आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

bhukamp grastache manogat nibandh | भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. मानवी जिवन हे संकटानी भरलेले असते त्‍यात कधी कोणते संकट येईल हे सांगता येत नसते या निबंधामध्‍ये अश्‍याच एका संकटाचा म्हणजे भुंकपाचा सामना केलेली व्‍यक्‍ती त्‍याचे मनोगत स्‍वरूपात त्‍यांनी अनुभवलेले भुंकपाचे संकट व्‍यक्‍त करते त्‍यावर त्‍यांनी कशी मात केली हे या 5 निंबधात सविस्‍तर सांगीतले आहे  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

bhukamp-grastache-manogat-nibandh
bhukamp-grastache-manogat-nibandh



निबंध 1 (450 शब्‍दात) 


एके दिवशी वर्गशिक्षिका वर्गात आल्या व म्हणाल्या, “आज आपण निबंध लिहायचा." मुलांनी “विषय कोणता, विषय कोणता," असा एकच कुजबुजाट केला. त्यातच त्‍यांनी  विषय जाहीर केला – भूकंप ! ' भूकंप' हा शब्द उच्चारताच माझ्या बाजूलाच बसलेला माझा मित्र स्वप्निल कावराबावरा झाला. माझ्या नजरेने हे तत्क्षणी हेरले. मधल्या सुट्टीत मी त्याला त्याबद्दल बोलते केले, तेव्हा तो व्याकूळ होऊन सर्व आठवणी सांगू लागला…


“भूकंप हा शब्द ऐकला तरी मला गलबलून येते. कारण मी स्वतः भूकंप अनुभवला आहे. भूकंप झालेल्या गावातूनच मी आलो आहे. आमचं गाव अगदी साधंसुधं खेडेगाव आहे. दिवसभर शेतात राबायचे, दोन वेळचं साधंसं जेवण घ्यायचं आणि रात्री गाढ झोपी जायचं, हाच गावाचा मुख्य दिनक्रम. एके दिवशी आम्ही असेच शांतपणे झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर अचानक जमीन थरथरली... फक्त काही सेकंदच ! आणि काही कळायच्या आत झाडे, घरेदारे धडाधड कोसळली... अनेक गुरेढोरे, माणसे सगळी घरांखाली गाडली गेली. 


काही मिनिटांनी सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. रडणे, ओरडणे, मदतीसाठी पुकारणारे  यांनी अवघा अवकाश व्यापून टाकला. ढिगारे उपसण्याचे असहाय प्रयत्न करण्यात, आपली माणसे शोधण्यात सकाळ उजाडली... आणि सर्वांसमोर उद्ध्वस्त वास्तव लख्ख प्रगटलं. प्रचंड मोठ्या नांगराने कोणीतरी जमीन नांगरावी, त्याप्रमाणे सगळी जमीन खणल्यासारखी दिसत होती.


सर्व घरे, वाडे उद्ध्वस्त झाले होते. मोठमोठी झाडेसुद्धा मुळापासून उपटून आडवी झाली होती. जी घरे माणसांना आजपर्यंत आश्रय देत होती, त्या घरांखालीच अनेकजण गाडले होते.  काही जणांचे हात तुटले होते; पाय तुटले होते. कित्येकजण जबर जखमी होऊन विव्हळत पडले होते. कित्येक मृतदेह इतस्ततः पसरले होते. प्रत्येक घरात मृत्यूने थैमान घातले होते. कुणी कुणाला सावरायचं? कुणी कुणाचे अश्रू पुसायचे?

" त्यानंतर झालेल्या हालांना तर पारावारच उरला नाही. भूक लागल्यावर खायला काहीच नव्हते. आमच्या वाडीवरची एकुलती एक विहीर उद्ध्वस्त झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचं संकटच उभं राहिलं.


औषधोपचाराविना अनेकजण तळमळत होते. आम्ही सर्वजण भुकेने व्याकूळ झालो होतो. रस्ते उखडलेले, झाडेझुडपे कोसळून पडलेली... त्यामुळे गावाबाहेरचे लोक आमच्यापर्यंत पोहोचायला संध्याकाळ उजाडली. तेव्हा कुठे आम्हांला खायला पहिला घास व पाण्याचा पहिला घोट मिळाला. हळूहळू सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. आम्हांला दूर मोकळ्या जागेत एकत्र केले. रडून रडून दमल्यावर आम्ही रात्री उघड्या माळरानावरच झोपी गेलो.


" नंतरच्या दिवसापासून मात्र दूरदूरचे अनेकजण आमच्यासाठी मदत घेऊन येऊ लागले. विविध वस्तू, कपडे, अन्नधान्ये यांची मदत सुरू झाली. तात्पुरते तंबू उभारून आमची राहण्याची सोय केली गेली. आम्हांला घरे बांधून देण्याच्या बातम्या येऊ लागल्या. बरीच मदत आली, हे खरे. पण मदतीतला मोठा वाटा गावातल्या मातब्बर लोकांनी व दांडगाई करणाऱ्यांनी बळकावला. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. काही गावकरी तर आजही उघड्यावर पडले आहेत.



“भूकंपाच्या आठवणी आल्या की, अजूनही माझं मन गलबलतं. माझी आई या भूकंपामुळे धरणीच्या कुशीत विसावली. माझा धाकटा भाऊ जबर जखमी होऊन काही दिवसांनी देवाघरी गेला. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझी बहीण, आजी आणि बाबा गावी कष्ट करून कसेबसे पोट भरत आहे. माझ्या मामाने मला इकडे बोलावून घेतले, म्हणून तर मी या शाळेत शिकायला येऊ शकलो आहे.

"नको रे बाबा ! त्या भूकंपाच्या आठवणी नकोत ! त्या आठवणींनी आजही माझ्या जीवाचा थरकाप होतोय."


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . खालील दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद



निबंध 2  (350 शब्‍दात) 


सारा गाव देवीच्या कुशीत विसावला होता. दिवसाभराची कामं झाली होती. जमिनीची, नोकरीची कामं; कुणाचं लग्न, कुणाचा वाढदिवस कुणाचं काय कुणाचं काय... भुकंप आला आणि... होत्याचे नव्हते झाले सूर्य उगवायचा होता; अंधारातच “धडाइ धूडम्” “गडगडगड" आवाज घुमले. घरे हालली; भांड्यांची भांडणे झाली, दरवाजांचे आवाज आले.....  अंधाराचा महासागर, गगनाला चिरणाऱ्या किंकाळ्या, उघडण्याआधीच कायमचे मिटलेले डोळे...  सूर्योदयापूर्वीच जीवनाचा  सूर्यास्त झाला. माझ्या सर्व नातेवाईकांबरोबर ४० हजार आयुष्ये गिळून हा भूकंप दैत्य शांत झाला.



जिवन हे चांगल्‍या प्रवासासमान असते पण उद्या काय होईल याबद्दल काही सांगता येत नसते .पाप वाढते तेव्हा धरणीकंप होतो असे म्‍हणतात मग  आम्ही काय पाप केलं होतं ? की आम्ही ४० हजारांनीच मिळून फक्त पाप केलं होतं ? मग आम्हाला ही शिक्षा का?


राहिलेल्या उजाड जीवनाचे मी करू काय ? आईवडील, बहीणभाऊ सारे गेले. दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली तुटलेल्या कमरेची माझी आई. फुटलेल्या डोक्याने आईला बिलगलेली बाहुलीसारखी बहीण, भींतीखाली दोन्ही पाय गमावुन निजलेले वडील, ढिगाऱ्यात हरवलेला भाऊ.... डोळ्यांसमोरून हलवा हे दृश्य.... नाहीतर मी वेडा होईन.


क्षणात गाव पुसलं गेलं. जगाला जाग आली. सहानुभूतीची लाट उसळली. संकटात सापडलेल्यांच्या मदतीला सरकार, स्वयंसेवी संस्था धावल्या. गावाला युद्ध छावणीचे रूप आले. अन्न, पाणी, दूध, वस्त्रे, औषधे, निवारे तंबू सर्व वाटले गेले. सर्वधर्मी प्रार्थना झाल्या. पुनर्वसनाची चक्रे फिरू लागली. माणुसकीचे दर्शन झाले.


हळूहळू सर्व ठीक होईल. लोक आपल्या विश्वात रमून जातील. हे सारं विसरूनही जातील. विस्मृतीच्या वरदानावरच माणसाचं जीवन सुसह्य होतं. परदुःख शीतल पण ज्याचं जळतं त्याचं काय ?... मदतीच्या खैरातीवर कां आयुष्य काढायचे ? -


उध्वस्त जपानकडून स्फूर्ति घ्यायला हवी. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारायचीय. जखमा विसरून कामाला लागायचे आहे.

"उष:काल होता होता काळरात्र झाली पुन्हा आता आयुष्याच्या पेटवा मशाली"


सारं सुरळीत होईल. पण एक नक्की, जेव्हा केव्हा ३० सप्टेंबर तारीख कलेंडरवर दिसेल तेव्हा मनात वादळं निर्माण होतील; आणि डोळ्यातुन अश्रुंच्‍या धारा वाहु लागतील. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3  

 भूकंपग्रस्ताचे मनोगत मित्रांनो, मी तुम्हाला एका वेगळ्या थरारक अशा अनुभवाची घटना सांगणार आहे. मी जो भूकंप अनुभवला त्याचे सविस्तर वृत्त मी तुम्हाला सांगणार आहे . 


काही क्षण थरथर थरथर जमिनीचे असे कंपन झाले. खडखड खडखड घरातील भांडे पडण्याचा आवाज आला आणि लगेच काही क्षणातच धडाम धूम, धाडधाड असा घरे पडण्याचा आवाज. पुढे अनेक आवाज. आई गऽऽऽऽ......मेलो रेऽऽऽऽ.....बाप रेऽऽऽ.....ओंऽऽऽ.... वाचवाऽऽऽऽ..असे अनेक आवाज व त्यात मिसळला जात होता तो रडण्याचा आवाज आणि विव्हळण्याचा आवाज. काय झाले हे समजण्याच्या आधीच एका सुंदर अशा वस्तीचे; विटा,दगड,माती मध्ये रुपांतर झाले होते. भूकंपाने संपूर्ण गाव उध्वस्त करुन टाकले होते. रस्ते कोणते व घरे कोणती यातील फरक समजत नव्हता. अगदी पक्की घर सुध्दा वाचली नव्हती.


काही कळायच्या आत काळाने त्यांच्यावर झडप घातली. काही जनावरे सुध्दा मृत्युमुखी पडली. जे वाचले ते क्षणभर अवाक होऊन नुसते बघत राहिले. परिवारातील सदस्य ढिगाऱ्याखाली दडले हे समजताच काय करावे त्यांना सुचेनासे झाले होते.



 भानावर येताच त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली. त्यांचा शोध घेण्यासाठी ढिगारा उपसण्याचे प्रयत्न ते करु लागले. ढिगारा उपसणे तेवढे सोपे नव्हते. काय करावे? मदतीला कुणाला बोलवावे? प्रत्येकाचा चेहरा रडवेला,हताश, घाबरलेला दिसत होता. कुणाची अगदी वेड्यासारखी स्थिती. “अरे देवा, हे काय केलस?' वर पाहून कुणा एकाचा प्रश्न. तर “लय पाप वाढलं होतं आपल्या गावात म्हणून असं घडलं' असा दुसऱ्याचा उदास स्वर.


 "गावातील पाप्यांना हाकलून दिलं असतं तर असा प्रसंग आला नसता”असा तिसऱ्याचा सूर. अशा प्रकारे विविध क्रिया, प्रतिक्रिया, आश्चर्य, दुःख, वेदना, हताशपणा, गोंधळ सुरु झाला होता. भूकंपाची ही बातमी प्रशासनापर्यंत पोहोचली. प्रशासनाच्या गाड्या पोहोचल्या. वृत्तपत्रे व विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी,पत्रकार पोहोचले. काही वेळाने मदतीसाठी सेना जवान पोहोचले. मदत कार्य सुरु झाले परंतु निसर्गाचा राग शांत झाला नव्हता. त्याने मदतीत अडथळा निर्माण केला. 


पावसाला सुरुवात झाली. पहिल्यांदा धरतीने झिडकारले नंतर पावसाने झोडपायला सुरुवात केली. धो धो पाऊस पडू लागला. पावसाच्या धारा व वाचलेल्या व्यक्तींच्या डोळ्यातील धारा थांबता थांबेनात. तर मदत कार्याला जसा विलंब होत जात होता. तसा लोकांचा धीर खचत होता. ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत सापडण्याची आशा मावळत गेली.पाऊस थांबला. मदत कार्य सुरु झाले. अंधार पडू लागला होता. 


वीज गेली होती. परंतु तरीही बत्तीच्या उजेडात जवान एक एक प्रेत बाहेर काढू लागले. वातावरण भेसूर दिसत होते. मृतदेह बाहेर काढताच आप्त स्वकीयांचा हंबरडा फुटायचा. वातावरणाचा भेसूरपणा आणखीनच वाढायचा. कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, कुणाची बहिण. काही घरातील पूर्ण सदस्य मृत्युमुखी पडले होते.


 काही लोक जखमी झाले होते. कुणाचा हात निकामी तर कुणाचे पाय निकामी झाले होते. अधून मधुन विजांचा कडकडाट तर जखमींचा उपचाराकरिता तडफडाट होत होता. जखमींचा उपचार करावा की मृतकांचा अंत्यसंस्कार ह्या पेचात आप्त स्वकीय पडले होते. पाहणाऱ्यांचे हृदय फाटावे असे विदारक चित्र निर्माण झाले होते. “संकटे कधी एकटी येत नाहीत” ह्या वचनाचा प्रत्यक्ष अनुभव आला होता.



शासनाने पुनर्वसनाचे आश्वासन दिले. परंतू मला प्रश्न पडला की, शासन कोणाचे पुनर्वसन करणार ? घरांचे की कुटूंबांचे ? भुकंपात कुटूंबची-कुटूंब गाडली गेली. घराला घरपण येतं ते परिवारामुळे. घरात रहायला परिवारच नाही तर घर कुणासाठी?. 


मित्रांनो, कुणाला सरस तर कुणाला निरसा असा मदतीचा वाटा शासनाकडून मिळाला. जिवित हानी ही पैशांनी भरुन निघत नसते. निसर्गाने दिलेल्या या सजेमुळे हृदयावर झालेल्या जखमांवर काळाशिवाय कोणीही कुंकर घालु शकत नाही.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 4 


किल्लारी येथे प्रचंड भूकंप झाला अन् तेथील सारे समाजजीवनच उद्ध्वस्त होऊन गेले. पेपरमध्ये याच्या बातम्या रोज वाचत होतो. अन् अशातच एक दिवस एक तरूण आमच्या दाराशी आला. त्याने आपली  कहाणी सांगितली.


“सारे लोक पहाटेच्या साखरझोपेत होते अन् एकाएकी जमीन गदगदा हालू लागली. झोपलेल्या लोकांना काय झाले ते कळलेच नाही. अन् एकाएकी घरे, वाडे सारे जमीनदोस्त होऊ लागले. अर्धवट जागे झालेले लोक सैरावैरा धावू लागले. त्यांच्या अंगावर मातीचे ढीग पडू लागले. अनेक लोक मातीच्या ढिगाखाली गाडले गेले. कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. 


पाच मिनिटांत सगळे होत्याचे नव्हते झाले. लोक भानावर येईपर्यंत सारा गाव जमीनदोस्त झाला होता. वाडवडिलांपासूनचे चालत आलेले माझे घर कोसळून फक्त एक मोठा मातीचा ढीग उरला. घरातील भांडीकुंडी, चीजवस्तू सारे काही त्या मातीत गेले. माझा छोटासा मुलगा, माझी बायको कोणीच वाचू शकले नाहीत. मी एकटाच या जगात उरलो आहे.


 मी तरी कशाला वाचलो ? आता माझा व्यवसाय, आजूबाजूच्या लोकांची शेती सारे काही भूतकाळात जमा झाले आहे. दुसऱ्याच दिवशी मातीचे ढिगारे उपसून त्याखालून मृतांना बाहेर काढण्याचे कार्य चालू झाले. क्वचित एखाद्या ठिकाणी दैवाच्या बळावरच एखादी व्यक्ती जिवंत सापडली. एरवी मातीच्या ढिगाऱ्यांवर बसलेले खिन्न जीव, त्या ढिगाऱ्यातून काही चीजवस्तू मिळते का असे शोधणारे अभागी लोक असेच दृश्य सर्वत्र दिसत होते. असले भयानक दृश्य पाहून जीव गलबलून जात होता. झालेला सर्वनाश अतिशय भयाकारी होता.


एवढी वर्षे काडीकाडी जमवून उभारलेली घरटी उद्ध्वस्त होऊन गेली होती. मृत्यू आलेले लोक तरी सुटले म्हणावे, अशी परिस्थिती जिवंत असणाऱ्यांची होती. जिवंतपणी मरणयातना भोगण्याची पाळी लोकांवर आली होती. दुसऱ्या दिवशी सरकारी पाहाणी चालू झाली. गावात पाणी नव्हते, वीज नव्हती, खाद्यपदार्थ नव्हते. त्यामुळे मदतकार्य अत्यंत अपुरे पडत होते. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची हानी झाली होती, पशुपक्ष्यांचे हाल झाले होते. 



मंत्री लोक दौरा करून जात होते. भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करीत होते. पण प्रत्यक्ष आमच्या हातात त्यातील फार थोडी रक्कम पडली. बाकीची कुठे गडप झाली, तो एक परमेश्वरच जाणे! परंतु अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांनी मदतीचा हात पुढे केला. सर्वांना शाब्दिक आधार दिला. ठिकठिकाणच्या लोकांकडून मदतीचा ओघ चालू झाला. 


निराधार झालेल्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न चालू झाला. भूकंपाला तोंड देऊ शकतील अशी घरे बांधण्याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. आता माझे घरटे पुन: कधी उभारले जाते, ते पाहायचे. सध्या तरी मी बेकार झालो आहे. कामधंदा मिळेल या आशेने शहरात आलो आहे. मला कुठेतरी नोकरी मिळेल का हो?"

त्याचा तो कारुण्यपूर्ण स्वर माझे अंत:करण कापीत गेला. आणि मी अंतर्मुख होऊन विचार करू लागले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 5



स्वप्नांच्या कुशीत झोपी गेलेले लोक मृत्यूच्या मांडीवर निद्राधीन झाले होते.कायमचे विसावले होते.फक्त तीस सेकंद ‘भूकंप' ही तीनच अक्षरे ... आई ऽ ऽ ऽ वाचवा ऽ ऽ मेलोऽ ऽ असा आक्रोश, दगड, माती, विटा यात गाडले गेलेले लोक..... वेदना व दुःख यांचे थैमान ..... निसर्गाचे उग्र रूप..... मुलांनो, काय सांगू तुम्हाला ....आजही अंगावर काटा उभा राहतो....."


धुडूम...ऽ ऽ धडाड..... आवाजाने अचानक मी जागा झालो. समोरची भिंत कोसळली होती.सारे घर थरथरत होते.माझी लाडकी लेक शांती , तान्हुला किसना अन् माझी कारभारणी सखू , सारेच दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती.मी उधडला गेलो होतो.मनाचं वस्त्र चिंध्या चिंध्या होऊन समोर नाचत होतं.मी सुन्न झालो होतो. दगड-माती उकरत माझ्या जिवाभावाच्या पोटच्या गोळ्यांचा , बायकोचा शोध घेत होतो. डोळ्यातले अश्रू अनावर झाले होते.मनातलं क्रंदन संपता संपत नव्हतं.हाती काही लागत नव्हतं.


निसर्गाचं हे विनाशाचं तांडवनृत्य घेऊन आलेली ती काळरात्र दुसऱ्या दिवशी सकाळ झाली खरी, पण अजूनही निराशेचा दुःखाचा अंधार दाट पसरलेलाच होता. लातूर ,उस्मानाबाद , जिल्ह्यातील सास्तूर, पेठसांगवी इत्यादी ८३ गावांतील घरे धरतीने गिळली होती. अनेक कुटूंबे बेचिराख झाली होती. चिमुरडी मुले, स्त्रिया , माणसे यांच्या प्रेतांनी परिसर शोकाकुल झाला होता.अनेक बालके अनाथ झाली होती.एकेका घरातून पाच - सहा मृतदेह बाहेर काढले जात होते.बघणाऱ्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते. 


रेडिओ, वर्तमानपत्रे,टी व्ही.द्वारे बातम्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या.सहानुभूती व मदत घेऊन अनेक जण तेथे पोहोचले. भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू केले. पंतप्रधान , मुख्यमंत्री यांनी तेथे तात्काळ भेटी दिल्या. दुःखितांना मदतीची आश्वासने दिली, त्यांचे अश्रू पुसले.चाळीस हजारांपेक्षा आधिक लोक मृत्यूच्या विळख्यात सापडले गेले होते. २० ऑक्टोबर १९९१ मध्ये उत्तर काशीत झालेल्या भूकंपाची वेदना परत ताजी झाली होती.''



"माझा संसार संपला तरी इतर शेकडो निराश्रितांचे अश्रू पुसण्यासाठी मी पुढे सरसावलो. “हे विश्वचि माझे घर' समजून मी समाजकार्याची कास हाती घेतली . भूकंपग्रस्त लोकांचे पुनर्वसन झाले. भूकंपासंबंधी पूर्व अनुमान संभव करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञ पुढे आले. अशा नैसर्गिक संकटातही मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून सर्वच प्रयत्नशील आहेत.''


लातूर, किल्लारीच्या भूकंपानंतर २-३ वर्षानं अचानक भेटलेल्या भूकंपग्रस्ताचे हे हृदयातल्या दुःखद भावनांच काव्यमय शब्दरूप माझे काळीज चिरून गेले.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

bhukamp grastache manogat nibandh | भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. धन्‍यवाद या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्‍ये  एक भाजीव्रिकेत्‍या मुलाने स्‍वताचे मनोगत सांगीतले आहे . त्‍याची घरची परीस्‍थीती, ग्राहकांसोबत होणारी वागणुक व त्‍याचे स्‍वताच्‍या भविष्‍याविषयीचे निर्णय याबदृदल मनोगत स्‍वरूपात निबंध दिलेला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


bhaji-vikretyache-manogat-marathi-nibandh
bhaji-vikretyache-manogat-marathi-nibandh



रोज ठरावीक वेळी 'दादा, भाजी' अशी आरोळी कानावर येते. विनायक एक पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा आमच्या वसाहतीत रोज भाजीची गाडी घेऊन येतो. विनायकचे वागणे आदबशीर व नम्र असते. त्यामुळे तो सर्वांचा आवडता झाला आहे. एकदा या विनायकला मी बोलते केले. मुद्दाम त्याला संध्याकाळी बोलावून घेतले आणि त्याची माहिती विचारली.


"दादा, मी आठवी नापास आहे,' विनायक सांगत होता. "आठवी नापास झालो आणि शाळा सोडली, तेव्हाच माझा बाबा वारला आणि घरासाठी काम करण्याची गरज निर्माण झाली. पूर्वी हीच गाडी माझा बाबा फिरवत असे, तेव्हा गमतीने मी त्याच्याबरोबर फिरत असे, म्हणून या कामाची मला माहिती होती.


“भाजी आणण्यासाठी मला भल्यापहाटे मोठ्या मंडईत, घाऊक बाजारात जावे लागते. भाजी खरेदी झाली की माझी गाडी लावतो. काही गिहाईकांनी काही खास भाज्या आणायला सांगितलेल्या असतात. त्या मी अगदी आठवणीने आणतो आणि मग आमचा शहराकडे प्रवास सुरू होतो. मोठी मंडई तशी गावापासून खूप दूर आहे. त्यामुळे चालायचे खूप श्रम होतात. त्याच वेळी मन साशंकही असते. 'एवढी भाजी आज विकली जाईल ना?' कारण भाजी हा नाशिवंत माल आहे. पण बहुधा सगळा माल संपतो.



"या व्यवसायात खूप पायपीट करावी लागते. पण अनेक ग्राहकांशी माझे एवढे प्रेमाचे नाते निर्माण झाले आहे की, त्या पायपिटीचे मला काही वाटत नाही. कित्येक आजींना मी त्यांच्या घरात भाजी पोचवतो. मग त्या प्रेमाने मला चहापाणी देतात. संक्रांतीला आठवणीने तिळगूळ देणाऱ्या अनेक ताई-माई आहेत. कुणाकडे काही कार्य असले की, ते भाजीची भलीमोठी यादी देतात.


"काही त्रासदायक, कटकटी ग्राहकही भेटतात. पण मी कोणाशी वाद घालत नाही. त्यामुळे खटके उडत नाहीत. संध्याकाळचा वेळ मला मोकळा असतो. त्यावेळी मी वाचन करतो. रोजची वृत्तपत्रे वाचतो. साने गुरुजींची पुस्तके मला खूप आवडतात. माझे घर व्यवस्थित चालेल एवढे पैसे सध्या मला मिळतात. पण मी यात समाधानी नाही.


"एक छोटासा गाळा घेणार आहे. त्यामुळे दुपारनंतर मी तेथे भाजी विकू शकेन. पण काही झाले तरी मी माझी सकाळची फेरी सोडणार नाही; कारण त्यामुळे मला खूप स्नेहीसोबती मिळतात.'' विनायकच्या विचारांनी मला मनोमन आनंद झाला. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



मराठी 2 

bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध 


"खूप दिवस मनात इच्छा होती की कुणाशी तरी मन मोकळे करावे; पण तशी संधीच मिळत नव्हती. आज मिळाली आहे तर माझे मनोगत मी व्यक्त करतो. "मी एक भाजी विक्रेता आहे. आमचे वडील मळ्यात भाजीपाला पिकवीत आणि उरलेला वेळ विठ्ठलभक्तीत घालवीत. पुढे कुटुंब वाढले. 


थोड्याशा जमिनीवर कुटुंबाचे पोट भरेना. मग माझे आईवडील शहरात येऊन भाजी विकू लागले. मी आणि माझा भाऊ जवळच्याच शाळेत शिकायला जात असू. "दहावी पास झाल्यावर मी आईबाबांच्या कामातच लक्ष घातले. रस्त्याच्या बाजूला एक पत्र्याची शेड उभी केली. 


माझे दुकान सुरू झाले. पहाटे मी मोठ्या मार्केटमध्ये जाऊन ताजी भाजी खरेदी करीत असे. आता भाज्यांबरोबर मी ताजी फळेही दुकानात ठेवू लागलो. उत्तम माल, अचूक माप आणि उत्कृष्ट वागणूक म्हणून माझे 'आनंद भाजी-फूटस् मार्ट' सदैव गजबजलेले असे. 


अनेक ग्राहक महिलांनी विनंती केल्यामुळे आम्ही आता दुकानात भिजवलेली कडधान्येही ठेवू लागलो. हिरवीगार भाजी, ताजी फळे व चवदार कडधान्ये माझ्या दुकानात विक्रीला असतात.


"त्याच वेळी एक दुर्दैवी घटना घडली. रस्ता रुंदीकरण आले आणि आमचे दुकान उडाले. मग मी एक गाडी घेतली आणि फिरता भाजी-विक्रेता झालो. कष्ट वाढले तरीपण भाजीचा खप होत होता. तेवढ्यात आणखी एक नवे संकट कोसळले. नव्या शहरात नवे नवे 'मॉल' उभे राहिले आणि तेथे शेतावरची ताजी भाजी स्वस्तात मिळू लागली.


मॉलमध्ये जाऊन भाजी खरेदी करण्याची रीत आली आणि आमचा धंदा बसला. आता कोणाकडे तक्रार करायची? भविष्यात मी भाजी-विक्रेता राहणार का? याचीच मला चिंता लागून राहिली आहे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

[शब्दार्थ : चवदार - tasty. स्वादिष्ट. स्वादिष्ट। कडधान्ये - pulses. ठीण. दालें। खप - sale. वेया. खपत, बिक्री। रीत-custom. पद्धति, रीत. तरीका।]


bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध

padkya killyache atmavrutta marathi nibandh | पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त / मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.या निबंधामध्‍ये एके काळी शत्रुंशी झुंज देवुन विजयत्री खेचुन आणणारा तो गड त्‍यांची झालेली दुरावस्‍था तो मनोगत म्‍हणुन तेथे आलेल्‍या वाटेकरूंना सांगत आहे. याविषयी सवीस्‍तर लेखन बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


बाळांनो, तुम्ही आज सहज सहल म्हणून इथे आलात तरी मला कित्ती आनंद झालाय म्हणून सांगू ! पण, काय देऊन मी तुमचं स्वागत करू ? काय दाखवू?



" अवघे झाले जीर्ण शीर्ण अन् सुन्न झाल्या दिशा खूप सोसले आता झाली मूक माझी भाषा......" हे माझे ढासळलेले बुरूज, ह्या पडक्या भिंती, जमीनदोस्त झालेले महाल आणि कोठया. हे पाहून तुम्हाला 'मी' समजणारच नाही रे !

३५० वर्षे तरी झाली असतील माझ्या वयाला ! मोगल साम्राज्य हिंदु राष्ट्रावर आक्रमण करायला शिवशिवत असतानाच तेजस्वी सूर्य श्रीशिवाजी महाराजांनी गणाजी बंडोला आज्ञा केली माझ्या उभारणीची ! साताऱ्याच्या पूर्वेकडून शत्रूच्या फौजा रोखण्यासाठी ह्या डोंगरावर माझी नेमणूक झाली. महाराजांचा शब्द ! तो झेलला गणाजी बंडो आणि बंदेअलीनं. जिवाचं रान करून चार महिन्यांत मला बाळसं आणलं.


बंदेअलीनं माझी अंतर्गत रचना केली. पूर्वेला नगारखाना, आत मध्यभागी खलबतखाना, बाजूला दरबार मंडपी, कोपऱ्यात मुदपाकखाना, उत्तर-दक्षिणेला टेहळणी बुरूज, जनानी, मर्दानी महाल, अश्वपागा, मावळ्यांसाठी छोटी घरं, पाण्याचं तळं अन् सहज न दिसणारं दारूगोळ्याचं कोठार ! उभारणीचा इतिवृत्तान्त सादर होताच महाराज प्रसन्न झाले. गणाजी बंडो आणि बंदेअलीला सोन्याची भेट महाराजांनी दिली...! आदिलशहा नित्य कुरापती काढतच होता.

padkya-killyache-atmavrutta-marathi-nibandh
padkya-killyache-atmavrutta-marathi-nibandh




म्हसवडवरून त्याच्या फौजांचा तळ उठला अन् सूर्यास्ताला गडाच्‍या क्षेत्रात आला. ५०० ची कुमक माझ्या पोटात होती. दत्ताजी सुभेदार, माझा किलेदार, यानं इशारा केला आणि माझ्या बुरुजावरून प्रथमच तोफांचे गोळे शत्रुसैन्यावर आग ओतू लागले. पहिल्यावहिल्या लढाईनं माझ्या अंगात थरार भरला... वीरश्रीचा ! या अचानक हल्यानं शत्रुची पळापळ झालेली मी नेत्रांनी पाहिली. पश्चिमेकडे निघालेले ते वाघ शेळी होऊन पूर्वेला पसार झाले. माझं काम मी चोख बजावलं !...आणि मग किती लढाया, किती संग्राम केले, गणतीच नाही.



ती वीरश्री, तो 'हर हर महादेव 'चा घोष... ' दीन दीन' करत झालेली शत्रची दीनवाणी अवस्था...कधी मलाही जखमा झाल्या, पण एका प्रसंगानं साऱ्या भरून निघाल्या...घडलं ते असं... कर्नाटक विजय मिळवून महाराज परतत होते. गोंदावल्यापाशी अंधारून आले. सैन्य थकलेले, महाराज माझ्यापाशी मुक्कामाला आले. त्यांचा पदस्पर्श झाला...आणि अंगावर रोमांच आला...मनाच्या गाभाऱ्यात शेकडो घंटा निनादल्या.



उभ्या आयुष्यात महाराज एकच रात्र माझ्यापाशी होते. पण कित्येक शतके पुरेल असं चैतन्य मला देऊन गेले. म्हणूनच आजवर मी आहे. जखमाही भरल्या. अल्प मुक्कामातही महाराजांनी मारुती मंदिर स्थापण्याची सूचना दत्ताजीला केली. मावळतीला ते आजही आहे. तो काळ गेला...महाराज गेले....मराठे, पेशवे बुडाले...जग पुढे धावले. माणसाने आकाश हाती घेतले...आणि...आणि माझी गरजच संपली. डोक्यावरून हल्ले झाले तिथे मी कसा लढणार ? मी दुर्लक्षिला गेलो. जवळची माणसे निघून गेली...सुसाट वारा, ऊन, पाऊस खात एकाकी मी ढासळू लागलो. मनानं तर मी महाराज गेले तेव्हाच खचलो, आता शरीरानेही...


आता कोणी तुमच्यासारखे येतात तेव्हा मनावरची धूळ उडते. तुम्हीही थोडे भूतकाळात जाता. 'अरेरे!... जतन केलं पाहिजे' म्हणता...निघून जाऊन कामात गुंतता. माझ्या आवारामध्ये मात्र सुसाट वारा घोंघावत राहतो आणि रातकिडे किरकिरत राहतात...

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व जिर्ण झालेल्‍या गडकिल्यांचे वैभव पुन्‍हा प्राप्‍त करण्‍यासाठी काय केले पाहीजे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

padkya killyache atmavrutta marathi nibandh | पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त मराठी निबंध

Essay on parrot in marathi | पोपट मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पोपट मराठी निबंध  बघणार आहोत. मानव प्राणी हा नेहमी आंनदाच्‍या शोधात असतो. त्‍यासाठी तो वेगवेगळे छंद जोपासतो. आपल्‍या आवडीच्‍या ठिकाणी फिरायला जातो. त्‍याला मनपसंत असलेले खाद्य पदार्थ खातो. पण मानवाचा सर्वात मोठा आनंद हा स्‍वतंत्र होण्‍यात आहे. त्‍यासाठी तो प्रंसगी युध्‍दही करतो. पंरतु इतर प्राण्‍यांच्‍या स्‍वतंत्रतेविषयी विचारही करत नाही. जसे उदाहरण द्यायचे झाल्‍यास पोपटाचे देता येईल. निबंधातील पोपटाने स्‍वता त्‍यांचे मनोगत स्‍पष्‍ट केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


मी पिंजऱ्यातला पोपट. आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. तुम्ही माणसे तुमच्या आनंदासाठी आम्हांला पकडता, घरी आणता आणि पिंजऱ्यात ठेवता. पण आम्हांला काय वाटत असेल, याचा विचार तुम्ही माणसे करत नाहीत. हेच बघा ना! या घरात आज अनेक वर्षे मला पिंजऱ्यात ठेवलेले आहे. ही घरातील माणसे माझ्यावर खूप प्रेम करतात. मला आवडणारे पदार्थ खायला देतात. माझ्यासाठी खास पेरू आणतात. माझे नेहमी कौतुक करतात. येणाऱ्या पाहुण्यांपुढे माझे प्रदर्शन करतात. मला नवे नवे शब्द बोलायला शिकवतात. पण मला खरोखरीच काय हवे आहे, ते हे लोक समजून घेत नाहीत.

Essay on parrot in marathi
Essay on parrot in marathi 

मला स्वातंत्र्य हवे आहे. अगदी सोन्याचा पिंजरा असला, तरी तो मला नकोसा वाटतो. मला रानात मुक्तपणे विहार करायचा आहे. माझ्या भाऊबंदांबरोबर मला मोकळ्या आकाशात उडायचे आहे. मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, तुम्ही माणसे स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी झगडता, युद्धही करता; मग आमचे स्वातंत्र्य मात्र कसे हिरावून घेता?

मला आता या पिंजऱ्यातून मुक्त करा. मी तुम्हांला रोज भेटायला येईन.

मित्रांनो तुम्‍हाला पोपट मराठी निबंध  हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.
व खालील निबंंध नं 2 पण वाचु शकता धन्‍यवाद .

निबंध 2 

एके दिवशी गंमतच झाली. पिंजऱ्यातील पोपट बाहेर आला आणि आम्ही त्याला शिकवलेल्या शब्दांपेक्षा वेगळेच काही बोलू लागला. तेव्हा आम्हा सर्वांना नवल वाटले आणि घरातली सारी माणसे त्याच्याभोवती जमली. पोपट सांगत होता, "हल्ली तुम्ही माझ्या पिंजऱ्याचे दार उघडे ठेवता. पण मी पिंजऱ्याबाहेर सहसा येत नाही. कारण वर्षानुवर्षे या पिंजऱ्यात राहिल्याने मला आता पिंजरा हेच आपले घर वाटू लागले आहे. बाहेरच्या जगाचे मला थोडेही आकर्षण राहिले नाही.

तुमच्याकडे येण्यापूर्वी मी माझ्या आईवडलांसह रानात मोकळे जीवन जगत होतो, त्यावेळी मी अगदी लहान होतो. 'कसे उडायचे' हेही मला अवगत नव्हते. आईवडील माझ्यासाठी खाऊ आणायला गेल्यावर मी झाडाच्या ढोलीत त्यांची वाट पाहत राहत असे.


याच प्रचंड झाडाच्या ढोलीमध्ये इतर पोपटांची वस्ती होती. त्यामुळे त्यांच्या छोट्यांबरोबर खेळण्यात, उडण्याचा सराव करण्यात माझा वेळ किती छान जात असे! अचानक तो घातवार उजाडला. एका पक्षिविक्याने मला पकडले. त्याच्याकडून मी तुमच्या घरी आलो. तुम्ही पहिल्या दिवसापासून माझे कौतुक करत आहात. मला खाऊपिउ घालत आहात. लाडाने माझ्याशी बोलत आहात. तेव्हा तुमच्या व जगाच्या दृष्टीने मी येथे सुखी आहे. पण खरे पाहता, मी सुखी नाही. कारण माझे स्वातंत्र्य मी कायमचे गमावले आहे. आकाशात मी केव्हाच उंच भरारी मारली नाही. आता तुम्ही मला मुक्त केलेत, तरी स्वतंत्र जगात मी जगूच शकणार नाही. आता माझे एकच सांगणे आहे की, माझ्या मृत्यूनंतर हा पिंजरा फेकून दया. दुसऱ्या कोणालाही कदापिही गुलाम करू नका.

मित्रांनो तुम्‍हाला पोपट मराठी निबंध  हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .

Essay on parrot in marathi | पोपट मराठी निबंध

 नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi

 नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi:  मुंबईहून पुण्याकडे परतत होतो. पुणे जवळ आल्याच्या खुणा दिसत होत्या. आता आपल्या आवडत्या नदीचे आपल्याला दर्शन घडणार असे वाटू लागले. नदीजवळील परिसरातून आम्ही जात होतो; पण नदी दिसत नव्हती. एवढी मोठी नदी हरवली होती, अगदी चक्क गायब झाली होती.कारण त्या नदीच्या संपूर्ण पृष्ठभागावर ‘पाणवनस्पती' उगवली होती. अनेकदा या वनस्पतीविषयी मी वर्तमानपत्रात वाचले होते, पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरत असेल अशी कल्पना नव्हती. नदीला काय वाटत असेल बरं! नदी बोलू लागली तर...



...तर ती नक्कीच मानवाला दोष देईल. या नदीने माणसाला काय दिले नाही? कुठल्यातरी डोंगरकपारीतून ती वाहत येते ती कशासाठी? आपल्या मानवपुत्रांना जीवन देण्यासाठीच ना! 


nadi bolu lagli tar essay in marathi
nadi bolu lagli tar essay in marathi



ती जीवन देते आणि माणसाचे जीवन फुलते. मानवी संस्कृतीचा इतिहास काय सांगतो? पूर्वीच्या काळी नदीच्या काठीच तर गावे वसत होती, मानवी संस्कृतीचा विकास होत होता. म्हणून तर प्राचीन काळापासून नदयांना 'लोकमाता' म्हणून संबोधिले जाते. या नदया आपल्या काटांवर सुपीक माती, गाळ टाकून शेतीसाठी उत्कृष्ट भूमी निर्माण करतात. या सरितेमुळेच माणसाची तहान भागते, शेते पिकतात, द्राक्षांच्या बागा फुलतात. आपल्याजवळ जे जे आहे ते दुसऱ्याला देत जा, हाच संदेश सांगत ही आपला सतत मार्गक्रमण करीत असते. 



वर्षाऋतूकडून मिळालेल्या जलाचा लोढा घेऊन येणाऱ्या या तटिनीला माणसाने अडविले, मोठमोठ्या भिती बांधून तिचा प्रवाह थांबविला, तरीही ही सरिता रागावली नाही. तिने माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. त्यांच्यासाठी तिने कड्यावरून उड्या घेतल्या, बोगदयातील काळोखातून ती धावली. तिच्या पाण्यावर माणसाने वीज निर्माण केली. त्यामुळे त्याचे घर प्रकाशाने उजळून निघाले, कारखान्यातील यंत्रे फिरू लागली. माणसांचे जीवन अधिक संपन्न, समृद्ध झाले. नदी आपल्या पाण्यातील मासे देऊन माणसाच्या जेवणाची लज्जतही वाढवीत होती.


आम्ही माणसे मात्र हे सारे विसरलो. मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहणाऱ्या मुलांना विचारले, “तुम्हांला पाणी कोठून मिळते?" तर ती सांगतात, “नळांतून.” अशा त-हेने आपल्याच कामात सदा गुंतलेल्या माणसाला या लोकमातेची आता आठवणही राहिलेली नाही. आपल्या गावातील सारी घाण आणून तो नदीत सोडतो, मोठमोठे कारखानदार आपल्या कारखान्यांतील दूषित पाणी नदीत आणून सोडतात. साखरेच्या कारखान्याची मळी पाण्यात सोडली जाते. अशावेळी नदीला केवढे दुःख होत असेल! तिला बोलता येत नाही. अगदीच भावना अनावर झाल्या तर ती बेफाम होते आणि मग गावेच्या गावे उद्ध्वस्त करीत जाते.


या नदीला बोलता आले तर ती प्रथम या द्वाड माणसाचे कान पकडून म्हणेल, "अरे उद्दामांनो, तुम्हांला काही अक्कल आहे का? तुम्ही माझ्या पाण्यावरून भांडणे करता. राज्याराज्यात माझ्या पाण्यावरून आज भांडणे पेटली आहेत. आता भारत आणि बांगलादेशातही पाण्याचा वाद सुरू झाला आहे. माझे पाणी म्हणजे तुम्हा सर्वांचे जीवन. ते भरभरून घ्या आणि हसत हसत जगा; आणि हो, जरा माझी स्वच्छताही ठेवा. अरे बाळांनो, माझ्याकडे पाण्याचा साठा उदंड आहे. ते कोणालाच कमी पडणार नाही. यास्तव तुम्ही भांडणे थांबवा व सुखाने जगा."
वरील निबंध नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

नदी बोलू लागली तर मराठी निबंध | nadi bolu lagli tar essay in marathi

झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi


झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi : एकदा काय गंमत झाली, आमच्या अकरा मजली उत्तुंग ‘गिरनार'जवळची झोपडपट्टी बोलू लागली. अहो, अगदी चक्क एखादया फडा वक्त्यासारखी ती आपले विचार मांडू लागली. वेळ होती रात्रीची. 'गिरनार' अगदी शांत झोपला होता-मऊ, मऊ फोमच्या गादयांत गोड गुलाबी स्वप्ने पाहत. त्याला कशाचा पत्ताच नव्हता. 


'गिरनारची' श्रीमंत शेजारीण 'उषाकिरण'सुद्धा अगदी रम्य, तरल स्वप्नात गुंग होती. जागी होती फक्त त्या दोन उंच इमारतींमधील झोपडपट्टी आणि जागा होता समोरचा अथांग निळा सागर. तो सुद्धा आपला नेहमीचा खळखळाट थांबवून शांतपणे त्या झोपडपट्टीचे गा-हाणे ऐकत होता. कारण कधी नव्हे ती झोपडपट्टी बोलत होती.
तिचा स्वर अगदी धीरगंभीर होता. तिच्या वयाचा विचार केला तर ती जरा अधिकच पोक्त वाटत होती. नाहीतरी संकटे कोसळली की अनुभवाने सर्वांनाच अकाली प्रौढत्व येते.


zopadpatti bolu lagte tevha essay in marathi
 zopadpatti bolu lagte tevha essay in marathi


 या झोपडपट्टीचे तसेच झाले होते. बरेच दिवस मनात साचलेली 'दु:खे' तिला आता कुणाला तरी सांगायची होती. तिने गिरनारला हाका मारल्या तेव्हा उषाकिरण जागी झाली आणि नवलाईने ऐकू लागली. “अरे गिरनार, तू आणि तुझी मैत्रीण उषाकिरण, माझ्याकडे तिरस्काराने बघता. माझ्या ओंगळ रूपामुळे तुमचे सौंदर्य डागाळते असे तुम्हांला वाटते. पण, तुमचा हा उलटा न्यायच नाही का? अरे सांगा, या जागेवर आधी कोण होते, तुम्ही की मी? माझीच जागा बळकावून तुम्ही मला दूर करू पाहता.


 कोठे जातील ही गरीब माणसे आणि त्यांची कच्चीबच्ची? तुमच्या मोठमोठ्या फ्लॅट्समध्ये जेवढी माणसे राहतात त्याच्या दसपट माणसे एका एका झोपडीत राहतात. रात्री झोपताना पाहावे तर एकाच्या अंगावर दुसऱ्याचे पाय ; तुमच्याकडे मात्र प्रत्येकाला स्वतंत्र खोली. तुम्ही माणसे आणि तीही माणसेच ना! मग हा फरक का? तुमच्याजवळ जे अवयव आहेत, तेच त्यांच्याजवळ. शक्तिसामर्थ्याबद्दल बोलायचे झाले तर कदाचित ती माणसे तुमच्यापेक्षा वरचढ ठरतील! मग हा भेदभाव का? पुरेसे अन्न नाही, चांगले कपडे नाहीत. चैनीच्या गोष्टी नाहीत. कारण त्यांच्याजवळ दामाजीपंतांचा अभाव आहे. तुम्ही मात्र स्वतःच्या गरजेपेक्षा अवास्तव पैसा बळकावून बसला आहात.



तुम्हांला माझे रूप ओंगळ वाटते. पण याला जबाबदार कोण? येथे राहणाऱ्या हजारो माणसांना का स्वच्छ जीवन आवडणार नाही! पण साधे पाणी तरी त्यांना पुरेसे मिळते का? तुला आठवते ती पु. लं. ची 'फुलराणी' रंगमंचावर काय सांगत होती? 'म्युनिसिपालटीचा मोठा नळ फुटतो तेव्हा आमची आंघोळ.' एवढ्या लहानशा जागेत हा माणसे आपले सर्व विधी उरकतात. मग घाण नाही का होणार?



 त्यांची दुःखं तरी किती अगणित. त्यामुळे ते मदयाला जवळ करतात. तर तुम्ही त्यांना त्यासाठी बोल लावता. पण तुमचे फ्रीज-कपाटांचे चोरकप्पे उघडा. तेथे काय आढळते? परक्या देशातील चोरट्या वाटेने आलेल्या मदयाच्या बाटल्या. तुमचे जीवन सुखी व्हावे यासाठी ही माणसे राबतात. या माणसांच्या श्रमांवरच तुम्ही तुमचे सुखी जीवन उभारलेले असते. पण त्यांचे जीवन साधारण सुसहय व्हावे एवढेही तुम्ही पाहत नाहीत. उलट आम्ही म्हणजे या झोपडपट्ट्या आणि त्यांतील माणसे यांचे खरेखोटे जीवन तुम्ही तुमच्या साहित्यात रंगवता आणि मानवतेचा पुळका आल्याचे भासवून पडदयावरही त्याचे अवास्तव चित्रण करता. पण एक लक्षात ठेवा,


 अनंत काणेकरांनी सांगितलंय त्याप्रमाणे ‘याच माणसांजवळ मोठं मन आहे, माणुसकी आहे.' झोपडपट्टी गप्प झाली, ती थकली होती; पण आता तिला हलके वाटत होते. 'गिरनार' शांत होता. सागर मात्र खवळला होता. वरील निबंध झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक  मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध | zopadpatti bolu lagte tevha essay in marathi