शेतीशिक्षण हवे की नको? मराठी निबंध | SHETISHIKSHAN HAVE KI NKO ? ESSAY MARATHI

शेतीशिक्षण हवे की नको? मराठी निबंध | SHETISHIKSHAN HAVE KI NKO ? ESSAY MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शेतीशिक्षण हवे की नको? मराठी निबंध बघणार आहोत. आज शिक्षण व्यवस्थेचा नव्याने विचार चालू आहे. सध्याचे आपले शिक्षण पुस्तकी बनले आहे. विदयार्थी परीक्षार्थी बनले आहेत. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेले विदयार्थी व्यवहारात समर्थपणे सहभागी होऊ शकत नाहीत, अशी स्थिती बनली आहे. 


याचे कारण आपली शिक्षण पद्धतीच एकांगी बनलेली आहे. शिक्षणाला बायजीवनाची जोड मिळत नाही. म्हणून एक नवीन विचार पुढे येत आहे. शिक्षण व्यवसायाभिमुख केले पाहिजे, असे मत मांडले जात आहे. या मताबरोबरीनेच आणखी एक विचार मोठ्या हिरिरीने पुढे मांडला जात आहे... 


आपण विदयार्थ्यांना शेतीचे शिक्षण दयावे की नाही? शेतीशिक्षण हवे की नको? शेतीशिक्षण हवे की नको म्हटल्यावर अनेकजण नकारार्थी मान हलवतात. साधे पाहा, दूरदर्शनवरील 'आमची माती. आमची माणसे' हा कार्यक्रम कितीजण आवडीने पाहतात? 


दहावीनंतर किंवा बारावीनंतर शेतीशिक्षण घेण्याची ईर्ष्या कितीजण बाळगतात? गुणवत्ता यादीत येणारे विदयार्थी डॉक्टर वा इंजिनिअर होण्याचे स्वप्न बाळगतात. परंतु इतक्या वर्षांत गुणवत्ता यादीतील एकानेही 'आपण शेतीतज्ज्ञ होऊ इच्छितो' असे सांगितलेले नाही.


शेतीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच नकारात्मक आहे. शेती म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर दरिद्री, दुष्काळात होरपळलेले, कोणतेही भविष्य नसलेले शेतकरी येतात; अत्यंत मागासलेल्या अवस्थेत असलेली खेडी डोळ्यासमोर येतात ! 


वास्तविक पाहता, कोणत्याही देशाच्या प्रगतीच्या रथाची मुख्य दोन चाके असतात. शेती आणि उद्योग. ही दोन्ही अंगे भरभराटीला आली, तरच देशाची सर्वांगीण प्रगती होऊ शकते. सर्वांगीण प्रगती झाली, तरच देशातील प्रत्येक व्यक्तीला उत्कर्ष साधता येऊ शकतो. म्हणून शेतीपासून दूर पळून भागणार नाही. 


शेतीचा विकास झाला नाही, तर औदयोगिक प्रगतीही अशक्य असते, हे लक्षात घ्यावे लागेल. आज चीनच्या प्रगतीने अमेरिकेसारखा सर्वांत प्रगत देशही अचंबित होतो. पण याच चीनने त्यासाठी काय केले ठाऊक आहे काय? तेथे प्रत्येक नागरिकाला, मग तो विदयार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, कारकून, बँकेतील कर्मचारी वा आणखी कोणीही


असो, अगदी प्रत्येक नागरिकाला वर्षातले काही महिने शेतीवर काम करण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे श्रमप्रतिष्ठेचे तत्त्व रुजले. शेती बहरली आणि आज प्रचंड लोकसंख्या असलेला चीन भरभराटीला आला. हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही?


शेतीशिक्षण मिळाले, तर ग्रामीण शहरी हा भेद नष्ट होण्यास मदत होईल. प्रगतीची फळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. दारिद्र्य नाहीसे होईल. संपूर्ण देश समर्थ बनेल ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद