झाडे नसती तर  मराठी निबंध बघणार  | if trees were not there essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण झाडे नसती तर  मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये झाडे नसल्‍यावर कोणत्‍या गोष्‍टी अशक्‍य होतील याविषयी सविस्‍तर माहीती  दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

if-trees-were-not-there-essay-in-marathi
if-trees-were-not-there-essay-in-marathi




स्वत: उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात आणि दुसऱ्यांसाठी फळेसुद्धा धारण करतात ते वृक्ष जणू सत्पुरुषच आहेत, असे वृक्षांचे यथार्थ वर्णन सुभाषितकारांनी केलेले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी ही झाडे नसती तर... विविध रंगांची व आकारांची पाने नसती. सुगंधी फुले नसती. मग रसाळ फळे कुठली? मग शंकराला बेल, गणपतीला दूर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळागौरीला सोळा प्रकारची पत्री कोठून मिळाली असती?


झाडे नसती तर हापूसचा आंबा खायला कसा मिळाला असता? कच्ची कैरी, लालबुंद सफरचंद, डाळिंब, पेरू, अननस अशा फळांची चंगळ नसती. चाफा, मोगरा, गुलाब यांचा मन प्रसन्‍न करणारा सुवास आणि वेड लावणारे सौंदर्यच नसते. पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वडाच्या सूरपारंब्यांचा खेळ, पारिजातकाचा सडा या साऱ्या गोष्टींतील मौजच हरवली असती!


आज अनेक औषधे वनस्पतींपासून उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशी, बेहडा, सबजा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदाणापेक्षा कमी नाहीत  आहेत. झाडे नसती तर आयुर्वेद निर्माण झाला नसता. झाडे नसती तर... वाऱ्याचे अस्तित्व कसे जाणवले असते? पाऊस आला नसता... मातीची धूप थांबली नसती. चंदनाचे झाड नसते तर विरहार्ताला शीतलता आणि देवपूजेला गंध नसते. झाडे नसती तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती. प्राणवायूचा पुरवठा कसा झाला असता?


झाडे नसती तर कवीमंडळींची फार अडचण झाली असती. 'त्या तरुतळी विसरले गीत' अशी सुंदर काव्यपंक्ती निर्माणच झाली नसती.  श्रावणात झोपाळे कोठे बांधले असते? सुगरण पक्ष्याने आपला घरोटा कोठे बांधला असता?


झाडे नसती तर... गजराजासारख्या शाकाहारी प्राण्यांनी काय केले असते? प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याची पाने घरात मांगल्य आणतात. भाजी-आमटीच्या फोडणीची लज्जत कढीपत्ता वाढवतो. झाडे नसती तर... माणसाच्या जीवनातील हिरवेपणा, मृदुताच हरवली असती. मग चांदोबा कोठे लपला असता? हिरव्या चाफ्याला सुगंध लपवण्याची गरजच पडली नसती. रजनीगंधा धुंद झाली नसती. वृक्षाविना सारे जीवन रूक्ष झाले असते. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षण झाडांशी इतका निगडित आहे की, त्यामुळेच माणूस आपल्या वंशावळीला 'वंशवृक्ष' असे सार्थ अभिधान देतो. असा हा मानवाचा थोर मित्र नसेल तर मानवी जीवन नष्टप्राय होईल.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • झाडांचे महत्त्व व उपयुक्तता 
  • झाडांचे विविध प्रकार
  • प्रदूषण
  • फळे, फुले, लाकडे, औषधे
  • निसर्गसौंदर्यात काव्य असते
  • पाण्याचा पुरवठा 
  • वनसंपत्ती उत्पादन 
  • पशु-पक्षी आणि मानवी जीवनाचा आधार

झाडे नसती तर मराठी निबंध बघणार | if trees were not there essay in marathi

वृक्षदिंडी निबंध इन मराठी | vruksha dindi nibandh Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्षदिंडी निबंध इन मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये पर्यावरणाविषयी जनजागृती व वृक्ष लागवड वाढवण्‍याविषयी शाळेतील मुले कश्‍याप्रकारे वृक्षदिंडी काढुन वृक्षारोपण करतात याविषयी सविस्‍तर माहीती दिली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

vruksha-dindi-nibandh-Marathi
vruksha-dindi-nibandh-Marathi



पर्यावरणाचा प्रश्न ही आजची जागतिक समस्या झाली आहे. प्रदूषणाचे बळी आपण केव्हा होऊ, हे सांगता येणार नाही. हा धोका ओळखून आमच्या शाळेने विदयार्थ्यांच्या मदतीने प्रदूषणाशी दोन हात करण्याचे ठरवले. वनमहोत्सवाच्या निमित्ताने आमच्या शाळेने 'वृक्षदिंडी'चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची तयारी जवळजवळ महिनाभर चालू होती. प्रत्येक विदयार्थ्याला आपल्या घरी एक 'बालवृक्ष' तयार करायला सांगितला होता. कोणी कोणते झाड लावावे, हे प्रत्‍येकजण आपआपल्‍या आवडीप्रमाणे ठरवु शकत होते. 


३० सप्टेंबरला सर्व विदयार्थ्यांना आपण लावलेली रोपे घेऊन सकाळी सातला शाळेत बोलावले होते, कारण त्या दिवशी शाळेतून वृक्षदिंडी निघणार होती. साऱ्या गावात फिरून ती परत शाळेतच येणार होती. शाळेच्या मागच्या मैदानात ही झाडे लावली जाणार होती. ते बालतरू भूमातेच्या स्वाधीन केले जाणार होते.



ठरल्याप्रमाणे ३० सप्टेंबरला सकाळी सात वाजताच सर्व विदयार्थी शाळेच्या गणवेशात आपापले बालवृक्ष घेऊन शाळेत हजर होते. आतापर्यंत शाळेतून अनेक प्रसंगी मिरवणुका निघाल्या होत्या; पण आजचा उत्साह अगदी आगळाच होता. कारण आम्ही स्वतः लावलेल्या व काही काळ आम्हीच जोपासलेल्या बालवृक्षांची मिरवणूक होती ती! आजच्या मिरवणुकीत दिल्या जाणाऱ्या घोषणाही आगळ्यावेगळ्या होत्या- 'झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषणाचा नाश करा', 'आजचे बालतरू, उदयाचे कल्पतरू !' वृक्षदिंडीत काही विदयार्थ्यांनी वृक्षांसारखे हिरवेगार पोशाख केले होते. त्यांच्या हातांत फलक होते- 


'वृक्षवल्ली आम्हां सोयरी', 

'एक बालक, एक झाड', 

'निसर्ग अमुचा सखा, आम्हां आरोग्य देई फुका!'


त्या बालतरूंचे स्वागत गावातील सारेजण उत्साहाने करत होते. संपूर्ण गावातून फिरत फिरत ही वृक्षदिंडी शाळेच्या मागच्या मैदानात आली. तेथे झाडे लावण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवण्यात आली होती. आळी तयार होती. सर्व विदयार्थ्यांनी आपापली झाडे लावली. गुरुजींनी, मुख्याध्यापकांनीही वृक्षारोपणात भाग घेतला आणि काय गंमत ! आकाशाच्या झारीतून त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव झाला. पळत पळत शाळेच्या इमारतीत शिरलो. पाऊस थांबला. टवटवीत झालेली झाडांची पाने वाऱ्याबरोबर सळसळत होती. जणू ती आनंदाने टाळ्याच पिटत होती.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व पर्यावरण वाचवण्‍यासाठी तुम्‍ही कोणते उपाय वापरता  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • पर्यावरणाचा प्रश्न
  • प्रदूषणाचे बळी 
  • झाडे लावण्याची आवश्यकता 
  • वनमहोत्सव 
  • बालवृक्षांची निर्मिती 
  • वृक्षदिंडी 
  • गणवेशात विदयार्थी 
  • इतर मिरवणुकांपेक्षा वेगळी
  • उत्साहाचे वातावरण
  • प्रत्येकाच्या हातात बालतरू वा फलक
  • काही विद्यार्थी वृक्ष बनले होते
  • लोकांच्यात उत्सुकता
  • गावभर जत्रा 
  • पाऊस 
  • त्याचे स्वागत..

वृक्षदिंडी निबंध इन मराठी | vruksha dindi nibandh Marathi

 संगणक शाप की वरदान मराठी निबंध | computer shap ki vardan essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संगणक शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये संगणकाच्‍या वापरामुळे होणारे फायदे व नुकसान याबद्दल सविस्‍तर माहीती दिली आहे.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

 

computer-shap-ki-vardan-essay-in-Marathi
computer-shap-ki-vardan-essay-in-Marathi



अत्याधुनिक संगणक हा विज्ञानाचा चमत्कार आहे. पण संगणकाचा वापर हानिकारक ठरणार की लाभदायक? संगणक शाप ठरेल की वरदान? हे प्रश्न बहुचर्चित ठरले आहेत. एक संगणक साधारण पंधरा माणसांचे काम करतो. संगणकाच्या साहाय्याने कामे करणारा यंत्रमानव तर एकावेळी साधारणतः पन्नास माणसांचे काम करतो आणि तेही कमी वेळात व अगदी अचूक. 


संगणक अवकाशयाने (spaceship) नियंत्रित करू शकतो. पाणबुड्यांवर नियंत्रण करतो आणि जमिनीवरील जी जी कामे मानव करतो ती सर्व कामे तो करतो. सध्या प्रवासी वाहनांत जागांचे आरक्षण करण्यासाठी, तसेच सर्व प्रकारच्या परीक्षांचे जटिल स्वरूपाचे काम करण्यासाठी संगणकाला वेठीला धरले आहे. आता बँकांमध्येही संगणकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यास सुरवात झाली आहे. जेथे विषारी वायूंचा धोका आहे, तिथे संगणकनियंत्रित यंत्रमानवाचा (रोबॉट) उपयोग करून प्राणहानी टळू शकते.


संगणकामुळे कामातील चुका टाळता येतात. त्यामुळे उत्पादनखर्चात बचत होते. अर्थातच वस्तू कमी दरात विकता येते. या साऱ्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील मालाची मागणी वाढते व त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनातही वाढ होते. संगणक माणसाला बाजूला सारून काम करतो. त्यामुळे संगणकाचा वापर हा शापच आहे असे वाटू लागते. आधीच लोकसंख्या भरपूर, त्यात रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत; अशा परिस्थितीत संगणक म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरणार नाही का?



प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच संगणकाच्या चांगल्या व वाईट दोन्ही बाजू आहेत. अणुबॉम्बने जपानचा सर्वनाश केला. पण त्याच अणुशक्तीचा आपण विकासासाठी उपयोग करून घेत आहोत. नांगरणी, शिंपणी, मळणी इत्यादींसाठी मोठमोठी अवजारे आज आपण वापरतो. ही अवजारे प्रथम वापरात आली त्यावेळेस बेकारीचे असेच संकट मजुरांवर आले होते, त्याला आपण तोंड दिलेच. तसेच संगणकाचा उपयोग केल्यावर निर्माण होणाऱ्या बेरोजगारांना दुसरीकडे रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करता येईल.


संगणकाच्या उपयोगाने आर्थिक बचत खूप होईल. या आर्थिक बळाचा उपयोग करून अधिकाधिक उदयोगधंदे निर्माण करता येईल. संगणक तयार करण्यासाठी, तसेच संगणकातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी, संगणकाला लागणारे प्रोग्रॅम्स बनवण्यासाठी अनेक प्रशिक्षित माणसांची आवश्यकता असते. बेरोजगारांना प्रशिक्षण देऊन या कामात त्यांना गुंतवता येईल.



संगणक विज्ञानाचे एक अपत्य आहे. मानवाला विज्ञानाने दिलेले एक प्रभावी साधन आहे. तेव्हा संगणकाचा वापर मानवासाठी जास्तीत जास्त सुखसुविधा निर्माण करण्याकरता केल्यास, संगणक हे मानवाला लाभलेले वरदान ठरेल यात शंका नाही. आज भारतीय तरुण संगणकतज्ज्ञ अमेरिकेतील 'सायबर लॉबी' सांभाळत आहेत. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक हा आवश्यकच आहे. मग सांगा, संगणक हा वरदान नाही का? संगणकासाठी माणूस नसून माणसासाठी संगणक आहे, हे लक्षात ठेवले म्हणजे संगणकाची धास्तीच उरणार नाही.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  • संगणक हा एक चमत्कारच
  • अचूकतेने व अफाट गतीने कामे
  • एकाच वेळी अनेक माणसांची कामे
  • विविध प्रकारची कामे
  • शाप असे वाटते बेकारी
  • पण ही समजूत चूक
  • संगणकामुळे इतरही उदयोगांची क्षेत्रे निर्माण
  • संगणकामुळे झालेल्या बचतीतून इतर उदयोगधंदे निर्माण करावेत
  • संगणक हा वरदानच
  •  त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे

संगणक शाप की वरदान मराठी निबंध | computer shap ki vardan essay in marathi

स्वतंत्र दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वतंत्र दिन मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये दरवषी स्वातंत्र्यदिन कश्‍याप्रकारे साजरा केल्‍या जातो याचे वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

निबंध 1 

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत पारतंत्र्याच्या अंधारातून निघून स्वातंत्र्याच्या प्रकाशात आला. दिडशे वर्षांची गुलामी संपली. ब्रिटिश या देशातुन निघून गेले. देशाची प्रशासन व्यवस्था व्यवस्थितपणे चालविण्यासाठी पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांना नियुक्त करण्यात आले. प्रतिवर्षी १५ ऑगस्ट राष्ट्रीय पर्वाच्या रूपात साजरा केला जातो.

swatantra-din-nibandh-marathi
swatantra-din-nibandh-marathi

मुख्य समारंभ लाल किल्ल्यावर साजरा होतो. पंतप्रधान तिथे पोहोचल्यावर सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख त्यांना सलामी देतात.पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवितात. ध्वजाला २१ तोफांची सलामी सन्मानाप्रीत्यर्थ दिली जाते. राष्ट्राच्या नावे दिल्या जाणाऱ्या संदेशात पंतप्रधान देशाची प्रगती आणि भविष्यातील योजना याबद्दल राष्ट्राला माहिती देतात. या प्रसंगी देशातील सन्माननीय व्यक्तींबरोबरच विदेशी पाहुणे पण हजर असतात. भाषण संपल्यावर तीन वेळा 'जयहिंद'च्या घोषणेनंतर राष्ट्रगीत गायिले जाते, नंतर कार्यक्रम समाप्त होतो. १५ ऑगस्टला राष्ट्रीय सुट्टी असते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. ती पाहण्यासारखी असते. १५ ऑगस्टचा या सोहळयाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर आणी इंटरनेटवर दाखविले जाते. त्यानंतर देशभक्तिपर गीते, कविता, नाटके प्रसारित केली जातात. राज्या-राज्यात व गावा- गावात उत्साहाने ध्वजारोहण केले जाते. आपणा भारतीयांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आपल्या जुन्या चुकांचा विचार करण्यास व त्या पुन्हा न होऊ देण्याचा प्रयत्न करण्यास सांगतो. कोणत्याही परिस्थितीत आपण आपले ऐक्य व अखंडतेचे रक्षण केले पाहिजे. तरच आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत असे अभिमानाने जगाला सांगू शकू. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 2

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला शाळेत जायचे, राष्ट्रध्वजाला वंदन करायचे, पाहुण्यांचे भाषण ऐकायचे हा एक ठराविक चाकोरीतील कार्यक्रम होता; पण यंदा आमचे वर्गशिक्षक म्हणाले की, "उदया झेंडावंदनाला याल, तेव्हा घरी सांगून या की आता एकदम संध्याकाळी घरी येऊ. आणि हो, येताना तुमचा दुपारच्या जेवणाचा डबाही घेऊन या, बरं का!"


१५ ऑगस्ट उजाडला. आम्ही शाळेत जमलो. ध्वजवंदन झाले. शाळेतील कार्यक्रम संपला. आता कोठे जायचे आहे, हे सरांनी काही सांगितलेच नव्हते, त्यामुळे उत्सुकता खूप वाढली होती. सरांबरोबर आम्ही सर्वजण निघालो.


आम्ही गावाबाहेरच्या एका जुन्या घरापाशी आलो. आमचे कुतूहल वाढले होते. सरांनी कुणाला तरी हाक मारली. एक वृद्ध पण तेजस्वी व्यक्ती पुढे आली. सरांनी ओळख करून दिली, ते सरांचे 'सर' होते. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे ते जुन्या पिढीतील एक स्वातंत्र्यसैनिक होते. १९४२ च्या 'चले जाव' आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. अनेक वर्षे ते भूमिगत होते आणि काही काळ त्यांनी कारावासही भोगला होता है पण  आम्हांला सांगितले.


स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी त्या वृद्ध तपस्वी स्वातंत्र्यसैनिकाच्या तोंडुन स्वातंत्र्यलढ्याची गाथा ऐकण्यात आम्ही रमून गेलो. दोन तास केव्हा संपले ते कळलेच नाही. त्या स्वातंत्र्यवीराने तो इतिहास प्रत्यक्ष अनुभवला होता.

नंतर ते तपस्वी आम्हांला जवळच्याच एका घरात घेऊन गेले. स्वातंत्र्योत्तर काळात काही अनाथ बालकांच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्या मुलांबरोबरच आम्ही आमचे भोजन केले. नंतर आम्ही काही वेळ गप्पागोष्टी व खेळ झाल्यावर घराकडे परत निघालो. तेव्हा एकच विचार मनात रेंगाळत होता की, स्वातंत्र्यदिन आज आम्ही खऱ्या अर्थाने साजरा केला.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

भारताचा स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक राष्ट्रासाठी व त्यांच्या जनतेसाठी एक स्वतःचे अस्तित्व दाखवणारा व कोणतेही राष्ट्र असो प्रत्येकाला आपला स्वातंत्र्यदिन हा प्रिय असतो.


स्वातंत्र्य म्हणजे नेमके तरी काय हो? तर स्वातंत्र्याचे अनेक अर्थ, संकल्पना असू शकतील परंतु स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रातील व जगातील प्रत्येक व्यक्तीला वा समूहाला त्याच्या इच्छेप्रमाणे, आवडीप्रमाणे जगता यावे व तो स्वतःचे अस्तित्व तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे समाजात दाखवू शकतो.


जगातील प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काही धडपड करावी लागली तर काही राष्ट्रांना स्वातंत्र्य हे सहजगत्या मिळाले. राष्ट्र लोकशाही, कम्युनिस्ट, हुकूमशाही असे देत. परंतु ज्या राष्ट्रात जास्तीत जास्त लोक स्वातंत्र्य उपभोगतात तोच देश अथवा राष्ट्र हे स्वातंत्र्याचे प्रतिक मानले जाते.


आपल्या देशालाही स्वातंत्र्य मिळविताना अनेक अडचणी आल्या. परंतु देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सरकारला विरोध करून वा प्रसंगी अहिंसा करत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना प्राणांची अहिंसा करत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. त्यात अनेकांना प्राणांची आहुती द्यावीच लागली. परंतु स्वातंत्र्य मिळाले ते १५ ऑगस्ट १९४७ साली.


परंतु हे स्वातंत्र्य मिळविण्यास जेवढे परिश्रम, त्रास झाला तेवढाच किंबहुना त्याहून अधिक त्रास हे स्वातंत्र्य व देशातील शांतता टिकविण्यास झाला. त्यातली कारणे वेगळी वेगळी आहेत. परंतु प्रश्न पडतो की स्वातंत्र्यदिन हा खड्या पहात किंवा सुरक्षेच्या जाळ्यात म्हणजे एखाद्या तुरुंगात असल्याप्रमाणे साजरा करणे व ते हेच का स्वातंत्र्य की ज्यासाठी आपण इतकी वर्षे लढलो. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याची प्रसंगी जिवाची होळी केली ते जर या स्वातंत्र्यदिनाच्या वेळी उपस्थित असतील तर त्यांचीही मान शरमेने खाली जाईल.


ज्या देशाची सूरक्षाव्यवस्था व आंतरिक शांतता योग्य, मजबूत आहे त्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित असते. परंतु आपल्या देशाची भौगोलिक रचना व तसेच आंतरिक रचना बघताना आपली शांतता, स्वातंत्र्य टिकविणे अवघड व महत्त्वपूर्ण असल्याचे वाटते. भारताच्या पश्चिमेस पाकिस्तान व पूर्वेस बांगलादेश ही फाळणीतून निर्माण झालेली राष्ट्रे आहेत व तीच राष्ट्रे ही जगातील व आशियातील महत्त्वाची दहशतवादी केंद्रे आहेत. व त्यांचे उद्दिष्ट हे जगातील व प्रामुख्याने विकसित देशांची शांतता, सुरक्षा भंग करणे व प्रसंगी हिंसा करणे. त्यामुळेच आपल्या राष्ट्रांना आपली सुरक्षाव्यवस्था मजबूतपणे कार्यरत ठेवणे भागच आहे.


भारतात विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक एकत्र राहतात परंतु भारतात धार्मिक, प्रादेशिक हे वाद देशाच्या दृष्टीने घातक निर्माण होत आहेत. भारतात अनेक धर्माचे लोक हे आपल्या पद्धतीने स्वतःच्या धर्माचे श्रेष्ठत्व गाजवताना दिसतात व त्यामुळेच आंतरिक शक्ती ह्या परोपरीने वा अनपेक्षितपणे शांततेस, सुरक्षेस आव्हान देत असतात.


ज्या देशाच्या स्वातंत्र्यास ६० वर्षे पूर्ण होऊनही त्या देशाला स्वतःचा 'स्वातंत्र्यदिन' हा सुरक्षाव्यवस्थेत पार पाडावा लागतो ही खरी शरमेची बाब आहे.


भारताचा स्वातंत्र्यदिन हा खड्या पहाऱ्यात साजरा होत असताना त्यात किती सामान्य लोक उत्साहपूर्वक सहभागा होऊ शकतात ? किती लोकांना शांत वातावरणात आपला स्वातंत्र्यदिन पाहायला मिळतो ?

स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्याचे अनेक फायदे जनतेस समजते. परंतु आंतरिक शांतता निर्माण करण्यास देशातील नेते कमी पडले.

खड्या पहाऱ्यात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना पाहताना हेच का ते स्वातंत्र्य जे आपण ६० वर्षांपूर्वी मिळविले व त्यासाठी अगणित हिरे गमावले. प्रत्येक स्वातंत्र्यदिन जवळ आला की सुरक्षेची चाचपणी सुरू होते व त्या दिवसापुरता तो दिवस यथायोग्यपणे पारही पडतो. परंतु इतर दिवस हे अशांतता, भीतीपूर्ण वातावरणात होतात त्याचे काय ?

स्वातंत्र्यदिनी आमचा ऊर भरून येतो आम्ही अभिमानाने तो विविध पूर्ण पद्धतीने साजरा करतो. परंतु हा स्वातंत्र्यदिन आम्ही यापुढेही याच पद्धतीने, भीतीपूर्ण वातावरणात साजरा करणार काय ? हाच प्रश्न मनात घर करून राहतो. ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा खड्या पहायात होतो तर मग सामान्य लोकांचे स्वातंत्र्य कसे अबाधित राहू शकते हे कळतच नाही.

म्हणूनच असे सतत वाटत राहते की माझ्या भारताचा स्वातंत्र्यदिन हा विना सुरक्षा व्यवस्थेत पार पडेल तेव्हाच तो खरा यथायोग्यपणे साजरा होऊ शकेल. व त्याचवेळी त्या राष्ट्राचे भवितव्य चांगले असेल आणि तोच माझ्या स्वप्नातील भारत असेल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

स्वतंत्र दिन निबंध मराठी | swatantra din nibandh marathi

 मदर टेरेसा मराठी निबंध | Mother Teresa Essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मदर टेरेसा मराठी निबंध बघणार आहोत.चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

Mother-Teresa-Essay-in-Marathi
Mother-Teresa-Essay-in-Marathi


निबंध 1 


कलकत्याच्या एका रस्त्यावरून एक विदेशी स्त्री चालली होती. तिच्याबरोबर तिच्या दोन सहकारी स्त्रियाही होत्या. पोशाखावरून ती स्त्री सेवाव्रत स्वीकारलेली धर्मप्रचारिका वाटत होती. रस्त्याच्या कडेला एक माणूस असहाय अवस्थेत पडला होता. जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्याच्याकडे पाहायलाही सवड नव्हती. तो आता फार थोड्या तासांचा सोबती होता. त्या स्त्रीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले. त्याचे अंग पुसले. त्याला स्वच्छ कपडे घातले. मरण्यापूर्वी मिळालेल्या या वागणुकीने त्याचा चेहरा उजळला. तेव्हा ती स्त्री आपल्या साथीदार स्त्रियांना म्हणाली, "मरताना त्याला जर जाणवले की, आपले कोणी तरी आहे तर त्याचे मरण सुखाचे होईल."



एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ही जगावेगळी आई म्हणजे 'मदर टेरेसा' होय. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना आपल्या जीवनध्येयाचा साक्षात्कार झाला; तेव्हाच त्यांनी स्वत:ला गरिबांच्या सेवेसाठी वाहून घ्यायचे ठरवले. अठराव्या वर्षी त्यांनी धर्मप्रचारिकेची दीक्षा घेतली व घर सोडले. १९३१ साली दार्जिलिंग येथे त्यांनी सेवेची व धर्मप्रचाराची शपथ घेतली व १९३९ साली त्यांनी कलकत्त्यात आपल्या कामाला सुरवात केली. आतापर्यंत त्यांचे हे कार्य अखंड चालू आहे. १० सप्टेंबर १९४६ नंतर त्यांनी झोपडपट्टीतील दीनदुबळे व गरीब यांच्यासाठी आपले आयुष्य वेचण्याचे ठरवले व त्या लाखो अनाथांच्या, अपंगांच्या सर्वार्थाने 'मदर' झाल्या.


 मदर टेरेसांच्या या सेवेचे मोल जगाला उमगले आणि १९७९ साली त्यांना 'शांततेचे नोबेल पारितोषिक' मिळाले. ती संपूर्ण रक्कमही त्यांनी गरिबांसाठीच खर्चण्याचे ठरवले. भारतानेही 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. मदर टेरेसा म्हणजे साक्षात प्रेम आणि मूर्तिमंत करुणा होय.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. व पुढील दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद





निबंध 2



ती समाजात सेवेचे व्रत घेऊन 'सिस्टर' म्हणून उतरली आणि आपल्या कार्याने समाजाची 'मदर' झाली, अशी ही एक आगळी आई - म्हणजे 'मदर तेरेसा'. स्वत:चे सर्वस्व इतरांच्या सेवेसाठी झोकून देण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 'मदर तेरेसा'. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मदर तेरेसांचे सेवाकार्य चालू होते आणि त्याचा विस्तार जगातील पाच खंडांत, सव्वाशे देशांत झालेला आहे.



मदर तेरेसा या मूळच्या अल्बानिया या देशातील. २६ ऑगस्ट १९१० मध्ये 'स्कोपजे' नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. 'नन' बनून दुःखितांचे दुःख दूर करायचे हे ते ध्येय होते.


सिस्टर अॅग्नेस म्हणून त्या भारतात कोलकाता येथे आल्या, तेव्हा 'जनसेवा' या एकाच विचाराने त्या झपाटलेल्या होत्या. २४ मार्च १९३१ मध्ये त्यांनी पहिली शपथ घेतली. त्यानुसार त्यांनी गरिबी, ब्रह्मचर्य व कृपाशीलता या गोष्टी स्वीकारल्या. स्वत:साठी 'तेरेसा' हे नाव घेतले. कोलकाता येथे आल्यावर त्यांनी प्राथमिक शाळेत शिकवण्याची जबाबदारी स्वीकारली.


 त्यासाठी प्रथम त्यांनी बंगाली व हिंदी भाषा शिकून घेतल्या. नंतर त्यांची शाळेतील कारकीर्द ' उत्कृष्ट शिक्षिका' म्हणून ठरली. शिक्षिकेचे काम करत असताना सिस्टर तेरेसांना 'ईश्वरी' आवाहन झाले आणि 'कॉन्व्हेंट 'च्या चार भिंती सोडून त्या अधिक व्यापक कार्यासाठी बाहेर पडल्या. त्यांनी मिशन स्थापन केले. सेंट तेरेसा शाळेत पहिले औषधालय काढले व शिवणकामाचे वर्ग सुरू केले.



२० डिसेंबर १९४८ मध्ये त्यांनी कोलकाता शहरात मध्यभागी असलेले 'मोतीझल' हे ठिकाण ही आपली कर्मभूमी म्हणून निवडली. त्यावेळी ते ठिकाण अत्यंत घाणेरडे व अस्वच्छ होते. असाध्य रोगाने ग्रासलेल्या एका मरणासन्न व्यक्तीला त्यांनी रस्त्याच्या कडेला पाहिले. त्या व्यक्तीचा शेवट तरी शांततापूर्ण व्हावा म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तिला उचलून आपल्या संस्थेत आणले. या घटनेतूनच तेरेसांचे 'सेवागृह' सुरू झाले व तेरेसा त्या सेवागृहाच्या 'मदर' झाल्या.



त्या क्षणापासून या मदरचे काम सतत विस्तारतच गेले. त्यांनी १२५ देशांत ७५५ आधारगृहे काढली. 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ही आंतरराष्ट्रीय संस्था त्यांनी सुरू केली. या संस्थेमार्फत पाच लाख लोकांना रोजचे मोफत जेवण सुरू झाले. तीन लाख लोकांना मोफत उपचार मिळू लागले. वीस हजार मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. यांखेरीज अपंग संस्था, कुष्ठधाम, दुर्बलांसाठी निवारे, व्यसनग्रस्तांसाठी उपचारगृहे त्यांनी सुरू केली. २५ जानेवारी १९६२ रोजी भारत सरकारने त्यांना ' पद्मश्री' हा किताब देऊन गौरवले. १९७१ मध्ये त्यांना 'रॅमन मॅगॅसेसे अॅवॉर्ड' मिळाले. त्यातून त्यांनी आग्रा येथे कुष्ठरुग्णांसाठी आश्रम सुरू केला.



वॉशिंग्टन येथील जोसेफ केनेडी अकादमीचे पारितोषिकही त्यांना मिळाले. त्या पैशांतून त्यांनी कोलकात्याच्या डमडम उपनगरात मनोदुर्बल मुलांसाठी रुग्णालय सुरू केले.  १९७९ साली मदर तेरेसा यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्या निमित्ताने तेथे होणारी मेजवानी रद्द करवून घेऊन त्यासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम त्यांनी आपल्या कार्यासाठी देणगी म्हणून स्वीकारली. १९८० मध्ये भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब बहाल करून सन्मानित केले. ५ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांचे वयाच्या ८८व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. शेवटपर्यंत मोह, मत्सर या दुर्गुणांच्या पलीकडे जाऊन माया, प्रेम, सेवा आणि भक्ती यांचाच साऱ्या जगावर या मदरने वर्षाव केला. अशी होती ही एक आगळी आई !


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

मदर टेरेसा मराठी निबंध | Mother Teresa Essay in Marathi

 संगणक वर मराठी निबंध | Computer Essay In Marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संगणक वर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये संगणकाच्‍या इतीहासापासुन ते आजपर्यंत ते कोणकोणत्‍या उपयोगात येत आहेत त्‍याबद्दल सविस्‍तर माहीती तारखासहीत दिली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


संगणक संस्कृतीच्या विकासाबरोबरच उत्तरोत्तर मानवाची वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती होत गेली. विविध इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या शोधाबरोबरच अनेक आधुनिक उपकरणे निर्माण केली गेली. वास्तविक संगणक ही मानवाने लावलेल्या शोधांतून मिळालेली देणगी आहे. संगणकाचा उपयोग संशोधनकार्य, शोध ऋतुसंबंधीची माहिती, बँक, इत्यादी अनेक क्षेत्रांत होतो.

Computer-Essay-In-Marathi
Computer-Essay-In-Marathi

संगणकाच्या वापरामुळे कार्यास गती येते. कार्य कौशल्यपूर्ण होते. आकडेवारी व माहितीचा चांगला उपयोग होतो. कार्यप्रणालीवर चांगले नियंत्रण राहते.संगणकाची कार्यपद्धती द्विआधार पद्धती (बायनरी सिस्टिम) वर आधारित आहे. जर्मनीतील गणितज्ञ व तत्त्वज्ञ गोटफ्रिड, बिलहेल्म लायबनिज (१६६४-१७९६) ने असे सुचविले की सर्व पाढ्यांचा आधार शून्य व एक मानावा या द्विआधारी पद्धतीत बेरीजवजाबाकीची प्रक्रिया सहजपणे करता येते. गुणाकार आणि भागाकार पण बेरजेच्या क्रमात करता येतो. या पद्धतीत अंकाची सुरवातीच्या व शेवटच्या अक्षरांना जोडल्यानंतर जो शब्द त्यास 'दुयंक' (Bit) म्हणतात. आठ बिटांच्या समूहाला बाईट (Byte) म्हणतात. १०२४ बाईट समूह मिळून एक किलोबाईट बनतो.


अंदाजे १५० वर्षांपूर्वी सर्वप्रथम संगणक निर्मितीच्या सिद्धांताचे प्रतिपादन इंग्लंडमधील चार्ल्स बेबेज या शास्त्रज्ञाने केले. याच्याच सिद्धांताच्या आधारावर हॉर्वर्ड विद्यापीठ (अमेरिका) १९३७ ते १९४४ या काळात संगणकाचा प्राथमिक विकास प्रा. होबोर्ड आयकन याने केला. या संगणकाचे वजन दोन टन होते. त्याची लांबी १५ मीटर व रुंदी 27 मीटर होती. 


१९६५ मध्ये इंटिग्रेटेड सर्किटपासून (IC) पहिला संगणक निर्माण करण्यात आला. त्यानंतर मागील काही वर्षांत संगणकाचा वेगाने विकास झाला. आता संगणक मनुष्यच संचालित करतो. त्याच्याच सूचनेप्रमाणे तो काम करतो. संगणकात मानवसदृश सर्व गुणांचा समावेश करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.


संगणकाचा प्रमुख भाग म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) ज्यात अनेक छोटे भाग असतात. संगणकाच्या एककापासूनच गणना होते. सेंट्रल प्रोसेसिंगशिवाय त्याचे अन्य भाग विद्युत कुंजिका, विद्युत यांत्रिक प्रिंटर डिस्क संचय एकक(hard disk drive), आवरण, इंटरफेस आणि टेपडेक असतात.


 भारतात शिक्षणाचा प्रसार-प्रचारासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. साक्षरतेच्या मोहिमेत संगणक महत्त्वाची भूमिका बजावीत आहे.वर्गात शिक्षक जे व्याख्यान देतात त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्याला होतोच असे नाही. परंतु संगणक प्रत्येक विद्यार्थ्याला सारखे शिक्षण देण्यात सक्षम आहे.



संगणकाच्या उपयोगामुळे बँकेच्या कार्यात सुधारणा झाली आहे. बँकेत संगणकावर प्रत्येक ग्राहकाच्या खात्याची संपूर्ण माहिती पाहावयास मिळते. त्याचे प्रिंट आऊट पण काढता येते. बँकेचा दैनंदिन हिशेब काही क्षणांतच संगणक आपणास देतो. संगणकात ग्राहकांच्या हस्ताक्षरांचा संग्रह करून एका स्कॅनरच्या साह्याने काही क्षणांत त्यांच्या हस्ताक्षराची तपासणी करता येते. बँकेच्या बाहेर कॉम्प्युटराईज्ड स्वयंचलित यंत्रे बसविलेली असतात. त्याद्वारे ग्राहक केव्हाही पैसे काढू शकतात, जमा करू शकतात, चेकसाठी अर्ज करू शकतात. याला वेळेचे बंधन नाही. 


संगणकाद्वारे वधुवरांची निवड करता येते. अनेक उपवर तरुण-तरुणींचे स्वभाव, वय, जात, आवडी इत्यादी माहिती संगणकात साठविली जाते. याच आधारावर निवड केली जाते.


रशिया, अमेरिका, भारत आणि इतर अनेक देशांमध्ये संगणकाचा उपयोग संरक्षण कार्यात होतो. याद्वारे गुन्हयांचा तपास केला जातो. विद्यार्थ्याचे निकाल तयार केले जातात. विविध विषयांचा अभ्यासक्रम तयार करण्यात मदत होते. विमाने आणि रेल्वेत आरक्षण करता येते. संगणकाच्या मदतीने अनेक टेलिफोन लाईन्स एकमेकांना जोडल्या जातात. एखाद्या व्यक्तीच्या गैरहजेरीत फोनवर आलेला संदेश संगणक टाईप करून ठेवतो आणि फोन करणाऱ्याला ती व्यक्ती कधी उपलब्ध असू शकेल ते सांगतो ई-मेलची सोय पण संगणकावर उपलब्ध असते.



संगणकाचा उपयोग डिझाईन, ड्रॉईंगसाठी पण केला जातो. यामुळे चित्रपट उद्योगात क्रांती घडून आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही संगणकाचा उपयोग होतो. वाहतूक नियंत्रणासाठी संगणकाचा वापर केला जातो. वाहनांच्या येण्या जाण्यावर संगणकाच्या आदेशामुळे आपोआप नियंत्रण येते.


वाहनांची, प्रवाशांची संख्या संगणक सांगतो. मोटार वा अन्य वाहनात रेडियो संचार व्यवस्थेखेरीज एक मायक्रो संगणक असतो. आवश्यकतेनुसार तो अॅम्ब्युलन्स, अग्निशमनाची त्वरित मागणी करतो. रोबोट हा सुद्धा एक प्रकारचा संगणकच आहे. तो माणसाप्रमाणे कार्य करतो.



संगणकाचा दुरुपयोग पण केला जातो उदा. जुगार खेळणे, संगणकाच्या साह्याने कुणाचेही चित्र काढुन त्‍यात अनावश्‍यक असे बदल करने.  कधीकधी संगणक चुकाही करतो. काही जणांना अशी भीती वाटते की संगणक मानवी बुद्धीच्याही पुढे जाईल. परंतु संगणक हे एक निर्जीव यंत्र असल्यामुळे ही गोष्ट शक्य नाही. ही गोष्ट खरी की संगणक अत्यावश्यक यंत्र आहे ज्याचा विकास आपल्या सुखासाठी निरंतर केला जाऊ शकतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका  


संगणक मराठी निबंध 

निबंध 2

संस्कृती आणि सभ्यतेच्या विकासाबरोबरच मानवाने शास्त्रीय व तांत्रिक क्षेत्रात उन्नती केली. त्याने इलेक्ट्रॉनिक तांत्रिक शोध लावून मानवोपयोगी आधुनिक उपकरणे बनविली. संगणकाचा शोध मानवाच्या यशाचे एक अद्वितीय उदाहरण आहे. शोध कार्य व अन्य क्षेत्रातून संगणकाला काढून टाकला तर मानव शास्त्रीय प्रगती करू शकणार नाही. 


मागील काही वर्षांत संगणाकाचा विकास तीव्रतेने झाला आणि होत आहे. संगणक मानवाच्या सूचनेनुसारच कार्य करतो. टाईपरायटरप्रमाणेच संगणकात अक्षरांचे, अंकांचे, विरामचिन्हांचे संकेत असलेल्या बटण असतात. त्यांच्या साहाय्याने संगणकाला आदेश दिला जातो. संगणकात लिहिले गेलेले सर्व आकडे, साहित्य साठविले जाते आणि ते एकानंतर एक समोर येतात.


 संगणकात साठविलेल्या साहित्याचे आकडेवारीचे मुद्रण प्रिन्टरच्या सहाय्याने करता येते. आपल्या दैनिक जीवनात संगणकाचा उपयोग खूप वाढला आहे. त्याद्वारे अनेक कामे करवून घेतो. संगणकामुळे मोठमोठी व किचकट कामे, आकडेमोडी चुटकीसरशी होतात. संगणकाद्वारे गुन्हयाची तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांचे निकाल तयार केले जातात. लहान मुले संगणकावर खेळ खेळतात.


 विविध विषयांचे पाठ्यक्रम संगणकावर तयार होतात. रेल्वे आणि विमानाचे आरक्षण संगणकाच्या मदतीने करता येते. बँकांमध्ये पण संगणकाचा उपयोग वाढला आहे. बँकेतील संगणकात प्रत्येक ग्राहकाचे खाते व त्याचे पूर्ण विवरण साठविलेले असते. बँकेतील दैनंदिन देण्याघेण्याचे हिशेबही असतात. ग्राहकाला संगणकावर त्वरित आपल्या खात्याची माहिती मिळु  शकते.



भारतात शिक्षणाच्या प्रसार-प्रचारासाठी संगणकाचा उपयोग केला जातो. प्रामुख्याने दूर शिक्षण घेणाच्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होतो. चित्रपट उद्योगातही संगणकाच्या साहाय्याने दृश्यांचे चित्रण होते. वाहतुकीचे नियंत्रणही संगणकाच्या साहाय्याने केले जाते. आपात्कालीन बातम्यांचे प्रसारणही संगणक करतो. अलीकडे लोकप्रिय झालेल्या इंटरनेट सेवेअंतर्गत संगणक टेलिफोनच्या तारांद्वारे जोडले आहेत ज्यामुळे महत्त्वाचे संदेश क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.


संगणक आज मानवासाठी अति आवश्यक आणि महत्त्वपूर्ण यंत्र आहे ज्याचा उपयोग आपल्या गरजांनुसार सतत केला जात आहे. भविष्यात याचा उपयोग आणखी वाढतच जाणार आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

संगणक वर मराठी निबंध | Computer Essay In Marathi