होमी भाभा मराठी निबंध | doctor homi bhabha marathi nibandh


निबंध 1 ( 550 शब्दात )


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण होमी भाभा  मराठी निबंध बघणार आहोत. स्‍वतंत्र भारताला परमाणु विज्ञान क्षेत्रात महत्‍वाचे स्‍थान मिळवुन देण्‍याचा गौरव डॉ. होमी भाभा यांनी केला जोपर्यत गरीब राष्‍ट्राला अनुविज्ञान वापरनार नाहीत तोपर्यंत ते आर्थीक व औद्योगीक प्रगती करू शकणार नाहीत त्‍यांच्‍या जन्‍मापासुन भारताला अनुउर्जा प्रदान करण्‍यापर्यतचा प्रवास या निबंधामध्‍ये सविस्‍तर पणे स्‍पष्‍ट केला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला . 

doctor-homi-bhabha-marathi-nibandh
doctor-homi-bhabha-marathi-nibandh



मुंबईमधील एका पारसी कुटुंबात ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये डॉ. होमी भाभा यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा म्हैसूर राज्यात दिवाण होते. त्यांचे वडील टाटा उद्योग समुहात वरीष्ठ अधिकारी होते. होमी भाभांना लहानपणापासून शास्त्रीय संगीताची आवड होती. ते लहान असताना जेव्हा रडत असत, तेव्हा त्यांचे माता-पिता त्यांना शास्त्रीय संगीत ऐकवत असत. ते संगीत ऐकताच ते आपले रडणे थांबवीत असत. चित्रकला हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांनी त्यांच्या आईचे चित्र काढून त्यांना भेट देऊन चकित केले होते.



डॉ. भाभा जॉन कॉर्नन इंग्लिश स्कूलमध्ये शिकले. अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून जैं वाचण्यासाठी देत. ती पुस्तके वाचून ते प्रयोग करीत असत. ते अत्यंत जिज्ञासू वृत्तीचे असल्याने प्रयोग करण्यात रममाण होत.

डॉ. भाभा इंटरच्या वर्गात शिकत होते. तेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. एच्. कॉम्प्टन मुंबईत येणार होते. त्यांच्या भाषणाचा लाभ डॉ. भाभा यांना झाला. त्यांनी अॅटॉमिक शास्त्रज्ञ होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय भविष्यकाळात योग्य ठरला.


गणित हा डॉ. भाभांचा आवडता विषय. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा इंजिनियर व्हावा, म्हणून वडिलांनी त्यांना वयाच्या सतराव्या वर्षी इंग्लंडमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात पाठविले. तेथे गेल्यावर डॉ. भाभांनी एकाच वेळी महत्त्वाच्या पाच विषयांची परीक्षा दिली व त्यात उत्तम यश संपादन केले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. त्यासाठी त्यांचा पदार्थविज्ञान हा विषय होता. त्यांना न्यूटन शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी पदार्थ विज्ञान या विषयात संशोधन केले.



वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांना फेलोशिप मिळाली. त्याच वेळी भारतात आण्विक सायन्सची ओळख झाली होती. पण प्रयोग करून पाहिल्याशिवाय हा विषय समजणे कठीण असल्याने भाभांनी 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फन्डामेंटल रिसर्च संस्थे'ची मुंबई येथे स्थापना केली. डॉ. भाभा भौतिकशास्त्र विषय शिकवत. १९४२ ते १९४५ या काळात ते इंग्लंडमध्ये 'कॉस्मिक रे रिसर्च इन्स्टिट्यूट', 'सायन्स इन्स्टिट्यूट' आणि काही प्रसिद्ध रिसर्च सेंटर्समध्ये काम करीत होते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा भारताला झाला.



डॉ. भाभांनी भारतातील संशोधन केंद्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला. अणुशक्तीचा विकास संहारासाठी नाही; तर देशाच्या प्रगतीसाठी झाला पाहिजे, असे त्यांचे विचार होते. त्यांनी अमेरिकेच्या साहाय्याने ऑगस्ट १९६२ मध्ये तारापूर येथे अणुशक्ती केंद्र स्थापन केले. त्यानंतर राजस्थानमधील प्रतापसागरमध्ये दुसरे प्रकल्पकेंद्र उभारले. तिसरा अणुप्रकल्प मद्रास येथील कल्पक्कम् येथे उभारला. १९५५ पर्यंत कोणीही अणुपासून विद्युत निर्मीती केलेली नव्हती. डॉ. भाभांजवळ दूरदृष्टी होती.



भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी डॉ. भाभांच्या कार्याची दखल घेतली व त्यांना भारत सरकारकडून आर्थिक सुविधा पुरवून प्रोत्साहन दिले. २६ ऑगस्ट १९४७ मध्ये भारत सरकारने डॉ. भाभांना 'अणुसंशोधन कौन्सिल'चे जनरल सेक्रेटरी हे पद बहाल केले. नंतर ते त्याचे अध्यक्ष झाले. त्यांनी आण्विक शक्ती संदर्भात भरीव कार्य केले.



४ ऑगस्ट १९५६ मध्ये पहिली भारतीय अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित झाली डॉ. भाभांचे अणुसंशोधनातील कार्य लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' देऊन त्यांचा गौरव केला. पटणा विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट मिळाली. हॉफकीन पुरस्कार, पद्मभूषण, मेधनाद साहा सुवर्णपदक, लखनौ, अहमदाबाद, केंब्रिज व अन्य विद्यापीठांकडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी त्यांना मिळाली. अणुशक्तीचा विकास देशाच्या शांततेसाठी व्हावा, यासाठी झटणाऱ्या या संशोधकाचा अपघाती मृत्यू झाला.


भारतीय विज्ञान जगाला अनुऊर्जा   देणारे यांनी शांततावादी वैज्ञानिकाप्रमाणे काम केले . चिन सारख्‍या देशांनी अनुबाॅम्‍ब बनविल्‍यावर भारताने पण अनुउर्जा संपन्‍न व्‍हावे असा  सल्‍ला त्‍यांनी दिला होता . आज वाळवंटातील जमीनीला अनुउर्जेव्‍दारे सुपीक बनविण्‍यात जे यश मिळाले आहे त्‍याचे श्रेय डॉ होमी भाभा यांनाच जाते . 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  धन्‍यवाद

निबंध  2 (400 शब्दात)


भारतीय अणुयुगाचे शिल्पकार म्हणून डॉ. होमी भाभा यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. भारतीय अणुसंशोधनाचा पाया डॉ. भाभांनी रचल्यामुळेच पुढे भारताला अणुवीजनिर्मिती, अणुबाँबस्फोट, अंतराळात उपग्रह उड्डाण हे सारे शक्य झाले, याचा आपल्याला कधीच विसर पडणार नाही.


डॉ. होमी भाभांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी एका सधन पारशी कुटुंबात झाला. अत्यंत तल्लख बुद्धीमुळे होमी वयाच्या १५ व्या वर्षी सिनियर केंब्रिजची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर केंब्रिज युनिव्हर्सिटीतून त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी डॉक्टरेट मिळविण्याचा विक्रम केला. त्यांनी अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळविल्या. त्यानंतर मात्र ते भारतात परत आले आणि बंगलोरला डॉ. रामन यांच्या संशोधन शाळेत त्यांनी आपले संशोधनकार्य चालू ठेवले. त्यानी विश्वकिरणाच्या अधिक सशोधनाला सुरुवात केली.


 १९४५ मध्ये 'टाटा मुलभूत संशोधन संस्थे'ची स्थापना झाली आणि डॉ.होमी भाभा या संस्थेचे संचालक झाले. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरूंनी अणुशक्तीचे महत्त्व ध्यानात घेऊन 'अणुशक्ती मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या अध्यक्षपदी अर्थातच डॉ. होमी भाभा होते. 'अणुशक्तीचा शांततामय विधायक कार्यासाठी वापर' हे या मंडळाचे उद्दिष्ट होते. अशा तव्हेने अणुविज्ञानाच्या दालनात भारताने पदार्पण केले.


१९५४ मध्ये तुर्भे येथे 'अणुशक्ती संशोधन केंद्रा'ची उभारणी झाली. आणि १९५६ मध्ये 'अप्सरा' या आशिया खंडातील पहिल्या अणुभट्टीची स्थापना झाली. हिरोशिमा, नागासाकी येथे अणुशक्तीची, संहार करण्याची ताकद जगाला दिसली होती. पण या प्रचंड शक्तीचा वापर विधायक कार्यासाठी करता येतो, यावर डॉ. होमी भाभांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी अणुऊर्जेचा वापर विजनिर्मितीकरिता, शांततामय कारणांकरिता करता येतो हे सिद्ध करून दाखविले.



अणुभट्टीच्या उभारणीबरोबरच त्यासाठी लागणारे इंधन, जड पाणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी गोष्टी भारतातच उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याबाबतच्या योजनाही डॉ. भाभांनी राबविल्या. तारापूर अणुनिर्मिती प्रकल्पाची आखणीही डॉ. भाभा यांनीच केली.  डॉ. भाभा यांनी अनेक निबंध लिहिले, खूप पुस्तके लिहिली, अनेक विज्ञानविषयक परिसंवादांत भाग घेतला. त्यांनी अल्पावधीत अणुशास्त्रात भारताची एवढी प्रगती करून दाखविली की बडी राष्ट्रे आश्चर्यचकित झाली. डॉ. भाभांनी अनेक विद्वत्तापूर्ण भाषणे दिली. ते उत्तम वक्ते होते. चित्रकलेचे त्यांना चांगले अंग होते. त्यांनी अनेक चित्रे काढली आहेत, तसेच चित्रकारांच्या चित्रांचा संग्रह केला आहे.



कामाच्या व्यापात संगीताची आवड मात्र त्यांना जोपासता आली नाही. विज्ञानाच्या संशोधनात मग्न असणाऱ्या या शास्त्रज्ञाला चित्र, शिल्प, संगीत अशा कलांचीही जाण होती, हा दुर्मिळ योग होय. एक बुद्धिमान आणि अतिशय रसिक असे कलाकाराचे व्यक्तिमत्त्व डॉ. होमी भाभांना लाभले होते. त्यांनी अणुयुगाची पहाट आपल्या कर्तृत्वाने भारताला दाखविली आणि या क्षेत्रातील अग्रगण्य अशा इतर बड्या राष्ट्रांच्या पंगतीला भारताला नेऊन बसविले. दुर्दैवाने या अणुशास्त्रज्ञाचे १९६६ मध्ये एका विमान अपघातात निधन झाले.

परंतु त्यांनी लावलेला अणुसंशोधनाचा दीप मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्वलित होऊन भारताची या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहे. जगात भारताची शान वाढवण्यात, मान उंच करण्यात डॉ. होमी भाभा यांचा सिंहाचा वाटा आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

होमी भाभा मराठी निबंध | doctor homi bhabha marathi nibandh

 सोशल मिडिया मराठी निबंध | social media essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सोशल मिडिया मराठी निबंध बघणार आहोत.  आजचे युग डिजीटल युग म्‍हणुन ओळखले जाते यात सोशल मिडीयाचे महत्‍व दिवसेदिवस वाढत आहे कोणतीही बातमी क्षणात आपल्‍या मोबाईलवर दिसून येते , आपल्‍याला आपले मत सहज मांडता येते पण  कोणत्‍याही गोष्‍टीचा अतीवापर केल्‍यास त्‍याचे नुकसान दिसुन येत असतात, आज ज्‍या प्रमाणात सोशल मिडीयाचा अतिवापर होत आहे त्‍याचे दुष्‍परिणाम आज आपण या निबंधात बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


social-media-essay-in-marathi
social-media-essay-in-marathi



आज घराघरात मोबाईल आहे आणि इंटरनेट सुद्धा बहुतेक जण वापरतात. बरीच मुलं मुली, विद्यार्थी तासनतास मोबाइल हाताळण्यात घालवितात. फेसबुक, ट्विटर यावर पोस्ट शेअर करणे, पोस्ट लाईक करणे, चाट करणे, पोस्ट अपलोड करणे इत्यादी कार्यात अगदी भान हरपून असतात. ह्याची त्यांना एवढी आवड निर्माण होते की त्या शिवाय त्यांना करमत नाही. ही लागलेली सवय वाईट व्यसना इतकीच घातक ठरु शकते. 


वेळ खर्च होतो. इंटरनेट  करिता जास्तीचा पैसा लागतो. आणि अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी परीक्षेत कमी गुण मिळणे किंवा अपयश येणे ह्या बाबी घडतात.  इंटरनेट वापरणारे कधी कधी जाली कंपन्यांच्या जाळ्यात अचूक अडकतात. बऱ्याच कंपनी ई मेल पत्यावर जाहिराती पाठवितात. कळत नकळत त्या फसव्या जाहिरातींना आपण बळी पडतो. व आपले आर्थिक नुकसान करुन बसतो. 


काही कंपन्या किंवा सायबर गुन्हेगार आपली सर्व माहिती काढून त्याचा दुरुपयोग करतात. बँक अधिकारी बोलतो अशी थाप मारुन आपला ए.टी.एम. नंबर विचारुन खात्यातील रक्कम लंपास झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. 


इंटरनेट  चा वापर मग तो कोणत्याही कामाकरिता करायचा असेल तर बसल्या जागी करावा लागतो. तासनतास बसल्यामुळे शारीरिक हालचाल होत नाहीत. परिणामी पचन संस्था कमी कार्यक्षम होते. त्यामुळे कमजोरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरीराची हालचाल न झाल्यामुळे लठ्ठपणा येतो. स्क्रीन च्या प्रकाशामुळे डोळ्यावर ताण येतो व डोळे कमजोर होवू लागतात. आज आपण पाहतो लहान मुलामुलींना चष्मे लागलेले आहेत. पुढे पुढे पाठ दुखी, मान दुखीचा त्रास व्हायला लागतो. अपचन, आम्लपित्त, मलावरोध यासारखे आजार बळावतात.


सोशल मिडीया वापरून लोकांना छळले जाते विशेषतः मुलींच्या बाबतीत हा प्रकार जास्त घडतो. पहिल्यांदा मुलींना विश्वासात घ्यायचं. त्यांचे फोटो मोबाइल मध्ये घ्यायचे. किंवा त्यांच्या  नकळत फोटो काढायचे व पुढे ते फोटो फेसबुक वर टाकण्याची धमकी द्यायची. व त्यांच्याकडून अधिक वाईट कामे करुन घ्यायची. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. आपली अब्रू वाचविण्याचा जेवढा प्रयत्न ती मुलगी करते तेवढी ती आणखी आणखी फसत जाते. शेवटी आत्महत्या केवळ हाच एक पर्याय तिच्यासमोर उरतो. अशी कित्येक प्रकरणे झाली आहेत. त्यातील केवळ काहीच उघड झाली आहेत कित्येक दाबून ठेवली गेलीत केवळ अब्रू झाकण्यासाठी.



बरेचदा काही देवीदेवतांच्या विटंबना होतील असा मजकूर अथवा फोटो अपलोड केले जातात. त्यामुळे धार्मिक भक्त संतप्त होतात आणि अशा वेळेस दोन गटात हाणामारी, जाळपोळ इत्यादी प्रकार होतात. त्यांचे परिणाम निरपराध्यांना सुद्धा भोगावे लागतात. सामाजिक संबंध दुरावतात. कायदा व सुव्यवस्था राहत नाही.


इंटरनेट मुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संपर्क साधता येतो. ह्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडणाऱ्याची संख्या सुद्धा वाढली आहे. यामध्ये जेव्हा ती व्यक्ती आधीच विवाहित असेल किंवा वाईट स्वभावाची असेल किंवा दुर्व्यसनी असेल तेव्हा धोका बसतो. घरातील मंडळीना विरोध करुन अशी लग्ने झालीत व अप्लावधीतीतच मुलीच्या जीवाला धोका झाला अशी बरीच उदाहरणे आहेत. 


सोशल मिडिया एवढा लोकप्रिय झाला की मुलांना त्याचे तोटे दिसत नाहीत. त्याचा वापर करु दिला नाही तर मुले व आईवडील यांच्यातील संबंध बिघडायला लागतात. ते आई वडिलांचे ऐकेनासे होतात. सतत नेटच्या संपर्कात राहिल्यामुळे एकटेपणा वाढतो. काही ताण तणाव निर्माण झाल्यास इतरांशी शेअर न करता ताण दाबण्याचा प्रयत्न केला जातो. जो घातक ठरु शकतो. कधी कधी अधिक ताण सहन न झाल्याने अशी व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. ह्या सर्व दुष्परिणामावरुन निष्कर्ष निघतो की सोशल मिडिया मुळे सांस्कृतिक पर्यावरण दुषित झाले आहे व होत आहे.


या सर्व समस्‍यांचा कमी करण्‍यासाठी पुढील उपाय वापरतात येतील.   म्हणजे सोशल मिडीया मर्यादीत वापरणे , त्‍यावर असणारी माहीती खरी आहे की नाही हे अगोदर तपासुन घेणे . आणखी काही समस्‍या असल्‍यास वडीलधाऱ्या व्यक्‍तीसमोर ती मांडणे . 


जगभरात करोडो लोग सोशल मिडीया वापरतात . यातील नकारात्‍मक गोष्‍टी न वापरल्‍यास व सोशल मिडीया हे चांगल्‍याप्रकारे वापरल्‍यास आपल्‍याला त्यापासुन फक्‍त फायदाच मिळेल. 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  व तुमचे सोशल मिडीया बद्दल काय मत आहे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

सोशल मिडिया मराठी निबंध | social media essay in marathi

होळी वर मराठी निबंध | holi essay in marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण होळी वर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये होळी या सणाविषयी असणारी ऐतिहासिक माहीती  व आज आपण हा सण कश्‍याप्रकारे साजरा करतो याची सविस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

holi-essay-in-marathi
holi-essay-in-marathi



भारतात साजरे केले जाणारे विविध सण आपला अमूल्य वारसा आहेत. मन प्रसन्न ठेवण्यासाठी सणांची मदत होते. होळी हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे. होळी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला येते.

प्रत्येक सणाला काही ना काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असते. त्याचप्रमाणे होळी लाही स्वत:चा एक इतिहास आहे.


हिरण्यकश्यप नामक एक नास्तिक राजा होता. त्याला आपल्या शक्तीचा फार गर्व होता. त्याने स्वत: ला ईश्वर म्हणून घोषित केले होते. त्याने प्रजेला सांगितले की, प्रजेने त्याची पूजा करावी. जी व्यक्ती त्याची पूजा न करता देवाची पूजा करेल त्याला शिक्षा करण्यात येईल. त्याचा पुत्र प्रल्हाद ईश्वरभक्त होता. त्याने आपल्या पित्यास ईश्वर मानण्यास नकार दिला. हिरण्यकश्यपूने आपल्या पुत्रास ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु हिरण्यकश्यपूला यश मिळाले नाही. म्हणून त्याने आपली बहीण होलिकाला आपल्या दृष्कृत्यांत सामील करून घेतले.


होलिके जवळ ईश्वराने दिलेले एक असे वस्त्र होते, ज्याला आग जाळू शकत नव्हती. होलिका लाकडांच्या ढीगावर ते वस्त्र परिधान करून, प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. मात्र प्रल्हादला भगवान विष्णूचे वरदान मिळाल्याने या आगीत होलिका जळून भस्म झाली पण प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. ही घटना दरवर्षी आपणास पाप आणि अन्यायाची होळी करण्याचा उपदेश करते.



होळीचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी पण आहे. गोप-गोपिकांची होळी फार प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात होळी खेळली जाते. होळीच्या दिवशी लोक आपल्या गल्लीच्या चौकात लाकडे जमा करून खूप उंच होलिका (म्हणजे एक लांब लाकूड) त्या लाकडांच्या ढीगात लावतात. संध्याकाळी स्त्रिया नारळ धूप इत्‍यादीनी होलिकेची पूजा करतात. तिला फेऱ्या घालत दोरा गुंडाळतात. रात्री निश्चित मुहूर्तावर होलिका दहन केले जाते. होळीत गव्हाच्या ओंब्या भाजून मित्रांमध्ये वाटून खातात.



होलिका दहनाच्या पाचव्या दिवशी रंगांची होळी असते. त्यात एक वेगळीच मजा व आनंद असतो. तरुण युवकांच्या टोळ्या गात नाचत रस्त्यावर येतात. पाण्यात वेगवेगळे रंग मिसळून एकमेकांच्या अंगावर टाकतात. एकमेकांच्या तोंडाला लाल, गुलाबी, पिवळे रंग लावतात व एकमेकांना मिठ्या मारतात. रंगीबेरंगी चेहरे आणि रंगीबेरंगी कपडे मजेदार दिसतात. सकाळपासूनच बायका फराळाचे पदार्थ व मिठाया बनवू लागतात.



प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जातो. यात लहानापासून थोरापर्यंत सर्वजण उत्‍साहाने भाग घेतात  हा एक असा सण आहे जो जातिभेद, उच्च नीचतेची भावना नष्ट करतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

होळी वर मराठी निबंध | holi essay in marathi

नाताळ वर निबंध | Christmas Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ख्रिसमस (नाताळ) मराठी निबंध बघणार आहोत.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


ज्याप्रमाणे दसरा आणि दीपावलीचा संबंध राम आणि कृष्णाशी आहे, गोकुळाष्टमा चा संबंध कृष्णाशी आहे त्याचप्रमाणे ख्रिसमसचा संबंध येशू ख्रिस्ताशी आहे. ख्रिसमसचा सण दरवर्षी २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवशी लोकोद्धारक, परम दयाळु, गरिबांचा सेवक येशूचा जन्म झाला होता. जगात ते मसीह (मृतांना जीवन देणारा) म्हणून विख्यात झाले. म्हणून त्यांना इसा मसीह म्हटले जाते.


Christmas-Essay-in-Marathi
Christmas-Essay-in-Marathi




२५ डिसेंबरच्या आधी आठवडाभर धूमधाम सुरू होते. लोक आपल्या घरांची स्वच्छता करतात. घरे, दुकाने, कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत स्वच्छता अभियान चालविले जाते. बंगल्यापासून झोपडीपर्यंत घरे झगमगू लागतात. दुकाने मालाने गच्च भरली जातात. मिठाया, नवी वस्त्रे, नव्या भेटवस्तू लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. सणाच्या आनंदात घराच्या अंगणात ख्रिसमसचा वृक्ष सजविला जातो. त्यावर चित्रे, फळे, फुळे, फुगे, खेळणी अडकविली जातात. चर्चची सजावट केली जाते. 


सणाचा प्रारंभ चर्चमध्ये विशेष स्तोत्रे व आनंद गीते गाऊन होतो. हा सण २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत चालतो. लोक आपल्या स्नेह्यांना मिठाई देतात. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा व्यक्त करतात. प्रीतिभोजाचे आयोजन केले जाते. रात्री दिवे आणि लाईटमुळे सारा गाव प्रकाशित होतो. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जीवनावर नाटक सादर केले जाते. मोठ्या शहरांत मिरवणूक काढली जाते. ख्रिसमसच्या रात्री मुलांच्या उशाशी चॉकलेट, खेळणी, मिठाई ठेवली जाते. सकाळी मुलांना सांगितले जाते की हे सर्व दयाळू, वृद्ध सांताक्लॉजने भेट म्हणून दिले आहे.


ख्रिसमसचा सण पुनर्मिलनाचा सण आहे. या दिवशी लोक आपल्या कुटुंबीयांना भेटतात. त्यासाठी आपल्या दूर असलेल्या नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणाहून आपल्या गावी येतात. संपूर्ण जगात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू लोक आपल्या ख्रिश्चन मित्रांना शुभेच्छा व भेटवस्तू देतात. राष्ट्रपती आणि पंतप्रधान देशातील ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा संदेश देतात. ख्रिसमसचा सण आपणास सेवा, त्याग आणि क्षमाशीलतेचा संदेश देतो. हा दिवश येशू ख्रिस्ताच्या महानतेची आठवण करून देतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

नाताळ वर निबंध | Christmas Essay in Marathi