Majhi Aawadti Shikshika Marathi Nibandh | माझी आवडती शिक्षिका मराठी निबंध

  Majhi Aawadti Shikshika Marathi Nibandh  | माझी आवडती शिक्षिका मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आवडती शिक्षिका  मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण माझी आवडती शिक्षिका असलेले दोन निबंध बघणार आहोत इयत्ता ५ वी ते १० वी या शिक्षणप्रवासात प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक असतात. पण एखादा शिक्षक आपल्यावर असा काही ठसा उमटवून जातो की तो पुसता पुसलाच जात नाही.


अशाच आहेत आमच्या मराठीच्या अत्रेबाई. त्या मला ५ वीला मराठी, चित्रकला, पी.टी., तर ६ वीला इंग्रजी, सामान्यविज्ञान, सातवीला गणित, हिंदीला होत्या, तर आठवीला इतिहास, संस्कृतला होत्या. पुन्हा मी नववीत जाते तर मराठीला अत्रेबाई. 


१० वीला पण मराठी त्याच शिकवतात. एकूण काय की आमच्या शाळेत बाईंनी सातवीपर्यंत सर्व विषय शिकवले आहेत. सुदैव असे की प्रत्येक वेळा अत्रेबाईंच्या वर्गात मी आहेच. या बाईंच्या बाबतीत माझ्या असे लक्षात आले की, विषय कोणता का असेना, तो सोपा करण्यात बाईंचा हातखंडा आहे. 


विद्यार्थ्यांवर उत्तम छाप पडेल असे बाईंचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची उंची बेताचीच आहे. रंग उजळ आहे. नाक सरळ, मोठे टपोरे डोळे, कमनीय भुवया, कुरळे जाड केस. केसांना आता वय दाखवणारी रुपेरी छटा आली आहे.


वाचताना आता त्या सोनेरी काडीचा, आकर्षक फ्रेमचा चष्मा वापरतात. चषयामुळे तर त्या अधिकच भारदस्त वाटतात.  शिक्षकी पेशाला शोभतील अशा फिकट रंगाच्या, बहुधा पांढऱ्या रंगाच्याच साड्या जास्त करून नेसतात. त्या नेहमी स्टार्च-इस्त्रीचे कपडे वापरतात. 


उजव्या हातात एक बांगडी, डाव्या हातात घड्याळ, कानात रिंग, टॉप्स, गळ्यात छोटे साधे मंगळसूत्र. चकचकीत. डोळ्यात खुपेल अशी कोणतीही गोष्ट बाई कधीही वापरत नाहीत.  त्या अतिशय नीट-नेटक्या राहतात. त्यामुळे सर्व शिक्षकांत आकर्षक वाटतात. 


प्रत्येक वर्गाला वाटते की अत्रेबाई आपल्या वर्गशिक्षक असाव्यात. बाई शिस्तप्रिय आहेत. बाई ‘गप्प बसा' म्हणून कधीही जोरात ओरडत नाहीत. वर्गात आल्या की पहिल्या बाकापासून ते शेवटच्या बाकापर्यंत नुसती नजर फिरवतात. 


ज्या बाकावर गडबड असते तेथे त्यांची नजर खिळते. विद्यार्थी ते पाहतात व त्या बाकावरच्या मुलांना ‘ए, गप्प बसा. बाई आल्या.' म्हणून सावध करतात. सर्व वर्ग शांत झाल्यावर बाई बसा म्हणतात, फी घेतात, पावती देतात. विषयाला सुरुवात करतात.


बाई मराठी अतिशय उत्तम शिकवतात. बाईंचे बोलणे अगदी गोड व ओघवते आहे. नाट्यउतारा तर इतका छान वाचतात की सर्व वर्ग कानांच्या ओंजळी करतो. बाई पाठांचे लेखक, त्यांची पुस्तके याची चर्चा करतात. पुस्तकातील पाठ लिहिण्यामागे कोणती भूमिका आहे? 


आपल्याला यातून काय शिकायचे ? पाठात कुठे कुठे सौंदर्य आहे, इ. गोष्टींचे स्पष्टीकरण करतात. ते समजावे म्हणून खूप उदाहरणे देतात. कवितांना सुंदर चाली लावतात. त्यातील नादमाधुर्य, सुंदर शब्द, अलंकार, शब्दापलीकडला अर्थ (ध्वनित) आम्हाला समजावून देतात. 


काही वेळा तर फळ्यावर सुंदर रेखाचित्र काढून एखादे दृश्य, वस्तू डोळ्यांसमोर उभी करतात. निबंध लिहिण्याआधी तासभर सविस्तर चर्चा करतात. तसेच आत्मवृत्त म्हटले की सर्वांचे एक, असे बाईंना आवडत नाही. बाई म्हणतात, 


७० मुले तर ७० विषयांवर मला ७० आत्सवृत्ते हवीत. बाई ८ वी, ९ वी च्या मुलांकडून स्वतंत्र वहीत त्यांचे स्वत:चे आत्मचरित्र लिहून घेतात. गृहपाठाची कॉपी होऊ नये म्हणून एकाच पाठावर पण प्रत्येक ओळींना वेगळे प्रश्न देतात. पुस्तकाखालचे प्रश्न त्या देत नाहीत. 


त्यामुळे गाईडवाल्या मुलांची निराशा होते. पत्रलेखनालाही त्या रोजच्या जीवनातले सोपे विषय देतात. चांगली पत्रे, निबंध त्या वाचून दाखवतात. शाळेच्या हस्तलिखितांसाठी देतात. एकदा खूप जोरात पाऊस पडत होता. बाईंनी मुलांना बाहेर जाऊन १० मिनिटे पाऊस पाहण्यास सांगितले. नंतर पावसावर कविता करायला सांगितले. 


आश्चर्य असे, सर्वांनी कविता केल्या. निवडक कविता नोटीसबोर्डावर लावल्या. १० मिनिटांत आम्ही कवी झालो. तसेच एका शनिवारी सकाळ' कविता मैदानावर शिकवली. झाडाआडून दिसणारी सूर्याची किरणे दाखवून म्हणाल्या, 'किरणांचे भुरभुरते कुंतल'. 


तेवढ्यात पक्ष्यांचा थवा ओरडत आकाशातून गेला. बाई म्हणाल्या, 'लहरत गेली मधुर एक स्वरलकेर रानोमाळ.' अशा प्रकारे कमी शब्दात पण अनुभूती देऊन आम्ही ती कविता शिकलो. तोंडी परीक्षा वर्षभरात वाचलेल्या इतर पुस्तकांवर आधारित घेतात.


आमची शाळा मुलामुलींची आहे. पण बाई भेद करत नाहीत. एकदा एक गरम डोक्याचे पालक आले. मिलिटरीतून निवृत्त झालेले होते. मुलाने प्रगती-पुस्तकात खाडाखोड केलेली होती. आले वर्गात आणि धरले की मुलाचे बखोटे आणि न्यायला लागले त्याला फरफटत. 


बाई लगेच वर्गाबाहेर गेल्या. त्यांनी त्या मुलाला ओढून आपल्यामागे केले. वडील खूप काही बडबडत होते. ते म्हणाले, 'मुलगा माझा आहे. द्या त्याला इकडे.' बाई म्हणाल्या, 'साडेपाच वाजेपर्यंत तो माझा आहे. घरी आल्यावर तो तुमचा.' पालक निघून गेले. पण आम्हा सर्वांना पटले १२ ते ५.३० बाईच आपल्या आई आहेत.


पालकांच्या दुर्लक्षामुळे एका मुलाची जखम बरी होत नव्हती. बाईंनी स्वत: १५-२० दिवस मधल्या सुट्टीत ड्रेसिंग करून जखम बरी केली. बाई वर्षाकाठी एक दोन गरजू मुलांची फी भरतात. स्वत:च्या मुलांचे कपडे शाळेतल्या मुलांना देतात. पण वाच्यता मुळीच नाही.


अशा या माझ्या -आमच्या बाई शतायुषी होवोत! त्यांच्याकडे पाहन मला 'आचार्य देवो भव'चा अर्थ प्रतीत होतो.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

Majhi Aawadti Shikshika Marathi Nibandh माझी आवडती शिक्षिका


मी एकदाची दहावी गाठली आणि सुटकेचा नि:श्वास टाकला, या वर्षी मात्र सपाटून अभ्यास करायचा आणि विशेष योग्यता मिळवायचीच असे ठरविले. गणित आणि इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यायलाच हवं! इतिहास-भूगोलाचं काय! गाईडमधील उत्तरं तोंडपाठ केली की झालं! आणि मराठी आपलीच मातृभाषा! 


तिचा काय अभ्यास करायचा? एकदा धडे वाचले की बस्स! हं, व्याकरण पाठ करून ठेवायचं आणि पाच-दहा निबंध वाचून ठेवायचे की झाला अभ्यास! काय विशेष आहे त्यात! गाईड आहेच की मदतीला! . _ असा विचार करीत असतानाच मराठीच्या देशमुख मॅडम वर्गात प्रवेश करत्या झाल्या, प्रसन्नपणे हसत हसतच! 


त्यांचं हसणं इतकं गोड होतं की वर्गातलं वातावरणच बदललं. सर्वांचे चेहरे फुलले. त्यांनी आम्हाला अर्धअधिक जिंकलं. मॅडमचं व्यक्तिमत्त्वही तसंच प्रभावी. भरपूर उंची, गौरवर्ण, तेजस्वी डोळे व त्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा, केसांचा सैलसर अंबाडा, व पांढरीस्वच्छ साडी. 


त्यांना पाहून आम्ही प्रभावित झालो. यापूर्वी त्यांच्या अध्यापनाचा आम्हाला अनुभव नव्हता, पण मराठी शिकविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या विद्यार्थिनी बोर्डात येतात अशी त्यांची ख्याती ऐकून होतो. मनात त्यांच्याविषयी अतीव आदर वाटला.


नेहमीप्रमाणे आम्ही पाठ्यपुस्तकं काढली. ते पाहताच मॅडम म्हणाल्या, 'सुरवातीचे ५-६ दिवस मी तुम्हाला पाठ्यपुस्तकातील काहीच शिकविणार नाही, पण मी जे काही सांगणार आहे ते मात्र मोलाचं असेल' असे म्हणून त्यांनी आपले विचार मांडले. 


'मुलींनो, भाषेचं शिक्षण म्हणजे जीवनशिक्षण! त्यातल्या त्यात मातृभाषेतून ते अधिक सुलभ होतं. ज्याची मातृभाषा उत्तम असते त्याचं व्यक्तिमत्त्व प्रभावी असतं. त्याला आपले विचार इतरांपुढे प्रभावीपणे मांडता येतात. आपली मायबोली अमृताते पैजा जिंकणारी भाषा आहे.


ती सर्वसामान्यांची भाषा आहे. तशीच साहित्यिक, महाकवी यांचीही भाषा आहे. तिला जसे संतांनी मोठेपण प्राप्त करून दिले तसेच साहित्यिकांनी तिचा अवघ्या जगातं प्रसार केला. आज परदेशातही मराठी प्रेमी मंडळींनी मराठी मंडळ स्थापन केलेली आहेत. 


तेथील मराठी माणसं साहित्य, काव्य, नाटकं यांच्या माध्यमातून वाङमयाचा आस्वाद घेतात, 'स्वानंद' मिळवितात. त्यांनी मातृभाषेचे ऋणानुबंध जपले आहेत. जर आपली मातृभाषा कच्ची असेल तर आपलं व्यक्तिमत्त्व खुरटतं. याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगते, तुम्ही यावर्षीही मातृभाषेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केलंत तर तुमची टक्केवारी' कमी होईल.


तुमचं अक्षर जर खराब असेल तर सर्वच विषयांत तुम्हाला कमी गुण मिळतील. तुम्हाला जर शुद्ध लिहिता येत नसेल तर तुमच्या उत्तरपत्रिकेतील गुण भराभर खाली येतील. तुमच्या अंगी वकृत्वाचे गुण नसतील, जर तुमचे उच्चार शुद्ध नसतील तर तुम्ही गावंढळ समजले जाल. 


तुम्हाला जर वाचनाची आवड नसेल, तुम्ही मातृभाषेतील उत्तम उत्तम पुस्तके वाचली नसतील तर तुम्ही सामान्यज्ञानात कमी पडणार आणि तुम्ही जर मातृभाषेचा सखोल अभ्यास केला नाही तर तुम्ही लेखक, कवी, नाटककार कसे होणार? 


आम्ही चित्रासारखे स्तब्ध होऊन आणि कानात जीव आणून हे सर्व ऐकत होतो, आपणच आपली 'कानउघाडणी' करीत होतो. अंतर्मुख होत होतो. इतक्यात तासबेल झाली. आम्ही हळहळलो. नंतर पुढच्या तासाची आतुरतेने वाट पाहू लागलो. त्यांच्या ओघवत्या वाणीच्या वर्षावात आम्ही वर्षभर न्हाऊन निघालो. अखंड बुडालो.


त्यांची अध्यापनाची पद्धत अत्यंत प्रगल्भ व समृद्ध होती. एखादा पाठ शिकण्यापूर्वी त्याचा लेखक, कवीचा परिचय, त्याचा काळ, वाङमयाच्या इतिहासातील त्यांचे योगदान, वाङ्मयप्रकार, तो पाठ ज्यातून घेतला त्या पुस्तकाचा परिचय, त्यांच्या भाषाशैलीचे वैशिष्ट्य इ.


सर्वांगीण माहिती सागून मग पाठाला सुरुवात करीत. फळ्यावर पाठाचे शीर्षक लिहिताना त्याच्या बाजूला त्यालाच समांतर निबंधाचे शीर्षक लिहीत. पाठ वाचताना त्यांचे स्पष्टोच्चार, वाचनातील चढउतार, वाणीतून होणारी रसनिर्मिती याने आम्ही भारावून जात असू. 


त्याचबरोबर व्यावहारिक दाखले देऊन पाठातील क्लिष्ट स्थळे अधिक स्पष्ट करून आमच्या आकलनाच्या टप्प्यात आणत. एखादा पाठ, कविता शिकविताना आम्हाला ब्रम्हांड फिरवून आणीत. यावरून त्यांचे वाचन किती दांडगे व सदर परिस्थितीचे किती भान आहे, याची आम्हाला जाणीव होत असे. त्यांचे शिकविणे कधी थांबूच नये असे आम्हाला वाटे.


केवळ देशमुख मॅडममुळेच आम्ही मातृभाषेच्या अभ्यासाकडे आकर्षित झालो. आपली मातृभाषा किती समर्थ आहे याची आम्हाला खरी जाण त्यांच्यामुळेच आली हे आम्ही कसे विसरू ? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद