घड्याळ नसते तर मराठी निबंध | Ghadyal Naste Tar Marathi Essay

 घड्याळ नसते तर मराठी निबंध | Ghadyal Naste Tar Marathi Essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  घड्याळ नसते तर मराठी निबंध बघणार आहोत.  काय गंमत आहे पाहा! घड्याळाच्या काट्याबरोबर धावणारे आम्ही, 'घड्याळच नसते तर।' अशी कल्पना करतोय. बाकी मानवी मन ही मोठी अजब चीज आहे. वास्तवाच्या चौकटीत राहण्यापेक्षा कल्पनांच्या स्वैर साम्राज्यात विहार करायला, रमायला त्याला फार आवडतं. 


मग 'जे आहे, ते नसते तर।' आणि 'जे नाही ते असते तर।' असा कल्पनांचा खेळ (पसारा म्हणा हवं तर।) ते मांडीत बसते.घड्याळ नसतं तर छान झालं असतं, असं मला बालपणी वाटायचं खरं. विशेषतः त्याच्या कर्णकर्कश गजराने रोज माझ्या साखरझोपेचं खोबरं व्हायचं तेव्हा तर त्याच्यावर मी जाम भडकायची. वाटायचं, काय बिघडलं असतं हे नतद्रष्ट घड्याळच नसतं तर? 


काळ कासवगतीने चालला असता की त्याने मधूनमधून विश्रांती ('छोटासा ब्रेक'हो!) घेतली असती? सूर्य उगवला नसता की चराचर सृष्टीला काळझोप लागली असती? मग पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाने, उषःकालच्या वाऱ्याच्या सुखद स्पर्शाने किंवा आजीने गायिलेल्या मंगल भूपाळीने घराघराला जाग आली असती. 


मोरपिसांची टोपी घालून, चिपळ्यांच्या तालावर नाचत नाचत, वासुदेवाची पावलं गावाकडे वळली असती. आबालवृद्धांना त्याच्या गाण्यांनी मोहिनी घातली असती. (अगदी 'लिटील चॅप्स' च्या गाण्यांइतकीच!) पूर्वी भाटचारण राजाची स्तुतिस्तोत्रं गाऊन राजाला जागं करीत. आजही राष्ट्रपती, मंत्रिगण, करोडपतींनी पदरी भाट बाळगले असते 


(स्तुती कोणाला प्रिय नाही हो?) पदरी भाट बाळगणं (दारी हत्ती झुलण्यासारखा) प्रतिष्ठेचा . प्रश्नही झाला असता कदाचित. आणि मानवनिर्मित नसती तरी ईश्वरनिर्मित घड्याळ होतीच की। सूर्य, . चंद्र, ताऱ्यांची। ऑल प्रुफ, एव्हररेडी। ही विनामूल्य (पण अनमोल) घड्याळं राजापासून रंकापर्यंत सर्वांनी वापरली असती. मग घड्याळाच्या तालावर नाचायची वेळ आमच्यावर कशाला आली असती? '


वेळेचे गुलाम' हा शिक्का तर आमच्या कपाळी नक्कीच बसला नसता. बालपण सरलं तसे बालिश कल्पनांचे बुडबुडेही विरले. कल्पनांच्या आकाशात भिरभिरणारं (की भरकटणारं?) मनाचं पाखरू वास्तवाच्या भुईवर स्थिरावलं. आज तर घड्याळाने आमचं जीवन इतकं काही व्यापून टाकलं आहे की 'ते नसतं तर काय झालं असतं?' कल्पनाच करवत नाही.  


एवढं मात्र नक्की की मानवाने घड्याळाचा (अचूक वेळ दर्शविणाऱ्या यंत्राचा) शोध लावण्याचा प्रयत्न आजही जारी ठेवला असता आणि आशा करायला काय हरकत आहे? आजच्या एखाद्या संशोधकाला (खिश्चन हायगेंझ ऐवजी) ते बनविण्यात यशही मिळालं असतं. (Always tope for the better' नाही का?)


घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी घटिकापात्र, वालुकायंत्र, मेणबत्तीचे यंत्र, सनडायल क्लॉक, वॉटरक्लॉक, वजनाचे घड्याळ इत्यादी द्वारे ढोबळमानाने वेळेचा अंदाज घेतला जात असे. घड्याळ नसतेच तर आज आम्हालाही असाच एखादा मार्ग चोखाळावा लागला असता, जीवन आजच्या इतकं गतिमान राहिलं नसतं. घड्याळ्याच्या इषाऱ्यावर चालणाचा तर प्रश्नच उद्भवला नसता.


घड्याळाविना आम्हा विद्यार्थ्यांचं वेळापत्रक कसं ठरलं असतं कुणास ठाऊक! कचेरी, कोर्ट, कंपनी, पोस्ट, बँक, कारखाने येथील कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची निश्चित वेळ ठरविता आली नसती आणि वाहनांचा तर यक्षप्रश्नच राहिला असता. घड्याळाअभावी त्यांच्या आगमन-निर्गमनाची वेळ ठरविणं केवळ अशक्यप्राय होतं. 


आमच्या आवडत्या 'शॉपिंग'चंही काही खरं नव्हतं. खरेदीला पोचावं तर दुकानाला भलं मोठं टाळं लागले अस्मादिकांचं तर टाळकंच तडकलं असतं. आकाशवाणी, दूरदर्शन सारख्या प्रसारमाध्यमांची (रसिक प्रेक्षक, श्रोतृवंदाचीही) खूप पंचाईत झाली असती. 


सार्वजनिक कार्यक्रमांचा तर अगदी बट्याबोळ झाला असता. कार्यक्रमस्थळी लोकांनी एक तर खूप आधीपासून झुंबड केली असती किंवा अर्धेअधिक प्रेक्षक खूप उशिरा पोचले असते. काही माणसं मनगटावरचं घड्याळ खुणावत असूनही 'इंडियन टाईम' नुसार वागतात. घड्याळ नसतं तर ते अधिकच बेशिस्त, बेपर्वा झाले असते. 


झोपाळू लोकांचा जास्तीत जास्त वेळ झोपेत तर कष्टाळू जनांचा अधिकाधिक समय कामात व्यतीत झाला असता. चकाट्या पिटण्यात, फोनवर गप्पा हाणण्यात किती कालापव्यय झाला असता याची कल्पनाच न केलेली बरी 'काळ कोणासाठी थांबत नाही' हे महान सत्य आम्हाला कळलंच नसतं, तर वळणार कसं?


क्षणभरही विश्रांती न घेता, निःस्वार्थपणे चालत राहणारे घड्याळ म्हणजे निष्काम कर्मयोगी. ते नसते तर आळशी माणसाला कार्यप्रवृत्त करणे कठीणच होते. कर्तव्यपराङ्मुख व्यक्तीच्या हृदयावर घण घालण्याची नि कर्तव्यतत्पर लोकांना शिस्तीत ठेवण्याची कामगिरी तरी कोणी बजावली असती? एकंदरीत घड्याळ ही भूतकाळाची गरज होती, वर्तमानकाळाची ही आहे आणि भविष्यकाळाची तर राहणारच आहे.


एकविसाव्या शतकातील चंद्रावर, मंगळावर जाण्याचे मनसुबे आखणाऱ्या आम्ही 'घड्याळच नसते तर।' या विषयावर विचार करणे 'अव्यापारेषु व्यापारच' वाटत नाही का? विचार करा, घड्याळासारखं यंत्र शोधून काढण्यात मानव अपयशी ठरला असता तर त्याहीपेक्षा अधिक गुंतागुंतीची, बुद्धीचा कस लावणारी यंत्रं त्याला शोधता, बनविता आली असती की नाही शंकाच आहे. 


थोडक्यात सांगायचं म्हणजे आमची मजल संगणक युगापर्यंत पोचलीच नसती. तीनशे, चारशे वर्षापूर्वीचं जीवनच आमच्या वाट्याला आलं असतं आणि हो! प्रस्तुत विषयावर निबंध लिहिण्याचा अकल्पित प्रसंग आमच्यावर आला नसता, तसं म्हटलं तर ते अप्रस्तुत ठरणार नाही.


"अदिती, घड्याळाकडे लक्ष आहे की नाही? शाळेत जायचंय ना?" आईच्या हाकेने माझी तंद्री भंग पावली घड्याळाकडे नजर गेली. 'अकरा वाजले' असे सांगून त्याने आपले काम चोखपणे बजावले. नेहमी 'आला क्षण, गेला क्षण' हे एकच पालुपद गाणारं घड्याळ आज वेगळंच काहीतरी गुणगुणतंय असा भास झाला. मी कान टवकारून ऐकू लागले. ते म्हणत होते,


“आम्हाला वगळा अम्हाविण परी नाही दुजे साधन। 

आम्हाला वगळा दिशाहीन किती होईल हे जीवन।।"


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद