शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी | Shetkaryache Manogat Marathi Nibandh

शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी | Shetkaryache Manogat Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.  पोळ्याचा सण होता. आम्ही सर्वजण अर्जुनदादांच्या घरी खास आग्रहास्तव जेवायला गेलो होतो. अर्जुनदादा, आमच्या परिसरातील प्रगतिशील नी प्रयोगशील शेतकरी शास्त्रीय पद्धतीने शेती करणारे एक सधन शेतकरी. 


जेवण झाल्यावर बाहेरच्या ओट्यावर सर्वजण गप्पा मारीत बसलो होतो. साहजिकच शेती विषयावर गप्पा जास्त रंगत गेल्या. आमची पण थोडीफार जमीन असल्याने, मी ही मन देऊन ऐकू लागलो. अर्जुनदादा सांगत होते, “आठवतं तुम्हाला, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काही दशकांत जगातल्या अन्नधान्यांचे उत्पादन खूप वाढले. 


त्या हरितक्रांतीची कारणं होती, संकरित बी-बियाणं, रासायनिक खतं आणि शक्तीशाली कीटकनाशकं. पण गेल्या काही वर्षांत शेतीउत्पादनाचा मूलाधार... जी जमीन, तीच हळूहळू निकस होत गेली. गांडुळासारखे प्राणी, अन्य कीटक मरून जाऊ लागले. 


मातीचा जिवंतपणा गेला, जळजळीत खतांमुळे आम्ही शेतकऱ्यांनी जमिनीला पाणीही भरमसाठ पाजले, त्यामुळे त्या पाणथळ झाल्या, खारवल्या. हजारो एकर शेतजमिनी नापीक झाल्या. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. जमिनींची पुढील हानी टाळायची असेल, तर नैसर्गिक, सेंद्रिय खतांच्या वापराकडे परत वळावे लागेल. 


शेणखत, कंपोस्ट खत, गांडुळखताचा सढळ वापर करावा लागेल. जमिनीचं जे आपण ओरबाडून घेतलंय, वापरलंय, ते तिला परत करण्याचा हाच उपाय आहे तरच नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड ही जैविक चक्रं पूर्ववत् होतील. अरे जमिनीला आपण 'आई' मानतो. ती काही यंत्र नाही, भांडवल घातलं की धान्य द्यायला. ऊस हे तर आळशी शेतकऱ्याचं पीक. ज्याला कामाचा आळस, तो ऊस लावतो असं माझं प्रामाणिक मत आहे. 


पैशाच्या मोहात पडून उसांमुळे जमिनी भिजट होतात व नापीकही! आणि भूजलसाठे तरी कुठे उपलब्ध आहेत! विहिरी, तळी, कूपनलिका जानेवारीतच आटतात. अनियमित पाऊस, पाण्याची अयोग्य साठवण, जलसंधारणाचा अभाव व भूजलाचा प्रचंड उपसा ह्यामुळे पाणी ही साधनसंपत्ती संपुष्टात येत आहे. वाढते प्रदूषण नि भयावह वृक्षतोडीमुळे संकटात भरच पडतेय. त्यासाठी


मला वाटतं प्रत्येकानं जर ठिबक सिंचन, फवारा सिंचनाद्वारे शेतीच्या पाण्याचं व्यवस्थापन व नियोजन केलं, तर आहे त्या पाण्यात जास्त क्षेत्र लागवडीखाली आणता येईल. विजेच्या भारनियमनाचा बाऊ न करता वाऱ्याच्या उपलब्धतेनसार पवनचक्क्या वापरून निर्माण होणाऱ्या वीजेवर शेतात पाणी खेळवता येईल. जमिनीच्या उंचवट्याच्या जागी खोदकाम करून 'शेततळे' तयार करता येईल. 


'सायफन' पद्धतीने शेततळ्यातील पाणी शेतासाठी वापरता येईल. जमिनींचा कस कायम राहावा ह्यासाठी मिश्रपिकं घेणं, शैवालाचा, तागाचा .... खतासाठी वापर करणं, कीटकनाशकं म्हणून कडुनिंब, लसूण, गोमूत्र, हिंग, वेखंड यांचा वापर करणं, जमिनीला गांडुळखताचं विरजण लावणं, अशा अनेक उपायांनी निसर्गाच्या जवळ जात शेती करणं कधीही फायद्याचंच.


कधी कधी वाटतं शेतकरी प्रामाणिकपणे शेती करतो. रक्ताचं पाणी करून मळा फुलवतो, भाजीपाला पिकवतो. मोत्याची कणसं बाजारात आणतो. समाजाचा अन्नदाता म्हणून त्याचा गौरवही होतो, पण... त्याच्या हाती त्या उत्पादिताचं खरं मोल, खरी किंमत पडते का? 


जेव्हा तजेलदार दोडकी, निरोगी कारली, घेवडा, दुधीभोपळे बाजारात पाठवले जातात, तेव्हा मजूर, दलाल, हुंडेकरी, भरेकरी, हमाल, भाडेखर्च ह्या सर्वांचा वाटा जाऊन शेतकऱ्याच्या हातात अतिशय नगण्य पैसे येतात... तेव्हा मात्र शेतकरी निराश होतो, कारण पुढच्या लागवडीसाठी त्याला पुन: पुन: भांडवल लागते व ते पुरेसे न मिळाल्याने त्यापायी कर्ज काढावे लागते, हे दुष्टचक्र चालूच राहिलं किंवा दुष्काळ, अवर्षण पावसाची गारपीट झाली. 


एखादा रोग साऱ्या पिकावर पडून उभ्या पिकाचं नुकसान झालं तर शेतकरी परत उभा राहणं दुरापास्त होतं. गरीब शेतकरी गरीबीतच लोटला जातो नी, मग... माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी राहिलेला रातदिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती... दुसऱ्याच्या हाती माप आम्ही कष्टाचेच खातो, जग करी हापाहाप! असं म्हणावं वाटतं.


या निराशेच्या गर्तेतून तो जर निघालाच नाही तर... मग... मनोरुग्ण होणं, व्यसनाधीन होणं, थेट आत्महत्यांपर्यंत त्याची मजल जाते. मला तर शेतकरीबंधूंना सांगावसं वाटतं, बाबांनो, असं करू नका. केंद्रसरकार, राज्यसरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते, उपक्रम घेते,  अनुदान देते. 


फळबाग, वनशेती, परसबाग, योजनांतर्गत, सामाजिक वनीकरणाच्या साहाय्याने शेतांतील बांधांवर झाडे लावून घ्या. फळझाडे लावा, वनशेती करा. मुख्य पिकांमध्ये दोन दोन आंतरपिके घ्या. 'साक्षर' होऊन बाजारपेठेचा, गि-हाइकाच्या मागणीचा अभ्यास करा, त्याप्रमाणेच पिके घ्या. मोठमोठ्या कंपन्या पुनखरेदी करार करतात. त्यांच्याकडूनच लागवडीला रोपे देतात, ती घ्या. 


सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची संघटना करा. दर आठ दिवसांनी एका ठिकाणी जमा. आपापल्या पिकांसंबंधी उदा. पपई रोपाची लागवड, कीड, वाढ, कीटक प्रतिबंधक उपाय, फवारणीचे नियोजन, खतांचे पाण्याचे व्यवस्थापन, बाजारपेठा, दर ह्यासंबंधी चर्चा करा. अरे, भागवत सप्ताह बसला की, आपण सारे कथा ऐकायला बसतोच नां! मग शेतकऱ्यांनी शेती सप्ताह' कायमच सुरू ठेवायला काय हरकत आहे? 


आता तर संगणक, इंटरनेटचे जाळे आहे तुमच्या दिमतीला. ते तुम्हाला हव्या त्या पिकाची हवी ती माहिती क्षणभरात पुरवेल. देश-विदेशीची पुस्तके सांगेल. कृषीविषयक, हवामान, पावसाविषयक माहिती देईल. त्या माहितीला पूरक असे पुरावे सांगेल तेही बसल्याजागी! आवश्यकता आहे प्रामाणिक प्रयत्न व विद्या यांची सांगड घालण्याची! 


एकमेकांवर, सरकारवर दोषारोप करून काय साधणार? देश माझा नि मी देशाचा, असं म्हणून माझंही काही कर्तव्य आहे असं माना नि कामाला लागा. सरकार सतत शेतकऱ्याला प्रोत्साहनच देते. सहकारी तत्त्वावरील शेतीला प्राधान्य देते. अल्पभूधारकाला सवलती देते. अगदी त्याला मोटार, ट्रॅक्टर, अवजारे घ्यायला सुद्धा! 


शेतकऱ्याच्या मालाला भाव नीट दिला नाही, तर लगेच आत्महत्या हा त्याला उपाय नव्हे. आंदोलनासारखे उपाय वापरा व सरकारला आपले मागणे ऐकायला लावा. कित्येक सरकारी योजना तुमच्यापर्यंत येतच नाहीत त्या माहीत करून घ्या. त्यांचा पाठपुरावा करा. धरणीमातेला पुन्हा नटवा, हिरव्यागार शालीने सजवा एवढंच!" अर्जुनदादांचे डोळे भरून आले होते. 


त्यांच्या पोटतिडिकीच्या शब्दांनी मीही भारावलो. आज बऱ्याच नवीन गोष्टी मला कळल्या होत्या! गृहिणी गृहम् उच्यते' तसेच 'कृषीवले राष्ट्रम् उच्यते' असं म्हटलं तरी उचित ठरणार आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद