशा खोड्या करेल पण त्याचा अतिरेक करणार नाही. शांत, गंभीर राहून तो आपल्या बालपणाचा, बालसुलभ भावनांचा खून करणार नाही; 


पण अभ्यास सोडून देऊन फालतू टुकारपणाही करणार नाही. माझ्या कल्पनेतील शिष्य स्वतःचा सर्वांगीण विकास साधून घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. अभ्यासाच्या जोडीनेच क्रीडा, कला, नाट्य, काव्य, साहित्य या क्षेत्रांतही तो आपल्या प्रतिभेची चमक दाखवेल. तो केवळ पुस्तकी किडा बनून राहणार नाही. 


जीवनाचं त्याच्या काहीएक ध्येय तो ठरवेल. ते ध्यये गाठण्यासाठी तो जीवपाड मेहनत करेल. दरवर्षी कॉलेजरूपी कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या एकाच छापाच्या डॉक्टर्स, इंजिनीयर्स शिवायही जीवनात करण्यासाखे बरेच काही आहे, याची त्याला जाणीव असेल. 


जीवनातल्या चांगल्या तत्त्वांवर, पवित्र, मंगलमय गोष्टींवर त्याची नितांत श्रद्धा असेल. जीवनाकडे तो आशावादी दृष्टीकोनातून पाहील. जीवनात येणाऱ्या अडचणींचा तो धैर्याने नेटाने मुकाबला करेल. जीवनाच्या वाटचालीत संघर्ष करण्याचे बाळकडू तो आपल्या गुरूकडून शिकेल. त्याला शिक्षणाची मनापासून आवड असेल.


माझ्या कल्पनेतील गुरू मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुलांना कवेळ परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आजच्या शिक्षण पद्धतीत दोषांची केवळ चर्चा न करता यावर कांही उपाय शोधेल. मुलांना मुलभूत ज्ञान देण्याचा तो प्रयत्न करेल. 


ज्ञान केवळ परीक्षेसाठीच नसेल तर संपूर्ण जीवनासाठी ते उपयोगी ठरते, हे ते विद्यार्थ्यांच्या मनांवर बिंबवेल. गुरू मुलांना अधिकाधिक चौकस बनवण्याचा प्रयत्न करेल. मुलांनी प्रश्न विचारून आपल्याला भंडावून सोडावे अशी त्याची मनापासून इच्छा असेल.


माझ्या कल्पनेतील गुरू शिष्यावर कदाचित रागावेलही, पण ते त्याच्या भल्यासाठीच असेल. शिष्याच्या चुका ओळखून त्या सुधारण्यासाठी तो प्रयत्नरत असेल. त्यासाठी त्याला सहकार्य करण्याची त्याची नेहमीच तयारी असेल. आपला शिष्य आपल्यापेक्षा ज्ञानी बनावा, याची त्याला आस असेल. 


आपल्यातील सर्वोत्तम ज्ञान तो विद्यार्थ्यांना देईल. जीवनाच्या रणांगणातही गुरूचे शिष्याला अनमोल मार्गदर्शन होईल. शिष्य गुरूला म्हणैल- 'पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा' असे असतील माझ्या कल्पनेतील आदर्श गुरू-शिष्य ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद .