शेतकरी सुखी तर देश सुखी मराठी निबंध ।shetkari sukhi tar desh sukhi marathi nibandh

 

शेतकरी सुखी तर देश सुखी मराठी निबंध ।shetkari sukhi tar desh sukhi marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  शेतकरी सुखी तर देश सुखी  मराठी निबंध बघणार आहोत. “शेतकऱ्याला वगळा,

गतप्रभ झणी होतील तारांगणे ।

शेतकऱ्याला वगळा,

विकेल कवडीमोलावरी हे जिणे ।।”


या कवितेप्रमाणे शेतकऱ्याशिवाय आपले जीवन म्हणजे पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशाप्रमाणे होय. कारण हिंदूस्थान हा पूर्वीपासूनच शेतीप्रधान देश आहे. देशातील ८० टक्के लोक शेतीवरच उपजिविका करतात. त्यामुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतकरी हा महत्त्वाच कणा आहे.


प्रत्येक शतेकऱ्याला आपल्या धरित्रीचा जिव्हाळा असतो. धरणीमाता आणि शेतकरी यांचे अतुट नाते असते. दिवसभर काबाडकष्ट करून शेतकरी जमिनीतून सोने उगवीत असतो. “कांदा, मुळा, भाजी। अवघी विठाई माझी।। "


अशी संत सावता माळ्याप्रमाणेच शेतकऱ्यांची अवस्था असते. कष्ट करणे हीच त्याची भक्ती आणि धरणीमाता हाच त्याचा देव असतो. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे' हे ब्रीद आपल्या शेतकऱ्याला चांगलेच, माहित आहे. जुने तंत्रज्ञान साधनसामग्रीचा अभाव, तुटपुंजा पैसा, पारंपरिक शेतीपद्धती यांमुळे शतेकऱ्याला शेतात राब राब राबावे लागते. तेव्हा कोठे कोरभर भाकर पोटाची खळगी भरायला मिळते. एवढे असूनही शेतकरी मनाने प्रसन्नच असतो.


“आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे।

करू काम, स्मरू नाम, सुखी रामहरी रे।।”


अशी संत ज्ञानेश्वर चित्रपटातील गीताप्रमाणेच शेतकऱ्यांची स्थिती असते. रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करूनही अवर्षणाची टांगती तलवार समोर उभी असते. भारताची शेती पूर्णतः लहरी पावसावरच! या हट्टी बळीराजामुळे दुष्काळ कधीही पाठ सोडत नाही. 


आज देश स्वतंत्र होऊन ५० वर्षे झाली. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला पण शेतीमध्ये भारत कासवाच्या गतीप्रमाणेच पावले टाकीत आहे. शासनाची मदत फार तोकडी आहे. कर्ज, बी-बीयाणे, खते योग्य दरात मिळत नाहीत. दुसऱ्याना अन्न, वस्त्र, निवारा देणारा हा शेतकरी अर्धवस्त्र आणि अर्धपोटीच राहातो.


आज भारतीय शेतकऱ्याला पारंपारिक पद्धतीचा वापर करूनच शेती उत्पादन करावे लागते. तो अल्प-भूधारक आहे. त्यामुळे त्याच्या शेतीत जास्त पीक तो घेऊ शकत नाही. त्यामुळेच आज देशात एवढ्या मोठ्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य कमी पडत आहे. तरीही


“ठेविले अनंते तैसेचि रहावे ।

चित्ती असू द्यावे समाधान ।।”


या तुकोबांच्या वचनाप्रमाणे शेतकरी समाधान मानीत असला तरी कोमेजलेल्या धरित्रीचे कुटुंबाचे हाल त्याला डोळ्याने बघवत नाहीत. सर्व संकटांना तोंड देऊन तो माल बाजारपेठेत नेतो तर त्याला योग्य किंमत मिळत नाही. कारण; समाजात सर्वत्र भ्रष्टाचार थैमान घालत आहे


महागाईशी शेतकऱ्याचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो. आज देशात कोट्यावधी शेतकरी असे आहेत की, त्याच्या वस्तीवर समृद्धीची पहाट अजून फटफटलीच नाही. त्यांच्या जीवनाचा खराटा दुःखाच्या नियमबद्ध चाकोरीतून 'रे रे' करीत चालला आहे. आपल्या देशात


शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ८० टक्के जनता शेतकरीच आहे. त्यामुळे शेतकरी सुखी तरच देश सुखी समृद्ध बनेल. म्हणूनच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' हा देशाच्या प्रगतीचा मूलमंत्र सांगितला. 


तर महात्मा गांधी यांनी देशाच्या प्रगतीसाठी 'खेड्याकडे चला' हा विचार मांडला. कारण खेड्याच्या विकासातूनच शेतीचा विकास होईल, आणि शेतीच्या विकासातूनच देशाचा विकास होईल, असे त्यांचे मत होते. 'आज कर्जात जन्माला येणा सरळव्याजात वाढणाऱ्या आणि चक्रवाढव्याजात मरणाऱ्या भारतीय शेतकऱ्याला दारिद्र्याच्या खाईतून अन् मदिंरेच्या फासातून वाचवले पाहिजे'. कारण त्याशिवाय देशच सुखी होणार नाही.


या दृष्टीने आज शासनही शेती उत्पादन वाढविण्याचा व शेतकऱ्यांना सुखी-समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञानासाठी धरणे, कालवे, जलसिंचन, करून जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणणे, त्यासाठी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही मोहिम राबवित आहे. 


शेतकऱ्यांना सुधारित बी-बीयाणे खते, ट्रॅक्टर यांसाठी कर्जे बँकांमार्फत मिळण्यासाठी सोय शासन करीत आहे. म्हणजे सावकारांच्या जीवघेण्या संकटापासून शेतकऱ्यांची सुटका होईल. तो सुखी होईल व पर्यायाने देश समृद्ध होईल.


“जुने जाऊ द्या मरणालागुनि

जाळूनी किंवा पुरूनि टाका ।”


हे लक्षात घेऊन आज शेतकऱ्यांनी नवीन तंत्र स्विकारावे. शेतीकडे व्यवसाय या दृष्टीने पाहून वर्षातून चार वेळा जलसिंचन सुविधांचा वापर करून 'नगदी पिके' घ्यावी. शेती बरोबरच पशुपालन कुटीरोद्योग, मत्स्यशेती यांच्याशी मैत्री करून दुष्काळातील पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा. सण सामुहिकरित्या साजरे केले तर 'रीन काढून सण' साजरे होणार नाहीत.


अशा भक्कम नियोजनाने अन्नधान्याबाबत आपला देश स्वावलंबी होईल. त्यामुळे शेतकरी सुखी त्याबरोबर देशही समृद्ध बनेल. आयात निर्यातीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर समृद्ध असे राष्ट्र बनेल आणि सानेगुरूजींच्या या आकांक्षांची पूर्तता होईल.


“बलसागर भारत होवो

विश्वात शोभूनि राहो।”



मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद