“पाणी अडवा पाणी जिरवा” मराठी निबंध. Pani Adva Pani Jirva Essay in Marathi

 “पाणी अडवा पाणी जिरवा” मराठी निबंध. Pani Adva Pani Jirva Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण “पाणी अडवा पाणी जिरवा” मराठी निबंध बघणार आहोत.  संस्कृतच्या तासाला बाई तन्मयतेने शिकवित होत्या.आप: पुनन्तु पृथिवीत! पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपैकी पाणी हा पृथ्वीतलावरचा अमृतम्रोत. प्रत्येक पेशीचा अविभाज्य घटक. सृष्टीनियमन करणारी अमोघ शक्ती, जल हेच जीवन आहे. 'जलमेव जीवनम् !' 


पण सध्या...तोंडचं पाणी पळवणारी समस्या निर्माण झालीय, ती म्हणजे पाण्याचा अभाव, पेयजलाचं दुर्भिक्ष! भूतलावरचं नि भूगर्भातले पाणी संपत चाललंय. बदललेल्या पर्यावरणामुळे, अनियमित पावसामळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जाऊन बसली आहे. 


शेतकऱ्यांचे अनियोजित पाणी व्यवस्थापन, भूगर्भातील पाण्याचा भरमसाठ उपसा, वाढती लोकसंख्या, पाण्याची हेळसांड, 'शिळे पाणी', 'ताजे पाणी' ह्या गृहिणींच्या भ्रामक समजुतींतून होणारी पाण्याची उधळमाधळ, गळणारे नळ, पाइपांवाटे होणारा पाण्याचा अपव्यय ह्यामुळे संपणाऱ्या पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करतेय अर्थात करावे तसे भरावे' या उक्तीप्रमाणे 'सांडावे तसे सोसावे!'


जानेवारीपर्यंत कसेबसे पुरणारे पाणी एप्रिलमध्ये व्यथा निर्माण करते, डोळ्यात पाणी उभे करते. जून अर्धा होऊन गेला तरी जेव्हा आकाशात काळे मेघ दिसत नाहीत, तेव्हा मात्र शेतकरी हवालदिल होतो. मेघाला आर्ततेने आळवतो, विनवतो. 


म्हणतो, "नाच मेघा नाच रे पाणी बरसून हांस रे भेगाडल्या जमिनींसाठी अंग घुसळून नाच रे दमले...श्रमले...शेतकरी, तप्त दग्धले कामकरी उभ्या आडव्या तिरप्या रेषेत...आज मेघा नाच रे. पाणी बरसून हास रे. ढग जमतात, पाऊस येतो व आल्या रस्त्याने निघूनही जातो. पाणी वाहून जाते. नेहमीप्रमाणे जमिनी कोरड्याच! पडलेल्या पाण्याची साठवण आपण नीटपणे करीत नाही. 


मग म्हणतो निसर्गचक्र बदललंय, दुष्ट झालाय देव, मान्सून लहरी झालाय, पर्यावरणाने समतोल घालवलाय...पण खरंतर मानवच आता जागा व्हायची वेळ आलीय. त्यानं असहाय्य, निराश होऊन त्याच्या पदरी काय पडणार? त्यापेक्षा थेंब थेंब पाणी कसे वाचेल, कसे साठेल, कसे पुरवायचे? ह्याचीच तातडीची उपाययोजना करणं नितांत गरजेचं आहे.

प्रयत्नांचेचि रूपांतर होते ।

 भाग्यामाजि निश्चयाने ।।


पाण्याचे दुर्भिक्ष ही समस्या मोठी आहे. संकट मोठे आहे अन् वेळ मात्र थोडा! म्हणून आम्हाला कार्यशील व्हायला हवे. पाणीबचतीचे छोटे-मोठे उपक्रम राबवायला हवेत. जलसंधारणाच्या मागे लागायला पाहिजे, कारण त्याशिवाय तरणोपाय नाही. 


भूगर्भजलसंधारणेची सुरुवात स्वत:च्या घरापासूनच करून! छतजलसंधारणापासून! ह्यात घराच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या मुसळधार धारा एकत्रित करून पकडतात आणि पाइपावाटे मोठ्या टाकीत हे पाणी सोडतात वा आतून बांधलेल्या विहिरी वा कूपनलिकांत सोडतात. 


जास्तीचे वाहन जाणारे पाणी घराजवळच्या खड्ड्यांमध्ये मुरवतात. शक्यतो रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहू द्यायचे नाही, थेंब थेंब लाखमोलाचा मानून! आपल्या घरात दैनंदिन प्रसंगीही पाणी वाचवण्याचे छोटे-छोटे उपाय आहेत. त्याकडे दुर्लक्ष करू नये. उदा. दिवाणखान्यातील, मत्स्यालयातील बदललेले पाणी गॅलरीतील कुंड्यांसाठी वापरावे.


घराला वातानुकूलनाची सोय असल्यास, शीतलीकरणाने तयार होणारे पाणी नळीवाटे बाहेरच्या हिरवळीवर सोडावे पाण्यावर चालणाऱ्या शोभेच्या वस्तू, खेळणी, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वर्ण्य कराव्यात. घरातल्या पाळीव प्राण्यांना बागेत आंघोळ घालावी म्हणजे त्यावर फुलझाडे येतील. 


झाडांना खूप कमी पाणी लागते हे लक्षात ठेवून फक्त त्यांच्या मुळांपाशीच घालावे. रबरी, भोकं पडलेला पाइप वापरू नये. आंघोळीचे, धुण्याभांड्याचे, स्वयंपाकघरातील वापराचे पाणी ह्यावर परसात छोटीशी बाग वाढवावी. त्यावर कोथिंबीर, मिरच्या, मेथी, वांगी ह्या भाज्या सहज येतात. 


भात शिजवण्यापूर्वी तांदूळ धुतलेले पाणीही गुलाबांना घालावे. एवढेच काय पिण्यासाठी ग्लासमध्ये हवे तेवढेच पाणी घ्यावे. दोन घोट पाणी पिण्यामागे एक ग्लास पाणी टाकून देऊ नये. मराठीत एक म्हण आहे, तेल सांडं असावं पण पाणी सांडं असू नये' थेंबे थेंबे तळे साचते.


ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते, चिपको आंदोलनाचे प्रणेते, सुंदरलाल बहुगुणा पाणीप्रश्नावर बोलताना म्हणतात स्त्रियाच सोडवू शकतात पाण्याचा प्रश्न!' खरंच, येत्या शतकात समाजात, राज्याराज्यात ताणतणाव होतील, भांडणतंटे होतील ते पाणीप्रश्नावरूनच. पावसाचं पाणी माणसाला नक्कीच निर्माण करता येत नाही, पण त्याची साठवणूक, अडवणूक, वाचवणूक तर त्याच्याच हातात आहे. पाणी अडवून, पाणी जिरवून!


स्वातंत्र्योत्तर भारताच्या पहिल्या वहिल्या मंत्रिमंडळातील द्रष्टे विद्वान, अर्थमंत्री श्री. चिंतामणराव देशमुख यांनी त्यावेळेस एक महत्त्वाकांक्षी योजना आखून पूर्ण पंचवार्षिक योजनेचा खर्च उत्तरेकडच्या नद्या दक्षिणेकडील नद्यांना जोडण्यासाठी करावा, 


जेणेकरून उत्तरेकडील प्रचंड महापूर व दक्षिणेकडील दुष्काळ कायमचा हटेल' असे प्रतिपादन केले होते. त्यावेळेस त्यांची योजना हसण्यावारी नेण्यात आली. पुनः एकदा ह्या योजनेला जाणते पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी गती देऊ केली. हीच भारताची आज पहिली गरज आहे. अन्यथा भारताचा सोमालिया होण्यास वेळ लागणार नाही. 


जेथे दरवर्षी दहा हजार तहानबळी होतात. भारतात सक्तीचे कुटुंबनियोजन करून लोकसंख्यावाढीवर नियंत्रण करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे लोकसंख्यावाढीचा विस्फोट ही पेयजलदुर्भिक्षाचं कारण आहे. त्यात ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. 


निसर्गाची आलटापालट होतेय. म्हणूनच बहुगुणा म्हणतात त्याप्रमाणे तीन पातळ्यांवर कार्यक्रम राबवणं जरुरीचं आहे. एक म्हणजे पाण्याचा अत्यंत काटकसरीनं वापर, पाण्याचा पुनर्वापर उदा. सांडपाण्याचं शुद्धीकरण. दुसरा म्हणजे उसासारख्या नगदी पिकांना पर्यायी शेती उत्पादिते शोधणं व तिसरा उपाय वृक्षतोड थांबवून वनशेती करणं, वनसंवर्धन करणं! शासनही विविध उपक्रमांद्वारे ताली बांधणे, सामाजिक वनीकरण करणे, 


जलसिंचन प्रकल्प उभारणे, ठिबक सिंचनास शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे इत्यादी गोष्टी करीतच आहे. आपला, सुजाण नागरिकांचा यातला वाटा मात्र सिंहाचा असायला हवा. पाण्याचा व्यवस्थापनात जर आपण कच्चे कमकुवत राहिलो, तर मात्र..काही वर्षांतच रेशनकार्डावर पाण्याचे वाटप होईल...रांग लावून. दरडोई 


आंघोळीला दोन लिटर, पिण्यासाठी दोन लिटर व स्वच्छतेसाठी दोन लिटर पाणी मिळेल, तेही आठवड्यातून तीन वेळा फक्त! जून, जुलै महिने रखरखीत कोरडे गेल्यावर कृत्रिम पावसाच्या हालचालींना वेग येईल. त्यात वशिलेबाजी, राजकारण, भ्रष्टाचार ह्याला ऊत येईल. 


नेत्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल, पण सामान्यांच्या डोळ्याचं पाणी खळणार नाही. आणि हजारो वर्षांनंतर कोण्या एका परग्रहावरचा मानवसदृश प्राणी पृथ्वी नावाच्या ग्रहाचा शोध लावेल. तिथली माती यानातून संशोधनास नेईल. पाण्याचे कोरडे अवशेष  बापरे! असे होऊ देणार नाही...


सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुरांचे ओठांवर झेलू थेंब पावसांचे! आणि ...म्हणूनच ध्यास घेऊन जागृत होऊयात. पाणी अडवून पाणी वाचवून, वसुंधरा सुजलाम् करूयात! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद