पाण्यासाठी दाही दिशा मराठी निबंध | Panyasathi Dahi Disha Essay Marathi

 पाण्यासाठी दाही दिशा मराठी निबंध | Panyasathi Dahi Disha Essay Marathi  

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पाण्यासाठी दाही दिशा मराठी निबंध बघणार आहोत.  'अन्नासाठी दाही दिशा। आम्हा फिरविसी जगदीशा' असं व्यंकटेश स्तोत्रात म्हटलं आहे. आज मात्र पाण्यासाठी दाही दिशा' असं म्हणण्याची वेळ आली आहे. 


मार्च, एप्रिल महिन्यात उन्हं तापायला लागली की सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवायला लागतात, 'तापतं ऊन आणि आटतं पाणी' या 'आला उन्हाळा' असा सांगावा घेऊन येणाऱ्या खुणा! स्वातंत्र्य मिळून पंचेचाळीस वर्षं झाली, पण सर्व गावांना पुरेसं पाणी मिळण्याची व्यवस्थासुध्दा झाली नाही. 


भारत हा खेड्यांचा देश, पण खेड्यांच्याच वाट्याला अनेक गैरसोयी येतात. त्यातली पाणी ही मुख्य अडचण. माणसांना प्यायलाच पुरेसं पाणी नाही, तिथे जनावरांच्या पिण्याचं पाणी, चारा, वैरण यांना पाणी कुठून येणार? 'पाणी' म्हणजे 'जीवन'. पाणी नसेल तर जगणार कसं?


पाण्याच्या आधारानेच मानवी संस्कृती निर्माण झाली, उभी राहिली. गंगा, यमुना, सिंधू, मिसिसिपी, नाईल या नद्यांच्या आश्रयाने वाढलेली संस्कृती ही त्यांची ठळक उदाहरणं. संस्कृतीचा स्रोत जलस्रोताच्या काठांनी रुजला, वाढला. म्हणूनच पाणी नाही तिथं जीवन नाही. 


मानवी जीवनाचा, निसर्गाचा आधार असलेल्या पंचमहाभूतापैकी पाणी हा एक प्रमुख घटक. पाण्याअभावी वस्ती उठून जाते ती पाण्याचा आधार नसल्यामुळे. भारतातील कोणतेही शहर किंवा अगदी लहानसहान खेडेसुध्दा नदीच्या आश्रयानेच वसलेले आहे. पण नद्याच आटल्या तर माणसांनी जावं कोठे ?


पापणीचा आर्त काठ, क्षितिजाशी भिडे। प्रवाहाची धार वळे, उगमाच्याकडे। पिकोनिया भोवताल. व्यथा दर्वळती। नाही सोसवत कळा, बावरली माती। उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाई भासू लागते. मग पाण्याच्या संदर्भात बातम्या वाचल्या की अंगावर शहारे येतात. 


कुठे एकाच पाण्याचा तीन तीनदा वापर करावा लागतो. हंडाभर पाण्यात ते पाणी वाया न घालवता अंघोळ करायची. त्याच धरून ठेवलेल्या पाण्यात धुणी-भांडी उरकायची व त्याच विसळलेल्या पाण्यात संडासंमार्जन करायचे. कुठे आठ-दहा माणसांच्या कुटुंबाला आठ-दहा बादल्यात सगळ्या गरजा भागवायच्या. 


कुठे पाच पाच रुपायाला एकेक पाण्याचा हंडा विकत घ्यायचा. हॉटेलमध्ये चहा घेतला तरच पाणी मिळणार. तोही अर्धाच पेला. त्याची शुद्धाशुद्धता हा खूपच दूरचा प्रश्न ! ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी, ते पैसे मोजून पाणी विकत घेऊ शकतात. ज्यांना ते परवडणं शक्य नाही अशी सामान्य माणसं पाण्याच्या शोधात वणवण फिरतात. 


या साऱ्यातही 'पाण्याचा धंदा' करून पाण्यासारखा पैसा मिळवणारे निघतात. दुसऱ्याच्या संकटात स्वतःच्या स्वार्थाची सुगी साधून घेण्याची माणूसकीशून्य वृत्ती येथेही दिसते. अशा ठिकाणी माणुसकीचा ओलावा आणायचा कुठून?


पाणीटंचाईच्या झळा सगळ्यांनाच जाणवतात, पण त्यातही अधिक . हालअपेष्टा वाट्याला येतात त्या स्त्रियांच्या. त्यांच्या डोळ्यांतून पाणी गाळायला लावणारी ही पाणीटंचाई! भर दुपार डोक्यावर घेत पाणी वाहणाऱ्या बायांची रांग सगळे ऋतू घेऊन येतात त्यांच्यासाठी न संपणाऱ्या कष्टांची माळ।


मैलोनमैल अंतर पायी तुडवून डोक्यावरून हंडे वाहून आणायचे नि मिळेल तेवढया पाण्यात घराचं भागावायचं. छोट्या छोट्या मुलींपासून म्हाताऱ्या बायकांपर्यंत सर्व डोक्यावर हंडे घेऊन डोंगरवाटांनी उन्हातान्हात चाललेले दिसतात. कधी हेच पाणी दोन स्त्रियांत भांड्याला भांडं लागून आवाज व्हायला कारणीभूत ठरतं, जीवन देणारं पाणी जीवघेण्या संघर्षाचं कारण ठरू शकतं.


उन्हाळ्यात पाणीटंचाई ही शहरातही जाणवते, पण खेड्याइतकी नाही. उलट शहरातली माणसं पाण्याची नासधूस करतात. बादलीभर पाण्यात होणाऱ्या कामाला दहा-दहा बादल्या पाणी वापरतात. या कामात मोलकरणी भलत्याच हुशार असतात. 


थोड्याशा कामाला तास न् तास पाण्याचा नळ चालू ठेवतात. झोपडपट्ट्यांत तर चोवीस तास नळकोंडाळे बदाबद पाणी रिचवत असतात, अर्थात पाणी बंद करण्याचे कॉक चोरीला गेलेले असतात, पण लक्षात कोण घेतो?
माणसं आशावादी असतात. उन्हाळ्याचे चटके सोसत ते पावसाकडे डोळे लावून दिवस कंठतात.... मग पाऊस पडायला लागतो.


थेंबथेंब साठवाया अंतराळ उलते। नद्या-नाले, तळी-विहिरी, ओघळ-पागोळ्या, सगळीकडे पाणी खेळायला लागतं, टंचाईची अवकळा जाते व पाणीटंचाईची मनातली तीव्रताही कमी होत जाते. सगळ्या उपाययोजना थंडावतात. पाण्याचा प्रश्न जमिनीत मुरलेल्या पाण्यासारखा मुरत जातो तो पुढचा उन्हाळा येईपर्यंत! 

पुन्हा सगळं चक्र सुरू होतं. हा प्रश्न, सरकार योजना आखतं पण योजना व अंमलबजावणी यात भ्रष्टाचार, लालफीत अशा असंख्य अडथळ्यांच्या शर्यतीत अडकून पडतो. भूगर्भातला कमी होत चाललेला पाणीसाठा हे त्यात भर घालणारं चिंतेचं प्रश्नचिन्ह ! असा पाण्याचा प्रश्न अनेक प्रश्नांच्या चक्रात भिरभिरत राहतो. 


ही सगळी सरकारची जबाबदारी' असं मानण्याची प्रवृत्ती अनेक प्रश्नांत आडवी येते. गावच्या पाणीपुरवठ्याचा पंप बिघडला तर चार लोकांनी एकत्र येऊन तो का दुरुस्त करू नये? सार्वजनिक म्हणजे 'कुणीही वाली . नाही ही वृत्ती, यासाठी स्वयंसेवा' करण्यासाठी माणसांनी पुढे यायला हवं. 


शहरातल्या पाण्याला मीटर बसवावेत. एरिएल फोटोचा वापर करून भूगर्भात जलाशयाचे शोध घ्यायला हवेत. लोकांनी संघटना निर्माण कराव्यात. आंदोलनं, रास्ता रोको, हंडा-मोर्चा, उपोषणे इ. मार्गांचा अवलंब करून सरकारला खिंडीत पकडायला हवे, तर पाण्याचा प्रश्न धसास लागेल व पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागणार
नाही.


पाण्यासाठी दाही दिशा पु. ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी लिहिले आहे, 'आपले राष्ट्रगीत म्हणताना- 'सुजलां, सुफलां, मलयजशीतलां...या ओळीपाशी आलो आणि विशेषत: 'सुजलां' शब्द लिहिताना माझी जीभ अडखळते. कारण अशा वेळी माझ्या डोळ्यासमोर खेडोपाडी चार चार मैलांवरून उन्हातान्हातून डोक्यावरून हंडे घेऊन जाणाऱ्या बायका दिसतात. 

मन उदास होते.' खरोखरच आपण शहरीभाग वगळून विचार केला तर खरोखरच या खंडप्राय देशात उन्हाळ्याचे चार महिने पाण्याचे अतोनात दुर्भिक्ष असते. महाराष्ट्रात तर नगर हा दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. या भागात जवळपासच्या तलावांमधून टँकर भरून कशीबशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. 


अंघोळ व कपडे धुणे यासाठी तर पाणी मिळतच नाही. अशा वेळी आरोग्याचे नियम कसे व किती पाळणार ?
राजस्थान हा तर वाळवंटाचा प्रांत. तेथे सुध्दा मोठी शहरे वगळली तर खेड्यापाड्यांमध्ये पाण्याचा दुष्काळच असतो. पावसाचे प्रमाणही तेथे कमीच आहे. राजस्थानात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, 


त्यामुळे तेथे पर्यटकांची गर्दी असते. त्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी पाण्याची मेटाकुटीने व्यवस्था करावी लागते.
भारतात जेथे जेथे बारमाही पाण्याने भरून वाहणाऱ्या नद्या आहेत, मोठमोठे जलाशय आहेत तेथे पाण्याची टंचाई जाणवत नाही. उदा. भाक्रा, . जायकवाडी, भंडारदरा, ही धरणे. वैतरणा, विहारलेक, कामजतलाव वगैरे. 


काही ठिकाणी बंधारे घालूनही पाणी अडविले जाते. बऱ्याच वृत्तपत्रातून हल्ली पाण्यावाचून हाल होणाऱ्या दुष्काळी प्रदेशांचे मुद्दाम फोटोसह वर्णन छापले जाते. कोणत्या भागात कशा प्रकारे पाणीटंचाई आहे हे सर्व लोकांना समजते. अशा वेळी सामान्य लोकांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था पुढे येतात. 


शासनावर दबाब आणून, आंदोलन करून वा अन्य मार्गाने दुष्काळी भागात मदतीचे हात पोहोचतात. लोकांच्या समस्या मांडणे व त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे यासाठी वृत्तपत्राचे माध्यम फार उपयोगी पडते. आता शास्त्र फार प्रगत झाले आहे. अणुशक्तीचा उपयोग करून भूगर्भातील पाणी शोधणे शक्य आहे. 


नद्यांचे प्रवाह वळविणे शक्य आहे. पाण्याने संपन्न अशा प्रदेशात पाण्याची साठवण करून पाण्याविना तडफडणाऱ्या प्रदेशांना ते पाणी पुरवणे शक्य आहे. कृत्रिम पावसाचाही प्रयोग केला जात आहे. परंतु या साऱ्या गोष्टी खर्चिक आहेत. तरीही त्या करणे अटळ आहे. 


माणूस एक वेळ अन्नावाचून राहील, पण पाण्यावाचून राहणे मात्र शक्य नाही. म्हणूनच पाण्याला 'जीवन' म्हटले आहे. उंचावरून कोसळणारा प्रपात, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, मनोरम जलाशय, अवखळ निर्झर आणि अथांग सागर ही सारी पाण्याचीच रूपे. 


आकाशातून बरसणाऱ्या जलावर यांचे सौंदर्य अवलंबून असते. पण प्यायचे दोन घोट पाणी जेथे दुर्मिळ आहे तिथे पाण्याचे सौंदर्य कुठले? निसर्गाने दिलेले पाण्याचे हे वरदान कुठे कमीजास्त मिळते. म्हणूनच काही बापड्यांना 'पाण्यासाठी दाही दिशा' वणवण हिंडायची वेळ येते.