भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Autobiography of Earthquake Victim Essay in Marathi

 भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध | Autobiography of Earthquake Victim Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंपग्रस्ताचे मनोगत  मराठी निबंध बघणार आहोत. ३० सप्टेंबर १९९३ ... त्या काळरात्री निसर्गाने मनुष्यांची क्रूर चेष्टा केली. मी किल्लारीजवळील राजेगावचा रहिवाशी. त्यादिवशी साधारणतः पावणेचारच्या सुमारास भूकंप



झाला. घरे ढासाळली, वृक्षं उन्मळली, गुरांना धरणीने पोटात घेतलं. साखरझोपेत असताना काळाने हा घाला घातला. कित्येकजणांना मृत्यूने कवटाळले.

"हादरली भूमी हादरले मन

मरणाने कसे घातले थैमान”


अशी अवस्था झाली होती. माझी आई, बहीण मला सोडून देवाघरी गेले. माझ्या घरी मी आणि माझे बाबा दोघेच वाचलो. पाहा किती क्रूर थट्टा! या धरणीने माझ्या आई, बहिणीला नेऊन मला कशाला जिवंत ठवेले? खरंच 'माता न तू वैरिणी' असे म्हणावेसे वाटते.


खूप प्रयत्नाने आई व ताई यांची प्रेते मिळवून अंत्यसंस्कार केले. सगळीकडे प्रेतेच प्रेते होते. जो तो जिवाच्या आकांताने, सुन्न मनाने आपापल्या आप्तांची प्रेते शोधत होते. सगळीकडे पसरली होती दुःखाची छाया.


“प्रेतांचे ढिगारे, आश्रूंचा पाऊस

श्वासाचा नाही कुठे मागमूस "

अशी अवस्था झाली होती.

“ओघळले दुःख आसवे होऊन

माणूसच गेला पार उन्मळून”


अशी माझी व बाबांची अवस्था झाली होती. अन्नावरील वासना उडाली होती. जगण्यात काही रसच वाटत नव्हता. सारे जीवन वैराण वाळवंटासारखे वाटत होते. आई, ताईच्या आठवणी जागवत एकेक दिवस ढकलत होतो. मी व बाबा अगदी विमनस्क व हताश झालो होतो.

“रामप्रहरीची आटली भूपाळी

कंठात फुटली केवळ किंकाळी”


याची पदोपदी आठवण येई आणि एक दिवस माझ्या आयुष्यात क्रांती आली. लातूरच्या 'साने गुरूजी सेवा दल' ने ही क्रांती आणली. त्यांनी मला व बाबांना धीर दिला. माझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घेतली. मला लातूरला नेले. 'साने गुरूजी प्रशालेत' माझे नाव घातले. माझ्या राहण्याची सोय केली. त्यांनी माझ्या आयुष्याच्या वाळवंटाचे नंदनवन केले.


मी त्या शाळेत रमलो अधून मधून मी गावाकडे जाऊन येत असे तेव्हा मला बाबांकडून अनेक धक्कादायक गोष्टी कळाल्या, देश-विदेशातून पाठविलेली औषधे, फळे, बिस्कीट, ब्लँकेट, तंबू यांचा अत्यल्प भाग भूकंपग्रस्तापर्यंत येत होता. बाकी मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे भ्रष्टाचारी मटकावत असत. 


हे ऐकून किळस वाटली. घरबांधणीचे काम निकृष्ट होते. अनेक भूकंपग्रस्त दारूच्या आहारी गेले होते. विकास आमटे आनंदवनातील व स्थानिक मनुष्यांच्या मदतीने स्वस्त व सुरक्षित घरे बांधून देऊ इच्छित होते. पण भ्रष्ट कारभाराने त्यांना निराश केले.


पण तिथले लोक आता सावरत आहेत. त्यांना जगण्याची प्रेरणा पुन्हा मिळालीय. भूतकाळ विसरून, भविष्यकाळाच्या आशेवर ते आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. माझ्या बाबांनी शेती सुरू केली आहे. अनेक लोक आता कामधंद्यात गुंतले आहेत. त्यांच्या डोळ्यात नव्या आशेची, नव्या उषेची, नव्या भविष्याची अनोखी चमक दिसली. संकटाशी सामना करण्याचे धैर्य दिसले. जणू ते म्हणत होते की -


“घडणारे होते, घडोनिया गेले

भूमिचेच देणे भूमीस मिळाले

भूमिनेच दिला सृजनाचा वसा

कोंब होऊनिया उगव माणसा.”



मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद