पहिला पाऊस मराठी निबंध | pahila paus nibandh Marathi

 पहिला पाऊस मराठी निबंध | pahila paus nibandh Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पहिला पाऊस मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण  पहिला पाऊस शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  “पुढील आठवड्यात पाऊस न पडल्यास कोयनेचा वीजपुरवठा बंद होण्याची शक्यता?” ही ठळक मथळ्यातील वर्तमानपत्रातील बातमी वाचून मी मनातून घाबरलेच व वर्तमानपत्राचं वाचन थांबवून खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाची करुणा भाकली. 


'करावा वर्षाव। तृषाक्रांत झाला जीव।' अशी आकाशाची विनवणी केली. जूनच्या पहिल्याच आठवड्यात 'नेमेचि' येणारा पाऊस कुठे लपून बसला होता कोण जाणे. 'मे' महिन्यातल्या उकाड्याने सर्वजण हैराण झालेले होतेच. परंतु यंदा २५ जून झाला तरी पाऊस नाही, त्यामुळे खरंच सर्वांच्या नळाचे व तोंडचेही पाणी पळाले होते. 


'पंखे' किंवा 'कलर'द्वारे मिळणारी थंड हवा त्यांना नकोशी झाली होती. उन्हाळी कामं आटपून सर्व शेतकरीसुद्धा आकाशाकडे डोळे लावून बसले होते. रोज सकाळी आकाश अंधारून यायचं पण नंतर दुपारी निरभ्र व्हायचं आणि निराशेनं सर्वांचे चेहरे काळवंडून जायचे!


बऱ्याच दिवसांनी येणाऱ्या प्रिय मित्राची वाट जितक्या आतुरतेने पहावी तितक्या आतुरतेने पावसाची वाट पाहणारे लोक व तो आज तरी नक्की येईल अशी वेडी आशा बाळगून, रोज छत्र्या घेऊन जाणारी ( ऑफिसमध्ये, शाळेमध्ये ) मंडळी कंटाळली व आज नेहमीप्रमाणे कामावर गेली आणि 


अवचित् त्या दुपारी आले भरून मेघ । 

अन् विस्कटून गेले सारे आकाशरंग॥


अचानक निळ्या तळपत्या आकाशात काळेभोर ढग जमू लागले. पर्जन्यराजाच्या आगमनाची सुवार्ता देण्यासाठी वारा सुसाट धावत सुटला. त्या वार्तेने आनंदित होऊन झाडे वेडीवाकडी डोलू लागली. गुरे शेपट्या उंचावून नाचू लागली. पक्ष्यांनीही ही आनंदाची बातमी आपल्या जात-बांधवांना दिली.


थोड्याच वेळात पर्जन्यराजाचे पृथ्वीवर आगमन झाले ते मृद्गंध उधळीतच. पावसाचे टपोरे थेंब जमिनीवर पडू लागले आणि हां हां म्हणता त्यांचे रूपांतर मुसळधार सरींमध्ये झाले. उन्हाने तडकलेली धरणीमाता शांत झाली. पावसाचे पाणी पिऊन तृप्त झाली. 


ग्रीष्माच्या उन्हाने करपलेली निस्तेज झाडे जिवंत झाली, ताजीतवानी झाली. रुक्ष, धुळीनं माखलेले कोरडे रस्ते पावसाने न्हाऊन निघाले व कोरड्या गटारांनाही नदीचे स्वरूप आले. तिकडे आकाशात अजूनही ढगांचे ढोल-ताशे वाजतच होते व बिजलीबाईंचा त्या तालावर थयथयाट चालूच होता. सर्व वातावरण मृद्गंधाने दरवळले होते. 


पावसाची रिमझिम बरसात चालू होतीच. पक्ष्यांनीही सुरेल लकेरी मारून पावसाला स्वागतगीत गायले. झाडे व वेलीही त्या सुरावर, तालावर माना डोलवू लागली. पहिल्या पावसाच्या आगमनाने सगळेजणच एकदम खूष झाले होते. आपल्या हातातली कामे थोडा वेळ बाजूला ठेवून सर्वजण प्रसन्न मनाने पावसाचे स्वागत करू लागले. 


लहान मुलांनीही घरातल्या मोठ्या माणसांची नजर चुकवून पावसात मनसोक्त भिजण्याची संधी सोडली नाही. मोठ्या माणसांनीही त्यांच्या ह्या खोडकरपणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. कारण हा पहिला पाऊस होता! सृष्टीचे हे पालटलेले रूप पाहन माझ्याही मनात विचार आला, "सजल श्याम घन गर्जत आले बरसत आज तुषार। आता जीवनमय संसार । मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

पहिला पाऊस मराठी निबंध | pahila paus nibandh Marathi


जून महिना! संध्याकाळची वेळ! आळसटलेली मी, काही वाचत लोळत पडली होते. सहज खिडकीतून नजर बाहेर गेली.... आकाश काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरले होते. वातावरण कुंद होते. वारा पडलेला होता. संध्याराणी दुर्मुखलेली होती. 


रस्ते माणसांनी दुथडी भरून वाहत होते.... ढगांचा गडगडाट झाला. पाठोपाठ वीज चमकली. टपोरे, थेंबांचे मोतीखाली झेपावले. लोकांची त्रेधातिरपीट उडाली. 'आता मोठा पाऊस येणार' ही खात्री पटून रस्ते उधळले गेले. छत्री, रेनकोट नसल्याने नि:शस्त्र सेनेप्रमाणे पळापळ झाली.


फेरीवाले, पथारीवाले गाशा गुंडाळू लागले. बाहेर लावलेला माल दुकानात सुरक्षित ठिकाणी हलवताना दुकानदारांच्या नाकी नऊ येऊ लागले. वाहनांचे वेग वाढले. नाक्यावरच्या सुस्तावलेल्या रिक्षा अधीर प्रवासी पोटी धरून धावू लागल्या... पुन्हा एकदा वीज लकाकली, ढग गरजले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला.


पाहता पाहता रस्ते नि यकी झाले. मेघांच्या गर्जनेला प्रत्युत्तर देणारा कोणी धैर्यधर उरला नाही.... मी पळत पळत वर गच्चीवर गेले- पहिला पाऊस डोळे भरून पाहण्यासाठी, अंगावर घेण्यासाठी! - डोक्यावरच्या आकाशानं काळा मेकअप जणू केला होता. अंधारून आलं होतं. 


मृद्गंधाचं अत्तर वातावरणात उधळलं गेलं होतं. पक्ष्यांनी झाडांचा आश्रय घेतला होता. 'अंगे भिजली जलधारांनी' अशी चिंबावस्था झाली होती. काया रोमांचित होत होती. संध्याराणीच्या दरबारात मेघमल्हार मस्त रंगला होता. साठल्या पाण्याच्या मंचावर थेंबांचा बॅलेडान्स चालला होता. 


घरांचे पत्रे दोघांना ताल देत होते. वेलींवरची फुले त्या तालावर डोलत होती. झाडे मधूनच पानांचे पंख फडफडवून दाद देत होती... माझं मन प्रसन्नतेचा पिसारा फुलवून मोराप्रमाणे थुईथुई नाचत होतं.


पावसाचा जोर वाढला तशी मी पण चिमणीसारखी आडोशाला गेले. 'कडकड शब्द करोनि' घन तांडव करू लागले. मेघराजाचा मेदिनीशी चाललेल्या नाजूक शगारातील कोवळेपण संपून धसमुसळेपणा सुरू झाला होता. नव्हे, आडदांडपणाच चालला होता... 


आकाशातील जटा आपटणारा, थेंबांच्या तडतडाटात बेभान नाचणारा, मेघांचे पखवाज वाजवत शंख फुकणारा रुद्राचा अवतारच अवतीर्ण होत होता... जटांतून मुक्त झालेली भागीरथीच धरतीच्या रंगमंचावर थयथय नाचू लागली.


भाजलेल्या धरतीला भिजताना काय सुख वाटत असेल! वाट पाहणाऱ्या बळीराजाला किती हलकं वाटलं असेल. पहिला थेंब चोचीत पडताना चातकाला किती समाधान वाटलं असेल, पहिला थेंब मिठीत घेताना सागराच्या शिंपल्याला किती आनंद झाला असेल... 


हे सारं मी अनुभवलं, पहिला पाऊप्त अंगावर बेताना ! कालांतराने बाहेरचा थांबला तरी मनात पाऊस कोसळतच होता, किती वेळ कोण जाणे! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   धन्‍यवाद