देश माझा, मी देशाचा मराठी निबंध | Desh Maza, Mi Deshacha Marathi Nibandh

 देश माझा, मी देशाचा मराठी निबंध | Desh Maza, Mi Deshacha Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण देश माझा, मी देशाचा मराठी निबंध बघणार आहोत. भारत माझा देश आहे. पुण्यभूमी भारत, काबूल, कंदहारपर्यंतचा सीमाव्याप्त अखंड भारत. एकेकाळी घराघरातून सोन्याचा धूर निघणारा भारत. ह्या भूमीचे नांव जिभेवर येताच मन रोमांचित होते. 


अंगअंग पुलकित होते. आर्यांनी वसवलेल्या सिंधूसंस्कृतीपासूनचा इतिहास डोळ्यांसमोर येतो. चंद्रगुप्तासारखा महान सम्राट घडविणारा थोर राजनीतिज्ञ चाणक्य आठवतो. साम्राज्यविस्तार करणारा राजा अशोक, राजा कृष्णदेवराय, अटकेपार झेंडा लावणारे थोर सेनानी राघोबादादा, शिवराय डोळ्यासमोर येतात. 


'सुजलाम्, सुफलाम्' अशी संतांची, थोरांची ही भूमी. 'जय भारता जय भारता जय भारती जनदेवता' अशा शब्दात कुसुमाग्रजांनी भारताचा व भारतीय जनतेचा जयजयकार केलाय. ह्याच भारतीय जनतेचा आपण एक घटक. देशाचा सुजाण नागरिक, रक्षणकर्ता, हितचिंतक. 'अशी घडावी माझ्या हातून तेजोमय सेवा, देश हा देव असे माझा' असे म्हणणारा एक देशभक्त, देशसेवक.


माझा धर्म, जात, भाषा एकच ती म्हणजे भारतीय. भारतीय संस्कृतीत मातृऋण फेडण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला जन्मच या मातेच्या कुशीतून नी मातीतून झाला. गीताख्य अमृताचे स्तन्य तिने आपणास पाजले. तिचे अन्नधान्य, दूधदुभते खाऊनच आपण मोठे झालो; मग तिचे ऋण फेडायला आता आपण तयार असायला हवं. 


मनात अशी भावना जागायला हवी की, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला... हे चंद्र, सूर्य तारे. पण हाय! आजूबाजूला दृष्टिक्षेप टाकला तर...काळजाला घरे पडतील अशी दृश्ये नित्य पाहायला मिळतात. हक्क व कर्तव्य ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. 


पैकी हक्क सर्वांना हवेत, पण कर्तव्यपालनाच्या बाबतीत मात्र आपण मागे असतो, हीच वस्तुस्थिती पाहायला मिळते. अनेकदा प्रवास करताना लक्षात येते, बसची सीटकव्हर्स फाडलेली असतात. खिडक्यांच्या काचा फोडलेल्या, कड्या मोडलेल्या, दाराच्या बिजागऱ्या खिळखिळ्या, बल्ब काढून नेलेले, बसमध्ये तिकिटे, शेंगांची टरफले, खाद्यपदार्थांचा कचरा टाकलेला असतो. 


रस्त्यांवर अस्वच्छता करणे, थुकणे, शिंकरणे पाहिले की मळमळून येते. रेल्वेस्टेशनवरही हेच दृश्य दिसते. स्वच्छता गृहे गलिच्छ व सुलभ शौचालये अत्यंत असुलभ असतात. ह्या सगळ्याला कारणीभूत कोण? आपण ना! सार्वजनिक मालमत्ता जनतेसाठी आहे. जनतेने त्याची देखभाल करणे जनतेचे आद्यकर्तव्य आहे.


रेल्वे, बस, स्टेशन्स, शाळा, कार्यालये, पाणवठे ही ठिकाणे सोयीसाठी आहेत. देशाची शान वाढवणारी आहेत. नुकसानीचं मला काय!' 'माझ्या बापाचं काय जातं?' ह्या वृत्तीना आपण तिलांजली द्यायला हवी. 'आधी लगीन कोंडाण्याचं म्हणणाऱ्या निस्वार्थी मावळ्यांच्या देशातले आम्ही आम्हाला अजूनही स्वार्थ सुटत नाही.


कर भरणे, वीजबिले वेळच्या वेळी देणे, कायदे पाळणे ही आपली कर्तव्ये आहेत. याउलट कायदे कसे मोडायचे, वीज चोरी कशी करायची? शासकीय कर कसे चुकवायचे, विनातिकिट प्रवास कसा करायचा? ह्यात आपण निपुण होतोय व आपलाच देश बुडवतोय. 'जे करू नये' अशी पाटी असते,


ती पुसून नियम मोडून ती गोष्ट आपण हटकून करतो. कदाचित ती लोखंडी पाटी खाजगी मालमत्तेतही जमा करतो. सरकारी मालांच्या चोऱ्या करतो. वाहतुकीचे नियम, सिग्नल्स हे तर केवळ तोडण्यासाठीच असतात, त्यामुळेच रेल्वेफाटकापाशी हमखास क्रॉसिंग करणारी माणसे वा वाहने ह्यांचे अपघात होतात.


२१ व्या शतकात आपण विज्ञानयुगात प्रवेश केला, तरी भारताला देवदासी, बारबाला, बालमजूर, परित्यक्तांचे पुनर्वसन, पाणीटंचाई, निरक्षरता, अंधश्रद्धा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वीजटंचाई अशा अनंत ग्रहणांनी पिडलं आहे. आपल्याला वाटते ह्या प्रश्नांची जबाबदारी सरकारची, पण सरकार म्हणजे कोण?  जनताच ना! 


हा देश माझ्यासाठी काय करतो ह्याआधी मी देशासाठी काय केलं नी काय करतो ह्याचा विचार आपण करायला हवा. साधं १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाला उपस्थित न राहता आपण सुट्टी सहलीसाठी वापरतो. प्रत्येक ठिकाणी आपण 'मी' पणा दाखवतो. 


मी महाराष्ट्रीय, मी आसामी, मी केरळी! बेळगाव महाराष्ट्रात की कर्नाटकात, अमुक नदीचं पाणी, त्यावरील धरण, वीजप्रकल्प ह्या राज्याचा की त्या? पण सर्वांआधी मी भारतीय हे जाणणं महत्त्वाचं नाही का? विद्यापीठांची, शहरांची, स्टेशनांची नावं बदलण्यातही आपण वादावादी करण्याचं सोडत नाही. 


ब्रिटिश निघून गेले तरी सँडर्सरोड, करीरोड सांताकुज ही इंग्रजी नावे आपल्या कानात रुतत नाहीत.पण...आंबेडकर विद्यापीठ की मराठवाडा विद्यापीठ ह्या झंजीत आपण कार्यक्षमता वाया घालवतो. एका माणसाची कार्यशक्ती गुणिले शंभर कोटी बरोबर किती हॉर्सपॉवर शक्ती होईल? बापरे! 


सानेगुरुजी म्हणतात, 'मोकाट सोडलेल्या वाफेचा उपयोग काहीच होत नाही, परंतु ती वाफ एकत्र नळीतून वाहन नेली तर आगगाडीला ओढून नेते. प्रचंड यंत्रे चालविते. म्हणूनच बहजनहिताय ही कार्यशक्ती खर्च करावी. 'माझा धर्म' 'माझी भाषा 'माझा प्रांत 'माझे हित असले बीज का रुजवावे आपल्या मनात? एकच भाषा 'मी सर्वांचा, सर्वचि माझे कां नसावी?


एकच देश भारत आपुला' हीच भावना कां न रुजावी? असे प्रकर्षाने वाटते. 'सगळ्या जगात सुंदर हा हिंद देश माझा' फुलपाखरे आम्ही हो फुलबाग आमुचा हा असा सुंदर विचार मनात आणून ही फुलबाग सजवू या. जल, वायू, ध्वनी, प्रदूषण रोखून निरक्षरांना साक्षर करुयात. 


नुसतं लिहिता-वाचता येतं म्हणजे साक्षरता नव्हे, तर कृषी, उद्योग, संगणक, शिक्षण, पर्यावरण, सहकार, व्यापार ह्या विषयांतही प्रगल्भता आणणं म्हणजे साक्षरता. एकोपा, बंधुभाव व प्रखर राष्ट्रीय भावनेने प्रेरीत होऊन देशाचे' बनून राहिल्यावर कुण्या शेजारील शत्रूराष्ट्राची हिंमत होणार नाही भारताकडे वाकडी नजर टाकण्याची. 


कारण जो कुणी वाकड्या नजरेनं पाहून भारताची खोडी काढील, त्याला नष्ट करण्यासाठी कोटी कोटी छात्यांचे 'कोट' एका निमिषांतच उभारले जातील. केवळ विजय मिळविण्यासाठी! याची शंभर टक्के खात्री असेल. एका मुखाने, एक दिलाने, एक रवाने सारे म्हणतील, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे हे राष्ट्र सर्व धर्मांचे आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद