तरूण पिढीची नैतिकता निबंध मराठी | tarun pidhichi naitikata nibandh marathi

 तरूण पिढीची नैतिकता निबंध मराठी | tarun pidhichi naitikata nibandh marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  तरूण पिढीची नैतिकता मराठी निबंध बघणार आहोत. तरूण पिढी म्हटली की, जोम, उत्साह खळाळते चैतन्य, आनंद या सारख्या भावनांनी आकंठ भरून गेलेली तरूण मुले मुली डोळ्यासमोर उभी राहतात. हल्ली या तरूण पिढीच्या नावाने जगात सर्वत्र ओरड चालू असलेली दिसते. ती अशी की, तरूण पिढीचीं नैतिकता हरवत चालली आहे. 


त्यांच्यात कोणत्याही प्रकारची नीतिमत्ता राहीली नाही. म्हणूनच ती चुकीच्या मार्गान जातात. तरूण पिढीवर घेतला जाणारा हा आक्षेप काही अंशी खरा असला तरी सर्वच तरूण पिढी नीतिमत्ता सोडून वागते असे नव्हे! आधुनिक काळात निरनिराळ्या प्रसार माध्यमांचा गदारोळ सर्वत्र सुरू असल्याने त्याला ही तरूण पिढी बळी पडते. 


आपला फायदा मिळविण्याच्या दृष्टीकोनातून प्रसारमाध्यमे आपल्या कार्यक्रमांची रचना करतात. असे करत असताना सर्वसामान्य नीतिमत्तेचे कोणतेही नियम पाळत नाहीत. त्याचे दुष्परिणाम तरूण पिढीवर होतात.


प्रथम आपण नीतिमत्ता म्हणजे काय? याचा विचार करू. जगातील सर्व धर्मग्रंथांनी मनुष्याने कसे वागावे? याचे नियम घालून दिलेले आहेत. खरोखरच त्यानुसार वागल्यास मनुष्य सात्त्विक जीवन जगतं आनंदाने आयुष्य घालवू शकतो. पण आजकाल धर्म हा फक्त आपापसातील संघर्षापुरता उरला आहे. 


धर्मग्रंथाचे वाचन कोणी करत नाही. आजूबाजूच्या वातावरणाचा आदर्श मुलांसमोर असतो व मुलेही तसेच वागतात. नैतिकता ही फक्त थित्लरपणे न वागण्यात आहे असे नसून नैतिकचेचे स्वरूप फार व्यापक आहे. प्रामाणिकपणे वागणे, सगळीकडे शिस्त पाळणे, वेळेचे महत्व समजून घेणे, 


आपल्या कार्याप्रति निष्ठा ठेवणे, परस्परांना मदत करणे, वडील मंडळींचा आदर ठेवणे इ. गोष्टींचे पालन करणे म्हणजेच नैतिकता. आजची तरूण पिढी लवकर जाणती होते व त्यामुळे वडीलमंडळींची कोणतीही गोष्ट ती ऐकत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे त्यांना वाटत नाही. 


बालपणापासून फसविण्याची, अप्रमाणिकपणे वागण्याची सवय मुलांना लागते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थी दशेपासून भ्रष्टाचार करायला शिकतात. पैसा देवून पास होतात, कॉप्या करतात हे ही नैतिकता ढासळण्याचे उदाहरण आहे. अर्थात याला शैक्षणिक क्षेत्र जबाबदार आहे. 


आजच्या तरूण पिढीपुढे सर्वदूर आदर्श फायद्यासाठी केल्या जाणाऱ्या आचरणाचा आहे. त्याचे परिणाम तरूण पिढीवर झाल्याशिवाय राहत नाही. तरूण पिढी त्याचेच अनुकरण करते. शैक्षणिक क्षेत्रात आणि व्यावसायिक क्षेत्रात भ्रष्टाचार माजलेला असल्यामुळे प्रगतीच्या संधी तरूण पिढीला मिळत नाही म्हणून ती अनितीच्या मार्गाने जाते. तिला नैराश्याने ग्रासले असल्याचे चित्र आपणास दिसते.


या विवादास्पद प्रश्नाला आणखी एक बाजू आहे. ती बरीचशी आशादायक आहे. अनेक तरुण व तरुणी चांगल्या वागणूकीचे, नितीमत्तेचे पालन करतात. आपल्या ठरविलेल्या उद्दिष्टाप्रत जाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी नीतिच्या मार्गाने जातात. प्रसंगी नीतिने वागल्याबद्दल त्यांना नुकसान सोसावे लागले तरीही ते मागे हटत नाही. 


असे तरूण तरूणी पाहिल्यानंतर मानवी समाजाचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल असे वाटते. अलीकडे प्रत्येकालाच शांततेने कोणताही संघर्ष न करता मिळेल तितक्यात समाधान मानून जीवन जगावे वाटल्यामुळे बरीचशी मंडळी अध्यात्माकडे वळू लागली आहे. त्यामुळे निश्चितच तरूणांच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल अशी आशा आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद