छत्रपती शिवाजी महाराज निबंध Essay Chhatrapati Shivaji Maharaj

 छत्रपती शिवाजी महाराज निबंध Essay Chhatrapati Shivaji Maharaj

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध बघणार आहोत. काही व्यक्ती या काळावरही मात करतात. असेच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी राजांचा अंत होऊन आता साडेतीनशेहूनही अधिक वर्ष ऊलटून गेली. तरीही या मराठ्यांच्या स्वराज्य संस्थापकास कोणीही विसरु शकलेले नाही. 


आजही हा समर्थ राजा अनेकांचे प्रेरणास्थान ठरला आहे. त्यांनीच सर्वप्रथम महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. असाध्य वाटणारे स्वराज्याचे स्वप्न साकार केले. महाराजांचा जन्म पुण्याजवळ शिवनेरी किल्ल्यावर झाला. वडिल शहाजी राजे हे प्रथम निजामाच्या व नंतर अदिलशाही दरबारात सरदार होते. 


आई जिजाबाई अतिशय कर्तबगार व धाडसी होत्या. स्वराज्य व स्वातंत्र्याची ज्योत त्यांनीच बाल शिवाजीच्या मनात पेटवली, दादोजी कोंडदेव या महान गुरुंच्या मार्गदर्शनाखाली व करड्या शिस्तीत शिवाजीचे शिक्षण पार पडले. या दोघांच्या प्रयत्नातून राजांचे व्यक्तिमत्व घडत गेले. 


लहान वयातच पुण्याची जहागिरदारी शिवबाच्या नावे करुन शहाजीराजांनी जिजाबाई व शिवबास पुण्याला पाठविले उध्वस्त व उजाड झालेले पुणे या दोघांच्या आगमनाने बदलले. या छोटयाश्या गावास नवजीवन मिळाले.


वयाच्या सोळाव्या वर्षी शिवबाने आपल्या मावळ्यांसह रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व लवकरच तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा पाया रचला. त्यांनी स्थनिक जनतेच्या प्रश्नांना महत्त्व दिले, त्यांचा न्याय-निवाडा केला. जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली. 


अत्याचारी यवनी सत्तेविरुद्ध उभे रहाण्याची हिंमत दिली, शून्यातून स्वराज्यनिर्मितीच्या यशस्वी प्रयत्नातून राजांचे मोठेपण सिद्ध होते. ते स्वतः एक शूर व कुशल योद्धा होते. राजांजवळ उत्कृष्ठ गुणग्राहकता होती. प्रसंगावधान होते. अफजलखानाचा वध व शहिस्तेखानाचा पराभव या प्रसंगातून त्यांच्या अजोड युद्धतंत्राची प्रचिती येते. 


आग्य्राहून सुटका या ऐतिहासिक घटनेतून त्यांच्या कल्पकतेची व प्रसंगावधानाची साक्ष मिळते. राजांना हिंदू धर्माचा रास्त अभिमान होता, पण इतर धर्मियांबद्दल द्वेष नव्हता. त्यांच्या सैन्यात अनेक मुसलमान सैनिक व अधिकारी होते.


कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मानाने परत पाठविण्याच्या त्यांच्या निर्णयावरून त्यांचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन व न्यायप्रियता दिसून येते. शिवरायांनी ५ जून, १९७४ ला रायगडावर सिंहासनारोहण केले. स्वत:ची मुद्रा निर्माण केली. मराठी ही आपली राजभाषा केली. 


त्यांच्या स्वराज्यात तीनशे गड किल्ले होते. अशा या न्यायप्रिय, गुणग्राहक कल्पक, प्रसंगावधानी, दूरदर्शी, धर्मनिरपेक्ष व अष्टपैलू राजाचा वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी मृत्यू झाला. मनात येते की आजही त्यांनी परत जन्म घ्यावा व देशाचा उद्धार करावा. समर्थांच्या भाषेत,


शिवरायांचा आठवावे रूप

शिवरांयाचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा साक्षेप

भूमंडळी!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद