एड्स/ एचआयव्ही निबंध मराठीत मराठीत | AIDS/HIV Essay In Marathi

 एड्स/ एचआयव्ही निबंध मराठीत मराठीत | AIDS/HIV Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एड्स/ एचआयव्ही मराठी निबंध बघणार आहोत.  आमच्या गल्लीत त्या दिवशी भयाण शांतता पसरली होती. कारणही तसं विचित्रच होतं. चार घरी धुणंभांडी करून शिकली सवरलेली, स्वत:च्या पायावर उभी असलेली शेजारची सुरेखाताई आम्हा सर्वांना सोडून गेली होती. 


सर्वांच्या मदतीला धावणाऱ्या, कामसू सुरेखाचा मृत्यू झाला होता. सर्वजण दु:खाने व्याकूळ झालो होतो, हळहळत होतो कारण लहानपणापासून नखांतही रोग नसलेल्या सुरखाला एड्स ह्या भयानक रोगाने गिळले होते. तिच्या स्वप्नील आयुष्याची विदारक शोकांतिका झाली होती. 


बारावीची परीक्षा झाल्या झाल्याच घाईघाईने तिच्या घरच्यांनी दूर गावी नोकरी करणाऱ्या मुलाशी तिची लग्नगाठ बांधून टाकली होती जो दुर्दैवाने एड्सग्रस्त असल्याचे, सहाच महिन्यात कळले होते. वर्षभराने सुरेखाने त्यांच्या बाळाला जन्म दिला... अर्थात एड्सग्रस्तच. 


अशा प्रकारे एका व्यक्तीमुळे दोन निष्पाप जीव बळी गेले होते. या प्राणघातक आजाराच्या हल्ल्याने, समाजात होणारी सततची मानहानी, हेटाळणी, तिरस्काराला सामोरं जाणं मानी सुरेखाच्या स्वभावधर्मात बसेना. एक दिवस मरणाची वाट पाहात बसण्यापेक्षा तिने तिची व बाळाची जीवनयात्रा संपवली, मृत्यूला आलिंगन देऊन!


हे सर्व आठवल्यावर अर्थात्च माझेही मन सुन्न झाले. एड्स नावाचा दैत्य सध्या समाजात धुमाकूळ घालतोय. त्याचा नायनाट करणं हेच आता एकविसाव्या शतकातील नव्या पिढीचं आव्हान ठरणार आहे. अन्यथा निष्पाप बळींची संख्या वाढतच जाईल. 


बेकारी, लोकसंख्येचा विस्फोट, अज्ञान, निरक्षरता, गरीबी, भ्रष्टाचार या समस्यांच्या यादीतील अग्रक्रमांकावर असणाऱ्या एड्सची समस्या फारच धोकादायी व भयावह आहे. ‘एड्स' हे नाव अॅक्वायर्ड इम्यूनोडेफिशियन्सी सिंड्रोम' या नावाने जे इंग्रजी स्पेलिंग आहे त्यातल्या चारही शब्दांची आद्याक्षरे घेऊन तयार झाले आहे. 


याचा मराठीत अर्थ असा आहे - शरीरात प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे दिसणाऱ्या लक्षणांचा समूह. सन १९८१ मध्ये अमेरिकेत सर्वप्रथम हा रोगी आढळला. भारतात १९८६ साली याचे आगमन झाले आणि भारतभर त्याने आपले पाय रोवून घेतले. 


जगातल्या एकूण एड्सग्रस्तांपैकी दोन तृतीयांशापेक्षा अधिक एड्सचे रुग्ण केवळ भारतात आहेत, हे ऐकून कुणीही थक्क होईल म्हणजे जगातल्या आठ रुग्णांमध्ये एक रुग्ण भारतीय आहे. एड्स हा रोग ‘एच. आय. व्ही.' (ह्यूमन इम्यूनो डेफिशियन्सी व्हायरस) ह्या विषाणूमुळे होतो.


हे विषाणू, असुरक्षित शारीरिक संबंध, अयोग्य व अपूर्ण निर्जंतुकीकरण झालेल्या इंजेक्शनच्या सुया, सिरींजेस, सलाइनच्या नळ्या ह्यांमार्फत शरीरात प्रवेश करतात. हे विषाणू एकदा शरीरात गेल्यावर पांढऱ्या पेशींना चिकटतात, शरीरभर त्यांच्याबरोबर प्रवास करतात. 


पांढऱ्या पेशी म्हणजे शरीरातील सैनिक पेशी वा रक्षक पेशीच. या सैनिकांवरच विषाणूंचा हल्ला झाल्याने शरीरातील रक्षणाचे कार्य कमकुवत होते व हळूहळू पूर्ण रोगप्रतिकारशक्तीच नष्ट होते. एडसची लागण झालेल्या व्यक्तीच्या रक्ताची विशिष्ट तपासणी (एलायझा किंवा वेस्टर्न ब्लॉक) केल्यास ती व्यक्ती विषाणूवाहक आहे की नाही हे कळू शकते. 


या एड्सग्रस्ताचा सगळ्या अवयवात व त्याच्या रक्त, पू अशा स्रावात एड्सचे विषाणू असल्याने त्यांची देवाणघेवाण झाली, तर ह्या विषाणूंचा प्रसार लगेच होऊ शकतो. त्यामुळेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉईज, रक्त लघवी तपासणारे लॅब टेक्निशियन्स, स्वच्छता कर्मचारी ह्या सर्वांनाच विशेष काळजी घेणे गरजेचे असते.


एड्सग्रस्त मातेचे बालकही या रोगासहीत निपजते. एड्सचे लोण आता पंधरा वर्षांखालील शालेय वयोगटातील मुलामुलींमध्ये सुद्धा पसरतेय. समाजात असलेलं अज्ञान, लैंगिक शिक्षणाचा अभाव, अर्धवट ज्ञान, स्वैर वागणूक, गैरवर्तन व बाहेरख्यालीपणाला नकळत मिळणारी मुभा, विविध वाहिन्यांवरून प्रसारित होणारे उत्तान व भडक प्रेम प्रसंग, प्रेमाच्या चुकीच्या व्याख्या व संकल्पना, मूल्यशिक्षण, संस्कारांचे विस्मरण इत्यादींमुळे एड्सचा विळखा जास्तच घट्ट होत चाललाय. 


आणि याला औषध? ...एक मोठे अनुत्तरित प्रश्नचिन्ह! एड्सवर उपचारात्मक औषध व प्रतिबंधात्मक लस जगभरातील शास्त्रज्ञ शोधत आहेत, पण अजूनही त्यांना नेमका रामबाण उपाय सापडलेला नाही हेच खरे! ए.आर.व्ही. (A.R.V.) म्हणजे अँटी रिट्रोव्हायरल औषधे एड्सग्रस्तांना देतात, पण ती अतिशय महागडी असल्याने सर्वांनाच परवडतील अशी नाहीत. त्यामुळे मृत्यूची प्रतीक्षा' हेच औषध सध्यातरी उपलब्ध आहे. 


एड्सची लागण झाल्यावर अनेक महिन्यांनी वा वर्षांनी जेव्हा प्रत्यक्ष हा आजार होतो, त्यावेळी माणसाच्या वजनात दहा टक्के घट होते. एक महिन्याहून जास्त काळ जुलाब, उलट्या होतात, ताप येतो, औषधांना दाद न देणारा खोकला, न्यूमोनिया व फुफ्फुसांचा क्षयही होतो. अंगावर पुरळ येते. वारंवार नागीण' (हर्पिस) होते. 


त्वचा निस्तेज होऊन त्वचेवर चट्टे पडतात, त्वचा सुरकुतते. तोंडात घशात दह्यासारखे बुरशीजन्य डाग दिसतात. रुग्णास विशिष्ट प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. शेवटी हा रोगी झिजत झिजत मरणासन्न होतो. एकूण काय, एड्सची सारी कथा ही एक जीवघेणी व्यथाच ठरते. जगात एड्सच्या व्यथेसह एकूण ३८.६ दशलक्ष लोक जगत आहेत...


म्हणूनच आता ‘एड्स प्रतिबंधक लस आपल्या म्हणजे सुजाण नागरिकांच्याच हाती आहे, असंच मनोमन वाटतं. ती लस म्हणजेच सुदृढ शरीर, निरोगी शरीर. त्यासाठी सुदृढ मन, नीतिमत्ता, निर्भिडता, नीरक्षीर विवेक बुद्धी, सुंदर आचार, विचार, विहार, व्यायाम यांची जोपासना. 


ही लस बाळपणीच घेतल्याने एड्सचा राक्षसी रोग जवळ येण्याचं धारिष्ट्य करणारच नाही मुळी. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, मूल्यसंस्कार, रुढीपरंपरा जपणे म्हणजे मागासलेपण नव्हे, लग्नसंस्था, कुटुंबपद्धती ह्यावर विश्वास, जोडीदाराशी एकनिष्ठता ह्यात बुरसटलेपणा नव्हे. संयम, शुचिता, सुसंगती ह्या त्रयी अंगी बाणवल्याने एड्स जवळपासही फिरकणार नाही. 


अर्थात ह्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन कार्यशील होण्याचीही गरज आहे. सामाजिक सजगतेसाठी, सबलतेसाठी सर्व सामान्यांचं प्रबोधन होणं, शाळा-कॉलेजांमधून सक्तीचं आरोग्य शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोनातून देणं, त्यावर परिसंवादांचं आयोजन करणं गरजेचं आहे. 


एड्स हा संपर्कजन्य रोग नाही. एकत्र राहिल्याने, स्पर्श केल्याने, रक्तदान केल्याने, डास-कीटक चावल्याने, एकत्र पोहण्याने, कपड्यांची अदलाबदल केल्याने, उष्टे कप वापरल्याने होत नाही. ह्या गैरसमजांचे निराकरण आपणच केले पाहिजे. इतकेच काय तर साधा साबण व गरम पाणी वापरल्यास एड्सचे विषाणू मरतात, हेही सांगणे अत्यावश्यक आहे.


'साक्षर जनता भूषण भारता' बरोबरच 'निरोगी जनता भूषण भारता' हे वचन सत्यात आणायचं ठरवूयात व १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन खऱ्या अर्थाने साजरा करूयात. समोर आले शतक नवे हे विज्ञानाचे संगणकाचे आव्हान पेलूया सामर्थ्याने उद्दाम एड्सला थोपवण्याचे! हे मनामनात ठसवून चला तर क्रियाशील होऊ यात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद